Thursday, September 22, 2011

अनियंत्रित रक्तस्त्राव - आय.टी.पी.चा धोका

अचानकपणे नाकातून, हिरड्यांतून किंवा त्वचेच्या कुठल्याही भागातून अनियंत्रित रक्तस्त्राव होण्याच्या समस्या ही बर्‍याचदा आय.टी.पी. या आजाराची लक्षणे असू शकतात. आयटीपी म्हणजेच इम्युन थ्रम्बोसायटोपेनिक पुर्परा हा आजार पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये विशेषत: आढळतो.


आय.टी.पी. म्हणजे नक्की काय?

आय.टी.पी.मध्ये शरीरात तयार झालेल्या ऍण्टिबॉडीज् प्लेटलेट्सवर हल्ला चढवतात. समजा आपल्या शरीरावर कोणत्याही रोगजंतूंचा हल्ला झाला तर स्वादुपिंड, बोनमॅरो, लिम्फनोड्स यामुळे ऍण्टी बॉडीज्ची निर्मिती केली जाते. त्यांच्या मदतीने हा सूक्ष्म जंतूंचा नाश केला जातो. पण आयटीपीमध्ये या ऍण्टिबॉडीज् बाहेरील हानिकारक घटकांऐवजी शरीराच्या पेशींवरच हल्ला करतात.

आयटीपी जेव्हा होतोे तेव्हा शरीरातील प्रतिकार शक्ती रक्तातील प्लेटलेट्सचाच नाश करते, ज्यांची आवश्यकता रक्त गोठण्याकरता असते. त्यामुळे प्लेटलेट्सची संख्या कमी होते.

प्लेटलेट्सची संख्या कमी असणे हे फारच घातक आहे. प्लेटलेटची संख्या ही ३० हजार/युएल पर्यंत कमी झाल्यास अचानकपणे शरीरातून रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते.

आयटीपी म्हणजे शरीराची आपल्याच प्लेटलेट्सचा नाश करण्याची वृत्ती. वैद्यकीय भाषेत त्याला ऑटो इम्युन रिस्पॉन्स असे म्हणतात.

ऍण्टी प्लेटलेट्स ऍण्टिबॉडीज्चा प्लेटलेट्सच्या निर्मितीवरसुद्धा परिणाम होतो. बोनमॅरोमधील पेशींवर याचा ताण येतो. त्यामुळे आयटीपी असणार्‍या व्यक्तींमध्ये दुहेेरी गोष्टी होतात, म्हणजे त्याच्या प्लेटलेट्सचा नाश होतो आणि नाश होणार्‍या प्लेटलेट्सची जागा घेऊ पाहणार्‍या सामान्य प्लेटलेट्सची निर्मितीसुद्धा कमी होते. या प्लेटलेट्सची प्रचंड घट होते आणि रक्त गोठण्याची प्रक्रिया मंदावल्यामुळे अचानक रक्तस्त्राव होतो.

दीर्घकाल आयटीपीचा त्रास असलेल्या रुग्णाच्या आयुष्यावर परिणाम होतो. आयटीपी असणार्‍या रुग्णांना अचानकपणे रक्तस्त्राव होण्याची सतत धास्ती असते. साधे खरचटले तरी अनियंत्रित रक्तस्त्राव होतो. तसेच नाकातून, हिरड्यांतूनही रक्त येण्याची शक्यता असते. मात्र मेंदूमध्ये किंवा पचनमार्गात रक्तस्त्राव झाल्यास मात्र मृत्यू ओढावू शकतो.

थकवा आणि औदासिन्य यासुद्धा गोष्टी आजाराबरोबर दिसून येऊ शकतात.

लहान मुलं आणि वयस्कांमध्ये दिसून येऊ शकतो. काही रुग्णांमध्ये हा आजार लपलेल्या स्थितीत असतो व त्याची लक्षणे दिसून येत नाहीत.

काहीजणांमध्ये खूपच रक्तस्त्राव आणि पुरळासारखी जांभळ्या रंगाची रॅश त्वचेवर दिसून येते.

या आजाराची लक्षणे ही प्लेटलेट्सच्या संख्येवर अवलंबून आहे. त्यामुळे अनियंत्रित रक्तस्त्राव होत असेल तर तो आयटीपी नाही ना, याची जरुर खात्री करून घ्या.

- डॉ. गणपती भट
जसलोक हॉस्पिटल
सौजन्य:- चिरायू, सामना २२०९२०११.

No comments: