Saturday, June 25, 2011

गवती चहा

दिसायला एखाद्या गवतासारखे दिसणारे गवत, पण या गवतामध्ये असणार्‍या औैैषधी गुणधर्मांमुळे त्याला आयुर्वेदात महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. बहुतेकजण मात्र चहाला फक्त चव यावी यासाठी या गवताचा वापर करतात. म्हणूनच याचे नाव गवती चहा असे पडले असावे. गवती चहाला इंग्रजीमध्ये लेमन ग्रास असे म्हणतात. गवतासारखी वाढणारी ही वनस्पती बहुवर्षीय व बहुगुणी औषध आहे.


पावसात उपयोगी पडणारी वनस्पती म्हणजे गवती चहा. घरातल्या कुंडीत सहज वाढणार्‍या किंवा बाजारात नेहमी मिळणार्‍या या गवताच्या पातीचे तुकडे चहात घातल्यामुळे चहा स्वादिष्ट बनतो.

- गवती चहा, सुंठ, आलं, खडीसाखर, धने, जिरे, लवंग, तुळस, बेल, पुदीना वगैरे पदार्थ घालून काढा करून प्यायल्यास सर्दी, खोकला बरा होतो.

- ताप आल्यास पारिजातकाची पाने या काढ्यात टाका. घसा दुखणे, ताप या तक्रारी नाहीशा होतात. हा काढा घाम आणणारा व ज्वरनाशक आहे. हा काढा घाम आणणारा व ज्वरनाशक आहे.

- गवती चहाचा काढा घेतल्यामुळे लघवी साफ होते.

- आलं, पुदीना, गवती चहा यांच्यापासून बनवलेला हर्बल चहा घेतल्याने पचन व्यवस्थित होते. पावसाळ्यात काहीतरी गरम पेय प्यावेसे वाटते. अशा वेळी हा हर्बल चहा घेणे उत्तम.

- गवती चहा, आलं, तुळसी, दालचिनी यांच्यासह उकळलेल्या पाण्यात चवीनुसार साखर टाकून पावसाळ्यात रोज एकदा घेणे चांगले. त्यामुळे जंतुसंसर्ग होण्यास प्रतिबंध होतो व पचनशक्ती चांगली राहण्यास मदत होते.

- उर्ध्वपातन पद्धतीने गवती चहाच्या पानांतील तेल काढले जाते. हे तेल सारक, उत्तेजक, शामक असल्यामुळे जंतनाशक, रेचक, त्वचाविकार, कुष्टरोग, अपस्मार, पोटातील वात वगैरे विकारांवर उपयुक्त आहे.

- वात विकारात याचे तेल अंगास चोळल्याने ठणका कमी होतो.

- साठवण्याच्या धान्यामध्ये कीटकनाशक म्हणून या गवती चहाच्या पानांचा वापर करतात.
सौजन्य:- चिरायू, सामना

No comments: