Sunday, August 03, 2014

फोन फ्रीकिंग

आपण अनेकदा वर्तमानपत्रात वाचतो अमक्या एका माणसाला टेलिफोनचे बिल ५० हजार रुपये आलं किंवा आणखी कोणाला १ लाख रुपये बिल आलं वगैरे वगैरे.. काही अक्षम्य तांत्रिक चुका सोडल्या तर बर्‍याच वेळेस खरंच आलेले हे बिल चुकीचं नसतंच मुळी. आता तुम्ही म्हणाल की, माझ्या फोनवरून फक्त एवढेच फोन केले आणि तुम्ही सांगताय की एवढे हजारो कॉल तुम्ही केले आहात हे कसं शक्य आहे. 
कल्पना करा की, तुमच्या फोनचा वापर शेकडो लोक करत असतील तर? तर ते करत असलेल्या सर्व फोनचं बिल तुमच्या नावावर येणार आणि फोन कंपनी ते तुमच्याकडून वसूल करणार, परंतु हे खरंच शक्य आहे काय? तर याचं उत्तर होय असे आहे. फोन या प्रकारच्या हॅकिंगला फ्रीकिंग असे म्हणतात आणि अशा प्रकारे दुसर्‍याचे फोन हॅक करून फुकटात फोन करणार्‍या हॅकर्सला फ्रीकर्स असे म्हणतात.
आपल्याकडे फोन हॅकिंग आणि फ्रीकिंग हे तसं अगदी गेल्या काही वर्षांपासून आपल्या कानावर पडत आहे, पण बाहेरच्या देशात मात्र फोन हॅकिंग आणि फ्रीकिंग गेल्या ५ दशकांपासून प्रचंड प्रमाणात सुरू आहे त्याचे प्रमाण एवढं मोठं आहे की अनेक देशांनी फोन हॅकिंग आणि फ्रीकिंग कमी करण्यासाठी अनेक कायदे केले आहेत आणि अशा प्रकारे फोन हॅकिंग आणि फ्रीकिंग करणार्‍यांना शिक्षादेखील केली जाते. 
फोन फ्रीकिंगची सुरुवात अमेरिकेत झाली आणि तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही, पण समस्त टेक जगाचा आवडता आणि आयफोनचा निर्माता स्टीव्ह जॉब्स हादेखील त्याच्या उमेदीच्या काळात एक नावाजलेला फोन फ्रीकर होता त्याकाळी ऍपलमधला त्याचा सहकारी स्टीव्ह वोजनियाक याने ब्लू-बॉक्स नावाचे फुकटे फोन करू शकेल असा टेलिफोन बनवला होता हा फोन ते त्याकाळी विकतदेखील असत. ब्लू-बॉक्स ने त्याकाळी अमेरिकेत धुमाकूळ घातला होता नशिबाची गोष्ट म्हणजे ब्लू-बॉक्स कम्युनिटी जी हे फोन विकत असे ज्यात स्टीव्ह जॉब्सदेखील होता त्यांच्यात आणि आपल्या हिंदी चित्रपटातील नायकात एक साम्य होतं, जसं आपला नायक रात्री गुन्हा करून जमलेले पैसे गरीबात वाटत असे असच काहीसं ब्लू-बॉक्स कम्युनिटीच एक तत्त्व होतं ते म्हणजे ब्लू-बॉक्सचा वापर करून ते फक्त श्रीमंत लोक सरकारी ऑफिस आणि मोठमोठ्या कंपन्याचे फोन हॅक करत आणि त्याचा वापर करून फुकटात फोन करत आणि गरीब लोकांनादेखील फुकटात फोन करायची सवलत द्यायचे. पुढे पुढे स्टीव्ह जॉब्सची ऍपल ही कंपनी संगणक आणि मोबाइल मध्ये नावारूपाला आली नाहीतर कदाचित इतर फ्रीकर्सप्रमाणे स्टीव्ह जॉब्सदेखील अमेरिकेच्या एखाद्या तुरुंगात फ्रीकिंगच्या गुन्ह्यात खडे फोडत बसला असता.

सौजन्य :- फुलोरा, सामना ०३०८१४
amitghodekar@hotmail.com

No comments: