Sunday, October 16, 2011

नवे वर्ष, नवे आराखडे - १५

ज्या गुंतवणूकदारांना इंटरनेट वापरण्याची सवय आहे. त्यांना फार सोपी सुविधा आहे ‘गुगल ऍलर्ट’ची. हा काय प्रकार आहे ते समजून घेण्यासाठी आधी त्याची आवश्यकता समजून घेऊया.



चलन फुगवट्याचा किंवा इन्फ्लेशनचा धोका अजून टळलेला नाही. ही समस्या सध्यातरी थोडी दबली आहे असे समजूया. ही समस्या मलेरियाच्या तापासारखी आहे. ताप गेला म्हणजे रोग संपला असे नाही. येत्या काही दिवसांत रिझर्व बँक पुन्हा एकदा व्याजाचे दर वाढवण्याची शक्यता आहे. जर व्यापारी बँकांनी या वाढीव दराची झळ सोसली तर विकासाचा दर वाढण्याची शक्यता आहे. तसे झाले नाही तर ज्या कंपन्यांचे लोन/इक्विटी हे गुणोत्तर मोठे आहे. त्यांना व्याजाचा अधिक भार यावर्षी सोसावा लागेल. हे गुणोत्तर जेवढे शून्याच्या जवळ असेल तेवढा कंपनीवर व्याजाचा भाव कमी. गुंतवणूक करताना मनीकंट्रोलसारख्या संस्थळावर हे आकडे तयार मिळतात, त्याचा वापर करायला हरकत नाही.
आर्थिक वर्षासाठी काही गुंतवणुकीचे प्रस्ताव
* आंतरराष्ट्रीय कारभार करणार्‍या लार्ज कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करा.

* वर्षानुवर्षे सतत लाभांश देणार्‍या कंपन्यांची यादी तयार करून त्यातील काही कंपन्यांमध्ये पैसे गुंतवा.

* मंदी अथवा तेजी, मौसम कसाही असला तरी सॉफ्टवेअर कंपन्यांशिवाय जग पुढे जाणार नाही. इन्फोसीस्-टीसीएस या कंपन्यात गुंतवणूक करण्यासाठी तज्ज्ञ सल्ल्याची आवश्यकता नाही. परंतु या कंपन्यांसोबत बर्‍याचशा अशा सोफ्टवेअर कंपन्या आहेत.

ज्या विशिष्ट क्षेत्रात जम बसवून आहेत अशा कंपन्यांची खरेदी स्वस्तात पडते. उदाहरणार्थ- काले कन्सल्टंट्स.

* मर्जर / ऍक्विजिशनची शक्यता आहे अशा कंपन्यांचे समभाग खरेदी करा .

* पुढच्या पाच-सहा वर्षात बँकिंग क्षेत्रात मोठी तेजी येणार आहे. कदाचित कुठल्याच बँकेचा समभाग पाचशे रुपयांपेक्षा कमी किमतीत नसेल (हे थोडे धाडसी विधान आहे, पण लेखक या विधानाची जबाबदारी घ्यायला तयार आहे). सरकारी बँकांच्या समभागात किंवा खाजगी बँकांपैकी ऍक्सिस किंवा एचडीएफसी बॅकेत गुंतवणूक करा.

या पाचही प्रस्तावांचा जोड प्रस्ताव असा आहे की, शक्यतो अशाच कंपन्यांमध्ये पैसे गुंतवा की ज्यांच्या समभागात फ्युचर आणि ऑप्शनची सुविधा आहे.

निवडीनंतरची आगेकूच

समभागाची निवड केली. खरेदी केली. त्यानंतर महत्त्वाचा भाग असतो त्या गुंतवणुकीवर गस्त घालण्याचा. यासाठी ज्या गुंतवणूकदारांना इंटरनेट वापरण्याची सवय आहे. त्यांना फार सोपी सुविधा आहे ‘गुगल ऍलर्ट’ची. हा काय प्रकार आहे ते समजून घेण्यासाठी आधी त्याची आवश्यकता समजून घेऊया. समजा तुम्ही सेसा गोवा या कंपनीचे समभाग खरेदी केले. या कंपनीचा व्यवसाय आहे लोखंडाचे खनिज निर्यात करण्याचा. आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जर या खनिजाचा भाव वाढला तर कंपनीचा नफा वाढेल. जर नफा वाढला तर भाव वाढेल. भाव वाढला तर तुम्हाला समभाग विकून बाहेर पडता येईल. मग काय करायचे? सोपे आहे. कंपनीचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायाच्या संस्थळांना भेट द्यायची. लोखंडाच्या खनिजाचे रोजचे भाव यू मेटल या संस्थळावर मिळतील. फक्त भावच नाही तर त्या खनिजाची सध्याची मागणी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील भाव - खनिजाचा दर्जा - ज्या बाजारपेठेत उतरणार आहे त्या बंदरांची नावे - सगळी माहिती एकाच वेळी. ही माहिती वापरून कंपनीच्या नफ्याचा अडाणी अंदाज बांधता आला तरी कमाई करायला पुरेसे आहे.

हे एक उदाहरण झाले. दुसरे उदाहरण बघा, मर्जर आणि ऍक्विझिशनचे. या सगळ्या बातम्या ज्या त्या व्यवसायाच्या संस्थळांवर मिळतात. दोन वर्षांपूर्वी डुफार-इंटरफ्रान या कंपनीचे ऍबट कंपनीत विलयन झाले. या विलयनाची बातमी ज्या गुंतवणूकदारांना इतरांपेक्षा आधी मिळाली त्यांची गुंतवणूक एका महिन्यात दुप्पट झाली. जे गुंतवणूकदार औषध कंपन्यांच्या संस्थळांच्या सतत संपर्कात होते त्यांना ही बातमी इतरांपेक्षा आधी मिळाली. पण हे वाटते तसे सोपे नाही. समजा तुमची गुंतवणूक वेगवेगळ्या बारा-चौदा क्षेत्रांत असली तर सर्वसामान्यपणे एका माणसाला मिळणार्‍या फावल्या वेळात हे काम करणे फार कठीण आहे. म्हणून गुगल ऍलर्टची सुविधा ज्यांना वापरता येते त्यांचा वेळ वाचतो. हे कसे करायचे? फार सोपे आहे. समजा तुमची गुंतवणूक सिमेंट-बँक- धातू- खाद्य पदार्थ -पोलाद अशा वेगवेगळ्या पाच क्षेत्रांत आहे आणि दहा कंपन्यांमध्ये आहे. गुगल या संस्थळाला भेट द्या. डाव्या बाजूला मेनू आहे तेथे इव्हन मोअरवर क्लिक करा. ऍलर्टची खूण दिसेल. त्यावर क्लिक करून तुमचे कार्यक्षेत्र आणि कंपनी यांचे ऍलर्ट तयार करा. पुढच्या तासापासून त्या क्षेत्रात काय घडामोडी होत आहेत याची ढीगभर माहिती विरोपाद्वारे (ई-मेल) रोज तुमच्या इन बॉक्समध्ये येऊन पडेल. आता एकच काम आहे ते म्हणजे विरोप वाचणे, आवश्यक त्या उपयुक्त माहितीचा उपयोग करणे. एका क्षेत्रासाठी पंधरा मिनिटे या हिशोबाने पाच क्षेत्रांसाठी सवा तास गुंतवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी हा वेळ पुरेसा आणि आवश्यक आहे. या कार्यक्रमात काही अडचण आल्यास विरोपाद्वारे संपर्क करावा आणि माहिती मिळवावी.

SAUJANYA:- FULORA, SAMANA
- रामदास (लेखक गुंतवणूक प्रशिक्षक आहेत.)
shreemant2011@gmail.com

No comments: