Sunday, December 28, 2014

न्यूरोमॉड्युलेशन मेडिकेअर


जिभेचा उपयोग केवळ चवीसाठी नसून मेंदूच्या आजाराने ग्रस्त रुग्णाचा जीव वाचविण्यासाठीही होऊ शकतो हे सिध्द झाले आहे... मानवी शरीरातील मेंदू हा सर्वाधिक संवेदनशील अवयव आहे. एखादा छोटा अपघातही मेंदूला गंभीर दुखापत करू शकतो. अशावेळी त्या रुग्णाचा जीव तरी धोक्यात असतो अथवा त्याला कायमचे अपंगत्व येऊ शकते. पण आता असे धोके टाळता येणार आहेत. संशोधकांनी केलेल्या एका प्रयोगात जीभ आणि मेंदू यांचा परस्परांशी संबंध असून जिभेच्या रक्तवाहिन्या थेट नर्व्हस सिस्टमशी जुळलेल्या असल्याने. न्युरोमॉड्युलेशन हे तंत्र वापरले. त्यामुळे मेंदूतील नक्की दोष ओळखून त्यावर योग्यवेळी योग्य उपचार करणे सोपे झाले आहे.

सौजन्य :- फुलोरा सामना २८१२१४ 

Sunday, December 21, 2014

सोशल नेटवर्किंगमधील गुन्हे

आजकालच्या संगणक युगात विविध ई-फ्रॉइस व्यतिरिक्त सर्वाधिक जास्त गुन्हे हे सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून घडतात. आजच्या संगणक युगात संगणक क्रांतीमुळे अनेकजण संगणकाचा अमर्यादित वापर करतात. संगणक व इंटरनेट युगामुळे अनेक व्यक्ती एकमेकांच्या सहज संपर्कात राहू शकतात व त्यातून विविध प्रकारे माहितीची देवाणघेवाण होते.
संगणक व इंटरनेटमध्ये सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या प्रकारात सोशल नेटवर्किंग हा एक महत्त्वाचा प्रकार आहे. सोशल नेटवर्किंग म्हणजे एखाद्या विशिष्ट संकेतस्थळाचा (वेबसाईट) अथवा ऑनलाइन चॅटिंगचा (गप्पागोष्टींचे ठिकाण) वापर करून अनेक लोक एकमेकांच्या संपर्कात राहणे व एकमेकांच्या माहितीची देवाणघेवाण करणे. गेल्या एका दशकात अशा अनेक वेबसाईट व चॅटिंग रूम तयार व लोकप्रिय झाल्या आहेत. त्याचा वापर करून आपण आपले फोटो, आवडीनिवडी व इतर अनेक गोष्टी एकमेकांना पाठवू शकतो. यातील लोकप्रिय प्रकार म्हणजे याहु मेसेंजर, ऑर्कुट, फेसबुक, लिकेंडीनसारखी संकेतस्थळे ज्याचा सर्रास वापर करून अनेक व्यक्ती एकमेकांशी संपर्क ठेवतात. त्याव्यतिरिक्त सोशल नेटवर्किंगचा वापर करून अनेक ई-पोर्टलस विविध प्रकारे लोकांना नवनवीन सेवा प्रदान करतात. उदा. विवाहविषयक नोंदणी तसेच नोकरीच्या शोधाकरिता वापरण्यात येणारी अनेक संकेतस्थळे.
अनेक लोक या सर्व संकेतस्थळांचा वापर करतात व त्याचा लाभ घेतात. परंतु गेल्या काही वर्षांत ‘सोशल नेटवर्किंग’च्या माध्यमातून अनेक लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली आहे व दिवसेंदिवस ही संख्या वेगाने वाढत आहे. ऑर्कुट/फेसबुक अगदी विवाहविषयक संकेतस्थळांचा वापर करून अनेक गुन्हेगार दररोज नवनवीन पद्धतीने लोकांना फसवतात. वर्षभरापूर्वी ‘ऑर्कुट’ या संकेतस्थळाचा वापर करून मुंबईतील एका श्रीमंत माणसाच्या मुलाचा खंडणीसाठी झालेला खून तसेच एका विवाहविषयक संकेतस्थळाचा वापर करून अनेक महिलांशी लग्न करून त्यांची आर्थिक लुबाडणूक असे एक ना अनेक गुन्हे सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून घडलेले आहेत. सोशल नेटवर्किंगमध्ये लोक आपली महत्त्वाची माहिती त्या संकेतस्थळावर ठेवतात व त्यानंतर त्या संकेतस्थळावर भेट देणारे इतर लोक त्या माहितीच्या आधारे त्या व्यक्तीशी संपर्क करतात. बहुतांशी वेळेस अनेक लोक आपली सर्व खरी माहिती अगदी आपल्या फोटोसहित या संकेतस्थळावर ठेवतात. त्यामुळे सराईत गुन्हेगार या माहितीचा गैरवापर करून अनेक फसवणुकीचे गुन्हे करतात. ‘ऑर्कुट’ या संकेतस्थळावर बदनामीकारक मजकूर छापून एकमेकांची बदनामी करणारे अनेक गुन्हे आज दाखल आहेत. विशेषत: महिलांच्या बदनामीचे. याहू मेसेंजरवरील चॅटिंगचा वापर करून अनेक गुन्हेगार विविध प्रकारचे ई-फ्रॉडस (हॅकिंगचे) गुन्हे तर करतातच. त्याचबरोबर ते समोरील व्यक्तीचे आर्थिक नुकसानदेखील करतात. गेल्या वर्षी काही अतिरेक्यांनी एका विवाहविषयक संकेतस्थळाचा वापर करून अनेक बनावट ‘पॅनकार्ड’ तसेच इतर फोटो आयडेंटी कार्डस् बनवून त्याचा कसा गैरवापर केला हे आपणास माहीतच आहे.
amitghodekar@hotmail.com
- अमित घोडेकर

सौजन्य  :- फुलोरा सामना २११२१४

इंटरनेटवरुन मोजमाप टेक्नोपॉइंट

जर तुम्हाला संगणकापासून अगदी फ्रीजपर्यंत काहीही घ्यायचं आहे आणि त्यातलं सगळ्यात चांगला काय असा प्रश्‍न पडला असेल तर compareindia.in.com:: हे तुमच्यासाठी एक सर्वोत्तम संकेतस्थळ आहे. तुम्हाला जर चंगला एक टनाचा ण् घ्यायचा असेल तर तुम्हाला फक्त ‘‘एक टनचा AC’’ एवढंच सर्च करायचं आहे मग हे संकेतस्थळ तुम्हाला एक टनचा AC मध्ये असणारे सर्व AC आणि त्यांची किमत दाखवेल, त्यानंतर तुम्हाला ज्या ज्या कंपनीच्या AC ची माहिती हवी असेल त्या त्याAC ला तुम्ही एकमेकांसोबत compare करू शकता. एकदा का तुम्ही हे केलं की तुम्हाला त्या सर्व ACचं एकमेकांसोबत केलेलं मोजमाप कळू शकेल. त्याचबरोबर त्याची तांत्रिक माहिती आणि किंमत व कोणत्या ठिकाणी हा AC तुम्हाला स्वस्तात मिळू शकेल याची देखील माहिती कळू शकेल..
http://www.mysmartprice.com/::
हे संकेतस्थळदेखील तुम्हाला म्दस्जग्ह्ग् प्रमाणेच सर्व वैशिष्ट्य देते याची एक खास गोष्ट म्हणजे हे संकेतस्थळ इतर अनेक ई-शॉपिंगची सोय असणार्‍या संकेतस्थळाबरोबर जोडले आहे. त्यामुळे एकदा का वस्तू ठरवली की तुम्ही दुसर्‍या संकेतस्थळावरून ती विकत देखील घेऊ शकता.
http://www.naaptol.com: 
यावर देखील तुम्ही कोणत्याही गोष्टीचं मोजमाप करू शकता त्याचबरोबर त्याची तांत्रिक माहिती आणि किंमत व कोणत्या ठिकाणी ही वस्तू तुम्हाला स्वस्तात मिळू शकेल याची देखील माहिती काढू शकता. यामध्ये बेस्ट डील किंवा हॉटडीलचा वापर करून तुम्ही स्वस्तात एखादी गोष्ट विकत घेऊ शकता. एखादी गोष्ट इथून विकत घेतली की तुम्हाला पुढील खरेदीसाठी काही रिवार्ड गुण दिले जातात व त्याचा वापर करून तुम्ही पुढच्या खरेदीमध्ये सवलत मिळवू शकता.
http://www.mouthshut.com:
हे संकेतस्थळदेखील अतिशय लोकप्रिय आहे याची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या संकेतस्थळावर तुम्ही फक्त वस्तूचे नाव टाकायचं. ज्यांनी कुणी ती वस्तू घेतली असेल त्याचे त्या वस्तू संदर्भातील अभिप्राय त्यांचे रेटिंग्ज देखील कळतील 
Dheeraj.bedarkar@gmail.com - धीरज बेदरकर

सौजन्य :- फुलोरा, सामना २११२१४

आयुर्वेद मातृसुख

हनुमंतापासून ते झाशीच्या राणीपर्यंत अशी विभूती आपल्या पोटी जन्माला यावी ही प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. पण हनुमंताला जन्माला घालणार्‍या अंजनी मातेची तपसाधना, इच्छाशक्ती याचा कोणच विचार करीत नाही. आता तर काय, गर्भाशयच विकत मिळतात. मग माता आणि मातृसुख यांचा विचार करणं सोडलंय सगळ्यांनी. आजकाल फक्त एकच पैसा पैसा आणि पैसाच.
एखाद्याचे आयुष्य किती खडतर असते हे दामणे यांच्या केसमधून जाणवलं. दोन वेळा गर्भाशयात गर्भ राहिलाच नाही. त्यांच्या सांगण्यावरून एक कारण पुढे आले ते म्हणजे ‘भीती.’ त्यांच्या आईला तीन मुली आणि सासरकडून मुलगा व्हावा म्हणून इच्छा या द्विधा भीतीमध्ये सापडलेली ती माऊली. त्या भीतीपोटी गर्भधारणा होऊनही गर्भ टिकत नव्हता. त्यांना बघताक्षणी ‘चिंतानाम् च अतिचिंतनात...’ या श्‍लोकाची प्रचीती येत होती. त्यांना गांभीर्य सांगितले. त्यांनी घरच्यांना समजावून सांगावे म्हणून विनंती केली. त्याप्रमाणे घरच्या मंडळींना समजावून सांगितले की, घरात येणारा जीव मुलगा आहे की मुलगी आहे, यावर बोलण्यापेक्षा त्याला गर्भाशयात असताना आणि नंतरदेखील सकारात्मक दृष्टी द्या. त्यांना ते पटलं. दामणे यांना मासिक पाळीदरम्यान पाळावयाचे नियम सांगितले. त्यासोबत गर्भस्राव करण्याची गर्भाशयाची सवय मोडण्यासाठी गर्भाशय शोधन करून मनाचे आणि शरीराचे बृहण केले. सात महिन्यांत त्यांना गर्भधारणा झाली. त्यांनी सोबत नऊ महिने गर्भसंस्कार घेतल्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी झाली. मुला-मुलीच्या रूपात शिवाजी जन्माला यायला वेळ लागत नाही. त्याला गरज लागते ती फक्त सकारात्मक विचारांची.
गर्भस्राव (Abortion miscarrage) होण्याची कारणे- मासिक पाळीदरम्यान परिचर्या न पाळणे.
- जगाचा मनस्ताप डोक्यावर घेऊन फिरणे.
- शरीराला व मनाला नकारात्मक बनविणे.
- समाजात वावरताना स्त्रीत्व विसरल्याने ममत्व कमी होणे.
- चुकीचे खानपान आणि सवयी.
प्रश्‍न तुमचे...
आहारात तूप का असावे? - भक्ती सावंत (भांडुप)
- तूप खाल्यावर रूप दिसते अशी म्हण आहे. तूप हे मंथनातून तयार होणारा पदार्थ आहे. तुपाचा दिवा हा तेजापेक्षा संथ आणि जास्त काळ टिकतो. तूप हे आपल्या शरीराची व्यवस्था मग त्या पाचनापासून ते एकाग्रतेपर्यंत या सर्वांना छान चालवते. त्यामुळे तुपाच्या दिव्याप्रमाणे आयुष्य जास्त काळ टिकवते. अगदी स्वस्थ. खाताना फक्त अपचन होणार नाही याची काळजी घ्या.
आमच्या घरी न्यूडल मैदा बेसन इतर स्नॅक वारंवार बनवले जातात. माझी पुतणी साडेचार वर्षांची आहे. तिला नाश्त्यात काय द्यावे? - शशांक ठाकूर (दहिसर)
- सर्वप्रथम खाण्यासाठी त्यांच्या मागे लागू नका आणि भूक लागेल तेव्हा त्यांच्या भुकेच्या मर्यादेत खाण्यास द्या. त्यांना नाश्त्याऐवजी मिठ न घातलेली भाताची पेज, तूपसाखर पोळी, चवनप्राश, शतावरी कल्प, भाताची खिमटी, गरमागरम थालीपीठ यांची सवय लावा. म्हणजे पचनशक्ती सुधारेल, हाडे बळकट होतील, मांसपेशी मजबूत होतील आणि तुम्हाला दवाखान्याच्या पायर्‍या झिजवाव्या लागणार नाहीत.
ayurveddeepak@hotmail.com
- डॉ. दीपक केसरकर
सौजन्य:- फुलोरा, सामना २११२१४

मस्त मौला सोल मेट

हा लॅपटॉप म्हणजे एक आक्रितच आहे. बंद असताना अंदाज येत नाही, पण परवलीचा शब्द उच्चारायचा अवकाश अलिबाबाची गुहाच उघडते जणू. कधी जुन्या अल्बममधे प्रवेश केल्यासारखं वाटतं, तर कधी वाचनालयात. कधी डिपार्टमेंटल स्टोअर, तर कधी सिनेमा हॉल, तर कधी जगाकडे उघडणारी मोठीच्या मोठी फ्रेंच विंडो.
मित्रांचा अड्डा भरवतो, गप्पांची मैफल सजवतो, माझा मूड ओळखून कधी ‘मुन्नी बदनाम’, तर कधी ‘गुलों में रंग भरे’ ऐकवतो . अर्ध्या अपुर्‍या कविता, पूर्णत्वास न गेलेल्या लेखांचे चिटोरे, स्कॅन करून ठेवलेली पुस्तकं, काही हवीहवीशी वाटणारी आणि काही अजिबात नकोशी ई मेलरूपी पत्रं सगळं सगळं जपून ठेवतो. घरकामाला मदत म्हणून कुणी घरात यावा आणि आपलं प्रतिबिंब होऊन जावा असा सोलमेट, आत्माराम!
एखाद्या काजळ संध्याकाळी गुहेत नेऊन खुष्कीच्या मार्गाने बरोबर गावी घेऊन जातो, अख्खं बालपण फिरवून आणतो आणि कुणालाही कळायच्या आत वास्तवात आणून सोडतो, कुठेही अडखळू न देता. धुळीने माखलेले पाय अन चेहर्‍यावर वडिलांना भेटून आल्याचं समाधान. पायाकडे कोण बघतंय! लोक वरवरच्या समाधानात खुश, मी लोकात खुश. हा गडी मात्र काम करत राहतो फक्त. कुठल्याही स्तुतीचं वा निंदेचं एनर्जी ड्रिंक पिताना दिसत नाही, पण सतत चार्ज्ड असतो, अलर्ट असतो. स्टॅण्ड बाय मोडमधेही अर्धा जागा असलेल्या रखवालदारासारखा. कधी कधी वाटतं भगवतगीता कोळून प्यायलाय आत्माराम.
चांगलं वाईट सगळं उघडया डोळ्यांनी बघतो, विरक्त हातांनी वेगळं करतो, वाईट गोष्टी रिसायकल करतो, पण बहुतेक काही गोष्टी कायमच्या रजिस्टरमधून काढणं त्यालाही अवघड जात असावं. कारण परवलीचा शब्द विसरून मी जेव्हा केव्हा एखादा क्षण त्याच्यासमोर थबकून उभा राहतो तेव्हा आपोआप आरसा होऊन जातो त्याचा. मग रिसायकल न झालेल्या मोहांचे, चुकांचे, गुन्ह्यांचे काही चरे दिसत राहतात, ज्याला आपल्या जगात सुरकुत्या म्हणतात. वय माझं वाढत चाललंय आणि दिसतंय त्याच्या चेहेर्‍यावर असं नशीब घेऊन आलो आहोत मी आणि माझा लॅपटॉप. आता कधी ना कधी हा आरसा तडकेल तेव्हा मी गरीब दिसेन हातात खजिना असून आणि पाठमोरा आत्माराम दूर जाताना दिसेल परवलीचा शब्द कायमचा स्वत:सोबत घेऊन.

vaibhav.writer@gmail.com वैभव जोशी
सौजन्य  :- फुलोरा, सामना २११२१४

Sunday, October 12, 2014

रताळे एक अद्भुत भाजी

रताळे ही केवळ सर्वत्र उपलब्ध, कमी किंमत असलेली व स्वादिष्ट म्हणूनच नव्हे, तर ही भाजी खाण्यासाठी अनेक कारणे आहेत.
रताळे हृदयरोग दूर करते का किंवा नियंत्रणात ठेवण्यास मदत करते का? 
- उत्तर मात्र आश्‍चर्यकारक आहे - ‘‘हो’’! रताळे हे ‘ब ६’ जीवनसत्त्वाने भरलेले आहे. ‘ब ६’ जीवनसत्व आपल्या शरीरातील होमोसिस्टाइन नामक द्रव्य कमी करते, ज्यामुळे भरपूर त्रासदायक आजारांवर नियंत्रण येते व हृदयरोगाचे प्रमाण कमी होते. 
या चमत्कारी भाजीमध्ये आणखी कोणती जीवनसत्त्वे आहेत?
- ब ६ जीवनसत्त्वाशिवाय या भाजीमध्ये सी, डी व ई जीवनसत्त्वे असतात.
या जीवनसत्त्वाचे आपल्या शरीराकरिता महत्त्व काय आहे?
- ही सारी जीवनसत्त्वे आपल्या शरीरात फार महत्त्वपूर्ण भूमिका साकार करतात. ‘ई’ जीवनसत्त्व ‘ब ६’सारखेच, ई जीवनसत्त्व एक ऍण्टीऑक्सिडेंट आहे, जे हृदयरोगाला कवचासारखे सुरक्षित ठेवते. ‘सी’ जीवनसत्त्व - सर्वांच्या माहितीनुसार ‘सी’ जीवनसत्त्व हे सर्दी व ताप यांसारख्या रोगजंतूपासून संरक्षण करते. पण फक्त काही लोकांना माहीत असेल की, हे महत्त्वाचे जीवनसत्त्व दात व हाडांच्या निर्मितीसाठी व पचन आणि रक्तपेशीच्या निर्मितीसाठी फार महत्त्वाचे ठरते. 
म्हणूनच रताळे हे फक्त लहान मुलांच्याच नव्हे, तर पौगांडावस्थेतील मुलांच्या आहारातही समाविष्ट केले पाहिजे. रताळ्याच्या सेवनाने जखमेच्या उपचाराची गती वाढते. ‘कोलाजेन’ नामक द्रव्य शरीरात तयार होऊन त्वचेचे तारुण्य टिकविण्यास मदत करते व आपणास तणावाशी लढण्यात मदत करते. त्याशिवाय आपल्या शरीराला कर्करोगाशी निगडीत टॉक्सिन्सपासून वाचविते. 
जीवनसत्त्वाची शरीरासाठी कशी मदत होते?
- ‘डी’ जीवनसत्त्व रोगप्रतिकारशक्ती वाढवते व एकूणच संपूर्ण आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. ‘डी’ जीवनसत्त्व फक्त एक जीवनसत्त्वच नव्हे, तर संप्रेरकसुद्धा आहे. हे जीवनसत्त्व आपल्या शरीरात पुरेसा सूर्यप्रकाश मिळाल्यावर तयार होते. 
आपली ऊर्जा पातळी उंच ठेवण्यासाठी, आपला मूड, आपली हाडे व दात मजबूत ठेवण्यास ‘डी’ जीवनसत्त्व फार महत्त्वाची भूमिका साकारते. गलग्रंथी (थायरॉईड ग्रंथी)साठीसुद्धा हे जीवनसत्त्व मदत करते. 
रताळ्यामध्ये काही खनिज पदार्थ असतात का?
- जीवनसत्त्वांशिवाय रताळे हे अनेक खनिज पदार्थांचे भांडार आहे. उदा. लोह, तांबे, मॅग्नेशियम व पोटॅशियम.
कमी हिमोग्लोबिन असलेल्या अथवा रक्ताशय असलेल्या व्यक्तींनी रताळ्याचे सेवन करावे का?
- कमी हिमोग्लोबीन असलेल्या अथवा रक्ताशय असलेल्या व्यक्तींनी या भाजीचे सेवन अवश्य करावे. सर्वांना माहीत असल्याप्रमाणे लोह हे द्रव्य शरीरातील ऊर्जा कायम ठेवण्यास मदत करते. पण लोह हे द्रव्य आपल्या शरीरातील लाल व सफेद रक्तपेशीच्या उत्पादनासाठी, तणावाला प्रतिकार करण्यासाठी, योग्य रोगप्रतिकाराचे कार्य व चयापचय क्रिया (मेटबॉलिजम) प्रथिनाचा योग्य वापर यासाठी रताळे हे सर्वोत्तम. 
मॅग्नेशियमची शरीरात काही महत्त्वाची भूमिका असते का?
- रताळे हे मॅग्नेशियमचा उत्तम स्रोत आहे. (मॅग्नेशियम हे विश्रांतीसाठी अथवा ताण घालविण्यासाठी अतिशय उत्तम).
परीक्षेपूर्वीची धाकधूक घालविणारे एक परिपूर्ण अन्न! निरोगी धमनी, रक्त, हाडे, हृदय, स्नायू व मज्जातंतूच्या सुरळीत कार्यासाठी मॅग्नेशियम हे द्रव्य फार महत्त्वाचे असते. 
शरीरातील पोटॅशियमची भूमिका स्पष्ट कराल का?
- रताळ्यात आढळणारे पोटॅशियम हे द्रव्य स्नायू आकुंचनासाठी, मज्जातंतू प्रेषणासाठी, हाडांच्या आरोग्यासाठी व शरीरातील पाण्याचे प्रमाण व रक्तदाब स्थिर ठेवण्यासाठी मदत करते. खरं तर केळ्याहून अधिक पोटॅशियम हे रताळ्यातच आढळते. उच्च रक्तदाब (hypertension) व कमी रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी रताळ्याचा समावेश हा आहारातच करावा.
शरीरातील तांब्याची भूमिका स्पष्ट करा... 
- शरीरात ‘कोलाजेन नामक सफेद संयोजक पेशा जालातील प्रथिन घटकाचे उत्पादन करण्याकरिता तांब्याची भूमिका फार मोठी आहे. स्नायू निरोगी ठेवण्यास व त्वचा घट्ट ठेवण्यासाठी रताळे अतिउत्तम. रताळ्यातील तांब्याच्या द्रव्यामुळे ही एक उत्तम वृद्धत्वविरोधी अशी भाजी मानली जाते. 
रताळे हे वजन वाढविण्यासाठी/वजन कमी करण्यास मदत करते का?
- या भाजीचा समावेश आहारात वजन वाढविण्यासाठी/वजन कमी करण्यासाठी करावा. असे केल्याने आपण आपल्या इच्छित तंदुरुस्तीच्या ध्येयांना गाठू शकतो. रताळ्यातील ‘केरोट्नाय्ड’ नामक वनस्पती द्रव्य रोजच्या जीवनातील व्यायामामुळे, दैनंदिन हालचालीमुळे होणार्‍या नुकसानापासून संरक्षित करते.
या चमत्कारिक भाजीचा फुप्फुसावर काही परिणाम होतो का?
- संशोधनाप्रमाणे रताळ्यातील ‘क्वेरसेटिन’ नामक शक्तिवर्धक फॅयेटोतत्त्व श्‍वसनक्रियेसाठी मदत करतात. असोशी, परागज्वर व दमा हे काढून टाकणे व असोशीविरोधक गुणधर्म असलेली ही भाजी निश्‍चितच चमत्कारी आहे.
रताळ्यातील काही प्रतिकूल परिणाम असतात का?
- सर्वसाधारणपणे ही भाजी बहुतांशी लोकांनी खाणे उत्तम. तथापि एका छोट्या विभागात ही भाजी खाणे मात्र असुरक्षित ठरते. Fructose Malabsorption किंवा रताळ्यातील Fructose तंतुमय फलशर्करा पदार्थामुळे काही गळक्या आतड्यांचे आजार होण्याची शक्यता असते. म्हणूनच रताळे हे फलशर्करा सहन न करणार्‍या, गळके आतडे असणार्‍या, लहान व मोठ्या आतड्यांचे आजार असणार्‍या रुग्णांनी कमी प्रमाणात खावे.

डॉ. मानसी पी. डाके
-manasidake@yahoo.com

सौजन्य :- उत्सव, सामना १२१०१४

Friday, October 03, 2014

हॅक पंप

अनेक वर्षापूर्वी धर्मेंद्रचा ‘’जीवनमृत्यू’’ नावाचा एक चित्रपट आला होता. त्यात शेअर बाजारात अतिशय कमी किमतीचे शेअर विकत घेऊन त्यांचे भाव वाढवून दाखवले जात असत आणि नंतर ते विकले जात असत. नंतर ज्यांनी जास्त भावात ते शेअर विकत घेतले असत त्यांना नंतर कळत असे की आपण अतिशय खराब शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे जे कधीच परत त्या किमतीला विकले जाऊ शकणार नाही; हा झाला चित्रपटाचा भाग. पुढे या विषयवार अनेक पुस्तके देखील आली. जगातील अनेक शेअर बाजारात अनेक प्रकारचे वेगळे फसवणुकीचे आणि गैरव्यवहारचे गुन्हे घडले आहेत त्यात भर पडली ती कमी किमतीचे शेअर जास्त भावात विकून पैसे कमावायच्या योजनेची. ज्याला पुढे हॅक पंप ऍण्ड डंप असे नाव पडले.
क्रिस्टोफर रॅड आणि जेम्स बॅ्रग नावाच्या दोन हॅकर्स च्या डोक्यात हॅक पंप ऍण्ड डंपची पैसे कमवायची योजना आली. बरेच दिवस त्यांनी यातून कशा प्रकारे पैसे कमावता येतील याचा अभ्यास केला आणि एक पध्दतशीर योजना बनवली. प्रथम त्यांनी कोणत्या कंपन्यांचे शेअर अतिशय कमी किमतीचे आहेत त्याची एक यादी बनवली आणि अशा कंपन्यांचे लाखो शेअर अतिशय स्वस्तात विकत घेतले. हे करत असताना त्यांना माहीत होत की या कंपन्यांचे शेअर कधीच वाढणार नाहीत. मग हळूहळू त्यांनी इंटरनेटवर खोट्या जाहिराती देऊन या कंपन्या कशा चांगल्या आहेत आणि काही दिवसात या कंपन्यांचे शेअर कसे वाढणार आहेत याच्या चर्चा सुरू केल्या. हे करत असताना त्यांनी लाखो लोकांना ईमेल द्वारे देखील या कंपनीच्या शेअरबद्दल खोटी माहिती पाठवली. याच ईमेलमध्ये त्यांनी मग व्हायरस टाकला होता जो समोरच्या माणसाच्या संगणकातील गोपनीय माहिती त्यांना पाठवत असे. अगदी जर कोणी संगणकात काही टाईप देखील केले तरी त्यांना ते कळत असे.
पुढे मग याच माहितीचा वापर करून त्यांनी लाखो लोकांचे शेअर खाते हॅक केले आणि त्या खात्यात स्वत:च कमी भावाच्या कंपन्यांचे शेअर जास्त भावात विकत घ्यायचा सपाटा लावला. या सर्वांमुळे अचानक कमी भावातल्या शेअरची किमत अचानक वाढू लागली आणि अनेक लोक मग ते शेअर्स विकत घेऊ लागले, जसजशी शेअर्सची किमत वाढू लागली तसतसे मग क्रिस्टोफर रॅड आणि जेम्स बॅ्रग यांनी स्वत:कडे असणारे त्याच कंपन्यांचे शेअर्स जे त्यांनी अगदी स्वस्तात विकत घेतले होते ते विकायला सुरुवात केली आणि काही दिवसातच त्यांनी तब्बल ४० कोटीहून अधिक पैसे कमावले. काही दिवसातच ते फरारी झाले. पुढे अनेक गुंतवणूकदारांनी तक्रार केल्यावर अमेरिकन शेअर बाजार खडबडून जागा झाला. पुढे कित्येक वर्ष या फसवणुकीचा तपास सुरू होता. अखेर २ वर्षानंतर क्रिस्टोफर रॅड आणि जेम्स बॅ्रग यांना जगाच्या दुसर्‍या टोकावरून अटक करण्यात आली आणि जागतिक शेअर बाजारात गुंतवणूक करणार्‍या लाखो लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
amitghodekar@hotmail.com
सौजन्य :- फुलोरा, सामना ०३१०१४

Sunday, September 21, 2014

नवरात्री


गणेश उत्सवानंतर येणारा मोठा सण म्हणजे नवरात्री. देवीचा घट स्थापून या पूजेचा आरंभ होतो. महाराष्ट्राबरोबरच गुजरात व कोलकात्यामध्ये नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आदिशक्तीची या दिवसांत करुणा भाकली जाते.
- नवरात्री म्हणजे देवीच्या चरणी वाहिलेले नऊ दिवस-रात्र.
- नवरात्री वर्षातून दोनदा येते.
- एक उन्हाळा सुरू होताच तर दुसरी थंडीच्या मोसमात.
- पौराणिक कथेनुसार या काळात देवीची शक्ती वाढलेली असते.
- दुर्जनांचा, दुष्टांचा संहार करण्यासाठी देवी प्रत्यक्ष भूतलावर येते.
- नऊ दिवस चालणार्‍या या उत्सवाचे पहिले तीन दिवस माता दुर्गेसाठी असतात.
- नंतरचे तीन दिवस लक्ष्मीसाठी असतात.
- शेवटचे तीन दिवस सरस्वतीची उपासना करण्यासाठी असतात.
- या दिवसांत अनेक भक्त नऊ दिवस कडक उपवास करतात.
- मंदिरांमध्ये नऊ दिवस मोठ्या उत्साहात गरबा खेळून नवरात्रोत्सव साजरी केली जाते.

सौजन्य :-  फुलोरा, सामना २००९१४

चंगूमंगू वडा

चंगूमंगू वडापाव म्हणजे झणझणीत आणि ढासू खाण्याची आवड असणार्‍या खवय्यांचा कट्टाच. सकाळचा नाश्ता असो की दुपारचा लंच नाहीतर संध्याकाळचा स्नॅक्स दहिसर पूर्वेला पोलीस ठाण्याला लागूनच असलेल्या सिग्नलजवळचा चंगूमंगू ऑल टाइम हीट...
झणझणीत वड्यासाठी हिरव्या मिरच्याच्या ठेच्यात बनवलेली मराठमोळी पिवळ्या बटाट्याची भाजी आणि तिचा तिखटसर भूक चाळवणारा सुगंध पार काशिमिरा अन् बोरिवलीकरांना दहिसरला खेचून आणतो. यामुळे इथे कधीही जा तोबा गर्दी मिळणारच, पण अच्छा और टेस्टी खानेका है तो वेट करनाच पडेगा ना..असे सांगत अनेक भुकाळू जिभेवर कंट्रोल करत रांगेत शांतपणे उभे असतात. हे विशेष.. चंगूमंगूचा वडा जेवढा हीट तेवढीच मिसळ, उसळ, कांदा भजी, बटाटा भजी आणि ब्रेड कटलेटही.. लालबुंद तिखटात तयार केलेल्या मिसळवर येणारी केशरी तर्री बघताच भूक नसतानाही भूक लागेल हे त्या मिसळचे वैशिष्ट्य. कुरकुरीत कांदा भजी तर अफलातून. आंबटगोड चटणीबरोबर तिची टेस्टही दुप्पट वाढते.
सकाळी दुपारी इथे जशी पुरुषांची, स्टुडंटस्ची गर्दी असते तशीच संध्याकाळी ऑफिसहून घराकडे परतणार्‍या महिलांची ब्रेड कटलेटससाठी चंगूमंगू स्टॉलवर गर्दी होते तर काहीजणी पार्सलची ऑडर ऑफिसमधूनच देतात.
गेल्या २१ वर्षांपासून चंगूमंगूने आपल्या खास ठेवणीतल्या टेस्टमधून खवय्यांना बांधून ठेवलंय. यामुळे चंगूमंगू नुसतच खाण्यासाठी प्रसिध्द नाही तर लॅण्डमार्क म्हणूनही रिक्षावाल्यांपासून बेस्टच्या कंडक्टरपर्यत सगळेचजण चंगूमंगूला ओळखतात. अलका वाईकर आणि मंगेश विचारे यांच्या कल्पनेतून साकारलेला चंगूमंगू वडापाव स्टॉल आधी साध्या फुटपाथवर लागायचा आता त्याच दुकानात रूपांतर झालंय. हे सगळे आमच्या गिर्‍हाईकांमुळे शक्य झाल्याचे मालक मंगेश विचारे कृतज्ञतापूर्वक सांगतात.

सौजन्य :- fulsaam123@gmail.com

Sunday, August 03, 2014

जम्बो वडापाव एकवेळचे जेवणच

मुंबईत जम्बो वडापाव सुरू होऊन कित्येक वर्षे झाली असतील, परंतु त्यापूर्वी कित्येक वर्षे आधी कणकवलीत मध्यवर्ती ठिकाणी बाळा सावंत यांच्या हॉटेलात जम्बो वडापावला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे जम्बो हा केवळ आकार नव्हे तर कित्येक वर्षांनंतर आजही या वडापावचे ‘पेटंट’ कायम राखल्याने जिभेवरील चव तीच आहे हे विशेष होय.


सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली हे एकमेव शहर असे आहे की, या ठिकाणी २४ तासांत कधीही या, येथे आलेला माणूस किमान उपाशी जाणार नाही. या वैशिष्ट्याला कारणीभूत आहे ते येथील बाळा सावंत यांचे दिवसरात्र सेवा देणारे हॉटेल. बाळा सावंत यांच्या हॉटेलमधील अगदी हातात न मावणारा असा वडापाव खाल्लात की, एकवेळ जेवलात नाही तरी चालेल असे म्हटले तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही. कित्येक वर्षांनंतर आजही वड्याचा तोच आकार, तीच चव, तेवढीच झटपट तत्पर सेवा यामुळे अनेक जण, विशेषत: ग्रामीण भागातून बाजारासाठी आलेला माणूस येथील वडापावची चव घेतल्याशिवाय जात नाही. अगदी मग तिथे कटवडा (वडा-सांबार) घेतलात की, एक मोठ्या थाळीत केवळ पाव व तेवढ्याच थाळीत वडासांबार खाल्लात की, झालं. एकवेळचे जेवण झाले समजा. येथील बुर्जी-पाव, पुरीदेखील तेवढीच फेमस आहे.

- दिपक गायकवाड
सौजन्य:- फुलोरा, सामना ०३०८१४

त्र्यंबकेश्‍वराची श्रावण पूजा

    श्रावण मास म्हणजे साक्षात भगवान शिवाचा महिना. याच मासात शिवाने विषप्राशन केले आणि तो नीळकंठ झाला. त्यामुळे हिंदूंसाठी हा महिना पवित्र समजला जातो. 
- श्रावण महिन्यातल्या सोमवारला विशेष महत्त्व असते.
देशभरातील शिवमंदिरांत यावेळी मोठ्या भक्तिभावाने शिवाची पूजा केली जाते.
- महाराष्ट्रातील नाशिक येथील त्र्यंबकेश्‍वर मंदिरात शिवपूजन करण्यासाठी लाखो भाविक येतात.
- या दिनी दिवसभर ‘ओम् नम: शिवाय’चा जप करत अनेक जण उपवास करतात. शिवपिंडीवर बेलपत्र, पांढरी फुले, मध, दूध, पाणी वाहून अभिषेक केला जातो.
- शिवमूठ वाहिली जाते. यावेळी शिवाच्या नामघोषात अवघे त्र्यंबकेश्‍वर तल्लीन होते.

सौजन्य  :- फुलोरा, सामना ०३०८१४

फोन फ्रीकिंग

आपण अनेकदा वर्तमानपत्रात वाचतो अमक्या एका माणसाला टेलिफोनचे बिल ५० हजार रुपये आलं किंवा आणखी कोणाला १ लाख रुपये बिल आलं वगैरे वगैरे.. काही अक्षम्य तांत्रिक चुका सोडल्या तर बर्‍याच वेळेस खरंच आलेले हे बिल चुकीचं नसतंच मुळी. आता तुम्ही म्हणाल की, माझ्या फोनवरून फक्त एवढेच फोन केले आणि तुम्ही सांगताय की एवढे हजारो कॉल तुम्ही केले आहात हे कसं शक्य आहे. 
कल्पना करा की, तुमच्या फोनचा वापर शेकडो लोक करत असतील तर? तर ते करत असलेल्या सर्व फोनचं बिल तुमच्या नावावर येणार आणि फोन कंपनी ते तुमच्याकडून वसूल करणार, परंतु हे खरंच शक्य आहे काय? तर याचं उत्तर होय असे आहे. फोन या प्रकारच्या हॅकिंगला फ्रीकिंग असे म्हणतात आणि अशा प्रकारे दुसर्‍याचे फोन हॅक करून फुकटात फोन करणार्‍या हॅकर्सला फ्रीकर्स असे म्हणतात.
आपल्याकडे फोन हॅकिंग आणि फ्रीकिंग हे तसं अगदी गेल्या काही वर्षांपासून आपल्या कानावर पडत आहे, पण बाहेरच्या देशात मात्र फोन हॅकिंग आणि फ्रीकिंग गेल्या ५ दशकांपासून प्रचंड प्रमाणात सुरू आहे त्याचे प्रमाण एवढं मोठं आहे की अनेक देशांनी फोन हॅकिंग आणि फ्रीकिंग कमी करण्यासाठी अनेक कायदे केले आहेत आणि अशा प्रकारे फोन हॅकिंग आणि फ्रीकिंग करणार्‍यांना शिक्षादेखील केली जाते. 
फोन फ्रीकिंगची सुरुवात अमेरिकेत झाली आणि तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही, पण समस्त टेक जगाचा आवडता आणि आयफोनचा निर्माता स्टीव्ह जॉब्स हादेखील त्याच्या उमेदीच्या काळात एक नावाजलेला फोन फ्रीकर होता त्याकाळी ऍपलमधला त्याचा सहकारी स्टीव्ह वोजनियाक याने ब्लू-बॉक्स नावाचे फुकटे फोन करू शकेल असा टेलिफोन बनवला होता हा फोन ते त्याकाळी विकतदेखील असत. ब्लू-बॉक्स ने त्याकाळी अमेरिकेत धुमाकूळ घातला होता नशिबाची गोष्ट म्हणजे ब्लू-बॉक्स कम्युनिटी जी हे फोन विकत असे ज्यात स्टीव्ह जॉब्सदेखील होता त्यांच्यात आणि आपल्या हिंदी चित्रपटातील नायकात एक साम्य होतं, जसं आपला नायक रात्री गुन्हा करून जमलेले पैसे गरीबात वाटत असे असच काहीसं ब्लू-बॉक्स कम्युनिटीच एक तत्त्व होतं ते म्हणजे ब्लू-बॉक्सचा वापर करून ते फक्त श्रीमंत लोक सरकारी ऑफिस आणि मोठमोठ्या कंपन्याचे फोन हॅक करत आणि त्याचा वापर करून फुकटात फोन करत आणि गरीब लोकांनादेखील फुकटात फोन करायची सवलत द्यायचे. पुढे पुढे स्टीव्ह जॉब्सची ऍपल ही कंपनी संगणक आणि मोबाइल मध्ये नावारूपाला आली नाहीतर कदाचित इतर फ्रीकर्सप्रमाणे स्टीव्ह जॉब्सदेखील अमेरिकेच्या एखाद्या तुरुंगात फ्रीकिंगच्या गुन्ह्यात खडे फोडत बसला असता.

सौजन्य :- फुलोरा, सामना ०३०८१४
amitghodekar@hotmail.com

Sunday, June 15, 2014

मूषक मंदिर

हिंदुस्थान हा मंदिरांचा देश आहे. वैविध्यपूर्ण वास्तुरचना हे या मंदिराचे वैशिष्ट्य. असेच एक अद्भुत आणि अनोखे मूषक मंदिर राजस्थानातील बिकानेर येथे आहे. करणी माता असेही या मंदिराला संबोधले जाते.
- देशातील प्रमुख महत्त्वाच्या मंदिरांत या मंदिराचा समावेश आहे.
- राजा गंगा सिंह यांनी २० व्या शतकात हे मंदिर उभारले.
- या मंदिरात पावलोपावली उंदीरच उंदीर फिरत असतात.
- या उंदरांची फौज पार केल्यावरच मुख्य देवीच्या मूर्तीचे दर्शन होते.
- शेकडो उंदरांच्या या टोळक्यात जर एखाद्या भाविकास सफेत उंदीर दिसला तर तो धनवान होतो. त्यामागची इडापिडा संपते असे म्हटले जाते.

सौजन्य :- फुलोरा, सामना १५०६१४

सर्दी - आयुर्वेद आरोग्य

ऍलर्जिक सायनायटीस नावाचं भूत समाजात जिकडेतिकडे पाहायला मिळतं. काही खाल्लं, कोणता वास घेतला, कुणाला स्पर्श केला, अहो एवढंच काय घरात साफसफाई केली की सुरू होते सर्दी. याला साधीसुधी नाही ऍलर्जीची सर्दी म्हणतात. खालावलेल्या रोगप्रतिकार शक्तीचं जिवंत उदाहरण म्हणावं लागेल.
पटेल नावाचे सद्गृहस्थ वसईला राहणारे. शहरी लाइफस्टाइल दिसायला मोहमाया असते. अडकलात तर फसलातच म्हणून समजा. असेच काही पटेल यांच्या बाबतीत झाले. काही विचित्र खाण्यामध्ये आले, कोणी आजूबाजूला साफसफाई केली, कामावर कोणाला सर्दी झाली की यांना सर्दी झाली म्हणून समजा. शिंका आणि नाकातून पाणी यायला काही प्रमाणच नाही. यांना शोधन व बृहन नस्य लगेच सुरू केले. सोबत रक्तशुद्ध करणारी औषधे व आहार योजना सांगितली. दीड महिन्यात त्रास कमी झाला. त्यानंतर विरेचन (जुलाब) देऊन शरीरशुद्धी केली आणि दरवर्षी शरीरशुद्धी करण्याचा सल्ला दिला.
तोंडाने श्‍वास घेणारे आणि रात्री तोंड उघडे करून झोपणारे बहुतेक लोक पाहायला मिळतात. काय करणार बिचारे? सर्दीने नाक ब्लॉक असल्याने तोंडाने श्‍वास घेणं भाग असतं. असेच देसाई. दिवसभरात त्यांचे नाक कधी ब्लॉक होईल याचा काही नेम नाही. नाडी तपासताना त्यांना यकृतासंबंधी आणि हृदयासंंबंधी बिघाड जाणवला. त्याप्रमाणे त्यांना कफ-वात दोषावर कार्य करणारी औषध दिली. सोबत गोमूत्रसिद्ध चित्रकादी तेलाने नस्याचा सात दिवसांचा कोर्स केला. गोमूत्राच्या तीव्रतेने व वासाने ब्लॉक तर सुटलाच आणि त्याने डोके हलके वाटायला लागले. पूर्वीपेक्षा ७० टक्के फरक जाणवायला लागला.
सर्दी नावाचं भूत घालवण्याचे तंत्र
- रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यासाठी रोज मोकळ्या हवेत प्राणायाम, सूर्यनमस्कार यासारखे सर्वांगिण व्यायाम करा.
- बाहेरचे पदार्थ खाण्याचे टाळा.
- (सुंठ हळकुंड आंबेहळद पुनर्नवा वचा शृंगी) उगाळून कपाळ, नाक, गालावर पातळ लेप करावा. एक चमचा हळद, अर्धा चमचा आलं, दोन कप पाणी उकळताच चार-पाच तुळसीची पाने उकळवून एक कप शिल्लक उरलेलेे गाळून दोन चमचे मध टाकून घेणे.
- आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्याने प्रकृतीनुसार शरीरशुद्धी करा. रोगप्रतिकार शक्ती आपोआप वाढेल.


- डॉ. दीपक केसरकर
सौजन्य :- फुलोरा, सामना १५०६१४

सायबर स्टॅकिंग सावधान!

    

सुरुवातीला लॉटरी लागली आहे, परदेशातील कंपनीत निवड झाली आहे किंवा परदेशातील एखादी ‘ललना’ मला हिंदुस्थानात यायचंय म्हणून प्रेमाची गळ घालत ईमेल पाठवायची. अशा आमिष दाखवणार्‍या ईमेलमधून जोरदार फसवणूक होत होती. त्याबाबत मग सोशल साईटवर सावधपणा बाळगला जायला लागला. लोक हुशार झाले फसवणूक करता येईना. ‘सायबर क्राइम’वाल्यांनीही याविरोधात कायदेशीर आणि तांत्रिक पाऊल उचलले. त्यामुळे सायबर चाच्यांचा बंदोबस्त तेवढ्यापुरता झाला, परंतु कायदे मोडणार्‍यांना अधिक वाटा माहीत असतात ना... या सायबर चाच्यांनी नवी पद्धती विकसित केली आहे... त्यालाच ‘सायबर स्टॅकिंग’ म्हणतात.
या सायबर स्टॅकिंग पद्धतीत समोरच्याला घाबरवून टाकणारी मेल पाठविले जातात. घाबरलेले एखादे सावज जाळ्यात आले की, त्याला भोवर्‍यात फसवले जाते. घाबरविण्यासाठी कोर्ट, मंत्रालय, पोलीस, इतर सरकारी खात्यांच्या नावाचा वापर केला जातो. त्यामुळे भल्याभल्यांची गाळण उडते आणि सायबरचाच्यांचे फावते. कोर्टातून अचानक ईमेलवर नोटीस आली, ‘तुमच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. उद्या दुपारी हजर रहा. उद्या वॉरंट काढून पोलिसांकडून उचलून आणण्यात येईल.’ तर कोणता भला माणूस घाबरणार नाही. तशीच पोलिसांची नोटीस, इन्कमटॅक्सची नोटीस... त्यामुळे आता या ‘स्टॅकिंग’पासून सावधान.
एवढेच नव्हे तर ‘मिस कॉल’ नावाची पद्धतीही गाजते आहे. एखाद्या अनोळखी नंबरवरून बर्‍याच वेळा हे नंबर पाकिस्तान, अफगाणिस्तान, दुबईकडचे असतात. ‘मिस कॉल’ आला की, कुणाचा होता हे बघण्याची खोड प्रत्येकालाच असते. आपण रिटर्न कॉल केला की झालंच, तिथून कुणी मधाळ आवाजात बोलू लागते आणि बिलाचा आकडा वाढत जातो. जेव्हा बिल पुढ्यात येतं तेव्हा आपल्या हाती ते भरणे एवढेच उरलेले असते. ‘व्हॉटस् अप’चा वापरही आता महिलांना फसविण्यासाठी केला जात आहे. त्यामुळे विज्ञानाची कास धर हे ठीक आहे, पण त्याच्या आहारी जाणे तरुणाईला परवडणारे नाही. हे कुठेतरी कळायला हवे एवढे खरे... किंबहुना तरुणाई मोबाईल, मेल आणि व्हॉट्स अपच्या आहारी गेल्यामुळेच या सायबर चाच्यांचे फावले आहे.
अतिशय वेगवान आणि सहजपणे कोणतीही गोष्ट आपण इंटरनेटच्या माध्यमातून करू शकतो त्यामुळे गेल्या काही वर्षात इंटरनेटचा वापर खूप मोठया प्रमाणात वाढला आहे. त्यात आता इंटरनेट मोबाईलवर देखील सहजपणे वापरता येते आणि मोबाईलवर असणार्‍या असंख्य सोफ्टवेअरमुळे आपली कामे चुटकीसरशी होतात. इंटरनेटच्या या चांगल्या बाजूबरोबर एक काळी बाजू देखील आहे आणि तिचे नाव म्हणजे सायबरक्राईम; इंटरनेटवरून लोकांच्या आर्थिक फसवणुकीचे शेकडो गुन्हे गेल्या काही वर्षात सर्रास घडताना आपण बघितले आहेत. यात तुमचे नेटबँकिंग अकाऊंट हॅक होणे किंवा कोणीतरी तुमचे क्रेडिट कार्ड वापरणे असे अनेक गुन्हे गेल्या काही वर्षात घडले आहेत. या सर्व गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी अनेक बँकांनी अनेक उपाययोजना देखील केल्या आहेत त्यामुळे आता सराईत सायबर गुन्हेगारांनी आपला मोर्चा नवीन प्रकारे लोकांना फसवण्यात आणि नवीन प्रकारचे गुन्हे करण्याकडे वळवला आहे. हे नवीन प्रकारचे सायबर गुन्हे हे आधी घडणाया सायबर गुन्ह्यापेक्षा अतिशय भयंकर आहेत.
अर्जंट अटेन्शन... ईमेल बघून कुणीही दचकणारच ना... परेशचं तसंच झालं. त्याने तो लगेच ओपन केला. वाचतानाच त्याची बोबडी वळली. तो पोलिसांचा होता. आम्हाला एक बॉडी सापडली आहे. त्याच्या खिशात तुमचा नंबर आणि फोटो आहे. तातडीने खालील पत्त्यावर संपर्क साधा. बिच्चारा परेश... हादरला. पुढचामागचा विचार न करता त्याने संपर्क केला आणि...
तुमच्या खात्यात अमेरिकन माफियाने पाठविलेला हवाला चेक वटविण्यात आला आहे... त्याबाबत त्वरित खुलासा करा. ‘अर्जंट अटेन्शन’ या विषयाखालीच एका बड्या उद्योगपतीला आलेला हा ईमेल. इन्कम टॅक्स खात्याची नोटीसच ती. तत्काळ संपर्क करण्याचे आदेश. त्यामुळे सीएला काही विचारण्यापूर्वीच त्याने त्या इन्कम टॅक्स अधिकार्‍याला संपर्क केला आणि...
‘‘तुझा अश्‍लील फोटो आम्हाला मिळाला आहे. हा क्राइम असून तुमच्यावर गुन्हा दाखल का करू नये.’’ अर्जंट अटेन्शन म्हणून दीपाली नावाच्या तरुणीला आलेला ईमेल. आता लग्न झालेली, दोन वर्षांचं मूल असणारी आणि कॉर्पोरेट क्षेत्रात चांगली नोकरी करणारी तरुणी, पण सायबर क्राइमकडून आलेली नोटीस पाहून थरकलीच. तिनेही संपर्क साधला आणि...
आणि... काय? ...आणि तिघेही फसले. असे फसले की, काहीही न करतासवरता पार धुऊन गेले. ज्यांनी संपर्क केला ते कोण तेही कळले नाही आणि कुठल्या खात्यात रकमा जमा केल्या, ते पैसे कुणी घेतले तेही कळले नाही. सर्व काही संपल्यानंतर जाणीव झाली की, आपण फसलो गेलोय... हा ‘सायबर क्राइम’च आहे, पण त्यामध्ये आता नवीन प्रकार आला आहे. त्याचे नाव आहे ‘सायबर स्टॅकिंग.’
सायबर स्टॅकिंगच्या क्राईमला बळी न पडण्यासाठी
- जंक मध्ये असणारे इमेल सहसा उघडू नका.
- कोणताही इमेल जर तुमच्या ओळखीच्या व्यक्तीने पाठवला असेल तरच उघडा
- कोणत्याही अनोळखी मोबाईल क्रमांकावरून आलेला ‘मिस कॉल’ वर परत ‘कॉल’ करू नका
- कोणत्याही जंक इमेलमध्ये असणारी फाईल उघडू नका.
- व्हाटस्ा्अपवरून अनोळखी क्रमांकावरून आलेल्या मेसेजला उत्तर देऊ नका.
- तुमचा घराचा पत्ता, इमेल, मोबाईल क्रमांक, कोणत्याही संकेतस्थळावर अपलोड करू नका.
- जर तुम्हाला इमेल किंवा मोबाईलवर अश्‍लील मेसेजेस कोणी पाठवत असेल तर असे क्रमांक किंवा इमेल ऍड्रेस आपल्या फोनबुक तसेच जंक इमेल मधून ब्लॉक करून टाका.
- तुम्ही अशा प्रकारचे इमेल तसेच मोबाईल क्रमांक व्हाटस्अप, तसेच इतर जीमेलला रिपोर्टदेखील करू शकता. त्यामुळे तुमच्याप्रमाणे जर इतरांना या इमेल किंवा मोबाईल क्रमाकावरून त्रास दिला जात असेल तर संबंधित कंपनी त्या इमेल आणि मोबाईल क्रमांकावरून इतरांना पाठवले गेलेले मेसेज बंद करू शकते.

अमित घोडेकर
सौजन्य :- फुलोरा, सामना १५०६१४

Saturday, May 31, 2014

जगन्नाथ मंदीर

- ओरिसन मंदिरांची छाप असलेलं हे मंदिर.
- मंदिराच्या चहूबाजूला मजबूत भिंती बांधण्यात आल्या आहेत.
- भिंतीमध्ये प्रत्येकी एक गोपुरा म्हणजे गेट बांधण्यात आले आहे.
- प्रत्येक गेटवर पिरामिडच्या आकाराचे छप्पर आहे.
- या मंदिराची जमिनीपासूनची उंची ६५ मीटर म्हणजे २१४ फूट एवढी आहे.
- मंदिरात पूजापठनासाठी तब्बल ६,००० भटजी आहेत.
- मंदिराच्या कळसाजवळ एक चक्र आहे. त्याला नील चक्र संबोधले जाते.
- आठ प्रकारच्या धातूंपासून हे चक्र बनविण्यात आले आहे.
- ११ मुख्य मंदिराच्या सभोवताली ३० छोटीमोठी मंदिरे बांधण्यात आली आहेत.
- यापैकी नरसिंहाचे मंदिर अतिप्राचीन असून मुख्य मंदिर बांधण्यापूर्वीच ते उभारण्यात आले होते.

सौजन्य :- फुलोरा, सामना ३१०५१४

गारेगार



उन्हाळा येताच गारेगार बर्फाच्या गोळ्याची आठवण येते. पण निकृष्ट दर्जाचा बर्फ आणि गोळा तयार करण्याची खराब पद्धत यामुळे हेल्थ कॉंन्शियस मंडळी इच्छा असतानाही हा गोळा खाण्याचे टाळतात. परंतु संभाजीनगरातील श्रेयनगर भागात असणारा आनंद गोळा यास अपवाद ठरला आहे. गेल्या ३० वर्षांपासून या व्यवसायात असणारे आनंद बसैये यांनी शुद्धता, स्वच्छता, चव आणि वैविधता जपली आहे. यामुळेच हा गोळा इतरांपेक्षा वेगळा ठरतो.
बर्फाचा गोळा म्हटला तर मशीनवर किसलेल्या बर्फावर टाकलेले विविध चवीचे रंगीत पाणी असे समीकरण असते. परंतु आनंद बसैये यांनी यात हटके प्रयोग केले आहेत. अशुद्ध पाण्याची तक्रार टाळण्यासाठी ते मिनरल वॉटरपासून तयार आणि प्रमाणित कंपन्यांच्या बर्फाचे गोळे बनवतात. रंगही प्रमाणित कंपन्यांचा असतो. मावा आणि साखरेचा पाक ते घरी करतात. गोळ्याच्या चवीत वैविध्य आणण्यासाठीही त्यांनी खासच प्रयोग केले आहेत. यासाठी त्यांना हिंदुस्थानभर केलेली भटकंती कामास आली. राजस्थानात बर्फाच्या गोळ्याचे अनेक प्रकार असतात. मनोज यांनी त्यापैकी काही फ्लेवर संभाजीनगरवासीयांना देऊ केले आहेत. ड्रायफ्रुट्सचा गोळा त्यापैकीच एक. बर्फाभोवती ड्रायफ्रूट्स, मावा, गुलकंद असे पदार्थ टाकून ते गोळा बनवतात. तर केवळ माव्यापासून तयार केलेले दहा प्रकारचे गोळे येथे मिळतात. पूर्वी केवळ काडीला चिकटवलेला गोळा आपल्याला माहिती असायचा. पण बसैये यांनी वाटीतील गोळा तयार करणे सुरू केले आहे. ग्राहकांच्या मागणीप्रमाणे त्यावर पातळ किंवा घट्ट पाक टाकला जातो. तर गोड पसंत नसणार्‍यांसाठी काहीसा खारट-नमकीन चवीचा गोळाही येथे मिळतो. पावसाळ्यातील चार महिने वगळता ८ महिने हा गाडा सुरू असतो. दसर्‍याला स्टॉल सुरू होतो ते थेट जून अखेरपर्यंत चालतो. दिवसाकाठी एक हजाराहून अधिक खवैये गोळा खाण्यासाठी अक्षरश: रांगा लावतात. सकाळी १० वाजेपासून सुरू झालेली गर्दी रात्री अकरापर्यंत कायम असते. हायजेनिक असल्यामुळे उच्चभ्रू मंडळीही कारच्या रांगा लावून बर्फ गोळ्याचा आस्वाद घेतात. १० रुपयांपासून ६० रुपये किंमतीचे हे गोळे उन्हाळ्यातील उष्णता तर घालवताच, पण बालपणीच्या दिवसांची आठवणही ताजी करतात.
- प्रिया गंद्रे
सौजन्य :- फुलोरा, सामना ३१०५१४

मलावष्ठंभ - आयुर्वेद आरोग्य

काय हो पोट साफ होतंय का? हो अगदी नॉर्मल. पण कसं होतंय विचारलं तर सुरू होतं रामायण. जोर द्यावा लागतोय. खडा होतो, संडास एक दिवसाआड होतेय. संडास करतेवेळी त्या जागी जळजळ होतेय. या पाळण्यातल्या बाळाला मलावष्ठंभ म्हणतात. हा मोठ्या मोठ्या आजाराला जन्माला घालतो.
सात वर्षांची दुर्वा संडास करायचं म्हटलं की घाबरायची. त्रास होतो म्हणून रडायची. आईसोबत आली तेव्हा तिच्या हातात कुरकुरे होते. मग सांगा कचरा खायला द्याल तर मग पोट खराब होणारच. नाडी व पोट तपासताना यकृताची आणि पचनाची तक्रार जाणवली. खाण्याविषयी पथ्ये सांगितली. जेवणाआधी १/२ तास १ चमचा आल्याचा रस आणि एक चमचा मध एकत्र मिक्स करून चाटायला सांगितले. जेवणानंतर २ चमचे द्राक्षासव २ चमचे पाण्यात मिक्स करून घ्यायला सांगितले. महत्त्वाचे म्हणजे रात्री झोपताना कापूस एरंडेल तेलात भिजवून संडासाच्या ठिकाणी ठेवायला सांगितले. तेलामुळे संडासला सहज होऊ लागले आणि औषधामुळे पचन सुधारले. आठवड्याभरात पोटाची तक्रार बरी झाली.
बेचाळीस वर्षांच्या कांबळे बँकेत चौकशी विभाग सांभाळतात. केस घेताना लक्षात आले की लघवी, संडासला झाले तरी समोर भली मोठी रांग असल्यामुळे त्या टाळत होत्या आणि जेवणामध्ये फास्टफूड जास्त प्रमाणात होते. संडास एक दिवसाआड होत होते, गॅसेस, अस्वस्थ होत होते. त्यांना लगेच सात दिवसाचा बस्तीचा कोर्स केला आणि जेव्हा प्रेशर येईल तेव्हा संडास, लघवीला जायला सांगितले. खाण्याविषयी नियम सांगितले. महिन्याभरात अपचन, गॅसेस मलावष्ठंभ हा सगळा त्रास पूर्णपणे बरा झाला.
पचनशक्ती व्यवस्थित असल्याची लक्षणे- दोन वेळा कडकडून भूक लागणे.
- खाल्लेलं अन्न पचन करणे.
- सकाळी एकदाच पोट साफ होणे.
- रात्री (झोपताना २५-३० बिया काढलेल्या काळ्या मनुका चावून खाणे.)
- आठवड्यातून एकदा २ चमचे एरंडेल दुधातून घेणे.
- आपण जे खातोय ते पचवू शकतो का याचा विचार करा.
- डॉ, दीपक केसरकर
:सौजन्य - फुलोरा, सामना ३१०५१४

Thursday, May 01, 2014

संधीवात

संधी भेटताच वाढणारा वात असं म्हटलं तर काही खोटं नाही. ‘अभी तो मैं जवान हूं।’ हे आजोबांनाच शोभून दिसतं, परंतु आता पंचविसाव्या वर्षांतच हाडांचा खुळखुळा झालाय.
असाच बत्तीस वर्षांचा तरुण, पण अगदी म्हातारपण आलेला सुधीर. कोणत्या सांध्यातून आवाज येत नसेल तर शपथ! सर्व सांधे तर दुखत होते, सोबत गंजलेल्या बिजागरासारखा करकर आवाज येत होता. त्याचा दोनदा अपघातसुद्धा झाला होता आणि भरीस भर कामाला पिझ्झा बॉय म्हणून. त्यामुळे खाण्याचीसुद्धा बोंबाबोंब, शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे अंगाला सहचरादी तेल लावायला दिले. सोबत वात कमी करणारी, हाडांना बळकटी देणारी औषधं सुरू केली. खराब वात बाहेर काढेल आणि हाडांचे पोषण करील असे २१ दिवस दुधाचे बस्ती केले. तेल लावल्यामुळे सांध्यांना वंगण तर मिळालेच त्याचप्रमाणे बस्तीमुळे हाडांना मजबुती मिळाली. त्याला पहिल्या बारा दिवसांतच बरं वाटायला लागलं. साडेतीन महिन्यांनंतर तो संधीवाताचे दुखणे विसरला.
आजकाल आईवडील लहान मुलांच्या वजनाकडे जास्त लक्ष देताना जाणवतात. टीव्हीवर दाखवणार्‍या बंद डब्यातील खाद्यपदार्थांमुळे मुलांचे वजन तर वाढतंच, परंतु नुसता मेद (फॅट) वाढून पुढे हाडांचे पोषण होत नाही. असाच अनुभव पवार कुटुंबाला आला. सात वर्षांचा मुलगा. पहिल्या तीन वर्षांमध्ये डबाबंद खाद्यपदार्थ. वजन वाढलं, पण ते वजन सहन करणारी हाडं मात्र पोकळ राहिली. या सर्वांमुळे त्याला संध्याकाळी ताप येऊन अंग दुखायचं. त्याला शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे मेद पचवणारी औषधं दिली. तेल लावून घाम काढला व सात दिवस काढ्याचे बस्ती दिले. आठव्या दिवशी अडीच किलो वजन कमी झाले. मेद पचून हाडांना मजबुती मिळाल्याने ८० टक्के फरक पडला.
अनुभवाचे बोल
चाळीतल्या कुलकर्णी आजोबांची नुकतीच पंचाहत्तरी साजरी केली. सगळ्यांच्या आग्रहाखार त्यांनी सांगितलेले गुपित तुम्हाला सांगतो :
- आंघोळीपूर्वी अंगाला तिळाचे तेल लावणे.
- आठवड्यातून एकदा रात्री झोपताना दुधातून २ चमचे एरंडेल घेणे.
- संध्याकाळी भूक नसल्यास जेवण न करता दूध पिणे.
- दररोज सकाळी १५ मिनिटे दीर्घश्‍वसन.
यालाच म्हणतात,
‘ओल्ड इज गोल्ड’.
- डॉ. दीपक केसरकर
सौजन्य :- फुलोरा, सामना ०१०५१४

Saturday, April 19, 2014

पेलिगन



लाल डोळे, लांब चोच आणि चोचेखाली पिशवीसारखी जागा हे वैशिष्ट्य आहे पेलिगन पक्ष्याचे. मुख्यत्वेकरून भरतपूर पक्षी अभयारण्यात आढळणार्‍या या पक्ष्याच्या आकारावरून तो इतर पक्ष्यांपेक्षा वेगळा ठरतो. पाणी असणार्‍या ठिकाणीच या पक्ष्याचे अधिक वास्तव्य असते. खोल पाण्यातून माशांना कमी पाण्याकडे ढकलून त्यांची शिकार तो करत असतो. पेलिगनचा बहुतांश वेळ पाण्यात जातो आणि विश्रांती घेण्यासाठी मात्र तो किनार्‍यावर येतो. भरतपूर अभयारण्यातील या पक्ष्यांना रोजी पेलिगन असेही म्हटले जाते. रोजी पेलिगनला न्याहाळण्यासाठी किंवा त्याचे फोटो काढण्यासाठी जानेवारी, फेब्रुवारीचा काळ सर्वोत्तम. या पक्ष्याचे फोटो काढण्यासाठी कमीत कमी ३०० एमएम लेन्स, ५००, ६०० एमएम टेलिलेन्सेसची गरज भासते. पेलिगनचे जवळून फोटो काढणेही शक्य आहे, पण जेव्हा तो प्रवास करून येतो आणि विश्रांती करण्याच्या तयारीत असतो तेव्हा तो माणसांना जवळ येऊ देतो अन्यथा तो बर्‍याचदा अंतर ठेवून राहत असतो. 
दुसर्‍या पक्ष्याने मासा पडकला असेल तर पेलिगन त्याच्यावर नजर ठेवतो आणि जलदगतीने उडत जाऊन तो मासा हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतो. बर्‍याच वेळा त्याला यशही मिळते. जे पक्षी खोल पाण्यात बुडून मासे घेऊन बाहेर येतात त्यांच्यावरही तो चार्ज करतो. अनेकदा तो इतर पक्षी व माशांना चोचीच्या पिशवीत धरून ठेवतो आणि काही वेळानंतर सोडून देतो. पेलिगनचे चांगले फोटो घेण्यासाठी दरवेळी त्याच्या बारीकसारीक हालचालींवर लक्ष ठेवावे लागते. या पक्ष्याची सतत हालचाल सुरू राहते. त्यामुळे त्याचे फोटो काढताना बिलकूलही कंटाळा येत नाही.
- बैजू पाटील

सौजन्य :- फुलोरा, सामना १९०४१४

दमा - आयुर्वेद आरोग्य

दमामरणाच्या दारातून परत येण्याचा अनुभव अनेक दमेकर्‍यांकडून ऐकायला मिळतो. प्रत्येकाची स्टोरी वेगळी, परंतु शेवट मात्र सारखाच.
संदीप एका राजकीय पक्षाचा खासगी कार्यवाह. केईएममध्ये ईसीजी, एक्स-रे, ब्लड टेस्ट सर्व केलं. अगदी नॉर्मल होतं. त्यामुळे औषध तर दिलीच नाहीत. आराम करण्याचा सल्ला दिला. तरीसुद्धा दम काही कमी नाही. अशाच अवस्थेत संध्याकाळी दवाखान्यात आला. नाडीवर बोट ठेवताच अजीर्ण जाणवलं. विचारपूस केल्यावर मांसाहार खाणे, जागरण आणि पोट साफ न होणे हे महत्त्वाचे हेतू मिळाले. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे सकाळी उलटीचे औषध, दिवसभर फक्त गरम पाणी आणि रात्री जुलाबाचे औषध दिले. एवढंच केलं. पोट साफ झाल्याने दमा कमी झाला. हलकं वाटायला लागलं.
लालबागमध्ये राहणारे साबळे नावाचे गृहस्थ प्रिंटिंग प्रेसमध्ये कामाला. पावसाळ्यात ढग जमा झाल्यावर दमा वाढतो, अस्वस्थ वाटते हा त्यांना त्रास होता. त्यांना सहा वर्षांपूर्वी कलरच्या रिऍक्शनमुळे ऍलर्जी झाली होती. औषध घेऊन ती दाबण्यात आली होती. शास्त्रानुसार त्वचेमधून निघणारी घाण जर औषधाने दाबली तर फुफ्फुसाद्वारे दम्याच्या स्वरूपात त्रास देते. मुख्य कारण लक्षात येताच उलटीचे आणि जुलाबाचे औषध दिले व रक्तातील घाण पचवणारी औषधे सुरू केली. इतक्या वर्षांचा दमा २२ दिवसांमध्ये पूर्णपणे बरा झाला. भूक वाढली. फ्रेश वाटायला लागलं आणि पावसाळ्यात दमसुद्धा लागत नाही.
गुरुवर्य जमदग्नी सरांचा
यशस्वी कानमंत्र
- एक भुक्त : आंघोळीपूर्वी सर्वांगाला तेल लावणे, सकाळी नाश्त्याला मिठ नसलेली भाताची पेज, दुपारी पोटभर पथ्याचे जेवण, रात्री भाजके अन्न (उपमा, थालीपीठ, डाएट चिवडा, दूध) खाणे. 
- उलटी, जुलाबाचे औषध घेऊन दम्याची औषधे सुरू करावी.
- दीर्घश्‍वसन अनुलोम-विलोम इ. फुफ्फुसाचे व्यायाम.
- दम्याचे चाटण (दालचिनी + अद्रक रस मनुका खडीसाखर)
आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्याने एवढं फक्त करा. मग स्टोरी कोणतीही असू द्या. शेवट मात्र गोड होईल एवढं मात्र नक्की.
- डॉ. दीपक केसरकर

सौजन्य :- फुलोरा, सामना १९०४१४

Monday, March 17, 2014

काही भलते

- फ्रेंचमध्ये १६९० साली एम डी सिव्हर्क यांनी सायकलच्या कल्पनेचे मूळ तयार केले एका दांड्याने जोडलेली दोन लाकडी चाके पायाने जमिनीला रेटे देत चालवावी लागे 
- १८१६ मध्ये बॅरन कार्ल द ड्रेस द सौअरब्रुन यांनी पुढच्या चाकावर एक हॅण्डल बसवले तरी सायकल पायाने रेटूनच चालवावी लागे 
- १८७६ साली एच जे लॉसन यांनी पायटा, साखळी वापरून चाकाला गती दिली आधुनिक सायकलचा हा पहिला नमुना

सौजन्य :- फुलोरा, सामना १५०५१४

Sunday, February 23, 2014

आगळे वेगळे

- शरीरातील सगळ्यात मजबूत स्नायू जिभेचे असतात.
- हाताच्या ठशाप्रमाणेच प्रत्येक व्यक्तीच्या जिभेची ठेवणही वेगवेगळी असते.
- मानवाच्या मांडीचे हाड सिमेंटपेक्षाही मजबूत असते.
- दर दोन आठवड्याला आपले पोट स्नायूंचा नवा थर निर्माण करत असते.

सौजन्य :- फुलोरा, सामना २३०२१४

Experience the Power of e-Insurance Account with NDML's National Insurance-policy Repository


Dear SANDIP SADANAND PARADKAR,

You have been enjoying the benefits of Demat account and would have experienced the ease and convenience that Demat form of holding Securities have brought to dealings in Securities Market. Now it’s time to hold Insurance Policies in electronic form and experience the same ease and convenience.

It gives us immense pleasure to inform you that our subsidiary NSDL Database Management Limited (NDML) has been authorized by Insurance Regulatory and Development Authority (IRDA) to act as an Insurance Repository. You can now hold your insurance policies in electronic form with NSDL group, the way you hold your securities in Demat Account. We have named this initiative as "National Insurance-policy Repository" (NIR).
NIR facilitates a proposer to hold insurance policies in electronic form in a single e-Insurance Account (eIA) and offers easy online access to these insurance policies. For this, you will have to open an eIA and the insurance policies will be credited by the Insurance Company into this eIA. You can seek credit of existing as well as new insurance policies in eIA.
And it costs you nothing to open eIA and hold insurance policies in electronic form.


NIR Facilitates:
                                                                                                                                                        !                                                                                                 
·         Holding of all insurance policies in a single e-Insurance Account (eIA),
·         Doing away the hassles associated with holding the insurance policies in physical form,
·         One time Know Your Customer (KYC)  for opening the e-Insurance account,
·         A single point of contact for the account holder to update demographic details with insurance companies,
·         Conversion of the existing paper policies into electronic policies at the request of the policy holder.
Benefits:

·         No charges for eIA opening and eIA maintenance to the eIA holder,
·         Eliminates multiple KYC,
·         All insurance policies  under one umbrella,
·         Single view for all policies,
·         Portfolio tracking,
·         Ease in Premium payments,
·         Account Statement from NIR.
eIA can be opened by filling the eIA application form (attached) and submitting it to your nearest Approved Person - your DP/Broker may also be an Approved Person who will facilitate opening of eIA.
The details of the Approved Persons and the list of insurance companies, whose policies as on date can be converted into electronic form are available at https://nir.ndml.in. We are in the process of appointing more approved persons and many insurance companies are likely to join the Insurance Repository system in due course.


To experience the power of e-Insurance Account fill in the attached eIA application form and submit it to the nearest Approved Person. Please visit https://nir.ndml.in for further information.


For any assistance please feel free to get in touch with us at helpdesk.nir@nsdl.co.in / 022 49142631.

Regards,
NSDL.

सौजन्य :- ई-मेल वर प्रसारित