Sunday, October 16, 2011

येत्या आठवड्यात काय कराल? - ११


अर्थसंकल्पानंतरच्या काही दिवसांत शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा मोह अनेकांना पडतो. पण या दिवसांचे महत्त्व सट्टेबाजांसाठी आहे, सामान्य गुंतवणूकदारांसाठी नाही. सामान्य गुंतवणूकदारांनी अर्थसंकल्प समजून घेऊन त्यानंतर निवांत काही दिवसांनी गुंतवणूक करावी...

दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीसाठी कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक करावी, ह्याचा विचार गेल्या काही अंकांमध्ये आपण करत आहोत. गेले काही दिवस बाजार रोज पडताना दिसतो आहे. खरेदी करण्यासाठी ही वेळ योग्य आहे की बाजार आणखी खाली जाण्याची वाट बघावी, असा विचार मनात आला असेल तर हीच योग्य वेळ कशावरून, असाही उपप्रश्‍न मनात आला असेल.
जानेवारी ते फेब्रुवारी या दोन्ही महिन्यांत निफ्टीचा निर्देशांक ५२००चा तळ बघून पुन:पुन्हा वर येतो आहे. बाजारातील हवा अजूनही अस्थिरतेचीच आहे. भाववाढीच्या प्रश्‍नावर रामबाण उपाय अजूनही सरकारच्या हातात आलेला नाही. मध्यपूर्वेत आणि आफ्रिकेत येऊ घातलेल्या राजकीय बदलाची हवा अजूनही गरम असल्यामुळे पेट्रोलियमचा भाव बॅरलमागे १००डॉलरच्या वर टिकून आहे. आस्थरता संपली नाही हे रोज सोन्याच्या वाढणार्‍या भावात कळून येत आहे. मार्क फेबर या बाजारातील मोठ्या सल्लागाराच्या मते पुढील सहा महिन्यापर्यंत बाजार दबलेला राहील. ही सगळी कारणे आणि त्यांचे परिणाम याचे गणित करण्यात विदेशी संस्था हुशार आहेत, आपण फक्त ते करतील तेच करावे. आपला बाजार चालतो विदेशी अर्थसंस्थांच्या गुंतवणुकीवर.ह्या गुंतवणुकीची महत्त्वाची आकडेवारी बाजारात मिळते. विदेशी गुंतवणूक कंपन्यांनी दिवसाअखेरी नक्त खरेदी केली किंवा विक्री केली हे त्या तक्त्यात कळून येते. ही गुंतवणूक एफ ऍण्ड ओ (फ्युचर -ऑप्शन ) विभागात किती आणि प्रत्यक्ष डिलीव्हरीत किती ह्याचे आकडे पण कळतात. ही गुंतवणूक वाढताना दिसली की खरेदी करायला हरकत नाही. पोलाद, इतर धातू, ऊर्जा, अन्न, औषध, बँक या क्षेत्रांत रोज थोडी थोडी गुंतवणूक करावी. खरेदी करण्यासाठी सरासरीची पध्दत वापरावी.

पोलाद क्षेत्रात जेएसडब्लू स्टील किंवा टाटा स्टील या दोन कंपन्यांचाच विचार करावा. इतर धातूंसाठी स्टरलाईट आणि हिंदाल्को ही योग्य खरेदी आहे. ऊर्जा क्षेत्रासाठी एनएचपीसी किंवा एनटीपीसी या समभागाची खरेदी करावी. अन्न आणि अन्न प्रक्रियेसाठी ब्रिटानीया आणि नेस्लेचा विचार करावा. या दोन कंपन्यांपैकी तूर्तास ब्रिटानीयाला झुकते माप द्यावे. औषध कंपन्यांसाठी सिपला-लुपीनचा डोज घ्यावा. बँक या क्षेत्रात कुठलीही सुस्थितीतील सरकारी बँक किवा ऍक्सिस बँक हा पर्याय आहे.

Fll trading activity on NSE and BSE in Capital Market Segment (In Rs. Crores)
Category : Date : Buy Value : Sell Value : Net Value
Fll : 25-feb-2011 : 2856.3 : 3417.76 : -561.46

Dll trading activity on NSE and BSE in Capital Market Segment (In Rs. Crores)
Category : Date : Buy Value : Sell Value : Net Value
Dll : 25-feb-2011 : 1345.28 : 789.99 : 555.29




लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे तीन महत्त्वाचे टप्पे आहेत. रेल्वे अर्थसंकल्प-आर्थिक सर्वेक्षण आणि त्यानंतर केंद्रीय सर्वसाधारण अर्थसंकल्प. शेअर बाजार आणि त्यातील गुंतवणूकदारांनी या बजेटचा काय फायदा घ्यावा किंवा लोकसभेत अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर काय करावे हे आज आपण बघणार आहोत. कोणताही अर्थसंकल्प म्हणजे एक प्रस्ताव. या प्रस्तावांना मनी बिल म्हणतात. संसदेत अनेक मनी बिल पास होतात तसेच हे दोन्ही अर्थसंकल्प. परंतु या मनी बिलांकडे औत्सुक्याने आणि अपेक्षेने बघायची बाजाराची पध्दत आहे.फार पूर्वीपासून बजेट किंवा अर्थसंकल्पाचा बाऊ करण्याची आपली मानसिकता आहे. अर्थसंकल्पाच्या अगोदर दोन दिवस आर्थिक सर्वेक्षण सादर करण्याची पध्दत आहे. सर्वेक्षणात आर्थिकदृष्ट्या मूलभूत महत्त्वाची आकडेवारी सादर केली जाते. त्याअगोदर महिनाभर वेगवेगळ्या औद्योगिक गटांतर्फे त्या त्या गटांची विशलिस्ट अर्थमंत्र्यांसमोर ठेवली जाते. हा एका गाजावाजा करण्याचा प्रयत्न असतो. शेवटच्या क्षणी अर्थसंकल्पात फारसे फेरबदल केले जात नाहीत. मग या अर्थसंकल्पाचे महत्त्व काय? महत्त्व असे की अर्थसंकल्पातून सत्तेत असलेल्या पक्षाचा राजकीय मसुदा कळतो. ज्याला पोलिटिकल विल म्हणतात. त्याचा अंदाज या अर्थसंकल्पातून कळतो. करांच्या आकारणीच्या पध्दती त्याच राहतात. काही सवलती दिल्या जातात, काही काढून घेतल्या जातात. प्राप्तीकर आणि इतर वैयक्तिक करांसाठीचे प्रस्ताव आणि बदल एप्रिल २०१२ नंतर येणार हे गेल्या वर्षीच कळले आहे. पेट्रोलची दरवाढ आधीच झाली आहे. जीएसटी चा ठराव लोकसभेत जेव्हा पास होईल तेव्हा त्याचा औद्योगिक क्षेत्रावर काय परिणाम होईल ते कळेल. म्हणून माझे मत असे की बाजारात अर्थसंकल्पाच्या दिवसाचे महत्त्व सट्टेबाजांसाठी, सामान्य गुंतवणूकदारांसाठी नाही. सामान्य गुंतवणूकदारांनी अर्थसंकल्प समजून त्यानंतर खरेदी करायची आहे. एक उदाहरण रेल्वे अर्थसंकल्पाचे घेऊ या. या अर्थसंकल्पापूर्वी दरवर्षी टीटाघर वॅगन ,कालिंदी रेल, टेक्समॅको अशा कंपन्यांचे भाव वाढतात. अर्थसंकल्प सादर झाल्यावर त्याची चर्चा होण्यापूर्वीच वाढलेले भाव कमी होतात. त्यानंतर पुढचा अर्थसंकल्प येईपर्यंत या कंपन्यांच्या भावात खरेदी-विक्री करण्यासारखे काही उरतच नाही. आश्चर्याची बाब अशी की रेल्वे अर्थसंकल्पाची व्याप्ती काही हजार कोटींची असते, पण त्याचा फायदा ज्या नोंदणीकृत कंपन्यांना होतो अशा कंपन्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. रेल्वेचा सगळा महत्त्वाचा व्यापार शेअर बाजारात नोंदणी नसलेल्या कंपन्यांच्या मार्फत होतो. राहता राहिला दरवाढीचा प्रश्‍न. दरवाढ ही आलटून पालटून वेगवेगळ्या घटकांवर केली जाते. मग बाजारात या अर्थसंकल्पाच्या केवळ अपेक्षांवर सामान्य गुंतवणूकदारांनी त्याच दिवशी आपले पैसे गुंतवण्यात काय अर्थ आहे? केंद्रीय अर्थसंकल्प गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा. त्यातील काही बदल बाजाराच्या नजरेत महत्त्वाचे असू शकतात. परंतु या बदलामुळे एखाद्या कंपनीच्या भावात वाढ झाली तरी ती तात्पुरती असू शकते.



- रामदास
 (लेखक गुंतवणूक प्रशिक्षक आहेत.)
Source :- Daily Samana.

No comments: