Saturday, June 18, 2011

अतिगुटगुटीत बाळ म्हणजे सुदृढ बाळ?

वयोमानाप्रमाणे वजन जास्त असलेल्या मुलाला ‘काय, बघूनच कळतं ना की, चांगल्या खात्यापित्या घरचा आहे ते?’ असं म्हणून त्याचं कौतुक केलं जातं. पुढे जाऊन त्याच मुलाला शाळेत ‘लठ्ठपणा’च्या बिकट परिस्थितीला सामोरं जावं लागतं.

तुम्हाला काही वर्षांपूर्वी ‘बेबी फूड्स’च्या सारख्या दाखवल्या जाणार्‍या जाहिराती आठवतात? त्यातली सगळी बाळं अगदी गोबरी आणि गुटगुटीत असायची. नशीब आता त्या जाहिराती दाखवत नाहीत! पण त्यावरून एक लक्षात यायला हरकत नाही की, मुळात आपल्या देशात गुटगुटीत म्हणजे सुदृढ असे समजले जात होते आणि आजही आपले बाळ ‘चबी’ नसलं तर बर्‍याच बायकांना वाईट वाटतं. कुठलंही साधारण बारीक वाटेल असं लहान मूल किंवा बाळ बघितलं की, आधी विचारला जाणारा प्रश्‍न म्हणजे ‘तुमचं बाळ नीट खात नाही का?’ या प्रश्‍नाचं जर उत्तर ‘व्यवस्थित सगळं खातं’ असं दिलं तर लगेच पुढचा उद्गार ‘अरेच्या, बघून तरी असं वाटत नाही!’ असं ऐकल्यावर उगीच त्या आईवडिलांच्या मनात शंकेचा किडा वळवळून जातो.


तसेच वयोमानाप्रमाणे वजन जास्त असलेल्या मुलाला ‘काय, बघूनच कळतं ना की, चांगल्या खात्यापित्या घरचा आहे ते?’ असं म्हणून त्याचं कौतुक केलं जातं. पुढे जाऊन त्याच मुलाला शाळेत ‘लठ्ठपणा’च्या बिकट परिस्थितीला सामोरं जावं लागतं. आपला मुलगा/ मुलगी कुठल्याही खेळात भाग घेत नाही, दिवसभरात त्याचा काहीच व्यायाम होत नाही ही गोष्ट लक्षात येईपर्यंत बराच उशीर झालेला असतो. लहानपणी ज्या गोबरेपणाचे कौतुक होत होते त्यालाच आता लठ्ठपणाचे लेबल लागल्यामुळे मुलं पण गोंधळात पडतात. प्रौढांमध्ये वाढणार्‍या लठ्ठपणाप्रमाणेच आज आपल्या देशात लहान मुलांमध्ये वाढत्या जाडीचा गंभीर प्रश्‍न आढळतोय. माझ्या मतानुसार ही समस्या जास्त निकडीची आहे. कारण बालपणी अतिलठ्ठ असलेले बहुतांश लोक मोठेपणी पण स्वत:चे वजन आटोक्यात ठेवायला धडपडत असतात.

या सगळ्याची सुरुवात गर्भारपणात होते. गर्भवतीने जर गरजेपेक्षा जास्त आणि अती तळलेले, तूपकट, गोड किंवा जंक फूड खाऊन तिचे वजन १५-२० किलो किंवा त्याहून अधिक वाढले तर गर्भातल्या शिशूच्या पण चरबीच्या पेशी अतिरिक्त प्रमाणात वाढतात. तसेच बाळाला स्तनपान न करता जर फॉर्म्युला फूड किंवा बेबी फूड दिले तर त्यात पण बाळाच्या पोटात आवश्यकतेपेक्षा अधिक कॅलरी जाण्याचा धोका असतो. यामागचे कारण म्हणजे सांगितलेल्या प्रमाणापेक्षा जास्त पावडर घालून बेबी फूड तयार करणे किंवा लहान बाळाची भूक खूप असते आणि ते जेवढं खाईल तेवढं सुदृढ होईल या धोरणाखाली त्याला अती खायला प्रोत्साहित करणे. गुटगुटीत बाळाला अधिक प्रमाणात गोड खिरी, गूळ घातलेले गोड पदार्थ, साखर घालून म्हशीचे दूध इ. पदार्थ जास्त खायला घालून त्याच्या वाढत्या वयात शरीरातल्या फॅट साठवून ठेवणार्‍या पेशींचा आकडा खूप वाढतो आणि नंतर याच पेशी जास्त प्रमाणात शरीरात चरबी साठवतात.

‘माझ्या नातीला प्रचंड गोड आवडतं’ म्हणून वरचेवर लाडू, पेढे, शिरा खायला देणं किंवा आई-बाबा हॉटेलमध्ये गेल्यावर तिथे मुलाला फ्रेंच फ्राईज, चीझ, चिप्स, आईस्क्रीम खायला देणं... दोन्ही सवयी लहान मुलासाठी तितक्याच हानीकारक असतात. तीन-सात वर्षांच्या वयोगटातली मुलं आईवडिलांच्या खाण्यापिण्याच्या सवयींचे अनुकरण करतात आणि त्याच सवयी त्यांना कायमस्वरूपी अवगत होतात. दर रविवारी सकाळी इन्स्टन्ट नूडल्स, दुपारी गोडधोड आणि रात्री हॉटेलमध्ये जेवायची सवय जर आई-बाबांना असेल आणि ती सवय घरात लहान मूल आल्यावर त्यांनी बदलली नसेल तर मुलाची पण ‘रविवारी असंच खायचं असतं’ अशी समजूत होणार आणि तो पण कायम तसंच खात राहणार. असे न होऊ देता अगदी बालपणापासूनच तुमच्या मुलाला (किंवा मुलीला) आरोग्यपूर्ण आणि प्रमाणात खायची सवय लावा आणि त्याचे ‘लठ्ठपणा’ नामक राक्षसापासून संरक्षण करा.

amitagadre@gmail.com
(ंलेखिका डाएट कन्सल्टंट आहेत)
सौजन्य:- फुलोरा, सामना १८०६२०११.

No comments: