Tuesday, June 14, 2011

ऍडवेअर आगाऊ जाहिराती

इंटरनेट वापरताना अनेकदा अचानक मधेच एखाद्या अनाहूत पाहुण्याप्रमाणे जाहिरातीचा किंवा एखाद्या चांगल्या ऑफरचा पॉपअप आपल्यासमोर प्रकट होतो. आपण काहीएक विचार न करता थेट अशा पॉपअपवर क्लिक करतो व त्यानंतर त्यांच्या जाहिरातवजा संकेतस्थळावर आपल्या माहितीची नोंद करून जाहिरातदाराच्या फोन किंवा ई-मेलची वाट बघत बसतो. इंटरनेटवरील अशा पॉपअपरूपी प्रकटणार्‍या जाहिरातींना ऍडवेअर असे म्हणतात. अशा जाहिरातींचा बहुतांशी उद्देश हा तुमची ‘आयडेंटी थेफ्ट’ अर्थात तुमच्या वैयक्तिक माहितीची चोरी करणे असा असतो.


- आयडेंटी थेफ्ट : आपला मोबाईल क्रमांक, घरचा पत्ता, ई-मेल ऍड्रेस, बँक अकाऊंट नंबर किंवा क्रेडिट कार्ड क्रमांक ही आपली गोपनीय माहिती असते. सराईत हॅकर्स ऍडवेयरचा वापर करून सहजपणे या माहितीची चोरी करू शकतात. यालाच ‘आयडेंटी थेफ्ट’ असे म्हणतात. पुढे या माहितीचा अनेक वेगवेगळ्या प्रकारे दुरुपयोग केला जाऊ शकतो. अगदी तुमच्या क्रेडिट कार्ड किंवा बँक अकाऊंटचा गैरवापर करून तुम्हाला आर्थिक भुर्दंडसुद्धा सहन करावा लागू शकतो. तुमचा मोबाईल क्रमांक किंवा ई-मेल ऍड्रेसचा वापर करून ‘स्पॅम’ ई-मेल किंवा ‘स्पूक एश्ए’ पाठवण्यासारखे प्रकारही केले जाऊ शकतात. त्यामुळे इंटरनेटवरील ‘ऍडवेयर’वर आपली वैयक्तिक माहिती शक्यतो शेयर करण्याचे टाळावे. अगदी जर खरच चांगली वेबसाईट किंवा खात्रीवजा प्रॉडक्ट असेल तर संबंधित कंपनीच्या ग्राहक सेवा विभागाला फोन करून अशा जाहिरातीची प्रथम खातरजमा करूनच मग अशा संकेतस्थळावर नोंदणी करावी.
- मॅन इन द मिडल : ऍडवेयरचा वापर करून सराईतपणे तुमचा ई-मेल किंवा ऑनलाईन बँक अकाऊंट किंवा इतर कोणत्याही ऑनलाईन सेवेमधे तुम्हाला माहीत नसताना बेमालूमपणे हॅक करण्याचा हा नवीन प्रकार आहे. ‘मॅन इन द मिडल’ म्हणजेच जेव्हा तुम्ही अशा कोणत्याही ऍडवेयरवर क्लिक करता तेव्हा तुमच्या संगणकातील इंटरनेट ब्राऊसमधील सर्व माहिती ‘ऍडवेअर वरील’ मुख्य संगणकावर नोंद होते व इंटरनेट ब्राऊसरमधील ‘कुकीज’चा वापर करून हॅकर्स थेट तुमच्या ऑनलाईन सेवेचा ताबा घेतात. गेल्या वर्षभरात ‘मॅन इन द मिडल’चा वापर करून अक्षरश: लाखो लोकांना फसवण्यात आले आहे.
- स्पायवेअर/मालवेअर : अनेकदा इंटरनेट वापरताना आपल्यासमोर ‘मोस्ट गुड स्क्रीन सेव्हर्स’ किंवा ‘अमेझिंग वॉलपेपर्स’सारख्या सुंदर चित्रे असणार्‍या जाहिराती झळकतात व आपण चांगले स्क्रीन सेव्हर्स किंवा वॉलपेपर्स डाऊनलोड करण्यासाठी त्यावर क्लिक करतो. हे स्क्रीनसेव्हर किंवा वॉलपेपर्स स्पायवेयर किंवा मालवेयर असतात. एकदा का हे स्क्रीनसेव्हर किंवा मालवेयर आपल्या संगणकावर इन्स्टॉल झाले की मग आपल्या संगणकात ते एक ठरावीक प्रोग्राम इन्स्टॉल करतात. हा प्रोग्राम दर ठरावीक वेळेला आपल्या संगणकात होत असलेल्या सर्व नोंदी ‘ऍडवेयरच्या’ मुख्य संगणकापर्यंत इंटरनेटवरून पाठवत राहतो मग या माहितीचा दुरुपयोग केला जातो. त्यामुळे इंटरनेटवर जाहिरातीमधून आलेल्या स्क्रीनसेव्हर वॉलपेपर्सपासून दोन हात दूरच राहणे केव्हाही चांगले.
बचाव कसा करावा?
- ऍडवेयरपासून बचाव करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुमच्या इंटरनेट एक्सप्लोररमधील ‘पॉपअप ब्लॉकरचा’ वापर करणे. त्यासाठी इंटरनेट एक्सप्लोर - प्रॉपरटीस - प्रायव्हसी - टर्न ऑफ पॉपअप ब्लॉकरवरील टीक काढून टाकणे. यामुळे तुमच्या संगणकातून कोणत्याही संकेतस्थळावरील पॉपअप कायमच्या बंद होतील. जर तुम्हाला काही विशिष्ट संकेतस्थळावरील पॉपअप बघायच्या असतील तर तुम्ही याच ऑप्शनमधील ‘आलाऊ वेबसाईट’चा वापर करून त्या संकेतस्थळावरील पॉपअप बघू शकता.



- कुठल्याही संकेतस्थळावरील ‘पॉपअप’वर आपल्या वैयक्तिक माहितीची नोंद करू नये.


-इंटरनेट एक्सप्लोररमधील स्मार्टस्क्रीन फिल्टर व क्रॉस साईट स्क्रिप्ंिटग फिल्टरचा वेळोवेळी वापर करीत रहा.


-इंटरनेट एक्सप्लोरर तसेच विंडोज संगणक प्रणालीचे लेटेस्ट पॅचेस वेळोवेळी अपडेट करीत रहा.


-ऍण्टिवायरस इन्स्टॉल करताना शक्यतो ऍण्टिस्पायवेयर व ऍण्टिमाल वेयरसारखी वैशिष्टे असणार्‍या ऍण्टिव्हायरचा वापर करा. त्यामुळे ऍडवेयरपासून बचाव होऊ शकतो. इंटरनेटचा वापर सतर्कतेने केला तर ‘ऍडवेयर’पासून सहजपणे बचाव करता येऊ शकतो.

Techno.savvy@live.com
सौजन्य:- इंद्रधनू, सामना १४०६२०११.

No comments: