Saturday, November 05, 2011

गुंंतवणूकदार आणि माकड - २२

पॅरॅबोलीक सार हा एक बाजाराचा कल दर्शवणारा इंडिकेटर आहे. सार म्हणजे एस. ऍण्ड आर. स्टॉप ऍण्ड रीव्हर्स. हा इंडिकेटर कलदर्शक (ट्रेंड इंडिकेटर) म्हणून वापरता येतोच आणि त्याच सोबत स्टॉप लॉस (तोट्याला अडसर) निश्‍चित करण्यासाठी याचा वापर करता येतो.



आज टे्रडिंगच्या दोन महत्त्वाच्या पध्दतीविषयी माहिती देणार आहे, पण त्यापूर्वी पुन्हा एकदा डे टे्रडिंगविषयी महत्त्वाचा सल्ला. डे टे्रडिंग पध्दतीत शंभर टक्के बरोबर अंदाज किंवा शंभर टक्के चुकीचा अंदाज असे काहीही नसते. ट्रेडरनी आपला व्यवहार (ट्रेड) ७० टक्के यशस्वी करायचा असतो. म्हणजे जर दहापैकी सात वेळा नफा केला आणि तो नफा तीन ट्रेडमध्ये झालेल्या नुकसानीपेक्षा जास्त असेल तर डे टे्रडिंग यशस्वी झाले असे म्हणावे. डे टे्रडिंंगचे नियम आणि व्यूहरचना फक्त डे ट्रेे्रडिंगसाठीच उपयुक्त असते. डे ट्रेे्रडिंग करताना १० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान ही धोक्याची पातळी असते. असे नुकसान झाले तर कामाची पद्धत बदलायची नितांत गरज आहे असे समजावे. नुकसानीचा अडसर आणि नफा वसुली हे दोन्ही आधीच ठरवून काम करावे. नाहीतर काय होते ते समजण्यासाठी एक छोटी गोष्ट सांगतो. आफ्रिकेतले आदिवासी माकड पकडण्यासाठी माकडाच्या मानसिकतेचा फायदा उठवतात. एका अरुंद गळ्याच्या मातीच्या बुधल्यात भाजलेले दाणे ठेवून बुधला झाडाच्या फांदीला बांधला जातो. सुरुवातीला माकड भीत भीत हात आत घालून मिळतील तेवढे दाणे खाते. दोन घासानंतर माकडाची हाव वाढते आणि माकड मुठीत जास्तीत जास्त दाणे भरून हात बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. बुधल्याची रचनाच अशी असते की मूठ वळल्यावर हाताचा पंजा बाहेर येत नाही. पण माकडाची हाव माकडाला काही मूठ सोडू देत नाही. या प्रयत्नात माकड इतके रंगून जाते की त्याच्या मागून हळूच जाऊन शिकारी माकडाला पकडतो. बघा तुमच्या काम करण्याच्या पध्दतीत आणि माकडाच्या गोष्टीत काही साम्य आहे का? असेल तर मूठ सोडून द्या. एकाच वेळी मूठभर दाणे खाण्यापेक्षा हातात येतील इतकेच दाणे एका वेळी खा.

तर सर्वप्रथम बघू या पॅराबोलिक सार.पॅरॅबोलीक सार हा एक बाजाराचा कल दर्शवणारा इंडिकेटर आहे. सार म्हणजे एस. अँड आर. स्टॉप अँड रीव्हर्स. हा इंडिकेटर कलदर्शक (ट्रेंड इंडिकेटर) म्हणून वापरता येतोच आणि त्याच सोबत स्टॉप लॉस (तोट्याला अडसर) निश्‍चित करण्यासाठी याचा वापर करता येतो. आता पॅरॅबोलिक सारचे गणित कसे करायचे हे शिकण्यापेक्षा त्याचा उपयोग करून नफा कसा कमावता येईल त्याचा विचार करू या. सोबत जोडलेला आलेख बघा. या आलेख रेषेच्या वर आणि खाली जे ठिपके दिसत आहेत ते आहेत पॅरॅबोलिक सारचे. जर ठिपके रेषेच्या वर दिसायाला सुरुवात झाली तर समभागाचे भाव कमी होणार हे गृहीत धरून चला. रेषेच्या खाली उमटणारे ठिपके म्हणजे समभागाचा भाव वर जाण्याची चिन्हे. आता या समभागात रेषेच्या खाली दुसरा ठिपका उमटल्यावर खरेदी करायची. ज्या दिवशी कल बदलून ठिपका रेषेवरच्या बाजूस उमटेल तेव्हा सौदा बरखास्त करायचा. विक्रीसाठी अगदी उलट तंत्र वापरायचे. आता असे बघा की आज खरेदी केली तर कालचा पॅरॅबोलिक सार हा स्टोपलॉस म्हणून वापरता येतो. उद्या खरेदी केली की आजचा पॅरॅबोलिक सार स्टोप लॉस वापरता येतो. म्हणजेच खरेदी किंवा विक्रीच्या संकेतासोबत सरकता स्टॉप लॉस म्हणूनही या इंडिकेटरचा वापर करता येतो. एक काळजी मात्र जरूर घ्यावी. १४ किंवा २१ दिवसांची सरासरीसुध्दा सोबत वापरावी. दोन्ही इंडिकेटर एकच दिशा दर्शवत असतील तर निर्णय घेणे सोपे जाते. डे ट्रेे्रडिंगसाठी पॅरॅबोलिक सारचा वापर करू नये. कारण हा इंडिकेटर थोडा हळूहळू संकेत देतो. परंतु पाच किंवा दहा दिवसांसाठी प्रवेश करण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी हा उत्तम आधार आहे.

सोबत जोडलेला निफ्टीचा आलेख बघा. पॅराबोलीक सार बघून सहज बाजाराच्या कलाचा अंदाज करता येतो. नुकसानीचा अडसर म्हणूनही त्याचा वापर करता येतो. हे आलेख त्याच स्वरूपात रोजच्या रोज ताजे मिळतात.

ज्यांना डे ट्रेे्रडिंगसाठीच बाजारात यायचे आहे त्यांना पिव्हॉट पॉइंट्स ख्रीज दुसरा सोपा पर्याय नाही. पिव्होट म्हणजे समभागाच्या बाजारभावाची अशी पातळी की जेथून बाजाराची दिशा बदलते. या पातळीवर प्रवेश करून नफा कमावणारे अनेक ट्रेडर बाजारात आहेत. पिव्होट पॉइंट जरी एकच असला तरी त्यासोबत त्या बाजारभावाशी निगडित अशा सहा पातळ्या असतात. त्यापैकी तीन होकाराच्या पातळ्या तर तीन नकाराच्या पातळ्या. म्हणजे प्रवेशाच्या सोबत नफा वसुलीच्या तीन पातळ्या किंवा तोटयाला अडसर घालणार्‍या तीन पातळ्या. सोबत उदाहरण म्हणून हीरो होंडाच्या २६/५/२०११ साठी उपयुक्त पिव्होट लेव्हल दाखवल्या आहेत. या पातळ्यांचे अंकगणित आदल्या दिवसाचा हाय-लो-क्लोज यावरून केले जाते. या पातळ्यांचा फॉर्म्युला शिकण्यात वेळ घालवू नये कारण इंटरनेटवर अनेक संस्थळावर या किमती तयार मिळतात.

८९९.४० नकाराची तिसरी पातळी
१८५०.९५ नकाराची दुसरी पातळी
१८२८.५० नकाराची पहिली पातळी
१८०२.५० पिव्होट
१७८०.०५ होकाराची पहिली पातळी
१७५४.०५ होकाराची दुसरी पातळी
१७०५.६० होकाराची तिसरी पातळी

आता या पातळ्या वापरायच्या कशा ते बघा. पिव्होट १८०२ प्रवेशासाठी वापरायची. नकाराची पहिली पातळी १८२८म्हणजे नफा वसुलीची पहिली संधी. होकाराची पहिली पातळी १७८० म्हणजे बाजाराने अचानक घुमजाव केले तर माघारी फिरण्याची पहिली संधी. काही वेळा असे होईल की प्रवेशासाठी संधी मिळणार नाही. खुलता भावच समजा १७८० पेक्षा कमी आला तर किंवा खुलता भाव १८२८च्या वर आला तर काय करायचे? काही नाही करायचे. आज व्यापाराची संधी नाही असे समजून कार्टून नेटवर्क बघत दिवस आनंदात घालवायचा.
या पिव्होट पॉइंटसीचा उपयोग ताबडतोब करण्यापेक्षा आधी पाटी-पेन्सील घेऊन चार ते पाच कंपन्यांच्या पिव्होट पॉइंटसोबत लुटुपुटीचे सौदे करून बघा. (मॉक ड्रिल) साधारण आठवड्याभरात हे पॉइंटस् कसे वापरायचा याचा अंदाज येईल.

हा झाला पिव्होट पॉइंटचा प्राथमिक अवतार. या प्राथमिक अवतारावर हात बसला की फेबोनासी पिव्होट आणि मेकॅरीला लेव्हलस वापरा. विशेषत: केमेरीला लेव्हल वापरल्यास यशाची खात्री ७० टक्क्यांपेक्षा जास्त मिळू शकते.
shreemant2011@gmail.com
(लेखक गुंतवणूक प्रशिक्षक आहेत.)
सौजन्य:- फुलोरा, सामना ०४०६२०११.

No comments: