सासू-सुनेचं नातं असं नुस्तं म्हटलं तरी भांडणाचे आवाज कानात घुमू लागतात. पण ’मॉडर्न डेज सासू-सून’ असलेल्या घरांमध्ये जरा डोकावून पाहिलं की लक्षात येतं, ‘अरेच्या! वादविवाद कायम असले तरी बोलण्यातले विषय बरेच बदललेत. हे नातंच बदलतंय का हळूहळू!’
घरं म्हटलं की, त्यात अनेक नाती आणि त्यातले वाद असणारच...वाद म्हटलं की, हमखास आठवणारं एकच नातं, सासू-सुनेचं!
मनुष्य या प्राण्यामध्ये तीन प्रकार असतात- सासू, सून आणि इतर! सासवांमध्येही प्रकार आहेत. सुनेशी स्वतःच्या मुलीप्रमाणे वागणार्या, सुनेच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवणार्या आणि इतर!
या इतर सासवा पहिल्या प्रकाराच्या जरा अलीकडे आणि दुसर्या प्रकारच्या बर्याच पलीकडे असतात. त्या उगीच काहीबाही करत असतात. सुनेला लहानसहान गोष्टींमध्ये डिवचणं हा त्यांचा छंद असतो.
सुनांचेही प्रकार आहेत. सासूला स्वतःची आई समजणार्या, सासूला श्वास घेणं मुश्कील करणार्या आणि इतर! इतर वर्गातल्या सुना सासूला सतत डिवचण्याचं काम करत असतात.
आधीचे दोन प्रकार तसे ‘नॉट सो मच इन फॅशन’ असल्यामुळे फक्त ‘इतर’ वर्गाबद्दलच बोलूया.
या नात्याइतकं अजब रसायन दुसरं नाही. ‘तुझं माझं पटेना, तुझ्यावाचून करमेना’ ही म्हणच या नात्यासाठी बनवली गेली असावी. सनातन काळापासून या नात्याला वादाचा शापच आहे. बदलत्या काळात वादाचे विषय बदलले इतकंच. हो पण, आपला मुलगा/नवरा कसा दुसरीच्या मुठीत आहे यावर आजही सासवा-सुनांचं एकमत असतं. असो.
अतिशयोक्ती वाटेल, पण एक गमतीशीर किस्सा हल्लीच ऐकायला मिळाला. नवीन घराचं काम करताना सासूच्या बेडरूमला लाल रंगाचं फर्निचर चांगलं दिसणार नाही हे सुनेने सर्वांना (सासू सोडून) पटवून दिलं. काम पूर्ण झाल्यानंतर सासूने रंगारी, ग्रिलवाला, सुतारांसकट सगळ्या कामगारांना एका रविवारी घरी मटणाच्या जेवणाचं आमंत्रण दिलं. त्या रविवारी सासूबाईंची तब्येत अचानक बिघडली याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल.
दरवेळी सासूच अशी वागते असंही नाही. ओळखीतल्या एक सासूबाई इतक्या हौशी आहेत की, दिवसभर घरकामांमध्ये रेंगाळणार्या सूनबाईला त्यांचा राग येतो. या सासूबाई प्रवचन, भजनी मंडळ, पिकनिक असं सगळं करतात. तरीही त्यांच्याकडे केसांना मेंदी लावणं, फेशिअल करणं, शॉपिंग यासाठी वेळ असतो. इतकं कमी की काय, म्हणून त्या दिवाळीचा फराळ, उन्हाळ्यात पापड, कुरड्या हे सगळंही करतात. यंदाच्या दिवाळीत सुनेला फेशियल केल्यानंतर लगेच दुसर्या दिवशी त्यांनी चकल्या तळायला बोलावलं म्हणून राग आला होता.
ही प्रातिनिधिक उदाहरणं झाली, पण या प्रसंगांवरून एक लक्षात आलं की, सासू-सून हे नातंही आता बदलतंय. सासूबाईंसाठी वेगळी रूम आणि त्यातली रंगसंगती ठरवण्याचा त्यांना अधिकार आहे. त्याचवेळी सुनेलाही त्यात हस्तक्षेप करण्याचा, आपलं मत मांडण्याचा अधिकार मिळतोय. एकाच घरात सासू-सून मिळून पार्लरच्या अपॉइंटमेंट घेताहेत, एकमेकींच्या डिझायनर साड्या एक्सचेंज करताहेत. अनेक सासवांनी स्मार्ट सूनबाईंकडून शिकवणी घेत स्वतःमध्ये सकारात्मक बदल केलेले दिसतात. आपणही नीटनेटकं राहायला हवं, बदल म्हणून तरी घराबाहेर पडायला हवं हे स्वतःला समजावून दिलंय.
शिकलेल्या, नोकरी करणार्या सुना, बायकोला समजून घेणारे-सन्मानाने वागवणारे नवरे, बदलत्या जगाचं भान येत असलेल्या सासवा असे अनेक घटक याला कारणीभूत आहेत. मागच्या पिढीतल्या कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या अनेक जणी आज सासूच्या भूमिकेत आहेत. त्यांना बदलणारं, विस्तारणारं जग माहितीचं आहे. या सगळ्याचा परिणाम एका अत्यंत नाजूक नात्यावरही होतोय.
ओळखीतल्या एक सासूबाई पार्टटाइम नोकरी करतात. त्यांची सून मात्र काही कारणांनी घरीच असते. या सासूबाई रात्री उशिरा, कामाच्या ठिकाणी जेवूनच घरी परततात. त्यानंतर त्यांच्या आवडीच्या सीरियल्स पाहत जागरण करतात आणि सकाळी उशिरा उठतात. घराबाहेर पडल्यानंतर सून काय करते, काय जेवण बनवते असल्या गोष्टींसाठी त्यांच्याकडे मुळीच वेळ नसतो. इतकंच नाही, अनेक छोट्या-मोठ्या समारंभांनाही त्या सुनेलाच सांगतात, ‘तू जाऊन ये. तेवढाच तुझा टाइमपास.’ त्यामुळे, भिशी मंडळ, किटी पार्टी, सोसायटीच्या पूजा वगैरेंमध्ये सूनबाईंचीच हजेरी असते. यात सुनेला चिडवण्याचा हेतू नसतो. उलट सुनेनं घराबाहेर पडावं यासाठी त्या प्रयत्न करत असतात. आणखी एक सासूबाई तर सुनेसाठी शॉपिंगही करतात. हळदीकुंकवाच्या भेटवस्तूंपासून तिच्या कपड्यांपर्यंत सगळं काही. लग्नानंतर चांगला टेलर, पार्लर, वडापावची गाडी या सगळ्यांशी सुनेची ओळख सासूबाईंनीच करून दिली.
हे नातं बदलण्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा घटक हा टीव्ही असावा. अगदी जवळच्या नात्यातल्या एका सुनेने सीरियल्स पाहण्याचं कारण सांगितलं होतं,‘ ही माझ्या आयुष्याची फँटसी आहे. या बायकांसारखं आयुष्य असलेलं मला आवडलं असतं, पण ते तसं नाही. मग बघण्याची तरी मजा घ्यायची.’
काहीही असलं तरी या कार्यक्रमांनी सासू-सुनेला किमान काही तास एकत्र ठेवण्याची किमया केली आहे. कार्यक्रम संपल्यानंतर त्यातल्या प्रत्येकीची साडी, मंगळसूत्राचं डिझाईन, एक्स्ट्रा मॅरेटिअल अफेअर्स अशा अनेक विषयांवर चहाच्या घोटासोबत हल्ली गप्पा रंगतात.
हा बदल नेमका काय आहे? याची प्रचिती काही दिवसांपूर्वीच आली. एका इंग्रजी वृत्तपत्राची गुळगुळीत पुरवणी हाताळत सासूबाईंनी विचारलं, ‘या विद्या बालनचा कोणी बॉयफ्रेंड नाही अजून?’