Sunday, June 26, 2011

धूमकेतू

आकाशात क्वचितच दिसणारी अतिशय सुंदर व आकर्षक अशी खगोलीय वस्तू म्हणजे धूमकेतू. रात्रीच्या आकाशात लांबलचक पिसार्‍याने जगाचे लक्ष वेधून घेणारा धूमकेतू पुरातन काळापासून भीतीयुक्त औत्सुक्याने पाहिला जातो. आपल्याला दिसणारे धूमकेतू हे आकाशाच्या पोकळीत असलेल्या उर्ट क्लाऊड भागातून येत असावेत असे शास्त्रज्ञांना वाटते. याभागात सुमारे शंभर अब्ज धूमकेतू असून काही कारणाने ते आपल्या जागेपासून हलल्यास व सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामध्ये अडकल्यास ते सूर्याकडे खेचले जातात. सूर्याला काही ठराविक अंतरावरून फेरी मारून पुन्हा सूर्यापासून दूर जातात. त्यांचे हे जाणे-येणे सतत चालू राहते. शेवटी त्यांच्यातील द्रव्य संपून किंवा ते ग्रहांवर अथवा प्रत्यक्ष सूर्यावर कोसळून नाहीसे होत असावेत असा शास्त्रज्ञांचा कयास आहे. धूमकेतू हे गोठलेल्या कार्बनडायऑक्साईड वायू ( CO 2), बर्फ, धूळ व छोट्या मोठ्या कणांपासून बनलेले असतात. सूर्यापासून दूर असताना ते गोठलेल्या अवस्थेमुळे, पृथ्वीवरून पाहिले असता बिंदुवत दिसतात. मात्र सूर्याजवळ आल्यावर तापून त्यांना प्रचंड मोठी शेपटी फुटल्याचे दिसू लागते. यावेळी धूमकेतूचे तीन भाग स्पष्ट दिसू लागतात. अगदी पुढे असणारा धूमकेतूचा केंद्रभाग किंवा घनभाग म्हणजे न्युक्लिअस. या घन भागाभोवती धुराप्रमाणे वायूचे आवरण असते. त्याला कोमा असे म्हणतात. या कोमातूनच एक लांबलचक शेपटी फुटलेली दिसते. धूमकेतूच्या घन भागाला ‘डर्टी स्नो बॉल’ या नावाने ओळखले जाते. कारण यामध्ये धूळ, काही वायू, बर्फ व कार्बनडायऑक्साईड वायू असतो. पृथ्वीवर जीवसृष्टी व पाणी कसे निर्माण झाले असावे याचे अनेक सिद्धांत शास्त्रज्ञांनी मांडले आहेत. यापैकी एका सिद्धान्तानुसार पृथ्वीवर धूमकेतू आदळल्याने पाणी व जीवसृष्टी निर्माण झाली असावी. प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ फ्रेड हॉवेल व विक्रमसिंघे यांच्या मते धूमकेतूंच्या धुळीत पृथ्वीचा प्रवास होताना काही विषाणू पृथ्वीवर येतात व रोगराई पसरते. अवकाशयाने धूमकेतूवर उतरवून धूमकेतूविषयीचे अधिक ज्ञान मिळवण्याचे स्वप्न पाहत आहेत.


सौजन्य :- फुलोरा, सामना २५०६२०११.

No comments: