Sunday, December 21, 2014

सोशल नेटवर्किंगमधील गुन्हे

आजकालच्या संगणक युगात विविध ई-फ्रॉइस व्यतिरिक्त सर्वाधिक जास्त गुन्हे हे सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून घडतात. आजच्या संगणक युगात संगणक क्रांतीमुळे अनेकजण संगणकाचा अमर्यादित वापर करतात. संगणक व इंटरनेट युगामुळे अनेक व्यक्ती एकमेकांच्या सहज संपर्कात राहू शकतात व त्यातून विविध प्रकारे माहितीची देवाणघेवाण होते.
संगणक व इंटरनेटमध्ये सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या प्रकारात सोशल नेटवर्किंग हा एक महत्त्वाचा प्रकार आहे. सोशल नेटवर्किंग म्हणजे एखाद्या विशिष्ट संकेतस्थळाचा (वेबसाईट) अथवा ऑनलाइन चॅटिंगचा (गप्पागोष्टींचे ठिकाण) वापर करून अनेक लोक एकमेकांच्या संपर्कात राहणे व एकमेकांच्या माहितीची देवाणघेवाण करणे. गेल्या एका दशकात अशा अनेक वेबसाईट व चॅटिंग रूम तयार व लोकप्रिय झाल्या आहेत. त्याचा वापर करून आपण आपले फोटो, आवडीनिवडी व इतर अनेक गोष्टी एकमेकांना पाठवू शकतो. यातील लोकप्रिय प्रकार म्हणजे याहु मेसेंजर, ऑर्कुट, फेसबुक, लिकेंडीनसारखी संकेतस्थळे ज्याचा सर्रास वापर करून अनेक व्यक्ती एकमेकांशी संपर्क ठेवतात. त्याव्यतिरिक्त सोशल नेटवर्किंगचा वापर करून अनेक ई-पोर्टलस विविध प्रकारे लोकांना नवनवीन सेवा प्रदान करतात. उदा. विवाहविषयक नोंदणी तसेच नोकरीच्या शोधाकरिता वापरण्यात येणारी अनेक संकेतस्थळे.
अनेक लोक या सर्व संकेतस्थळांचा वापर करतात व त्याचा लाभ घेतात. परंतु गेल्या काही वर्षांत ‘सोशल नेटवर्किंग’च्या माध्यमातून अनेक लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली आहे व दिवसेंदिवस ही संख्या वेगाने वाढत आहे. ऑर्कुट/फेसबुक अगदी विवाहविषयक संकेतस्थळांचा वापर करून अनेक गुन्हेगार दररोज नवनवीन पद्धतीने लोकांना फसवतात. वर्षभरापूर्वी ‘ऑर्कुट’ या संकेतस्थळाचा वापर करून मुंबईतील एका श्रीमंत माणसाच्या मुलाचा खंडणीसाठी झालेला खून तसेच एका विवाहविषयक संकेतस्थळाचा वापर करून अनेक महिलांशी लग्न करून त्यांची आर्थिक लुबाडणूक असे एक ना अनेक गुन्हे सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून घडलेले आहेत. सोशल नेटवर्किंगमध्ये लोक आपली महत्त्वाची माहिती त्या संकेतस्थळावर ठेवतात व त्यानंतर त्या संकेतस्थळावर भेट देणारे इतर लोक त्या माहितीच्या आधारे त्या व्यक्तीशी संपर्क करतात. बहुतांशी वेळेस अनेक लोक आपली सर्व खरी माहिती अगदी आपल्या फोटोसहित या संकेतस्थळावर ठेवतात. त्यामुळे सराईत गुन्हेगार या माहितीचा गैरवापर करून अनेक फसवणुकीचे गुन्हे करतात. ‘ऑर्कुट’ या संकेतस्थळावर बदनामीकारक मजकूर छापून एकमेकांची बदनामी करणारे अनेक गुन्हे आज दाखल आहेत. विशेषत: महिलांच्या बदनामीचे. याहू मेसेंजरवरील चॅटिंगचा वापर करून अनेक गुन्हेगार विविध प्रकारचे ई-फ्रॉडस (हॅकिंगचे) गुन्हे तर करतातच. त्याचबरोबर ते समोरील व्यक्तीचे आर्थिक नुकसानदेखील करतात. गेल्या वर्षी काही अतिरेक्यांनी एका विवाहविषयक संकेतस्थळाचा वापर करून अनेक बनावट ‘पॅनकार्ड’ तसेच इतर फोटो आयडेंटी कार्डस् बनवून त्याचा कसा गैरवापर केला हे आपणास माहीतच आहे.
amitghodekar@hotmail.com
- अमित घोडेकर

सौजन्य  :- फुलोरा सामना २११२१४

No comments: