गेल्या काही महिन्यांतील बाजारातले वातावरण बघता ज्या तेजीची वाट गुंतवणूकदार बघत आहेत ती दिवसेंदिवस दूर दूर जाताना दिसते आहे. श्री संत ज्ञानेश्वरांच्या एका विरहिणीत म्हटल्याप्रमाणे ‘अवस्था लावोनी गेला, अजून का न ये’ अशी अवस्था गुंतवणूकदारांची झाली आहे. खासकरून या सदराच्या वाचकांची तर नक्कीच. कारण हे सदर वाचून प्रेरित झालेल्या गुंतवणूकदारांना अजूनही तेजीचा माहोल गेले सहा महिने बघावयास मिळाला नाही. असा बाजार सकारात्मक किंवा नकारात्मक असे काहीही संकेत देत नाही. दीर्घ पल्ल्याची गुंतवणूक ताबडतोब करावी असे काहीही चित्र सध्या दिसत नाही. अशा वातावरणाची निर्मिती होण्यासाठी अनेक कारणे आहेत. त्यापैकी महत्त्वाचे म्हणजे विदेशी गुंतवणूक संस्थांची (जवळ जवळ) अनुपस्थिती.
विदेशी संस्थांची खरेदी विक्री आंतराष्ट्रीय संकेतांवर चालते. आंतरराष्ट्रीय चित्र काहीसे असे आहे. अमेरिकेत अजूनही आर्थिक सुस्थितीचे संकेत नाहीत. युरोपमधील काही देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभे आहेत. त्यामुळे उत्साहवर्धक वातावरण तयार होण्यासाठी बाजाराला देशी संस्थांचाच आधार आहे, परंतु राजकीय वातावरण बघता देशी संस्था आक्रमक होऊन खरेदी करतील असे वाटत नाही. चौथ्या तिमाहीचे आकडे वाचल्यावर येणार्या तिमाहीचे नफ्याचे आकडे कमी असतील हे स्पष्टच झाले आहे.
सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी या प्रकारच्या बाजारात काय करावे? असा मोठा प्रश्न असतो. असा प्रश्न ज्यांच्या मनात आला असेल त्यांनी मान्सूनच्या मोसमात कोळी काय करतात ते बघावे हे उत्तम. या मोसमात कोळी आपली जाळी दुरुस्त करतात आणि होड्यांची गळकी भोके बुजवतात आणि समुद्र शांत झाला की, परत जाळी पसरतात. थोडक्यात काय तर या मरगळीच्या वातावरणानंतर जी तेजी येणार आहे त्या तेजीत भाग घ्यायचा असेल तर गुंतवणूकदारांनी आपली जाळी म्हणजेच ट्रेडिंगची हत्यारे घासून पुसून तयार ठेवावीत. गेल्या मोसमात केलेल्या चुकांचा आढावा घेऊन त्या चुका पुन्हा न होण्यासाठी नवीन व्यूहरचना करावी. मंदीची ओहोटी कायम टिकत नाही आणि तेजीची भरती पण कायम टिकत नाही हे लक्षात असले म्हणजे झाले.
डबा आणि फाटक
फार पूर्वी म्हणजे साधारण पंधरावीस वर्षांपूर्वी शेअर बाजाराच्या बाजूला एका इमारतीच्या तळमजल्यावर मधूभाईचा डबा होता.डबा म्हणजे अनधिकृत शेअर बाजार. सगळे सौदे शाळेच्या पाटीवर लिहिले जायचे. फक्त डे ट्रेडिंगचे सौदे लिहिले जायचे. बाजार संपला की, हारजीतचे पैसे देऊन घेऊन पाट्या पुसल्या जायच्या. या डब्यात एक फाटक सौदा पण लिहिला जायचा. फाटक सौदा म्हणजे समभागाची पूर्ण किंमत न देता काही प्रमाणात अंशत: पैसे डबा चालवणार्याकडे द्यावे लागत.उदाहरणार्थ बॉंबे डाइंगचा भाव २७० रुपये आहे. ५०० समभागाची किंमत झाली १३५०००. सौदा लिहिणारा फक्त १३५०० रुपये देऊन एंट्री घ्यायचा. समजा पुढचे वळण म्हणजे सेटलमेंट येईपर्यंत समभागाचा भाव २९० झाला तर सौदा लिहिणार्याला १३५०० (५००ङ२०) म्हणजे २३५०० रुपये मिळायचे. परंतु भाव २५० झाला तर सौदा लिहिणारा नुकसानीत जाऊन त्याला फक्त ३५०० रुपये परत मिळायचे. मिळणार्या रकमेतून डबा चालवणारा कार्यवाहीचा खर्च म्हणून काही पैसे घ्यायचा. या फाटक सौद्याचा फायदा असा की, १३५०० भांडवलावर १०००० किंवा कमीजास्त फायदा मिळवण्याची संधी. असे अनधिकृत सौदे लिहिणे यावर कडक निर्बंध होते. प्रसंगी पोलिसांची धाड पडण्याची शक्यता असायची तरी पण असे सौदे चालत राहिले. कारण कमीतकमी भांडवलावर अनेक पट पैसे कमावण्याची संधी. यानंतर बर्याच वर्षांनी नॅशनल स्टॉक एक्सेंज सुरू झाल्यावर असे
फाटक सौद्यासारखे सौदे लिहिण्याची एक नवीन पद्धत -एक नवीन बाजार जन्माला आला. त्याचे नाव फ्युचर आणि ऑप्शन
. अधिकृतरीत्या छोट्या भांडवलावर जास्त पैसे कमावण्याची संधी प्रत्येकाला मिळाली. फ्युचर आणि ऑप्शन या दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत. गुंतवणूक कमी, पण फायदा कमावण्याची संधी अनेक पट. त्याचसोबत भांडवल एकाच सौद्यात नाहीसे होण्याची पण शक्यता. थोडक्यात काय तर ही एक तारेवरची कसरतच पण इंद्रधनुष्याच्या तळाशी असलेला खजिना कोणाला नको आहे ?
निफ्टी निफ्टी
फ्युचरच्या सौद्यात सगळ्यात लोकप्रिय म्हणजे निफ्टीचा सौदा. निफ्टी म्हणजे नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा तापमापक. निफ्टीचा पारा वर म्हणजे बाजार तेजीचा. निफ्टीचा पारा घसरला तर बाजार नरम म्हणजे मंदी. असे गृहीत धरा की, निफ्टी हा एक समभागच आहे. सकाळी पन्नास निफ्टी खरेदी करा. ही खरेदी करण्यासाठी साधारण १५ ते २० टक्के मार्जिन दलालाला द्यावे लागते. आजची तारीख समजा जून पंधरा आहे. तर मग जून महिन्याच्या शेवटच्या गुरुवारपर्यंत निफ्टीचा पारा वर गेला तर पन्नासच्या पटीत फायदा आणि जर निफ्टीचा भाव घसरला तर पन्नासच्या पटीत नुकसान. आता यातले फायदे बघा. फायदा क्रमांक एक :थोड्याशा मार्जिनवर महिनाभरात जास्त पैसे कमावण्याची संधी. फायदा क्रमांक दोन : गुंतवणूक कमी असूनही हातात महिन्याचा कालावधी निर्णय घेण्यासाठी हातात शिल्लक असतो. ज्यांची जोखीम घेण्याची इच्छा किंवा कुवत नसेल त्यांच्या साठी मिनी निफ्टी म्हणजे वीस निफ्टीचा लॉट आहेच. अंदाज फक्त बरोबर ठरला पाहिजे. अंदाज अचूक मिळण्यासाठी तावीच्या अभ्यासासारखा दुसरा पर्याय नाही. पुढच्या भागापासून तावी आणि निफ्टीचा अभ्यास एकाच वेळेस करू या.
shreemant2011@gmail.com
(लेखक गुंतवणूक प्रशिक्षक आहेत.)
No comments:
Post a Comment