Saturday, November 05, 2011

सरासरी फायदा - २०

सरासरीचा अभ्यास करून नफा कसा कमवायचा ते आज बघू या. त्यासाठी व्यापार करण्यायोग्य अशी परीस्थिती बाजारात कशी तयार होते ते बघू या. 
कुठल्याही एका विशिष्ट प्रकारचे म्हणजे तेजी किंवा मंदीचे संकेत मिळत नाहीत त्यावेळी कंटाळलेले जुने गुंतवणूकदार हळूहळू विकत घेतलेल्या समभागातून बाहेर पडतात आणि जाणते निवेशक खरेदीला सुरुवात करतात. ही झाली संकलनाची सुरुवात. कदाचित या सुमारास बाजारात फारसे उत्साहवर्धक वातावरण नसेल. ही पातळी म्हणजे भविष्यातील तेजीची एक पायरी समजा. हा कालावधी बर्‍याच वेळा मोठ्या अवधीचा असतो. भावफरक नजरेला येईल असे नसतात. मोठ्या अवधीचे गुंतवणूकदार येथे खरेदी करतात.या कालावधीचा आलेख पसरता असतो. यानंतर हळूहळू भाव वाढत जातात आणि प्रत्येक वेळी त्या आठवड्याचा किंवा एखाद्या पंधरवड्याचा जास्तीतजास्त भाव त्याअगोदरच्या आठवड्याच्या किंवा पंधरवड्याच्या भावापेक्षा जास्त असतो. या पातळीचा आलेख थोडा वरच्या दिशेने, पण लांबीने अजूनही जास्तच असतो. मध्यम पल्ल्याचे गुंतवणूकदार येथे बाजारात प्रवेश करतात. यानंतर सगळ्या जनतेला हालचालीची खबर लागते आणि समभागाची मागणी वाढत जाऊन रोज नव्या जास्तीतजास्त भावाचे उच्चांक तयार होताना दिसतात. डे ट्रेडर्सना यावेळी पैसे कमवायची संधी मिळते. या कालाचा आलेख एकदम चढ्या स्वरूपाचा दिसतो. बरेच डे ट्रेडर्स आलेखांचे निरीक्षण करून या फेजची वाट बघत असतात. यावेळी बाजारभावाचे रेखांकन सर्व मूव्हिंग ऍव्हरेजेसच्या (किंवा सरासरी भावाचे) रेखांकनाला पार करून जाताना दिसतात. अशावेळी डे ट्रेडर्सना व्यापाराची संधी मिळते. येथे लक्षात घेण्याची बाब अशी हा कालावधी अत्यंत अल्प स्वरूपाचा असतो. भाववाढीचे लक्ष्य नक्की करूनच हालचाल करावी नाहीतर डे ट्रेडिंगच्या उद्देशाने केलेली खरेदी गळ्यात येते किंवा सौद्यात नुकसानी येते. खरेदी विक्रीची काही पथ्ये अशी आहेत.

१. भाववाढीच्या सोबत उलाढालीचे आकडे वर जाताना दिसले तरच सौद्यात हात घालावा.

२. शक्यतो डे ट्रेडिंग अशाच समभागात करावे ज्या समभागात फ्युचर-ऑप्शनचेही सौदे केले जातात. एकाच वेळी अनेक कंपन्यांच्या समभागात सौदे करू नयेत.

३. स्टॉप लॉस ठरवल्याशिवाय सौद्यात हात घालू नये.

४. शुक्रवारची खरेदी बर्‍याच वेळी फायद्याची असते आणि सोमवार सकाळची खरेदी बर्‍याच वेळा महागडी ठरते.

५. टार्गेट मिळाल्यावर सौदा विसर्जित करावा.

वेगवेगळ्या सरकत्या सरासरीचा उपयोग कसा करावयाचा ते आता बघू या.

बाजाराचा कल जोखण्यासाठी ट्रेंड लाइनचा उपयोग केला जातो. एखाद्या समभागाच्या शिखरांना जोडणारी एक रेषा काढली आणि त्याच आलेखाच्या तळांना जोडणारी रेषा काढली तर बाजाराची ट्रेंड लाईन काढता येते. जर ही रेषा वरच्या बाजूने प्रवास करताना दिसली तर बाजाराचा कल तेजीकडे आणि तसे नसल्यास मंदीकडे आहे असे समजले जाते. पण फक्त कल समजून उपयोग नाही. कदाचित निश्चित कल लक्षात येईपर्यंत खरेदी किंवा विक्रीची संधी हातातून निघून गेली असेल म्हणून ट्रेंड लाईनच्या सोबत सरकत्या सरासरीचा किंवा मूव्हिंग ऍव्हरेजचा वापर करण्याची पध्दत आहे. जेव्हा समभागाचा बाजारभाव या सरासरीच्या वरती जातो तेव्हा तेजीकडे वाटचाल आहे असे समजायला हरकत नाही. ही सरासरी शक्यतो अल्प कालावधीची म्हणजे पाच किंवा आठ दिवसांच्या सरासरीची असावी. हे शस्त्र आणखी धारदार बनवण्यासाठी आणखी एक सरासरी वापरायला हरकत नाही. ही सरासरी दीर्घ मुदतीची असावी. याचे कारण असे की अल्पमुदतीची सरासरी रेषा बर्‍याच वेळा बाजारच्या फसव्या हालचालीमुळे चुकीचे संकेत देऊ शकते.

उदाहरणार्थ बाजारभाव अल्पमुदतीच्या सरासरीच्या खाली आला तर ताबडतोब विक्रीचा निर्णय घेण्यापूर्वी दीर्घ मुदतीच्या रेषेकडे एक नजर टाकावी. जर ही रेषा अजूनही तेजीचा संकेत देत असेल तर विक्रीची घाई करू नये. अशा प्रकारची सरासरी वापरूनही संकेत वेळच्या वेळी मिळत नाहीत म्हणून मध्यम काळची एक सरासरी वापरण्याची पध्दत आहे. ही सरकत्या सरासरीची जुडी वेगवेगळ्या प्रकारे वापरली जाते. काही गुंतवणूकदार ५-८-१३ अशी सरासरी वापरतात. काही ८-२०-३५ आणि काही १३-२१-५५ अशीही सरकत्या सरासरीची जुडी वापरतात. दीर्घ मुदतीचे गुंतवणूकदार २०-५०-२०० असे कॉम्बिनेशन वापरतात. जोपर्यंत बाजारभाव २०० दिवसाच्या सरासरीखाली जात नाहीत तोपर्यंत काही निर्णय घेण्याची घाई करत नाहीत. अल्प मुदतीचे खेळाडू ५-८-१३ चे कॉम्बिनेशन वापरताना दिसतात. तीन सरासरी वापरण्याचा सगळ्यात जास्त फायदा असा की या सरासरींच्या रेषा एकमेकांना छेद देऊन पुढचा प्रवास करतात तेव्हा बाजाराचा कल बदलल्याचा निश्चित संकेत मिळतो. उदाहरणार्थ जेव्हा अल्पमुदतीची रेषा मध्यम रेषेला छेदते आणि त्याचवेळी मध्यम रेषा दीर्घ मुदतीला छेदून तिन्ही रेषा खालच्या बाजूने वळतात तेव्हा गुंतवणूकदारांनी आपली बाजारातील पोझिशन खालसा करावी हे उत्तम. अशीच परीस्थिती वरच्या अंगाने तयार झाली तर खरेदी वाढवून पुढच्या कलाची वाट बघावी. लेखातील शब्दसंख्येच्या मर्यादेमुळे कदाचित चित्र स्पष्ट होणार नाही. जिज्ञासूंनी डोळ्यांसमोर आलेख ठेवून अभ्यास करावा.


मागील अंकात आपण स्टॉप लॉसचा (तोट्याचा अडसर) ओझरता विचार केला. तोट्याचा विचार किंवा तोट्याला वेळीच अडसर घालणे म्हणजे भांडवलाचे संरक्षण करणे. घरातल्या एका छोट्या कुंडीत लावलेल्या गुलाबाच्या काही पानांवर कीड पडलेली दिसली की आपण ती पाने खुडून टाकतो आणि त्यामुळे इतर पानांवर कीड पसरण्याचा धोका कमी होतो. तसेच काहीसे या तोट्याच्या अडसराचे असते. एक उदाहरण बघून हे अधिक स्पष्ट करता येईल. समजा तुम्ही शंभर रुपयांना काही समभाग खरेदी केले. अडसर लावलेला नसल्याने भाव नव्वद झाल्यावरही समभाग तुमच्या हातात राहिले. समजा हाच भाव नंतर साठ झाला. अजूनही समभाग आपल्याच खिशात राहिले. भाव अधिक घटून दहा रुपयापर्यंत आले. म्हणजे एका समभागमागे ९० टक्के नुकसान झाले. आता भाव नव्वद टक्क्यांनी जरी वाढले तरी भाव १९ रुपये होईल. पुन्हा १००चा भाव गाठण्यासाठी रुपये दहा ते शंभर हा प्रवास म्हणजे भाव ९०० टक्क्यांनी वाढायला हवा. ९०० टक्क्यांची वाढ ताबडतोब होणे शक्य नसते. कारण प्रत्येक टप्प्यावर अडकलेले तुमच्यासारखेच इतर खेळाडू विक्रीसाठी तयार असतील. आता असे बघा की तोट्याचा अडसर नव्वदच्या भावाला लावला असता तर नुकसान दहाच टक्के झाले असते. ९० ते १०० हा प्रवास अकरा टक्क्याच्या वाढीने साध्य आहे. किंवा या टप्प्याला पोहचणे बाजारात कधीही शक्य आहे. आणखी एका परिस्थितीचा विचार करा. तुम्ही १०० रुपयात समभाग घेतले आणि तोट्याचा अडसर ९० ला लावला. भाव १२० रुपये झाला तरी हा अडसर ९०चा राहील. भाव वाढून १४५ झाला आणि जर अडसर ९० रुपयांचाच राहिला तर १४५या भावापासून ९० रुपयापर्यंत येईस्तो नुकसान होतच राहील. सांगायचा मुद्दा असा आहे की जर भाव वाढत गेले तर तोट्याचा अडसरसुध्दा तसाच वर जायला हवा. याला ट्रेलिंग स्टॉप लॉस असे म्हणतात. डे ट्रेडिंग करताना प्रत्येक सौद्यासोबत त्या सौद्याचा स्टॉप लॉस पण निश्चित करून ठेवायला हवा. थोडक्यात काय? जर सर सलामत तो पगडी पचास.
shreemant2011@gmail.com

No comments: