Sunday, November 06, 2011

तुलसी ‘विवाह’ पर्व

समाजाचे चक्र विवाह संस्थेच्या केंद्रीभूत प्रथांनी गतिमान होते. त्याचे गुपित तुळशी विवाहातून स्पष्ट होते. म्हणून हा समारंभ दीपावली खालोखाल धूमधडाक्यात साजरा होतो.

दिवाळी झाली. फटाके फोडले. खमंग लाडू-चिवड्यांवर ताव मारला. मामाच्या घरी भाचेमंडळी गेली. बहीणही माहेरी आली. दिवाळीचा सण असा आनंदात साजरा झाला. दिवाळीत फोडता-फोडता उरलेल्या टिकल्या, फटाक्यांची थोडीबहुत आतषबाजी बच्चेकंपनी अजूनही करीत असले तरी, दिवाळीचा सण महिनाभर म्हणजे देवदिवाळीपर्यंत राहतो असे मानले जाते. पाच दिवसांची दिवाळी झाल्यानंतर तुळशी विवाह समारंभ असतो. या वर्षी कार्तिक शुद्ध द्वादशीपासून सुरू होणार्‍या तुळशी विवाह पर्वाची सांगता वैकुंठ चतुर्दशीला होते.


याच पर्वामध्ये चातुर्मासाची समाप्ती होऊन कार्तिक मासाचा आरंभ होतो. कार्तिक मासामध्ये आवळा, ऊस, कौट, चिंच, हरभरा, बोर ही फळे आलेली असतात. त्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी पोषक असते. तुळशी विवाह सोहळ्यात ऊस, आवळा आदी अर्पण करूनच सेवन करण्याची प्रथा आहे. त्यातही आवळ्यांचा मान मोठा असतो.

मुख्यत: दिवाळीच्या पाठोपाठ हिवाळ्याची चाहूल लागते. दिवसागणिक थंडीचे प्रमाण वाढत जाते. या ऋतूमध्ये आहार-विहारामध्ये बदल होत असल्याने सकाळी पडणार्‍या कोवळ्या उन्हाची किरणे सेवन करणे, बलवृद्धीसाठी व्यायाम, चालणे योगासन-प्राणायाम असा उपक्रम प्रत्येक जण आखतो. दिवाळीचा फराळ-चिवडा एव्हाना संपलेला असतो. मग शुद्ध तुपात बनविलेले पौष्टिक लाडू. संधीवातावर गुणकारी मेथीचे लाडू, खारीक-खोबरे, उडीद इत्यादी पदार्थ बनविले जातात. तर दुसरीकडे पहाटेच स्नान करून देवळात काकड आरती होते. त्यामुळे परंपरेप्रमाणे कार्तिक स्नान अन देवदर्शनासाठी प्रथा पाळली जाते.

असा हा कार्तिक महिन्याचा महिमा असून, शुद्धता आणि पावित्र्याचे प्रतीक असलेल्या ‘तुळस’ या छोट्याशा डेरेदार रोपट्याला अतिव महत्त्व असते. म्हणून कृष्णभार्या रुख्मिणीचे प्रतीक असलेल्या तुळशीचे दिवाळीनंतर येणार्‍या पर्वामध्ये विवाह लावण्याची प्रथा हिंदू धर्मात आजही अखंडपणे सुरू आहे. तुळशीची कुंडी अथवा वृंदावन सजवून त्यावर स्वस्तिक किंवा श्रीकृष्ण-राधाचे चित्र रेखाटन करायचे. मग ऊस, कौट, चिंच, बोर, आवळा, हरभर्‍याचे रोपटे इत्यादी वाहून तुळशीसमोर छोट्या मुलास उभे करायचे किंवा समोर रंगनाथाची मूर्ती मांडून मंगलाष्टक होतात आणि हा असा विवाह समारंभ पार पडतो.

ग्रामीण भागात हा उत्सव उत्साहात साजरा होतो. या पूजेमुळे उपवर मुलामुलींचे विवाह लवकर होतात असा गोड समज पसरलेला असल्याने या उत्सवाला महत्त्व आहे. अर्थात तुळशी विवाह उत्सवानंतर जवळपास एप्रिल-मेमध्ये लग्नसराईचा मोसम असतो.

जीवनातील महत्त्वाचा समारंभ हा ‘विवाह’ असतो. विवाहातूनच संसाराचा रथ पुढे सरकतो. दोन जीवांना एकत्र आणणारा आणि समाजाला हातभार लावणारा हा सामाजिक सोहळा आहे. दोनाचे चार हात झाले म्हणजे जुनी पिढी आत्मनिर्भर होते. सांसारिक जबाबदारी नव्या पिढीकडे सोपवून जुनी मंडळी मोक्षप्राप्तीकडे वळतात. संसाराचा रथ पती-पत्नी चालवत असताना या रथामध्ये नवीन पाहुणा येतो..

थोडक्यात समाजाचे चक्र विवाह संस्थेच्या केंद्रीभूत प्रथांनी गतिमान होते. त्याचे गुपित तुळशी विवाहातून स्पष्ट होते. म्हणून हा समारंभ दीपावली खालोखाल धूमधडाक्यात साजरा होतो. पाच दिवस ही पर्वणी अनुभवायला मिळत आहेच आहे.

- श्रीराम सोनार
सौजन्य:- उत्सव, सामना ०६११२०११.

No comments: