Saturday, November 05, 2011

मोकाट लांडग्यांचा दिवस - २५

 गेल्या सोमवारी पुन्हा एकदा लांडगा आला रे आलाची भूमिका उठली आणि काही मिनिटातच बाजार कोसळायला सुरुवात झाली. आता नक्की ‘डेंजर लांडगा’ कोणता याबाबत मात्र संभ्रमावस्था होती.
दिवसाची सुरुवात जीटीएल कंपनीचे भाव 50 टक्क्यांनी घटल्यामुळे झाली. -Green Ridge Properties, Cosmo Advisory Services, Reckon Trading, Aerolite Advisory Services, Cross Link Trading, Plasma Advisory Services and Savyasachin Estates- एकाच वेळेस एक्कावन्न लाख समभागाची विक्री झाली. या विक्री करणार्‍या कंपन्या विक्री का करत आहेत हे न कळल्यामुळे मंदीवाल्यांनी आणखी जोरात विक्री केली. परिणामी समभागधारकांच्या गुंतवणुकीची किंमत एकाच दिवसात बासष्ठ टक्क्यांनी कमी झाली. येत्या काही दिवसात हिंदी सिनेमात जसे सगळं काही झाल्यावर पोलीस येतात तशी सेबीला जाग येईल आणि चौकशीचे सत्र होईल.
हा दिवस लांडगे मोकाट फिरण्याचा असावा. अनेक समस्यांचे लांडगे फिरताना दिसत होते. मॉरीशसमध्ये स्थापन झालेल्या कंपन्यांवर कर वाढवण्याची बातमी आली. ही आवई गेल्या वर्षी पण आली होती आणि बाजार पडला होता. या वर्षी पुन्हा एकदा तीच बातमी आणि पुन्हा एकदा विक्रीचे वादळ आले. ही बातमी गळ्याखाली उतरत नाही तोच ग्रीसच्या दिवाळखोरीचा प्रश्‍न उभा राहिला. काही जणांच्या मते सोमवारची पडझड ही ग्रीस दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असल्याने झाली. विदेशी वित्तसंस्थांना हे कारण विक्री करण्यासाठी पुरेसे होते. प्रत्यक्ष पाहता ग्रीसची परीस्थिती पण फारच वाईट आहे. ग्रीसच्या दरडोई उत्पन्नाच्या 153 टक्के कर्ज आहे. आकडयात सांगायचे झाले तर हे कर्ज 482 बिलीयन डॉलर्स इतके आहे. गेल्या वर्षभरात पन्नास हजार कारखाने बंद पडले आहेत. परिणामी सहापैकी एक कामगार कामावर जातो आहे. येत्या पंधरा दिवसात 85 बिलीयन डॉलर मदत आली नाही तर ग्रीस देश दिवाळखोर होईल. आंतराष्ट्रीय बाजारपेठेत देश दिवाळखोर होणे म्हणजे त्यापाठोपाठ आणखी काही देश पण त्याच मार्गानी जाणार हे निश्चित. हा लांडगा फार धोकेबाज म्हणून विदेशी वित्त संस्थांनी तडाखेबंद विक्री केली. त्याचवेळी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या केजी बेसीन या प्रकल्पात काहीतरी लिपापोटी झाल्याची आवई आली आणि देशी गुंतवणूकदारांनी रिलायन्सची विक्री सुरू केली. खरे सांगायचे झाले तर गेल्या दोन वर्षात या काउंटरवर काहीच हलचल नाही, पण मंदीवाल्यांनी विक्री करून भाव पाडला. त्याच वेळी अनिल अंबानींच्या ग्रुप कंपन्यांपैकी काही कंपन्या ऍक्टिव्ह ग्रुपमधून बाहेर काढून त्याऐवजी दुसर्‍या कंपन्यांची भरती केली गेली. अंबानींच्या कंपन्या इंडेक्सचा भाग असल्याने त्याही कंपन्यांचे भाव पडले. देशी वित्तसंस्थांनी पाच-सहाशे कोटी रुपयांची खरेदी करून बाजार सावरून नेला खरा, पण दिवस मंदीवाल्यांचे आहेत हे खरेच आहे.

- एखादा मद्यपी मधुमेही रोगी डॉक्टरकडे आला की डॉक्टरची फार कुचंबणा होते. दारूमुळे कामातून जाणारे लिव्हर वाचवावे तर ग्लुकोज भरपूर द्यायला हवे आणि ग्लुकोज दिले की मधुमेह बळावणार. अशावेळी इन्शुलीनचे छोटे छोटे डोज देऊन रक्तातली साखर ताब्यात ठेवणे हा एकच उपाय डॉक्टरकडे असतो. आपली सध्याची आर्थिक परिस्थिती अशीच काहीशी आहे. पतपुरवठा आहे तसाच ठेवला तर महागाई वाढते आणि पतपुरवठा कमी केला तर विकासदर कोसळतो. दोन्हीचा समतोल साधण्यासाठी या वर्षी रीझर्व्ह बँकेने या एका वर्षात अनेक वेळा छोट्या छोट्या प्रमाणात रेपो आणि रिव्हर्स रेपोरेट वाढवले. गेल्या आठवडयातील शेवटची वाढ म्हणजे विकासदराचा हट्ट सोडून दिला असे गृहीत धरून बाजारात मंदीची लाट आली आहे. हा उपाय करून इनफ्लेशन ताब्यात येत नाही असा ठाम ग्रह विदेशी संस्थांचा झाल्यामुळे या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यातच या संस्थांनी बाजारातून 2152 कोटी रुपयांची विक्री करून भांडवल सुरक्षित ठेवण्याचा मार्ग चोखाळला आहे. अशा वेळी छोट्या गुंतवणूकदरांनी काय करावे हा मोठा यक्ष प्रश्‍न आहे. ज्या गुंतवणूकदारांनी दीर्घ मुदतीची गुंतवणूक केली आहे त्यांनी या मंदीकडे दुर्लक्ष करावे.अशा प्रकारची मंदी बाजारात येत-जात असते. डे ट्रेडर्सनी मात्र काही महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवाव्यात. पहिली महत्त्वाची बाब म्हणजे मंदी असो वा तेजी ट्रेडींग स्टॉक्स बाजारात नेहेमीच उपलब्ध असतात. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे जुन्या आधार पातळीचा आणि ट्रेडींग रेंजचा या कालावधीत उपयोग होत नाही. यासाठी ज्या समभागाचे वळण तोंडपाठ असेल त्या समभागातच काम करावे. मंदीच्या प्रदीर्घ कालावधीत जुने संदर्भ नेहेमीच कालबाह्य होत असतात.
shreemant2011@gmail.com
(लेखक गुंतवणूक प्रशिक्षक आहेत.)
सौजन्य:- फुलोरा, सामना २५०६२०११.

No comments: