Sunday, October 16, 2011

गुंतवणुकीसाठी अक्सीर इलाज - १०




मधुमेह, हृदय आणि रक्तदाबाच्या रोग्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. त्यामुळे या रोगांवरची औषधे बनवणार्‍या कंपन्या कायम फायद्यात राहणार यात काही शंका नाही. म्हणूनच गुंतवणूकदारांनी सिप्ला, सन फार्मा, रॅनबॅक्सी या कंपन्यांकडे लक्ष द्यावे. विक्री आणि नफा या दोन मुद्यांवर सिप्ला प्रथम क्रमांकावर आहे. दीर्घ मुदतीसाठी सिप्लाचा विचार जरूर करावा.

औषध बनवणे ही प्रक्रिया फार लांबलचक आणि किचकट आहे. त्यामुळे औषध कंपन्यांची नफ्याची समीकरणे रोज बदलणारी असतात. पहिली पायरी मॉलिक्युलचा शोध लावण्याची. मॉलिक्युल म्हणजे विशिष्ट रोगांवर-रोगलक्षणांवर काम करणारे रासायनिक संयुग. हे रासायनिक संयुग तयार करणे हे काही वर्षांचे काम असते. त्याची प्रयोगशाळेत यशस्वी निर्मिती झाली की, पुढची पायरी क्लिनिकल टेस्टची. आधी प्राण्यांवर, त्यानंतर माणसांवर या औषधाचा प्रयोग करून विदा (डेटा) जमा करून या संयुगापासून बनवलेल्या औषधाचा फायदा होईल अथवा नाही याची पडताळणी करणे, कारखान्यात निर्मिती करण्यायोग्य आराखडा बनवणे. प्रयोगशाळेतील निर्मिती आणि कारखान्यातील निर्मिती यामध्ये बरेच व्यावहारिक अडथळे असतात ते दूर करणे. सरतेशेवटी ज्या देशात त्याची निर्मिती होते त्या देशाच्या कायद्याप्रमाणे औषध बाजारात आणण्यासाठी कायदेशीर तरतुदी पूर्ण करणे आणि पेटंट घेणे. एकाच वेळी एकाच रोगासाठी मॉलिक्युल बनवण्याची खटपट करणार्‍या दहा प्रयोगशाळा असतात. ज्याचा हक्क पहिल्यांदा शाबीत होतो त्याला जास्त नफा. मॉलिक्युल तर मिळाला, पण तो शरीरात पोहोचवण्याच्या मार्गाला पण महत्त्व आहे. औषध सहजरीत्या घेण्यासारखे बनवणे (डिलिव्हरी सिस्टिम)याला पण फार महत्त्व आहे. या अनेक पायर्‍यांपैकी एक पायरी एखाद्या संशोधनामुळे कालबाह्य झाली की करोडो रुपयांचे नुकसान. तंत्रज्ञान ज्या वेगाने विकसित होत आहे त्याकडे बघितले तर दरवर्षी ही भीती वाढत जाते आहे. उदाहरणार्थ सध्या इन्सुलिन टोचून घ्यावे लागते. बायोकॉनसारख्या काही कंपन्या हेच औषध सुईने न टोचता तपकिरीसारखे नाकावाटे घेण्याच्या डिलिव्हरी सिस्टिमच्या अगदी जवळ आल्या आहेत. हे तंत्र आले की, रोजच्या दु:खदायक टोचणीतून लाखो-करोडो रुग्णांची मुक्तता होईल. सुईचे तंत्रज्ञान कालबाह्य होईल. पेटंट जीवित असेपर्यंत नफा वाढत जाईल. पेटंट संपले मक्तेदारी संपली. मक्तेदारी संपली की नफा घटला. त्यातून संशोधनाची नवी लाट रोज येत असते. काही वर्षांपूर्वी प्रतिजैविकांची लाट होती तर सध्या बायोटेकची आहे. पुढची लाट नॅनो टेक्नॉलॉजीची असेल.
हे सगळे करून व्यापारी तत्त्वावर त्याची विक्री करणे हा वेगळाच विषय आहे. संशोधकांचा ताफा-प्रयोगशाळा-क्लिनिकल टेस्ट-डिलिव्हरी सिस्टिम- पेटंट रजिस्ट्रेशन-पायलट बॅच-कमर्शिअल बॅच-मार्केटिंग या सगळ्या सव्यापसव्यासाठी हजारो कोटींचा खर्च फक्त विदेशी कंपन्या करू शकतात. त्यामुळे फारच थोड्या हिंदुस्थानी कंपन्या स्पर्धेत उभ्या राहू शकतात. तरी पण गेल्या काही वषार्ंत ही परिस्थिती सुधारून काही थोड्या हिंदुस्थानी कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारात उभ्या आहेत. परदेशी कंपन्यांची मक्तेदारी संशोधन क्षेत्रात अजूनही आहे तशीच आहे. औषध कंपन्यांना गरज असते ती फक्त आपल्यासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशाची. असा देश की, जिथे नाइलाज झाल्याशिवाय लोक डॉक्टरकडे जात नाहीत. असा देश की, जिथे स्त्रियांचे आरोग्य दुय्यम महत्त्वाचे समजले जाते. असा देश की, जिथे चाळिशीपूर्वी प्रिव्हेंटिव्ह टेस्ट करण्याकडे लोकांचा कल नसतो. आजच्या तारखेस हिंदुस्थानला मधुमेहाची राजधानी समजली जाते. हृदय आणि रक्तदाबाच्या रोग्यांची संख्या एका विशिष्ट वयात दहा माणसांमागे चार माणसांची आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. या रोगांवरची औषधे बनवणार्‍या कंपन्या कायम फायद्यात राहणार यात काही शंका नाही. या सगळ्या मुद्यांचा विचार करून गुंतवणूकदारांनी सिप्ला-सन फार्मा-रॅनबॅक्सी या कंपन्यांकडे लक्ष द्यावे. विक्री आणि नफा या दोन मुद्यांवर सिप्ला प्रथम क्रमांकावर आहे. दीर्घ मुदतीसाठी सिप्लाचा विचार जरूर करावा.



विलय आणि ताब्याचे गणित

आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा दृष्टिकोन गेल्या काही वर्षांपासून संशोधनासोबत बाजार ताब्यात घेण्याचा आहे. त्यामुळे मर्जर आणि ऍक्विझिशनची स्पर्धा बाजारात जोरात आहे. यातून गुंतवणूकदारांचा मोठा फायदा होणार आहे. साम्राज्य विस्ताराच्या पाठीमागे असणार्‍या आंतरराष्ट्रीय पालकत्व असलेल्या हिंदुस्थानी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करावयास हरकत नाही. हिंदुस्थानचेे नाव आंतरराष्ट्रीय बाजारात आणणारी फार्मा कंपनी म्हणजे रॅनबॅक्सी. दोन-तीन वर्षांपूर्वी या कंपनीची मालकी एका जपानी कंपनीकडे गेली. येती काही वर्षे अशाच प्रकारच्या देवघेवीत जाणार आहेत. जे गुंतवणूकदार आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या हालचालीकडे लक्ष ठेवतील त्यांना भरघोस फायदा होणार हे निश्‍चित आहे. उदाहरणार्थ, सॉल्वे फार्मा ही हिंदुस्थानातील जुनी कंपनी. जुने नाव ड्युफार- इंटरफ्रान, त्यानंतर नवीन नामकरण सॉल्वे फार्मा. दोन वषार्ंपूर्वी ऍबट कंपनीने ही कंपनी विकत घेतली. ही बातमी आंतरराष्ट्रीय बाजारातून आपल्या बाजारात पोहोचेपर्यंत सात-आठ दिवसांचा अवधी गेला. ज्या गुंतवणूकदारांचे या हालचालीकडे लक्ष होते त्यांच्या समभागाची किंमत एका महिन्यात दुप्पट झाली. मुन्नीचा झंडू बाम

चरक आणि सुश्रूताच्या देशातल्या काही आयुर्वेदिक देशी कंपन्यांचा उल्लेख केला नाही तर हे लिखाण अपूर्ण राहील. मुन्नीमुळे जास्तच लक्षात राहिलेल्या झंडू बामची कंपनी झंडू फार्मास्युटिकल गेल्या वर्षीपासून इमामीच्या ताब्यात गेली. गुंतवणूकदारांसाठी झंडू म्हणजे तीन वर्षांत रक्कम दुप्पट करणारे प्रमाणपत्र होते. झंडू आठवल्यावर सांडू फार्माची आठवण होईल. सांडू ब्रदर्स हे आयुर्वेदिक औषध निर्मितीतले जुने नाव सध्या विस्मृतीत गेले आहे. आजचा सांडूचा भाव फक्त तेरा रुपये आहे. झंडूच्या बामापेक्षा सुप्रसिद्ध आहे अमृतांजन बाम. आता त्या कंपनीचे नाव अमृतांजन हेल्थ केअर आहे आणि भाव आहे सहाशे तीस रुपये. आयुर्वेदिक औषधे बनवणार्‍या सगळ्या कंपन्या विखुरल्या गेल्या आहेत. काही ओटीसी प्रॉडक्ट आहेत म्हणून या कंपन्या लक्षात राहतात. संपूर्ण आयुर्वेदिक उत्पादने बनवणारी हिमालय ड्रग्ज ही कंपनी खासगी मालकीची असल्यामुळे नोंदणीकृत नाही.
- रामदास


(लेखक गुंतवणूक प्रशिक्षक आहेत.) 

No comments: