Sunday, August 18, 2013

झटपटीत चिकन पकोडा

‘‘का य छान पाऊस कोसळतोय. अगदी भजी खाण्याचं वातावरण झालंय, पण जरा काहीतरी वेगळं पाहिजे. तीच ती नेहमीची कांदा-बटाटा भजी खाऊन कंटाळा आलाय. काय करशी, आरती?’’ प्रतापची फर्माईश!
‘‘नो प्रॉब्लेम! आज चिकन पकोडा करूया.’’ ‘‘पण तो होईपर्यंत पाऊस थांबायचा.’’
‘‘अरे नाही, पटकन होतो. अर्धा किलो बोनलेस चिकन आहे घरात. त्याचे साधारण बोटभर लांबीचे तुकडे करणार. त्याला १ टीस्पून आलं-लसणाची पेस्ट चोळून ठेवणार. मग भजीचं पीठ बनवायचं. १ वाटी बेसनमध्ये अर्धा टीस्पून धणे पावडर, अर्धा टीस्पून जिरे पावडर आणि अर्धा टीस्पून गरम मसाला पावडर घालायची. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि एक टीस्पून लाल मिरची पावडर घालणार. जरासा १ चिमूटभर सोडा घालून बटाटा भजीप्रमाणेच पीठ बनवायचे आणि चिकनचे तुकडे एकेक करून या पिठात घोळवून डीप फ्राय करायचे.
गरम-गरम चिकन पकोडे, हिरव्या चटणीबरोबर किंवा टोमॅटो स्केचपबरोबर सर्व्ह करायचे... आणि मस्त पावसाची मजा घेत फस्त करायचे. चल आता जितक्या पटकन रेसिपी सांगितलीस तेवढीच पटकन बनव म्हणजे झालं. ‘‘प्रताप प्रोटीन या अन्नघटकाची आवश्यकता केवळ वाढत्या वयाच्या मुलांसाठीच नाही तर सर्वांनाच असते. शरीराची झीज भरून काढण्याचे काम प्रोटीन करते. चिकन हा प्रोटीनचा सगळ्यात चांगला स्रोत आहे. यात सॅच्युरेटेड फॅटस्चे प्रमाण रेड मीटपेक्षा खूप कमी असते. तसेच त्यात पोटॅशियम, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. कर्बोदके कमी प्रमाणात असतात. त्यामुळे सर्व स्तरांतील लोकांनी मुबलक प्रमाणात खाण्यासारखा हा एक पौष्टिक पदार्थ आहे.

आरती मांजरेकर
सौजन्य - फुलोरा, सामना १७०८१३

No comments: