Sunday, October 16, 2011

ही घ्या जमीन, द्या गिरणी कामगारांना घरे - शिवसेनेने दाखविला मुख्यमंत्र्यांना मार्ग



गिरणी कामगारांना मोफत घरे देण्यासाठी मुंबईत जमीन आणि पुरेसा पैसा नसल्याची बतावणी करणार्‍या आघाडी सरकारच्या सर्व पळवाटा शिवसेनेने बंद करून टाकल्या आहेत. १ लाख गिरणी कामगारांच्या घरांसाठी २०० एकर जमीन आणि त्यासाठी १० हजार कोटी कसे उभारता येतील याची माहिती देणारी ‘चातकांचे वारसदार’ ही मार्गदर्शक पुस्तिका शिवसेनेने तयार केली आहे. शिवसेना विधिमंडळ पक्षनेते सुभाष देसाई व विधान परिषद गटनेते दिवाकर रावते यांनी आज ही पुस्तिका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना देत ‘ही घ्या जमीन आणि द्या घरे’ असे आव्हानच सरकारला दिले.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गिरणी कामगारांना मोफत घरे मिळवून देणारच अशी ग्वाही दिली. त्याच वेळी शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी गिरणी कामगारांना मोफत घरे कशी देता येतील याबाबतची ‘चातकांचे वारसदार’ ही पुस्तिका शिवसेनाप्रमुखांना दिला होती. उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार सुभाष देसाई आणि दिवाकर रावते यांनी आज सायंकाळी विधान भवनात मुख्यमंत्र्यांना ही पुस्तिका देताना गिरणी कामगारांना मोफत घरे कशी देता येतील हे समजावून सांगितले. कामगारांच्या घरांसाठी १९८ एकर जमीन कशी उपलब्ध करता येईल, किंबहुना ही जमीन उपलब्ध आहे याची आकडेवारी देसाई-रावते यांनी दाखवून दिली.
- चार्ल्स कोरिया कमिटाच्यो अहवालानुसार एनटीसीची १३३ एकर जमीन मिळू शकते
- १०८५ हेक्टर जमीन यूएलसी कायद्यांतर्गत विविध कारखानदारांकडे पडून आहे.
- यूएलसीची २००० हेक्टर जमीन शासनाच्या हातात होती त्यापैकी ५० हेक्टर जमीन वेगवेगळ्या सोसायट्यांना दिली होती. ५० हेक्टर जमिनीवर आरक्षण होते. ८५ हेक्टर जमीन अतिक्रमित आहे ती म्हाडाकडे पडून आहे. त्यावर २५ हजार गिरणी कामगारांना घरे देऊ शकतात.
- बोरिवलीच्या खटाव मिलची ३४ एकर जागा
- सिम्प्लेक्सची भाडेपट्टी संपलेली अर्धा एकर जागा, मफतलालची ७ एकर जागा, बॉम्बे डाइंगची प्रभादेवीतील २० एकर जागा तर मालवणी-मालाड येथील २२ एकर जमीन
- गिरणीमालकांना टीडीआर दिला. त्यातून सुमारे ४ हजार कोटी उभे राहू शकतात.
- गिरणी कामगार घरांची चातकासारखी वाट पाहत असल्याने ‘चातकांचे वारसदार’ हे नाव पुस्तिकेला दिले आहे.


सौजन्य:- सामना १३१०२०११. 

No comments: