Monday, September 12, 2011

पितृपक्ष

भाद्रपद महिन्यातील अमावास्येला सर्वपित्री अमावस्या असे म्हणतात. या तिथीला सर्व पितरांना श्राद्ध घालतात. श्रद्धेने करावयाचे ते श्राद्ध. असा हा आपल्या पूर्वजांनी घालून दिलेला कुळाचार आहे. भाद्रपद कृष्णपक्ष हा पंधरवडा पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. आपले निकटवर्तीय ज्या तिथीला गेले असतील त्या तिथीला या पंधरवड्यात श्राद्ध घातले जाते. आपले मृत पूर्वज म्हणजेच पितर होय. या तिथीला काही धार्मिक विधींची परंपरा आहे. हा पंधरवडा म्हणजेच पितृपक्ष वा श्राद्धपक्ष म्हणजे आपल्या पूर्वजांच्या तर्पणाचा पक्ष. तर्पण करावयाचे म्हणजे श्रद्धेने, मनोभावाने तृप्त करावयाचे.


समाजामध्ये सदविचार, सत्कर्मे वाढावी आपल्याला इतरांविषयी कळकळ वाटावी, कृतज्ञता वाटावी व त्यामुळे आपल्या हातून सत्कृत्ये घडावी यासाठी आपल्या पूर्वजांनी काही कुळाचार नेमून दिले आहेत. त्यापैकी पितरांना पिंडदान करणे हे एक. यादिवशी समाजातील दीनदुबळ्यांना अन्नदान करावे व पुण्यकर्म करावे. त्यांची क्षुधाशांती करून मने तृप्त व संतुष्ट करावीत. या दिवशी अनेक मंदिरातून, संस्थातून, घराघरातून अन्नदानाचे कार्यक्रम पार पडत असतात. भुकेल्याला जेवू घालणे हीच खरी ईश्वरसेवा आहे ही उद्दात भावना त्यामागे आहे.



पूर्वजांचे स्मरण केल्याने त्यांची सत्कर्मे आठविल्याने त्यातून आपल्याला स्फूर्ती, प्रेरणा मिळते. मन उत्साही होते.


अशा रितीने अन्नदानाचे महत्व सांगणारा हा पितृपक्ष आपण कृतज्ञतापूर्वक पाळला पाहिजे.

सौजन्य:- http://zampya.wordpress.com/

No comments: