Sunday, October 16, 2011

तर्कापलीकडची तेजी - १४

जानेवारी ते मार्च या काळात बाजारावर कोसळलेल्या अरिष्टांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे . अपेक्षेप्रमाणे या काळात विदेशी अर्थसंस्थांनी तुफानी विक्री केली. देशी अर्थसंस्थांनी पण याच काळात विक्रीचे धोरण अवलंबून विक्रीत भर टाकली
राजकीय आस्थरता, मध्य-पूर्वेतील अशांतता, क्रुडचे वाढते भाव, पंतप्रधांनांची ढासळती छबी आणि जपानमधील नैसर्गिक आपत्ती म्हणजे उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी. असे म्हणे म्हणेस्तो गेल्या आठवड्यात अचानक बाजारात तेजीचे वातावरण तयार झाले. आतापर्यंत उगवत्या बाजारपेठेतून (इमर्जिंग मार्केटमधून) पळ काढणार्‍या विदेशी वित्तसंस्थांनी अचानक घूमजाव करून खरेदीचा सपाटा लावला आहे असे दिसते. म्युच्युअल फंड मात्र या काळात तटस्थ राहिलेले दिसतात.सोबत दिलेला तक्ता पाहिल्यास नक्की कळेल की विदेशी वित्तसंस्थांनी २१ ते २५ मार्च या काळात अडीच हजार कोटींची खरेदी केली तर देशी संस्थांनी याच काळात दीड हजार कोटीची खरेदी केली. एक विचित्र योगायोग असा की जून २०१० ते डिसेंबर २०१० या काळात म्युच्युअल फंडांनी तुफानी विक्री केली (तेलाच्या वाढत्या भावासोबत) आणि देशीविदेशी संस्थांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. जानेवारी २०११ ते फेब्रुवारी २०११ या काळात विदेशी संस्थांनी १०,००० कोटींची विक्री केली तेव्हा म्युच्युअल फंडांनी देशी वित्तसंस्थांसोबत खरेदीचा सपाटा लावला होता, असे काय घडले असावे या आठवड्यात की ज्यामुळे या संस्थांना अचानक तेजीचा साक्षात्कार झाला आहे ?
संकटे अजून टळली नाहीत. क्रुडचा भाव आहे तेथेच आहे. लिबिया किंवा इतर तेल उत्पादन करणार्‍या देशांतील समस्या आहेत तेथेच आहेत. देशांतर्गत राजकारणाची गढूळता वाढत जात आहे . रिझर्व्ह बँकेला चलनवाढीला लगाम घालणे अजूनही जमले नाही . या पाठीमागे दोनच महत्त्वाची कारणे दिसत आहेत. (१) डेरीवेटिव्ह सेगमेंटमध्ये (कदाचित ) झालेल्या नुकसानीच्या पोझिशनची लिपापोटी करणे, एप्रिल आणि पुढच्या महिन्याच्या वायद्यात तेजी कायम ठेवणे.(२) या संस्थांकडे अशी काही राजकीय माहिती उपलब्ध असावी ज्यामुळे आगामी काळात काही क्रांतिकारी बदल घडणार आहेत. या दोन शक्यतांपैकी क्रमांक दोनची शक्यता खरी असण्याची शक्यता जास्त आहे. अशा वातावरणात गुंतवणूकदारांनी काय करावे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्‍न आहे. या समस्येचे उत्तर असे की, येत्या गुरुवारनंतर जर तेजीचा माहोल कायम राहिला तर हा तेजीचा नवा अध्याय आहे असे समजावे. जे गुंतवणूकदार महागडी खरेदी करून पस्तावले असतील त्यांना मुद्दल मोकळे करण्याची संधी या काळातच मिळेल.

तेजीच्या बाजारात तोतयांची गर्दी

गेल्या आठवड्यापासून बाजाराने तेजीचा जोर धरला आहे. या तेजीची कारणे आपण तपासून बघणार आहोतच पण तत्पूर्वी एक सावधगिरीची सूचना. बाजारात नवीन दाखल झालेल्या गुंतवणूकदारांना मोहात पाडणारे अनेक एसेमेस यायला आता सुरुवात होईल. अमुक शेअर तमुक भावात घ्या आणि अमुक -तमुक किमतीत विकून नफा कमवा. या संदेशाच्या आधारे देवघेव केल्यास काही वेळा नफा होतो. हा नफा झाला की दुसर्‍या दिवशीच्या एसेमेसची वाट गुंतवणूकदार आतुरतेने बघतो . नफ्याचा दुसरा दिवस भरतो.
नफा होणारच असतो. कारण बाजार तेजीत असेल तर दगड पण हवेत उडायला लागतात. यानंतर तिसर्‍या दिवशी फुकट आणि पौष्टिक एसेमेस संपून वार्षिक फी भरून करार करण्याची विनंती एसेमेसद्वारे केली जाते. रक्कम फारशी मोठी नसते .दोन दिवस नफा कमावणारा गुंतवणूकदार ताबडतोब रक्कम भरून मोकळा होतो. त्यानंतर येणार्‍या संदेशाची शाश्‍वती बाजाराच्या मूडवर असते. साधारण दोन ते तीन महिन्यानी संख्या रोडावत जाऊन संदेश बंद होतात अथवा नफ्याची शाश्‍वती कमी होत जाते. अशा प्रकारचा सल्ला देणार्‍या बर्‍याचशा कंपन्या सेबीकडे नोंदणीकृत नसतात. अशा प्रकारच्या कंपन्यांकडून टीप विकत घेणे आणि त्यावर शेअर बाजारात देवघेव करणे हे आजचा भाग्यांक वाचून आकडा खेळण्यासारखे आहे. जोपर्यंत सल्ला देणारा सेबीकडे असलेल्या नोंदणीची ग्वाही देत नाही तोपर्यंत किंवा सल्लागार प्रत्यक्ष भेटत नाही तोपर्यंत शुल्क भरून सल्ला घेऊ नये. प्रश्‍न शुल्क भरण्याचा नसून सल्ला घेतल्यानंतर भांडवलात नुकसान होते त्याचा आहे. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावतो हे खरे.

लव्हेबल नफा 
गेल्या आठवड्यात पीटीसी इंडिया फायनान्सिअल सर्व्हिसेस इंडियाचा आयपीओ बाजारात येऊन गेला. पॉवर ट्रेडिंग कॉर्पोरेशन या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीची ही वित्त कंपनी आहे. जाहिरात किंवा गाजावाजा न करता हा आयपीओ बाजारात आला त्यामुळे बर्‍याच गुंतवणूकदारांनी या आयपीओची हवी तशी दखल घेतली नाही. क्रिसिलने या इश्यूचे मानांकन ग्रेड ३/५ असे केले होते तर इक्रा आणि केअर या कंपन्यांनी हे मानांकन ग्रेड -४ असे केले होते. वित्त कंपन्यांमध्ये एक छोटी कंपनी आणि पुरेसा ट्रॅक रेकॉर्ड नसल्यामुळे क्रिसिलने ग्रेड ३/५ असे मानांकन केले होते.

या इश्यूचा भरणा हवा तसा झालेला नाही परंतु याच कारणामुळे नोंदणीच्या दिवशी गुंतवणूकदारांना अनपेक्षित लाभाची अपेक्षा ठेवण्यास हरकत नाही. याच आठवड्यात लव्हेबल लिंगरीची नोंदणी बाजारात झाली आणि अपेक्षेप्रमाणे गुंतवणूकदारांना भरपूर नफा झाला. साधारण वीस दिवसांच्या गुंतवणुकीनंतर भांडवलावर २० ते २३ टक्क्यांचा नफा पदरात पडला. एकूण उलाढाल ६९ लाख शेअर्सची झाली. उलाढालीचा आकडा हेच दर्शवतो आहे की आणखी काही दिवस या समभागात सट्टा चालू राहण्याची शक्यता आहे. यासोबत आणखी एक कंपनी -ऍक्रोपेटल टेक्नॉलाजीजची नोंदणी या आठवड्यात झाली.उलाढाल मोठ्या प्रमाणात झाली तरी या समभागाचा भाव नोंदणीनंतर १५६ रुपयांवरून ६९ रुपयांपर्यंत घसरला. सध्या तरी या समभागाकडे दुर्लक्ष करावे हे योग्य ठरेल.
- रामदास

(लेखक गुंतवणूक प्रशिक्षक आहेत.)
 saujanya:- fulora, samana.

No comments: