Wednesday, April 20, 2011

घरट - गोडाधोडाचा दिवस

 सार्वजनिकरीत्या सण साजरा करण्यासाठी गर्दी लोटत असली तरी त्या गर्दीपासून दूर राहाणार्‍यांची संख्या कमी नाही. वेळेअभावी किंवा सणांच्या बदललेल्या स्वरूपामुळे अनेक जण शॉर्टकटमध्ये सण साजरे करतात.


शेजारच्या घरातून गुढीच्या पूजेचा प्रसाद आला. छान वाटलं. घरी जाऊन पाहिलं तर साधारण अर्धा फूट उंचीची रेडिमेड गुढी तासाभरातच शोकेसमध्ये विराजमान झाली होती.हल्ली ‘कॉस्मोपॉलिटन सोसायट्यां’चा शोभायात्रेच्या फोटोंशिवाय गुढीपाडव्याशी फारसा संबंध नसतो. हे खरं आहे की हल्ली लागण झाल्यासारख्या शोभायात्रा निघत असतात, पण गुढीपाडवा म्हणजे एक सुट्टी, हा विचार करणारेही कमी नाहीत. गुढीपाडवाच कशाला सगळ्याच सणांच्या बाबतीत हे चित्र दिसतं.


ओळखीच्या एका घरात अकरा दिवस गणपती असतो. ही पद्धत दोन पिढ्यांपूर्वी सुरू झालेली. दरवर्षी गणपतीचं दर्शन घ्यायला गेल्यावर घरातल्यांची एकच टेप सुरू असते. ‘पूर्वीच्या लोकांना जमत होतं हो. हल्ली अकरा दिवस वगैरे झेपत नाही. इतकी सुट्टी तरी मिळते का? घरातलं सगळं करणंही जमत नाही. फार व्याप होतात हो.’

आमचं कुटुंब तसं भलंमोठं. रक्षाबंधन, भाऊबिजेच्या दिवशी सगळ्या बहिणी किंवा भावांच्या घरी जायचं म्हटलं तर दिवस संपून जातो. यावर काही वर्षांपूर्वी तोडगा निघाला गेट टुगेदरचा. दरवर्षी या दोन्ही दिवशी कुणातरी एकाच्या घरी सर्व भावंडांनी जमायचं. सगळ्यांची भाऊबीज एकत्रच. म्हणजे प्रवासात वेळ घालवण्याऐवजी सगळ्यांना मनसोक्त भेटताही येतं. दसर्‍याला सोनं देण्यासाठी तर हल्ली प्रत्येकाला भेटणंही शक्य होत नाही.

का बरं?

टाइम नहीं है बॉस!
 
कुठलाही सण साजरा करायला, त्याचे कौतुक करायला हल्ली माणसांकडे वेळ नाही आणि उत्साहसुद्धा नाही. रोजचं ऑफिस, ट्रेन-बसची गर्दी, धावपळ यातून सणांसाठी वेळ कुठे मिळतो. सण म्हणजे एक सुट्टी. जेवायला छान गोडधोड करायचं, नव्या पिढीला माहिती मिळेल इतपत सोपस्कार करायचे आणि मग सुट्टी एन्जॉय करायची.


जुन्या पिढीमध्ये कर्मकांडाचं महत्त्व फार होतं. हे असं नाही केलं तर देव रागवेल ही भीती होती. अलीकडच्या काळात शिक्षणामुळे हे प्रमाण बरंचंसं कमी झालेलं दिसतं. आजही देवाविषयी श्रद्धा असली तरी कर्मकांडांचं खूळ कमी होतंय. पूजाअर्चा करताना आपण सर्रास शॉर्टकट वापरतो. गुढीपाडवा, नागपंचमी अशा अनेक सणांच्या दिवशी असंख्य घरांतून कोणतीही वेगळी पूजाअर्चा केली जात नाही.

सण साजरा न करण्याच्या या मानसिकतेचं आणखी एक कारण म्हणजे त्यांचं अलीकडच्या काळात झालेलं विकृतीकरण!

गणपतीच्या दिवसांत प्रत्येक गल्लीबोळात एक सार्वजनिक गणपती विराजमान होतो. रात्री दहा वाजेपर्यंत (अनेक ठिकाणी नियम धाब्यावर बसवून त्यानंतरही) कानठळ्या बसवणारा स्पीकर सुरू असतो. विसर्जनाच्या मिरवणुकीत तर दारूबाजांमुळे चालणंही कठीण होतं. चौपाटीवरील गर्दीऐवजी अनेकांना टीव्हीचा रिमोटच मग आपलासा वाटतो.

तीच तर्‍हा दिवाळी, होळी या सणांची. शाळेची दिवाळी सुट्टी सुरू होण्यापूर्वीच टुरिस्ट कंपन्यांच्या टुर्स फुल्ल झालेल्या असतात. लक्ष्मीपूजनाच्या रात्री साधारणपणे काय चित्र दिसतं? सगळीकडे एकामागोमाग एक फटाक्यांच्या माळा पेटताहेत. जणूकाही स्पर्धा लागलीय. त्यांचा आवाज, सगळीकडे धूर, जळका वास. त्यापेक्षा या गर्दीपासून कुठेतरी लांब, शांत ठिकाणी जाण्याचा पर्याय अनेकांना सोयीचा वाटू लागलाय. निदान कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवता येतो.

होळीचा सण तर हल्ली घाबरवून टाकणाराच झाला आहे. मुंबई आणि आसपासच्या अनेक परिसरांमध्ये होळीच्या आठ-दहा दिवस आधीपासून रस्त्यावर चालणं मुश्किल होतं. कुठून, कधी एखादा फुगा येऊन तुमच्यावर धडकेल सांगता येत नाही. फुग्याचा मार आणि घाणेरड्या पाण्यामुळे खराब झालेले कपडे असा दुहेरी संताप घेऊनच तिथून निघावं लागतं. काही ठिकाणी तर चालत्या ट्रेनवरही फुगे मारतात.

आपले सगळे सण हे माणसांना आनंद देण्यासाठी असतात. ते साजरा करण्याची मूळ पद्धतच तशी बनवली गेली आहे. सणांच्या निमित्ताने सगळ्यांनी एकत्र यावं, गोडधोड खाऊन मूड चांगला ठेवावा, एकमेकांना शुभेच्छा देऊन कटुता संपवावी, असा यामागचा उद्देश असतो.

पण हल्ली कुणालाच स्वतः पलीकडचं दिसतं नाही. माझ्या गल्लीतला गणपती मोठा, माझ्याच लाऊडस्पीकरचा आवाज मोठ्ठा, माझी माळ पन्नास हजारांची, माझ्या फुग्याचा नेम बरोबर बसला...बस्स! इतरांचा विचार करायला तरी वेळ कुठे आहे?

सौजन्य :- darekar.amita@gmail.com, FULORA, SAMANA

No comments: