Monday, June 27, 2011

गर्भावस्थेतील महत्तवपूर्ण तपासण्या

वैद्यकीय क्षेत्रात दिवसेंदिवस होणार्‍या प्रगतीमुळे काही गोष्टी सोप्या झाल्या आहेत; पण त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांपुढे नवीन आव्हानंदेखील उभी राहू लागली आहेत. सध्याचा जमाना ‘हम दो हमारा एक’चा आहे. मात्र हे मूल शारीरिक व मानसिकदृष्ट्या निरोगी असावं असा प्रत्येक मातापित्याचा आग्रह असतो आणि तो साहजिक आहे

बाळ गर्भावस्थेत असतानाच अनेक तपासण्या करून आपल्याला बाळाच्या वाढीची योग्य कल्पना येते.या तपासण्या बाळाच्या जन्मापूर्वीच केल्या जातात. होणार्‍या बाळाला गर्भावस्थेतच काही शारीरिक विकृती, बौद्धिक दोष, आनुवंशिक आजार आहेत का याची शक्यता या तपासण्यांनी पडताळता येते.


या तपासण्या गर्भधारणेपासून 10 ते 16 व्या आठवड्यात केल्या जातात . सगळ्या गर्भवती स्त्रियांना या सर्वच तपासण्यांतून जाणे आवश्यक नाही. यातील काही तपासण्या सर्वसाधारणपणे सर्व गर्भवती स्त्रियांना सुचविल्या जातात. मात्र ज्यांच्या बाळात आनुवंशिक दोष असण्याची शक्यता जास्त आहे अशा आई-वडिलांना, ज्या स्त्रियांना वयाच्या 35 व्या वर्षानंतर गर्भधारणा झाली असेल आणि ज्यांच्या आधीच्या गर्भधारणेतून झालेल्या मुलामध्ये काही विकृती असेल अशांसाठी या तपासण्या करून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. यासाठी प्रत्येक स्त्रीने गर्भधारणा झाल्यावर लगेच प्रसूतीतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. पूर्ण तपास केल्यावर तुम्हाला आवश्यक असलेल्या तपासणीबद्दल त्यांचे मार्गदर्शन घ्यावे.

गर्भावस्थेत करण्याच्या या तपासण्यांमध्ये सोनोग्राफी (अल्ट्रासाऊंड टेस्ट्स ), ट्रिपल मार्कर टेस्ट, ऍम्नियोसेंटेसिस (Amniocentesis), कोरिऑनिक व्हिलस सॅम्पलिंग (chorionic villous sampling ) यांचा समावेश होतो .

गर्भावस्थेतील पहिल्या तीन महिन्यांमध्ये म्हणजे 10 ते 11 व्या आठवड्यात सोनोग्राफीमध्ये न्युकल थिकनेसची (NT - SCAN) तपासणी केली जाते. त्याचबरोबर पॅप-ए आणि बिटा - एचसीजी या हार्मोन्ससाठी रक्ततपासणीही केली जाते. दुसर्‍या तिमाहीमध्ये 16 ते 20 आठवड्यांत एनॉमली स्कॅन म्हणून सोनोग्राफी केली जाते. त्याचबरोबर रक्तातील बिटा - एचसीजी , इस्ट्राडिऑल आणि अल्फा फिटोप्रोटिन या हार्मोन्सची तपासणी केली जाते. रक्ततपासणीचे निष्कर्ष, सोनोग्राफीमधील बाळाची तपासणी या सर्वांचा आईचे वय, शारीरिक स्वास्थ्य, गर्भकाळ यांच्याशी निकष लावून डाऊन सिंड्रोम, ट्रायसोमी-18, ट्रायसोमी-13 या विकृतींची शक्यता दर्शवता येते.

14-18 व्या आठवड्यात ऍम्नियोसेंटेसिस ही तपासणी केली जाते. त्यामुळे बाळाच्या शरीरातील दोषांची माहिती होते. ऍम्नियोसेंटेसिस, कोरिऑनिक व्हिलस सॅम्पलिंग या तपासण्या करण्यापूर्वी गर्भवती महिलांना जेनेटिक काऊन्सिलर यांना भेटण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून या तपासण्यांचे फायदे - तोटे व्यवस्थित समजून घेऊन निर्णय घेण्यास मदत होते .

अशा तपासण्यांमुळे जन्म होण्याआधी गर्भावस्थेतच किंवा जन्मानंतर लगेच काही दोषांवर उपचार करून घेता येतात. जर विकृती गंभीर स्वरूपाची असेल, त्यावर उपचार करणे कठीण असेल किंवा उपचार उपलब्ध नसतील तर अशा परिस्थितीत मातापित्यांना ठोस निर्णय घ्यायला मदत होते. काही वेळा माता - पिता असा दोषी गर्भ न वाढवण्याचा निर्णय घेऊ शकतात. अशा सदोष बालकाला जन्म दिल्यानंतर ते वाढवताना आई - वडिलांना होणारा मानसिक त्रास, अपत्याला समाजाकडून मिळणारी वागणूक, बाळाच्या उपचाराला लागणारा वेळ व तयारी, बाळाच्या भवितव्याचे नियोजन, त्यासाठी करावी लागणारी आर्थिक तरतूद यांचा पूर्णपणे सखोल विचार करून माता - पित्यांना हा निर्णय घ्यायचा असतो.

या तपासण्यांमुळे निदान होणार्‍या काही समस्या बाळाच्या जन्माआधी सोडविता येतात; तर काहींवर बाळ जन्मल्यावर उपचार करणे शक्य असते, पण त्याच्यामुळे पूर्ण नियोजन करून उपचार करणे साध्य होते.

अशा प्रकारे या तपासण्यांमुळे निरोगी मूल जन्माला घालण्याचं प्रत्येक माता - पित्याचं जे स्वप्नं असतं ते पूर्ण करण्यास बर्‍याच अंशी मदत होते.

- डॉ . प्राजक्ता देऊळकर drprajaktadeulkar@gmail.com
सौजन्य:- फुलोरा, सामना २५०६२०११.

No comments: