डे ट्रेडिंग म्हणजे मागणी आणि पुरवठ्याचा खेळ आहे. मागणी जास्त म्हणजे बाजार तेज आणि पुरवठा जास्त म्हणजे बाजार मंद. डे ट्रेडिंग करून सतत नफा कमवत राहावा हे बाजारात येणार्या प्रत्येकाचे ध्येय असते.
सर्दी-बध्दकोष्ठ -दाढदुखीसारख्या आजारांनी यांची तब्येत नाजूक मिजाज होत असेल त्यांच्यासाठी डे ट्रेडिंग नाही. एखाद्या स्थितप्रज्ञासारखे तटस्थ राहून इतरांच्या भावनाकल्लोळाच्या खेळाचा फायदा घेणे हे डे ट्रेडरचे काम आहे. डे ट्रेडिंग करून नफा कसा कमावतात ते बघूया. या प्रकारच्या व्यवहारात दोन ते अडीच टक्क्यांचा फरक म्हणजे मोठा फरक. उदाहरणार्थ ऍक्सीस बँकेचा खुलता भाव 1320 आहे. यावर 0.10 टक्के दलाली. भाव समजा दोन टक्क्यानी वाढला तर प्रत्येक समभागापाठी 1.90 टक्के फायदा. दिवसभरात 500 समभागाचा व्यवहार पार पाडला तरी 12000चा फायदा. मग हे जर असे सोपे असेल तर....... असा मनात विचार येतो. पण प्रत्यक्षात असे होईल असे नाही. भाव 2.0 टक्के खाली पण जाऊ शकतो किंवा एक टक्का कमी झाल्यावर घाबरलेला खेळाडू विक्री करू शकतो आणि थोड्या वेळाने भाव पुन्हा एक टक्का वाढू शकतो. एकाच दिवसात दोन टक्क्यांची वाढ प्रत्येक दिवशी होते असे नाही. साधारण एक टक्क्याची वाढ झाली तरी नफा मिळतो. म्हणून डे ट्रेडिंगमध्ये व्हॉल्यूम महत्त्वाचा. दलाली जितकी कमी तितका फायदा जास्त. आता बघू या डे
ट्रेडिंगसाठी काही महत्त्वाचे नियम.
1) वर्तमानपत्रातील मथळे वाचून सौदे करू नयेत. आजचा मथळा हा बाजारात कालचा झालेला असतो.
2) जेव्हा आपण खरेदी करतो तेव्हा दुसरे कोणीतरी विक्री करत असणार. याचा अर्थ असा की खरेदी करण्याचा निर्णय ज्या तर्काच्या आधारे घेतला आहे तो तर्क विक्रीच्या तर्कापेक्षा बळकट असायला पाहिजे.
3) जर खरेदी केली तर आपण गृहीत धरलेला भाव मिळेलच असे नाही. त्यामुळे बाजाराचा कल बदलताना दिसला तर हट्ट न धरता सौदा पूर्ण करून वायद्याच्या बाहेर पडावे.
4) बर्याच वेळा नफ्याऐवजी नुकसान होते अशावेळी किती नुकसानीत सौद्याच्या बाहेर पडायचे हे आधीच ठरवलेले फायद्याचे असते. नुकसान नंतर कधीतरी भरून काढता येते, पण भांडवल जर नाहीसे झाले तर नफा कमावण्याचा रस्ताच बंद पडतो. किती नुकसानीची तयारी ठेवायची याची जी मर्यादा आहे त्याला स्टॉपलॉस असे म्हणतात. सुरुवातीला कॉंप्युटराइज्ड स्टॉपलॉसचा वापर करावा. पण हळूहळू या यांत्रिक अवलंबितेच्या बाहेर पडून मानसिक स्टॉपलॉस ठेवण्याची सवय करावी.
5) नफ्याचे प्रमाण मनाशी निश्चित ठरवूनच सौदा करावा. जर जास्त नफा दिसायला लागला तर वाट बघण्यापेक्षा आहे तो नफा पदरात घेण्याची सवय लावून घ्यावी.
प्रत्येकाला आपापल्या पायरीवरती नफा कमावण्याची संधी मिळते. असा विचार करत सौदा केला तर नफा छोट्या छोट्या प्रमाणात गोळा होतो. ही सवय लागली की अनेक छोट्या नफ्याचे रूपांतर छोटा नफा आणि मोठा सौदा असे होते. हे संक्रमण पार पाडणे ज्याला जमते तो यशस्वी. या आणि अशा अनेक नियमांचे सार असे की प्रत्येकाने आपल्या सौद्याची एक व्यवस्था बनवून घ्यावी. त्या व्यवस्थेप्रमाणे जेवढा नफा करता येईल तेवढेच सौदे करावेत. एक सोपे उदाहरण बघा. ऍक्सीस बँकेचा 1247 ते 1327 हा टप्पा माझ्या ओळखीचा आहे. व्यवस्थेप्रमाणे यादरम्यान भाव असेल तरच मी खरेदी-विक्री करतो. या टप्प्याच्या बाहेर भाव गेला तर मी बाजूला राहतो. ही शिस्त लागली की यशाचे प्रमाण वाढते. डे ट्रेडिंग कोणत्या समभागात करावे याचे नियम असे नाहीत, परंतु ज्या समभागात जास्तीत जास्त खरेदी-विक्री होत असेल त्या समभागातच खेळावे. नियम असे अनेक आहेत, परंतु या नियमासोबत जोपर्यंत टेक्निकल ऍनालिसिस येत नाही तोपर्यंत सगळे काही जुगार खेळण्यासारखे आहे. टेक्निकल ऍनालिसिस आणि डे ट्रेडिंग दोन्हीचा अभ्यास एकसोबत होईल अशा पध्दतीने पुढचे लेख लिहिता येतील.
पसंती-नापसंती
मुळात प्रश्न आहे तो भाव खालीवर होण्याचा. भाव वधारणे म्हणजे दिसेल त्या किमतीत एक विशिष्ट समभाग हवाहवासा वाटणे आणि मंदी म्हणजे काय तर मिळेल त्या भावात एखादा किंवा कुठलाही समभाग नकोनकोसा वाटणे. पण हे भाव खाली-वर कसे जातात हे कळले की बाजार आपलाच. चला तर बघू या हा भाव वर-खाली जाण्याचा गेम.
यासाठी एक कल्पना करा की, एका हॉलमध्ये पन्नास विवाहोत्सुक तरुणींचा मेळावा बसला आहे. प्रत्येक तरुणीला विवाहास योग्य अशा तरुणाची माहिती संचालकांमार्फत दिली जाते आहे. पसंती-नापसंती दर्शवण्यासाठी तरुणींच्या हातात एक फ्लॅग दिला आहे. आता ज्या युवकाची माहिती सांगणार आहेत त्याचा नंबर 911 पुकारला गेला. जन्म एशियात आणि निवास अमेरिकेत. पन्नासपैकी पंचवीस फ्लॅग हलवले जातात. उंची 6फूट 2 इंच. अर्धे फ्लॅग खाली जातात. रंग काळा आणखी काही फ्लॅग खाली जातात. डावखुरा -चेनस्मोकर. सगळे फ्लॅग खाली. उत्पन्न दहा लाख डॉलर ‘अय्या म्हणजे आपले पाच कोटी.जाऊ दे बाई रंगाचे काय ते आपल्या हातात थोडेच असते’ या विचारांनी पुन्हा एकदा वीस फ्लॅग वर येतात. एकेकाळी गव्हर्नर -आणखी पाच फ्लॅग वर. वय बावन्न -उंचावलेले अर्धे फ्लॅग खाली. कदाचित या वर्षी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होणार. सगळे फ्लॅग वरती. बघा प्रत्येक विधानासोबत या घटनेत भाग घेणार्यांचे विचार कसे हेलकावे घेत होते. हे अगदी असेच डे ट्रेडिंगमध्ये होत असते आणि म्हणून सव्वा नऊ ते साडेतीन वाजेपर्यंत भाव वरखाली होत असतात. या नाट्यात तुम्ही भाग घेतला तर तुमचे नुकसान नक्की. पण विंगेत उभे राहून या नाट्याचा फायदा करून घेतला तर तुम्ही नफ्यात. परंतु मानवी मनाच्या लीला कधी विंगेतल्या माणसाला मंचावर आणतील, तर मंचावरील माणसाला विंगेत नेतील हे सांगता येत नाही .म्हणून डे ट्रेडिंग करणार्यासाठी योजना ठरलेली असली पाहिजे.
shreemant2011@gmail.com
लेखक गुंतवणूक प्रशिक्षक आहेत
सौजन्य :- फुलोरा, सामना ०८०५२०११
No comments:
Post a Comment