Sunday, September 18, 2011

कॉर्पोरेट मंत्र - येडा बनून पेढा खा

दुसर्‍यांची थट्टा करायला सर्वांना आवडते पण स्वत:ची मस्करी केली कुणी की अजिबात सहन होत नाही. आपल्याशी जराशी कधी मस्ती केली कुणी तर आपल्यातला गब्बर सिंग जागा होतो. आयुष्यात अनेक गोष्टी हसण्यावर नेल्या तर जगणे सोपे होते व त्याचा फायदाही होतो. चिडण्या किंवा रक्त आटवण्यापेक्षा थट्टेची मजा घ्या. थट्टेचाही उपयोग होऊ शकतो हे समजा. एक गोष्ट सांगते. उज्जैन बाहेरील एका गावात एक गणिती होता. लोक त्याला आकड्यांचा बादशहा म्हणत. अर्थविषयक सर्व निर्णय घेताना राजा आवर्जून त्याचा सल्ला घेत. उत्तरेतील तक्षीलेपासून ते दक्षिणेतील कांचीपर्यंत त्याची चर्चा होत. गावातील सरपंच मात्र त्याच्यावर जळत. तो सरपंच सतत त्याला चिडवत, ‘‘तू असशील मोठा आकड्यांचा राजा पण तुझा पोरगा अगदी मठ्ठ आहे. त्याला चांदी आणि सोन्यात जास्त महाग काय हेही समजत नाही. पोरावर लक्ष द्या जरा’’. गणिततज्ज्ञाचा अपमान झाला. त्याने त्याच्या पोराला बोलावले व विचारले, ‘‘चांदी महाग की सोने?’’ पोरगा म्हणाला, ‘‘सोने.’’ बाप खूश झाला, पण आश्‍चर्याने म्हणाला, ‘‘अरे तुला माहीत आहे मग सरपंच असे का बोलतात. ते मला रोज चिडवतात की मी तुला काहीच शिकविले नाही, दुर्लक्ष केले. तुला अक्कल नाही आणि सोने-चांदी काय मोठे याचीही तुला जाण नाही. मला याचे फार वाईट वाटते. त्यावर पोरगा म्हणाला, ‘‘मी रोज शाळेत जाताना वाटेत सरपंच मला बोलावून घेतात. काही वयस्कर जमलेल्या गावकर्‍यांसमोर एका हातात चांदीचे व दुसर्‍या हातात सोन्याचे नाणे धरून मला सांगतात महाग असेल ते घेऊन जा. मी चांदीचे नाणे घेतो, सरपंच व गावकरी खूप हसतात माझ्यावर. माझी थट्टा करतात. तुमचा सूड घेतल्यासारखे त्यांना वाटत असावे म्हणूनच ते तुम्हाला मी मठ्ठ आहे असे सांगतात. गणिततज्ज्ञाने तोच प्रश्‍न विचारला जो तुम्हालाही पडला असेल, ‘‘तुला माहीत आहे सोने महाग मग तू चांदीचे नाणे का घेतोस, का फजिती करून घेतोस रोज. पोरगा बापाचा हात धरून आतल्या खोलीत घेऊन गेला. चांदीची नाणी भरलेला एक डबा बापाला दाखवला आणि बापाला म्हणाला, ‘‘ज्या दिवशी मी सोन्याचे नाणे घेऊन त्यांची मजा, थट्टा संपेल. मला नाणी मिळणेही बंद होईल. घेऊ द्या त्यांना मजा आणि मला नाणी.’’ कधी कधी थट्टेचे पात्र होण्यात काहीच हरकत नाही. याचा अर्थ आपण बावळट किंवा मूर्ख असा नाही. आपल्याला काही साध्य करण्याकरिता दुसर्‍यांना थोडा आनंदाचा वाटा देणे एवढेच. सगळ्यांचा आनंद घ्या थट्टेचाही. येडा बनून पेढा खावा कधी कधी. अधिक गोड लागतो.


dr.swapnapatker@gmail.com
सौजन्य:- फुलोरा, सामना १७०९२०११.

No comments: