Friday, September 09, 2011

‘शुभमंगला’ आधी सावधान...

समाजात हुंडाबळी, घटस्फोट, नवर्‍याकडून होणारी छळवणूक, फसवणूक असे प्रकार वारंवार समोर येतात. देवा, ब्राह्मणांच्या साक्षीने घेतलेल्या आणाभाका लग्नानंतर खोट्या का ठरतात? याचा विचार करण्याची वेळ आली आहे. करिअर, पत्नी आणि एखाद्या कुटुंबात सून म्हणून जाताना पेलाव्या लागणार्‍या अनेक जबाबदार्‍या पार पाडायच्या म्हणजे तारेवरची कसरतच. मात्र यावरही मात करता येऊ शकते. ती म्हणजे लग्नाआधीच्या काऊन्सिलिंगने म्हणजेच समुपदेशनाने. लग्न तुटण्याच्या वळणावर आल्यानंतर समुपदेशन करण्यापेक्षा विवाहपूर्व समुपदेशन केव्हाही चांगलेच.


मुलगा आणि मुलगी हे दोघेही अशा काऊन्सिलींगच्या माध्यमातून आपल्या भावी आयुष्याविषयीच्या कल्पना, शंका, एकमेकांचे स्वभाव याविषयी जाणून घेऊ शकतात. ज्या कुटुंबात जायचे आहे अथवा ज्या मुलीशी विवाह करायचा आहे ती आपल्या घरात कशी रुळेल, घरातल्या मंडळींशी जुळवून घेऊ शकेल का? अशा असंख्य प्रश्‍नांची उकल काऊन्सिलिंगच्या माध्यमातून होऊ शकते.

भावी जोडीदार आणि सासरच्या मंडळीबाबत मुलीच्या मनात काही कल्पनाचित्र असते. एखाद्या चित्रपटातील गोड प्रसंग डोळ्यासमोर आणून ती जोडीदाराचे स्वप्न रंगवत असते. प्रत्यक्षात वास्तव दुसरेच असते. म्हणून आयुष्यातल्या खाचखळग्यांविषयी मुलींनी अधिक जागरुक असले पाहिजे. सगळे काही सुरळीत होईल असे न मानता येणारे प्रत्येक संकट कसे टाळायचे किंवा त्याला धीराने कसं तोंड द्यायचं हे ठरवून आपले नाते बळकट कसे होईल असा प्रयत्न मुलींनी केला पाहिजे. सासू-सासर्‍याव्यतिरिक्त घरातील दीर, भावजय किंवा नणंदेचे व्यक्तिमत्त्व, स्वभाव व आवडी निवडीविषयी भावी जोडीदाराशी मनमोकळेपणाने बोललं पाहिजे.

मुलींची दुहेरी भूमिका

चूल आणि मूल ही संकल्पना इतिहासजमा झाली असून महिला आता पुरुषांपेक्षाही कितीतरी पुढे निघून गेल्या आहेत. लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वीच अनेक मुली स्वत:च्या पायावर उभ्या राहतात. लग्नानंतर नोकरी आणि पत्नी अशी दुहेरी भूमिका तिला वठवावी लागते. तेव्हा नोकरी, पती आणि कुटुंब यामधील संतुलन साधणे अत्यंत आवश्यक असते.

लग्नानंतरचे प्लॅनिंग

वंशाचा दिवा, खानदानचा वारस हवा असे म्हणत लग्न झाले की वर्षभरात मूल अंगणात खेळलं पाहिजे अशी इच्छा मुला-मुलींचे आई-वडील बाळगून असतात. मात्र आजच्या काळात विवाहानंतर मूल किती वर्षांनी हवे याचे देखील नियोजन करायला हवे. नोकरी करणार्‍या मुलींनी अत्यंत विचारपूर्वक हा निर्णय घेतला पाहिजे.

बिनधास्त बोला ...

विवाह हा मुलगा आणि मुलगी या दोघांच्या जीवनातील एक महत्त्वाचा क्षण. त्यामुळे याविषयी निर्णय घेताना मनात उठणारे प्रश्‍न दाबून ठेवून, घाई गडबडीत किंवा लोक काय म्हणतील याचा विचार न करता मनातील प्रत्येक प्रश्‍नावर काऊन्सिलरशी बिनधास्त बोला. अगदी सेक्सविषयीचे प्रश्‍न असले तरी न लाजता चर्चा करून मनातली घालमेल दूर करून मगच लग्नाचा निर्णय घेतला पाहिजे.

- सीमा कुलकर्णी
सौजन्य:- मानिनी, सामना.

No comments: