तांत्रिक विश्लेषण करणार्या अभ्यासकाला व्याजाचे दर,पेट्रोलचे भाव, युद्ध, युद्धविराम, निवडणुका, हवामान अशा कोणत्याही घटकांचा विचार करण्याची आवश्यकता नसते कारण बाजारभावाच्या पोटात ही सगळे माहिती आपोआप साठवलेली दिसते. या बाजारभावाचा आलेख मांडून त्याचा अभ्यास करणे म्हणजे तावि.
तबल्यावर जोरात थाप पडली म्हणजे गायक समेवर आला इतकेच संगीताचे ज्ञान असलेला हौशी रसिक जसे दर्दी आणि ग्यानी असल्याचा आव सहज आणू शकतो तसा बाजारात कुणीही तावितज्ज्ञ असल्याचा दावा करू शकतो. आता विचार करू या ताविच्या महत्त्वाचा. ताविच्या अभ्यासामुळे बाजारात प्रवेश कधी करायचा -बाजारातून बाहेर कधी पडायचे -बाजारातील आपली गुंतवणूक वाढवावी किंवा कमी करावी याचे संकेत मिळतात. हे संकेत अनेक प्रकारचे असतात. या संकेतांचा उपयोग कसा करायचा याचा अभ्यास म्हणजे ताविचा अभ्यास. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की ताविचे ज्ञान फक्त शेअर बाजारात वापरता येते असे नाही. कुठल्याही बाजारात जेथे चढ उतार आहेत अशा बाजारात हे शास्त्र वापरता येते. कमोडीटीमधील सट्टा आपल्या बाजारात फारच नवीन आहे परंतु माझ्या ओळखीतील एक युरोपीयन तावितज्ज्ञ मला फेब्रुवारी 2002 पासून चांदीची खरेदी करण्याचा आग्रह करीत होते. त्यावेळी चांदीचा भाव 16900च्या आसपास होता. आता एनएसीवर डॉलर-पाऊंड -युरो-येनची खरेदी विक्री करता येते. जर ताविचे विशुद्ध रूप तपासायचे असेल तर फॉरेक्स बाजारातील आलेखांचा अभ्यास करावा. याचे कारण असे की ताविची सत्यासत्यता बाजारभाव आणि उलाढाल यावर अवलंबून असते. शेअरबाजारात हे दोन्ही कृत्रिमरीत्या ताब्यात ठेवता येण्याची शक्यता असते पण फॉरेक्समध्ये आंतरराष्ट्रीय चलनाचा भाव कुणाच्याच ताब्यात राहू शकत नाही. म्हणूनच ज्यांना ताविचा अभ्यास करायचा असेल त्यांनी शेअरबाजाराचे आलेख अभ्यासण्यापूर्वी फॉरेक्स मार्केटचे आलेख अभ्यासावे.
ताविच्या अभ्यासात बाजाराचा कल समजण्यासाठी आलेखात बाजारभाव रेखांकित केला असतो. यासोबत आणखी काही संख्यांचे रेखांकन केले असते त्याची आज ओळख करून घेऊया. आलेख हे उभ्या अक्षावर भाव आणि आडव्या अक्षावर कालखंड अशा पध्दतीने केले जातात. काही आलेख फक्त बंद बाजारभाव दाखवतात. काही आलेख खुलता -बंद -जास्तीत जास्त -कमीतकमी असे सगळे भाव दाखवतात. या खेरीज जपानी कॅण्डलस्टीक हादेखील लोकप्रिय आलेख आहे. यासोबत आणखी काही संख्यांचे रेखांकन केले असते त्याची आज ओळख करून घेऊ या.
1 सरकती सरासरी किंवा हलती सरासरी (मूव्हिंग ऍव्हरेज) ही आपल्या सोयीप्रमाणे घ्यावी. सर्वसाधारणपणे पाच दिवसांची /दहा दिवसांची /वीस दिवसांची /पन्नास दिवसांची अशी सरासरी वापरली जाते. या सरासरीचा उपयोग छोट्या म्हणजे पाच दिवसांच्या काळात किंवा मोठ्या म्हणजे पन्नास दिवसांच्या काळातील बाजाराच कल कळून घेण्यासाठी येतो. शंभर किंवा दोनशे दिवसांच्या सरासर्यांचाही उपयोग करता येतो. बाजाराच्या संकेतासाठी सोप्यात सोपी वापरले पद्धत हीच आहे. सरासरीला आणखी धार येण्यासाठी एक्स्पोनेंशिअल मूव्हिंग ऍव्हरेज (5/10/20/50/100) वापरण्याची पध्दत आहे.
2 आधार किंवा नकार पातळी. (सपोर्ट लेव्हल /रेझिस्टन्स लेव्हल) या पातळ्या ऐतिहासिक असतात. आधार पातळीवर समभागाची खरेदी होत असते आणि नकाराच्या पातळीवर विक्री होत असते या जर लक्षात आल्या तर दोन्हीमधील पोकळीत चांगला नफा कमावता येतो.
3 शिखर आणि तळ . (टॉप्स /बॉटम्स) एखाद्या कालखंडात आलेखावर भाव वर गेलेला दिसतो आणि तेथून मागे फिरलेला दिसतो. हा उच्च भाव म्हणजे त्या वेळेचे शिखर आणि त्याच काळाचा कमीतकमी भाव म्हणजे तळ. या शिखर /तळाचा उपयोग तेजी किंवा मंदी समजण्यासाठी करता येतो. याखेरीज अनेक ताविच्या विशिष्ट संज्ञा आहेत त्याचा वापर आणि अर्थ जसे आपण पुढे जाऊ तसे समजून घेऊ.
ताविमध्ये एक वेगळा पंथ आहे इलियटवेव्ह थीअरीवाल्यांचा. इलियटवेव्हच्या सिध्दांताप्रमाणे बाजार,मग तो कुठलाही असा,आठ लाटांमध्ये फिरत असतो. पहिलीलाट वर जाणारी. दुसरी खाली येणारी तिसरीवर जाणारी तर चौथीखाली येणारी. चौथ्या लाटेचा तळ हा दुसर्या लाटेच्या तळापेक्षा वर असतो. पाचवी लाट ही तेजीची शेवटची लाट. त्यानंतरच्या तीन लाटांमध्ये बाजार एकदाच वर जातो. आठवी लाट संपली की पुन्हा नवा संच सुरू होतो. राल्फ नेल्सन इलियट हे या सिध्दांताचे जनक. त्यांनी या लाटांचा फेबोनासी सीरिजशी संबंध जोडून हा सिध्दांत जगासमोर मांडला. फेबोनासी सीरिज म्हणजे 1,1,2.3,5,8,13,21,34,55... .पुढचा आकडा हा आधीच्या आकड्याच्या बेरजेने तयार होतो. आजच्या तारखेस हा सिध्दांत वापरून बाजाराची निश्चित दिशा काय असेल हे वर्तवणार्यांंची संख्या कमी आहे. या शास्त्राचा अभ्यास करून नियमीत योग्य अंदाज वर्तवणार्यांंमध्ये विवेक पाटील, दीपक मोहोनी,सदानंद राजे, बिरेंद्रकुमार जिलेदार यांची नावे अग्रगण्य आहेत.
shreemant2011@gmail.com
(लेखक गुंतवणूक प्रशिक्षक आहेत.)
सौजन्य:- फुलोरा, सामना १४०५२०११
No comments:
Post a Comment