Sunday, October 16, 2011

‘पॉटहोल ट्रॅकिंग सिस्टम’ पुढील आठवड्यापासून - फोटो पाठवा, खड्डे बुजवा!

मुंबईच्या रस्त्यांवर एकही खड्डा राहू नये यासाठी महापालिकेने कंबर कसली असून आता नागरिकांना ‘पॉटहोल ट्रॅकिंग सिस्टम’द्वारे खड्ड्यांची तक्रार पाठविणे सहज शक्य होणार आहे. ही प्रणाली पुढील आठवड्यापासून कार्यरत होत असून याद्वारे नागरिकांना आपल्या विभागात खड्डा आढल्यास त्याचा फोटो काढून तो थेट महापालिकेला पाठविता येणार आहे. या तक्रारीची दखल तातडीने घेऊन त्या त्या विभागातील खड्डे बुजवून रस्ते चकाचक करण्याचा उपक्रम महापालिका राबविणार आहे.
‘पॉटहोल ट्रॅकिंग सिस्टम’चे सॉफ्टवेअर महापालिकेच्या वेबासाइटवरून नागरिकांना आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करायचे आहे. हे सॉफ्टवेअर मोबाईलवर असल्यास कुठेही फिरताना आपल्याला खड्डा आढळल्यास त्याचा फोटो आणि ठिकाण नोंदवून तक्रार सेंड करायची. तत्काळ संबंधित अधिकारी, वॉर्ड ऑफिस तसेच महापालिकेच्या वेबसाइटवर ही तक्रार जाते. संबंधित अधिकार्‍यांनी यावर कोणती कारवाई केली याचा तपशील वारंवार संबंधित तक्रारदार नागरिकांना मिळणार आहे. कामात दिरंगाई करणार्‍या अधिकार्‍यांना यामुळे दंडही होऊ शकतो. या नवीन प्रणालीमुळे नागरिकांच्या हाती तंत्रज्ञानाचे अनोखे हत्यार लाभणार आहे. पुढील आठवड्यापासून हे सॉफ्टवेअर प्रत्यक्ष कार्यान्वित होईल, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी दिली.


सौजन्य:- सामना १११०२०११.

No comments: