Sunday, April 10, 2011

खाऊ का? आहारविषयक टॉप पाच भ्रमनिरास

गेल्या काही वर्षांत आपल्या आहारात खूप विविधता आली असून आपण बरेच पाश्‍चात्य पदार्थ पण खातो, तसेच आरोग्य आणि आहाराविषयी जागरूकतादेखील वाढली आहे. जेव्हा आपल्याला बर्‍याच माध्यमातून माहिती मिळत असते तेव्हा त्याचबरोबर बरेच समज-गैरसमज पण उद्भवत असतात....


गेल्या काही वर्षांत आपल्या आहारात खूप विविधता आली असून आपण बरेच पाश्‍चात्य पदार्थ पण खातो, तसेच आपली आरोग्य आणि आहाराविषयी जागरूकतादेखील वाढली आहे. जेव्हा आपल्याला बर्‍याच माध्यमातून माहिती मिळत असते तेव्हा त्याचबरोबर बरेच समज-गैरसमज पण उद्भवत असतात. आज मी इथे असेच काही भ्रमनिरास करत आहे.

* खूप पाणी पिऊन वजन कमी होते

मी बर्‍याच सिनेतारकांच्या मुलाखतीत वाचलेले आहे, ‘माझ्या सौंदर्य आणि सुडौल फिगरचे रहस्य म्हणजे पाणी’ असं सांगणारी ती सुंदरी, तिने केलेल्या आहारनियंत्रण आणि व्यायाम याबद्दल काहीच सांगत नाही. आजदेखील बर्‍याच लोकांना असं वाटतं की, खूप खूप पाणी प्यायलं तर शरीरातली चरबीसुद्धा वितळून निघून जाते. हा भ्रम आहे. पाणी पिणे हे अगदी अत्यावश्यक असते. ते शरीरातल्या बर्‍याच हानीकारक किंवा अनावश्यक पदार्थांना बाहेर फेकतं, पण त्यात अतिरिक्त चरबीचा समावेश होत नाही. आपल्या शरीरातली चरबी ही फक्त व्यायाम आणि संतुलित नियंत्रित आहाराने कमी होते.

* सगळे फॅट हानीकारक असतात

हा बहुधा सर्वात जुना गैरसमज असेल. ‘सगळे’ फॅट (तेल, तूप, दुग्धजन्य पदार्थ, दाणे, काजू, किशमिश) वाईट नसतात. उलट आपल्या सगळ्यांना थोड्या विशिष्ट फॅटची रोजच्या आहारात गरज असते. उदा. म्युफा, प्युफा, इसेन्शियल फॅटी ऍसिड जे आपल्याला ऑलिव्ह ऑइल, सोयाबीन ऑइल, सनफ्लॉवर ऑइल, करडी ऑइल, शेंगदाणा तेल व अक्रोड, पिस्ता, काजू आणि मासे यातून मिळते. फॅट शरीरातल्या पेशींचे आरोग्य जपत, विटामिन अ, ड, ई, क याच्या पचनात मदत करतं आणि सगळ्या मज्जातंतूंचे स्वास्थ्य संभाळतं. अर्थात अति तेलयुक्त किंवा फॅट रीच आहार असेल तर वजन नक्कीच वाढते पण त्याचा अर्थ सगळे फॅट हानीकारक असतात असं होत नाही.

* फॅटफ्री ृ लो कॅलोरी

हा आधुनिक हेल्थ फूड संस्कृतीचा मोठा गैरसमज आहे. फॅटफ्री म्हणजे त्यात कॅलोरी पण कमी असतात किंवा त्याने वजन वाढत नाही असे अजिबात नाही. उलट एक सोपा निर्देश म्हणजे जर फॅट कमी असेल तर पदार्थात साखरेचे किंवा तत्सम प्रमाण वाढवलेले असते. तसेच शुगरफ्री पदार्थात इतर फॅटचे प्रमाण जास्त असते. आणि बेक्ड म्हणजे लो कॅलोरी असं नेहमीच नसतं. तर म्हणून कायम हल्ूगहू लेबल वाचूनच पदार्थाची निवड करावी!

* जास्त साखर खाऊन मधुमेह होतो

तुम्हाला जर मधुमेह असेल तर जास्त साखर किंवा गोड पदार्थ खाऊन तुमच्या रक्तातल्या ग्लूकोजचे प्रमाण वाढेल. पण तुम्हाला मधुमेह नसेल तर फक्त जास्त साखर खाल्ल्यामुळे हा आजार होत नाही. तसेच, आहारात अजिबात वरून साखर घातलेले पदार्थ नसतील तरी तुम्हाला मधुमेह होणार नाही याची खात्री देता येत नाही. कारण मधुमेह होण्यामागे बरीच आनुवंशिक व इतर कारणं असतात जसे अति वजन असणे, व्यायामाचा अभाव, अनियमित व असंतुलित आहार, मद्यपान इ. साधारण गोड पदार्थ कॅलोरी व फॅट रीच असतात आणि म्हणून त्याने वजन वाढून मधुमेह होण्याची शक्यता वाढते. म्हणून रोजच्या रोज गोडधोड, तळलेले पदार्थ खाणे टाळावेत.

* रात्री उशिरा खाल्लं की वजन वाढते

काही वर्षांपूर्वी ४ पी. एम. डाएट नावाचे फॅड आले होते. तेव्हापासून खूप लोकांची अशी समजूत झाली आहे की रात्री-अपरात्री खाल्लं की जास्त वजन वाढतं. आपलं शरीर वेळ बघून पचनक्रिया कशी करायची हे ठरवत नसतं. नाहीतर दिवसा भरपूर केक, पेस्ट्री, पिझ्झा आणि रात्री फक्त सलाड असं खाल्लं तरी मग वजन वाढायला नको मग? पण तसं होत नाही. वजन वाढणं किंवा कमी होणं हे पूर्णपणे दिवसभरात (आणि रात्रीत) आहारात असलेल्या कॅलोरीवर आधारित असतं. एका निरीक्षणानुसार अपरात्री खाल्ले जाणारे पदार्थ हे मुळातच खूप कॅलोरी रिच असून त्याने मेदोवृद्धी होत. तर वजनवाढीचा संबंध ‘कधी’ खातोय याच्याशी नसून ‘काय’ आणि ‘किती’ खातोय याच्याशी असतो!

- सौजन्य:- फुलोरा, सामना. अमिता गद्रे-केळकर (ंलेखिका डाएट कन्सल्टंट आहेत)
amitagadre@gmail.com

No comments: