आयटी कंपनीचे शेअर घ्यावेत की औषध कंपनीचे? आता योग्य भावात आहेत की थोडे थांबावे असा विचार करता करता उत्तर मिळाले नाही की, गुंतवणूकदार अल्प मुदतीच्या ठेवीत पैसे टाकून निर्णय लांबणीवर टाकतात.
बर्याच वेळा असे होते की हातात अचानक एकरकमी पैसे येतात. उदाहरणार्थ सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनंतर सरकारी नोकरीत असलेल्यांना पगाराची थकबाकी मिळाली. अशावेळी समभागात गुंतवणूक करण्यास बरेचजण उत्सुक असतात. पण नक्की काय खरेदी करावी हा संभ्रम असतो. आयटी कंपनीचे शेअर घ्यावे की औषध कंपनीचे? आता योग्य भावात आहेत की थोडे थांबावे असा विचार करता करता उत्तर मिळाले नाही की गुंतवणूकदार अल्पमुदतीच्या ठेवीत पैसे टाकून निर्णय लांबणीवर टाकतात. या प्रकारची गुंतवणूक करताना महत्त्वाचा मुद्दा पैसे सुखरूप ठेवणे. म्हणजे या पोतडीतले समभाग ऑल वेदर प्रूफ असे असावेत. ठरावीक काळानंतर त्यात वाढ झालेली दिसली पाहिजे. वेळ पडल्यास विक्री करून पैसे सहजतेने हातात यावे. अशी मम सुखाची ठेव बनवताना कोणती कंपनी, हा विचार करण्यापूर्वी गुंतवणूक कोणत्या क्षेत्रात करावी हा विचार आधी करावा लागतो किंवा पैसे कुठे गुंतवू नयेत याचा विचार जर केला तर काम अधिक सोपे होते. कंपनीची निवड त्यानंतर करता येते. लांब पल्ल्याचा विचार करताना चार ‘पी’ टाळावेत आणि एक ‘पी’ अवश्य घ्यावा. टाळण्याचे ‘पी’ म्हणजे अशी चार क्षेत्रं ज्यात गुंतवणूक करू नये. पहिला पी -प्लास्टीक. दुसरा पी -पेपर, तिसरा पी-प्लायवूड, चौथा पी- पेस्टिसाईड. टाळण्याचे कारण एकच आहे की यातल्या सगळ्याच कंपन्यांना पर्यावरणाच्या अत्यंत कडक अशा निर्बंधांना येत्या काळात सामोरे जायला लागणार आहे. कीटकनाशक द्रव्यांना बायोलॉजिकली मॉडिफाईड किंवा जेनेटीकली मॉडिफाईड बियाणे हा पर्याय उपलब्ध होणार आहे. पेपरवर अवलंबून असणारे जग आता पेपरलेस होणार आहे. पेपर आणि प्लायवुड या दोन्ही क्षेत्रांना जंगलतोडीचे कडक निर्बंध पाळावे लागणार आहेत. प्लास्टिकच्या उत्पादनात निर्माण होणारी जीवघातक द्रव्ये ही एक मोठी समस्या आहे. अर्थात या क्षेत्रातील सरसकट सगळ्या कंपन्या टाळाव्यात असे नाही, परंतु गुंतवणुकीत धोका दिसत असताना मुद्दाम त्या क्षेत्रात पैसे गुंतवा कशाला? म्हणजे याचा अर्थ असा की, पर्यावरण पूरक उत्पादने करणार्या क्षेत्रात पैसे टाकायला हरकत नाही. आता घ्यावा असा पी म्हणजे पॉवरचा. पॉवर आणि एनर्जी -ऊर्जेचे दुर्भिक्ष कायम राहणार आहे. ऊर्जेची गरज वाढत जाणार आहे आणि ऊर्जा दिवसेंदिवस महाग होत जाणार आहे. त्यामुळे ऊर्जा क्षेत्रातील चांगल्या कंपनीत पैसे गुंतवणे शहाणपणाचे होईल. त्यासोबत ऊर्जानिर्मितीच्या पूरक उद्योगांना कायम मागणी राहील. सोबत ऊर्जा वाचवणार्यांना उत्पादनांच्या किंवा पर्यायी ऊर्जेचे उत्पादन व्यापारी तत्त्वावर करणार्या कंपन्यांना चांगले दिवस येतील. येथे व्यापारी तत्त्वावर हा महत्त्वाचा शब्द आहे, कारण सौर ऊर्जेचे व्यापारीकरण अजून तरी सुलभ झालेले नाही.
मुद्दा क्रमांक १ - दीर्घ मुदतीसाठी ऊर्जा क्षेत्रातील चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करावी. आता विचार करूया एका अमर उद्योग क्षेत्राची. ते क्षेत्र म्हणजे धातू आणि धातू उद्योगाचे. काही अब्ज वर्षांपूर्वी जेव्हा पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा धातूंचे साठे निर्माण करून ईश्वराने आपला निरोप घेतला. त्यामुळे या साठ्यात वाढ होणार नाही . जेवढे साठे उपलब्ध आहेत त्यावर उद्योगांची मदार असेल. कदाचित एका धातूची जागा दुसरा धातू घेईल, पण धातूंशिवाय काम चालणार नाही. उदाहरणार्थ तांब्याची जागा विद्युत वितरणात ऍल्युमिनीयम घेऊ शकेल. जग पेपरलेस होऊ शकेल, पण मेटललेस होणे कठीण आहे. त्यामुळे लोखंड -तांबे -शिसे -निकेल किंवा इतर कोणताही धातू वापरात असला तरी दुर्भिक्ष कायम राहणार आहे. भाव सतत वाढत जाणार आहेत. येथे आपण प्रेशिअस मेटल म्हणजे सोन्या-चांदीचा विचार करत नाही. त्या धातूंची दुनिया वेगळीच आहे. आपण विचार करतो आहे रोजच्या कामात येणार्या धातूंचा. उपयुक्ततेत लोखंड आणि पोलाद आघाडीवर आहे. तांबे आणि इतर धातू कमतरतेमुळे महाग होणार आहेत. त्यामुळे धातू आणि धातूकाम करणार्या कंपन्यांचे समभाग नेहमीच तेजीत राहतील.
मुद्दा क्रमांक २- दीर्घ मुदतीसाठी पोलाद निर्मिती करणार्या कंपनीचे समभाग घ्यावेत. सोबत नॉन फेरस मेटल (तांबे-शिसे) उत्पादन करणार्या कंपनीचे समभाग घ्यावेत. याखेरीज पुढच्या भागात अभ्यास करू अन्न, अन्न-प्रक्रिया आणि औषध कंपन्यांचा.
आजचा गृहपाठ : ऊर्जा आणि धातू क्षेत्रातील कंपन्यांची यादी वाचून त्यांचा अभ्यास करा.
बनी तो बनी...
बनी तो बनी, नही तो...हा वाक्प्रचार मुंबईत बर्याच वेळा वापरला जातो. शेअर बाजारात याच विचारांनी गुंतवणूक करणारे काही गुंतवणूकदार असतात. यांना गुंतवणूकदार म्हणावे की ‘फंटर’ म्हणावे हा प्रश्नच आहे, परंतु असे गुंतवणूकदार असतात हे मात्र खरे आहे. त्यांची प्रोफाईल फार गमतीदार असते. समभाग घेऊन त्यावर नफा करणे हा त्यांच्या दृष्टीने गेम ऑफ चान्स असतो. त्यांचा भरवसा अभ्यासापेक्षा खबरीवर असतो. खबर खरी ठरली तर फायदा. नाही तर पुढची खेळी करण्याइतपत भांडवल खिशात असले की झाले. केवळ अशा ‘बनी तो बनी, नही तो अब्दुल गनी’ कॅटेगिरीसाठी काही समभाग मी सुचवतो आहे.
समभाग क्रमांक एक : हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी. (एचसीसी) लवासातल्या सहभागामुळे या कंपनीचे समभाग सपाटून मार खाऊन आता छत्तीस -सदतीसच्या पातळीवर आहेत. जे काही वाईट होऊ शकते ते झालेले आहे. आता पुढे काही झाले तर चांगलेच होणार आहे. या विचारांनी बनी तो बनी त्यात पैसे टाकीत आहेत.
समभाग क्रमांक दोन : डेल्टा कॉर्प लिमिटेड. हिंदुस्थानातली एकमेव कॅसिनो कंपनी. दक्षिण आफ्रिकेत मोठ्या प्रमाणात जमीन घेऊन हॉटेल -व्यापारी शेती करण्याचा कंपनीचा मनोदय आहे. अंबानींनी या कंपनीत पैसे टाकल्याची खबर बाजारात आल्यावर या समभागाचा भाव वधारून एकशे चाळीसवर गेला. कॅसिनोवर बंदी आली तर खाली पंचाहत्तरपर्यंत आला. खबरी भाईंचा आवडता समभाग.
समभाग क्रमांक तीन : प्रदीप मेटल. छोटे भागभांडवल असणारी ही कंपनी गाड्यांचे फोर्जड् भाग बनवते. गेल्या महिन्यात अचानक काऊंटर जोर से चलेगा अशी आवई आली आणि भाव वाढत गेले. जर तुम्ही या बनी तो बनी कॅटेगरीत असाल तर टाका या समभागात आपले पैसे...
* ‘फंटर’ हा शब्द इंग्रजीतील पंटर या शब्दाचा अपभ्रंश आहे. जो पैशांची पैज लावतो तो पंटर.
- रामदास
(लेखक गुंतवणूक प्रशिक्षक आहेत.)
No comments:
Post a Comment