Sunday, December 21, 2014

आयुर्वेद मातृसुख

हनुमंतापासून ते झाशीच्या राणीपर्यंत अशी विभूती आपल्या पोटी जन्माला यावी ही प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. पण हनुमंताला जन्माला घालणार्‍या अंजनी मातेची तपसाधना, इच्छाशक्ती याचा कोणच विचार करीत नाही. आता तर काय, गर्भाशयच विकत मिळतात. मग माता आणि मातृसुख यांचा विचार करणं सोडलंय सगळ्यांनी. आजकाल फक्त एकच पैसा पैसा आणि पैसाच.
एखाद्याचे आयुष्य किती खडतर असते हे दामणे यांच्या केसमधून जाणवलं. दोन वेळा गर्भाशयात गर्भ राहिलाच नाही. त्यांच्या सांगण्यावरून एक कारण पुढे आले ते म्हणजे ‘भीती.’ त्यांच्या आईला तीन मुली आणि सासरकडून मुलगा व्हावा म्हणून इच्छा या द्विधा भीतीमध्ये सापडलेली ती माऊली. त्या भीतीपोटी गर्भधारणा होऊनही गर्भ टिकत नव्हता. त्यांना बघताक्षणी ‘चिंतानाम् च अतिचिंतनात...’ या श्‍लोकाची प्रचीती येत होती. त्यांना गांभीर्य सांगितले. त्यांनी घरच्यांना समजावून सांगावे म्हणून विनंती केली. त्याप्रमाणे घरच्या मंडळींना समजावून सांगितले की, घरात येणारा जीव मुलगा आहे की मुलगी आहे, यावर बोलण्यापेक्षा त्याला गर्भाशयात असताना आणि नंतरदेखील सकारात्मक दृष्टी द्या. त्यांना ते पटलं. दामणे यांना मासिक पाळीदरम्यान पाळावयाचे नियम सांगितले. त्यासोबत गर्भस्राव करण्याची गर्भाशयाची सवय मोडण्यासाठी गर्भाशय शोधन करून मनाचे आणि शरीराचे बृहण केले. सात महिन्यांत त्यांना गर्भधारणा झाली. त्यांनी सोबत नऊ महिने गर्भसंस्कार घेतल्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी झाली. मुला-मुलीच्या रूपात शिवाजी जन्माला यायला वेळ लागत नाही. त्याला गरज लागते ती फक्त सकारात्मक विचारांची.
गर्भस्राव (Abortion miscarrage) होण्याची कारणे- मासिक पाळीदरम्यान परिचर्या न पाळणे.
- जगाचा मनस्ताप डोक्यावर घेऊन फिरणे.
- शरीराला व मनाला नकारात्मक बनविणे.
- समाजात वावरताना स्त्रीत्व विसरल्याने ममत्व कमी होणे.
- चुकीचे खानपान आणि सवयी.
प्रश्‍न तुमचे...
आहारात तूप का असावे? - भक्ती सावंत (भांडुप)
- तूप खाल्यावर रूप दिसते अशी म्हण आहे. तूप हे मंथनातून तयार होणारा पदार्थ आहे. तुपाचा दिवा हा तेजापेक्षा संथ आणि जास्त काळ टिकतो. तूप हे आपल्या शरीराची व्यवस्था मग त्या पाचनापासून ते एकाग्रतेपर्यंत या सर्वांना छान चालवते. त्यामुळे तुपाच्या दिव्याप्रमाणे आयुष्य जास्त काळ टिकवते. अगदी स्वस्थ. खाताना फक्त अपचन होणार नाही याची काळजी घ्या.
आमच्या घरी न्यूडल मैदा बेसन इतर स्नॅक वारंवार बनवले जातात. माझी पुतणी साडेचार वर्षांची आहे. तिला नाश्त्यात काय द्यावे? - शशांक ठाकूर (दहिसर)
- सर्वप्रथम खाण्यासाठी त्यांच्या मागे लागू नका आणि भूक लागेल तेव्हा त्यांच्या भुकेच्या मर्यादेत खाण्यास द्या. त्यांना नाश्त्याऐवजी मिठ न घातलेली भाताची पेज, तूपसाखर पोळी, चवनप्राश, शतावरी कल्प, भाताची खिमटी, गरमागरम थालीपीठ यांची सवय लावा. म्हणजे पचनशक्ती सुधारेल, हाडे बळकट होतील, मांसपेशी मजबूत होतील आणि तुम्हाला दवाखान्याच्या पायर्‍या झिजवाव्या लागणार नाहीत.
ayurveddeepak@hotmail.com
- डॉ. दीपक केसरकर
सौजन्य:- फुलोरा, सामना २११२१४

No comments: