Sunday, October 16, 2011

वेरावली जलबोगद्याचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज लोकार्पण


वेरावली जलाशय ते यारी रस्ता हा सहा किलोमीटर लांबीचा जलबोगदा पूर्ण झाला असून यामुळे अंधेरी-जोगेश्‍वरीकरांचा पाणीप्रश्‍न कायमचा सुटला असून लोखंडवाला, मिल्लतनगर, जे. पी. रोड, वीरा देसाई रोड, चार बंगला, बेहरामबाग, यारी रोड या भागातील नागरिकांना शनिवारपासून मुबलक पाणीपुरवठा होणार आहे. या जलबोगद्याचे शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता लोकार्पण होणार आहे.
हा सोहळा सिटी मॉलमागे, कमलाकरपंत वालावलकर मार्ग, अंधेरी (प.) येथे पार पडणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महापौर श्रद्धा जाधव भूषविणार आहेत. याप्रसंगी महापालिका सभागृहनेते सुनील प्रभू, स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे, भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे, उपमहापौर शैलजा गिरकर, आयुक्त सुबोध कुमार आदी उपस्थित राहणार आहेत.
पाणीपुरवठ्याची वेळ
यानुसार लोखंडवाला विभाग, मिल्लत नगर, जे. पी. रोड, वीरा देसाई रोड, चार बंगला (काही भाग), बेहरामबाग या ठिकाणी सकाळी ११.०० ते दुपारी ४ वाजेपर्यंत; यारी रोड, चार बंगला (काही भाग) या ठिकाणी रात्री ८ ते १२ वाजेपर्यंत पाणीपुरवठा होणार आहे.
आणखी जलबोगदे
मरोशी ते रूपारेल कॉलेज १० किमी, मोडकसागर बेलनगर ते इगतपुरी ७.५ किमी, गुंदवली ते भांडुप संकुल ८ किमी, मलबार हिल ते क्रॉस मैदान ४.५ किमी अशी जलबोगद्याची कामे टप्प्या टप्प्याने पूर्ण होणार आहेत. या जलबोगद्यांमुळे फोर्ट, गिरगाव, ताडदेव तसेच पूर्व उपनगरवासीयांच्या पाणीपुरवठ्यात वाढ होणार आहे.
जलबोगद्यांचे फायदे
ह बोगद्यांमुळे पाणीगळती थांबणार
ह दूषित पाणीपुरवठ्यावर नियंत्रण
ह देखभाल खर्च घटणार
ह लोकसंख्यावाढीनुसार जादा पाणी वाहण्याची क्षमता
ह जलवाहिनीवर दहशतवादी हल्ल्याचा धोका टळेल


सौजन्य:- सामना ०७१०२०११. 

‘वचनाला जागणारी माणसे’ असा लौकिक असल्यामुळेच गेली १५ वर्षे मुंबई महापालिकेत शिवसेना व भाजप युतीची सत्ता आहे. निवडणुका आल्या म्हणून आम्ही चांगली कामे करत आहोत असे कधीच झालेले नाही. आम्ही याआधीही लोकोपयोगी कामे केलेली आहेत आणि यापुढेही करत राहणार आहोत. मुंबईचा विकास हाच आमचा ध्यास आहे, असे शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले.
अंधेरी-जोगेश्‍वरी परिसराला पाणी पुरवणार्‍या आदर्शनगर ते यारी मार्ग अशा भूमिगत वेरावली टेकडी जलाशयाचे लोकार्पण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ‘मुंबई दिवसेंदिवस वाढत आहे. महापालिकेची सत्ता सांभाळताना आमच्याकडे अधिकार कमी आहेत, मात्र जबाबदारी जास्त! अधिकारी कोण असावेत हे आम्हाला ठरवता येत नाहीत. राज्य सरकारने मुंबईकडे कायम दुर्लक्ष केले आहे, पण आम्ही कायम मुंबईकरांचे प्रश्‍न सोडवण्याचा नेटाने प्रयत्न केलाय. सव्वा ते दीड कोटी लोकसंख्येच्या या शहराला देण्यासाठी फक्त निम्म्याने सुविधा आहेत पण तरीही दुप्पट लोकसंख्येला त्या पुरवण्यासाठी युती जीवाचे रान करत आहे.’
पाण्याचा प्रश्‍न सोडवतानाच पावसामुळे मुंबई जलमय होणार नाही याचीही काळजी ठिकठिकाणी पंपिंग स्टेशन बसवून घेतली जात जात आहे. देशाच्या कुठल्याही महापालिकेत झाली नसतील इतकी विकासकामे मुंबई महापालिकेत होत आहेत. याचमुळे आगामी निवडणुकीतही जनता आमच्यावर विश्‍वास दाखवील’ असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
महापौर श्र्रद्धा जाधव, अतिरिक्त आयुक्त राजीव जलोटा यांनीही मुंबई विकासकामांची माहिती दिली. याप्रसंगी उपमहापौर शैलजा गिरकर, विभागप्रमुख ऍड. अनिल परब, आमदार रवींद्र वायकर, स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे, सभागृह नेते सुनील प्रभू, स्थानिक नगरसेवक यशोधर फणसे, संगीतकार अनिल मोहिले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
धो धो मते युतीला मिळतील!
‘शिवसेनाप्रमुखांच्या आदेशानुसार महापालिकेत विकासाची कामे जोरात सुरू आहेत. अंधेरीकरांसाठी पिण्याचे पाणी व ट्रॅफिक हे दोन महत्त्वाचे प्रश्‍न होते. त्यापैकी महापालिका म्हणून पाण्याचा प्रश्‍न सोडवत आमची जबाबदारी आम्ही चोख बजावली आहे. पण राज्य सरकारकडे टॅ्रफिकचा प्रश्‍न सोडवण्यासाठी काहीच यंत्रणा नाही. विविध जलबोगद्यांप्रमाणे डबल फोर्सने मुंबईकरांना पाणी मिळणार आहे आणि त्याच गतीने धो धो मते युतीला मिळतील’, असा विश्‍वास यावेळी भाजप प्रदेश सरचिटणीस व आमदार विनोद तावडे यांनी व्यक्त केला.
पाण्याची तूट भरून काढणार
मुंबईला रोज पाण्याची गरज ४२०० एमएलडीची, पण पाणी मिळते ३४०० एमएलडी. सध्या ८०० एमएलडीची तूट असून ती भरून काढण्यासाठी जलबोगदे तसेच इतर पर्याय शोधून काढले जात आहेत. २०३१ पर्यंत मुंबईची लोकसंख्या गृहीत धरून नवीन प्रकल्प टप्प्याटप्प्याने आखले जातील. मध्य वैतरणा धरणाचे पाणी जून २०१२ पासून मिळायला सुरुवात होईल आणि ४५५ एमएलडीचा पाणीसाठा उपलब्ध होईल. गारगाई, पिंजळा धरणे तसेच धामणगंगा नदी प्रकल्प अशा प्रकल्पातूनही २५०० एमएलडी पाणी मिळवता येईल. असे अतिरिक्त आयुक्त राजीव जलोटा यांनी यावेळी सांगितले.


सौजन्य:- सामना ०८१०२०११. 

No comments: