हा लॅपटॉप म्हणजे एक आक्रितच आहे. बंद असताना अंदाज येत नाही, पण परवलीचा शब्द उच्चारायचा अवकाश अलिबाबाची गुहाच उघडते जणू. कधी जुन्या अल्बममधे प्रवेश केल्यासारखं वाटतं, तर कधी वाचनालयात. कधी डिपार्टमेंटल स्टोअर, तर कधी सिनेमा हॉल, तर कधी जगाकडे उघडणारी मोठीच्या मोठी फ्रेंच विंडो.
मित्रांचा अड्डा भरवतो, गप्पांची मैफल सजवतो, माझा मूड ओळखून कधी ‘मुन्नी बदनाम’, तर कधी ‘गुलों में रंग भरे’ ऐकवतो . अर्ध्या अपुर्या कविता, पूर्णत्वास न गेलेल्या लेखांचे चिटोरे, स्कॅन करून ठेवलेली पुस्तकं, काही हवीहवीशी वाटणारी आणि काही अजिबात नकोशी ई मेलरूपी पत्रं सगळं सगळं जपून ठेवतो. घरकामाला मदत म्हणून कुणी घरात यावा आणि आपलं प्रतिबिंब होऊन जावा असा सोलमेट, आत्माराम!
एखाद्या काजळ संध्याकाळी गुहेत नेऊन खुष्कीच्या मार्गाने बरोबर गावी घेऊन जातो, अख्खं बालपण फिरवून आणतो आणि कुणालाही कळायच्या आत वास्तवात आणून सोडतो, कुठेही अडखळू न देता. धुळीने माखलेले पाय अन चेहर्यावर वडिलांना भेटून आल्याचं समाधान. पायाकडे कोण बघतंय! लोक वरवरच्या समाधानात खुश, मी लोकात खुश. हा गडी मात्र काम करत राहतो फक्त. कुठल्याही स्तुतीचं वा निंदेचं एनर्जी ड्रिंक पिताना दिसत नाही, पण सतत चार्ज्ड असतो, अलर्ट असतो. स्टॅण्ड बाय मोडमधेही अर्धा जागा असलेल्या रखवालदारासारखा. कधी कधी वाटतं भगवतगीता कोळून प्यायलाय आत्माराम.
चांगलं वाईट सगळं उघडया डोळ्यांनी बघतो, विरक्त हातांनी वेगळं करतो, वाईट गोष्टी रिसायकल करतो, पण बहुतेक काही गोष्टी कायमच्या रजिस्टरमधून काढणं त्यालाही अवघड जात असावं. कारण परवलीचा शब्द विसरून मी जेव्हा केव्हा एखादा क्षण त्याच्यासमोर थबकून उभा राहतो तेव्हा आपोआप आरसा होऊन जातो त्याचा. मग रिसायकल न झालेल्या मोहांचे, चुकांचे, गुन्ह्यांचे काही चरे दिसत राहतात, ज्याला आपल्या जगात सुरकुत्या म्हणतात. वय माझं वाढत चाललंय आणि दिसतंय त्याच्या चेहेर्यावर असं नशीब घेऊन आलो आहोत मी आणि माझा लॅपटॉप. आता कधी ना कधी हा आरसा तडकेल तेव्हा मी गरीब दिसेन हातात खजिना असून आणि पाठमोरा आत्माराम दूर जाताना दिसेल परवलीचा शब्द कायमचा स्वत:सोबत घेऊन.
vaibhav.writer@gmail.com वैभव जोशी
सौजन्य :- फुलोरा, सामना २११२१४

No comments:
Post a Comment