Sunday, October 16, 2011

अर्थसंकल्पाची फलश्रुती - १२

सालाबादप्रमाणे यंदाचाही अर्थसंकल्प आला. चलन फुगवटा- अन्नधान्याची महागाई यासारख्या खोल घावांवर थोडी मलमपट्टी झाली. शून्यातून शून्य वजा झाले. बाकी उण्यात आली. या अर्थसंकल्पाची मोठी उठाठेव करण्यासाठी आपण अर्थशास्त्री नाही पण बाजारावर किंवा काही विशिष्ट कंपन्यांवर त्याचा काय परिणाम होईल यावर फक्त लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे.


चलनवाढ आणि इतर आर्थिक समस्यांवर या संकल्पात जे औषध अर्थमंत्र्यांनी दिले आहे ते औषध रक्तात विरघळायला सहा महिने तरी लागतील असा अंदाज आहे त्यामुळे ताबडतोब बाजाराचा कायापालट होणार नाही. सुरुवातीचे काही महिने कळ सोसायची तयारी असलेल्या गुंतवणूकदारांना उरलेल्या वर्षात सुखद बदल होताना दिसतील. या अर्थसंकल्पात पहिल्यांदाच अन्नाची शाश्वती (फूड सिक्युरिटी ) या कल्पनेचा पाठपुरवठा करण्याचे अर्थमंत्र्यांनी सूतोवाच केले आहे. सूतोवाच म्हणण्याचे कारण असे की प्रत्यक्ष अर्थसंकल्पात यासाठी वेगळी तरतूद नाही. पण अन्नशाश्वतीचा लोकसभेत प्रस्ताव आणून त्याचा पाठपुरावा केला तर अन्न-अन्न पुरवठा-खते-कीटकनाशके या क्षेत्रातील कंपन्यांना चांगले दिवस येतील. या वर्षभरात शेतकी-अर्थतज्ज्ञ काय म्हणत आहेत यावर लक्ष देणे गुंतवणूकदारांच्या हिताचे राहील. दुसरा महत्त्वाचा प्रस्ताव या अर्थ संकल्पात आहे तो परकीय नागरिकांना म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची परवानगी देण्याचा. आतापर्यंत फक्त सेबीकडे नोंदणीकृत विदेशी वित्तसंस्थांना म्युच्युअल फंडात गुंतवणुकीची परवानगी होती.यानंतर केवायसी कायद्याचे पालन करणार्‍या विदेशी नागरिकांना ही परवानगी मिळणार आहे .इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणार्‍यांना याचा फायदा होईल. या अर्थसंकल्पाचा विशेष फायदा होणार आहे पायाभूत सिुवधा पुरवणार्‍या कंपन्यांना. (इन्फ्रास्ट्रक्चर)या कंपन्यांमध्ये दीर्घ मुदतीची गुंतवणूक येत्या वर्षभरात भरभरून फळे देईल असा बाजाराचा होरा आहे. गेल्या काही वर्षांत इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांचे पेव फुटले होते तेव्हापासून अनेक कंपन्या बाजारात आल्या. यापैकी निवडक चांगल्या कंपन्यांमध्येच गुंतवणूक करावी.
काही क्षेत्रांना मात्र या अर्थसंकल्पात सापत्न वागणूक देण्यात आली .त्यापैकी एक म्हणजे सिमेंट उत्पादनाचे. सिमेंट कंपन्यांना हे वर्ष कठीण जाणार आहे .या उद्योगात वाढीव उत्पादन असल्यामुळे दरवाढ करता येत नाही.त्यात भरीस भर म्हणजे कच्च्या मालाचे वाढत जाणारे भाव . कोल इंडियानी कोळशाचे दर ३० टक्क्यांनी वाढवले.सिमेंट उद्योगाला अर्ध्याहून अधिक कोळसा देशी कंपनीकडून येतो. जीप्समवर सरकारनी कर कमी केले आहेत पण जीप्समचे एकूण लागणार्‍या मालातले प्रमाण फार कमी म्हणजे तीन-चार टक्केच आहे. पेट कोकवर (कोळशाचा एक प्रकार) आयात कर पाच टक्क्यांवरून अडीच टक्क्यांवर आला आहे पण पेट कोक वापरणार्‍या कंपन्यांची संख्या फार कमी आहे. पायाभूत सुविधा आणि गृहनिर्माण क्षेत्रातून मागणी मंदावलेली आहे. अशाप्रकारे चारी दिशांनी कोंडी झाली असतानाच या नवीन अर्थसंकल्पात सिमेंट उद्योगावर आणखी कर लादल्यामुळे नफ्याचे गणित डळमळीत झाले आहे. एसीसी, गुजरात अंबुजा, अल्ट्राटेक, श्री सिमेंट, इंडिया सिमेंट या सगळ्या कंपन्यांना नवीन वर्षात अपेक्षेपेक्षा कमी नफा होणार आहे. वेळोवेळी वाढणार्‍या बाजाराचा फायदा घेऊन हे शेअर विकण्यास हरकत नाही. मे-जून महिन्याच्या दरम्यान सिमेंटची मागणी वाढली की पुन्हा एकदा खरेदी करायला हरकत नाही.
अर्थसंकल्पाचे समालोचन करणारे अनेक कंपन्यांचे अहवाल सध्या उपलब्ध आहेत. जिज्ञासूंनी ते वाचायला हरकत नाही पण जोपर्यंत आर्थिक समतोलाच्या गणिताचा ताळा लागत नाही तोपर्यंत येणारी तेजी ही अल्पजीवी असेल हे ध्यानात ठेवून खरेदी-विक्री करावी

काही अनुभवसिद्ध तोडगे

शेअर बाजारात बरीच वर्षे घालवल्यावर काही गुंतवणूकदार स्वत:ची अशी काही तंत्रे विकसित करतात की ज्याला शास्त्रीय असे कारण शोधू बघता मिळत नाही परंतु या क्लृप्त्या नफा मात्र मिळवून देतात.त्यापैकी एक म्हणजे सार्वजनिक रजेचा फायदा घेणे. बाजार शनिवार -रविवार असा बंद असतो.याला लागून जर एखादी रजा आली तर हा मध्यांतर तीन दिवसांचा होतो.काही चतुर खेळाडू ही रजा सुरू होण्याच्या आदल्या दिवशी दुपारी बारानंतर आणि दोन वाजण्याच्या आधी एखाद्या ऍक्टिव्ह शेअरमध्ये (उदा : लार्सन -टुब्रो) गुंतवणूक करतात. रजा संपून ज्या दिवशी बाजार उघडतो त्या दिवशी सकाळी ते शेअर विकून टाकतात. दलाली वजा जाता शेअरमागे सहा-सात रुपये सुटतात. विचार केला तर या तोडग्याला शास्त्रीय आधार नाही. परंतु चौकशी केली तर हे खेळाडू त्याचे समर्थन अशाप्रकारे देतात.


अर्थसंकल्प : अनुकूल-प्रतिकूल

ऑटोमोबाईल-सुटे भाग -टायर : ० फरक नाही
बँका : + अनुकूल
खते : + थोडे अनुकूल
सिमेंट : - प्रतिकूल
घरबांधणा : + अनुकूल
आयटी : - प्रतिकूल
खनिज तेल -गॅस : ० फरक नाही
नॉनफेरस मेटल : ० फरक नाही

पोलाद -लोखंड : ० फरक नाही
पेपर : + अनुकूल
रस्ते बांधणा : + अनुकूल
वस्त्र-उद्योग : - प्रतिकूल
बंदरांची बांधणी : ० फरक नाही
हॉटेल : - प्रतिकूल
साखर : ० फरक नाही
टेलीकॉम : ० फरक नाही

बघा, तीन दिवस घराला टाळे लावून बाहेर जायचे म्हटले तर आपण घरातील चीजवस्तू लॉकरमध्ये जमा करतो. जोखीम नाहीशी करतो. मोठ्या वित्त संस्थांचे मॅनेजर किंवा दलालसुध्दा या रजेची जोखीम घेत नाहीत. छोटे-मोठ्या सौद्याची वजावट करून घरी जातात. परिणामी भाव दबलेले राहतात. या तीन दिवसांची जोखीम आम्ही घेतो. त्याचे बक्षीस रजा संपल्यावर मिळवतो. असाच एक दुसरा तोडगा आहे म्युच्युअल फंडाचा पाठलाग करणार्‍यांचा. हे गुंतवणूकदार रोज फंडांनी काय खरेदी केली ते तपासतात. बर्‍याचशा वेबसाईटवर ही यादी म्युच्युअल फंडाचे टॉप -२५ -५०-१०० या स्वरूपात वाचावयास मिळते. त्याच शेअरमध्ये गुंतवणूक करून नफा कमावण्याची यांची पद्धत असते. बर्‍याच वेळा नफा मिळतोही. पण अभ्यासाचे तास वाचवण्यासाठी ही एक सोपी पद्धत आहे हे मात्र खरे. काही गुंतवणूकदार मात्र रोजच्या बल्क आणि ब्लॉक खरेदी विक्री वाचून गुंतवणुकीचे अंदाज बांधतात. ही यादीसुध्दा सहजरीत्या उपलब्ध असते. दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करण्याचा हा एक रांगडा अंदाज आहे.
एकवीस अपेक्षित प्रश्‍न आणि त्याची उत्तरे वाचून परीक्षा उत्तीर्ण होणारे आणि वर्षभर अभ्यास करून उत्तीर्ण होणारे या दोन्हींना प्रमाणपत्र एकसारखेच मिळते. या रीतीने बाजारात व्यवहार करावयाचा किंवा नाही हा मात्र ज्याचा त्याचा प्रश्‍न आहे.

- रामदास

(लेखक गुंतवणूक प्रशिक्षक आहेत.)

No comments: