Sunday, December 29, 2013

मालवणी ‘सिंधू’

  मालवणचा किनारा... समुद्रात पिवळे गुलाबी झेंडे फडकवत पाण्यावर तरंगणार्‍या बोटी... नारळी, पोफळीच्या बागा... निसर्गाच्या कुशीतून डोके वर काढणारी टुमदार कौलारू घरे... अंगणात तुळशी वृंदावन आणि नजर फिरवावी तिथे कायम लक्षात राहणारे निसर्गसौंदर्य... असेच अस्सल मालवणी ‘लूक’मध्ये खवय्यांची भूक भागवते ते विलेपार्ल्याचे ‘सिंधू.’
मुंबईकरांना स्वादिष्ट मालवणी मेजवानी द्यावी अशा विचाराने पार्ल्याच्या जवाहर बुक डेपोच्या भोगले परिवारातले मिथिल भोगले यांनी ‘सिंधू’ सुरू केले. हुबेहूब कोकणातले घर. लाल मातीच्या भिंती. मुख्य प्रवेशद्वारावर सुपारीची झाडे. होडी, तुळशी वृंदावन आणि त्यात तेवणारी पणती. बाहेरचा हा ‘लूक’ पाहिला की ‘सिंधू’प्रवेश करण्याचा मोह आवरतच नाही.
आत प्रवेश करताच नजर फिरते ती भिंतीवर खुंटीला टांगलेल्या टोपी सदर्‍यावर... काचेच्या कंदिलांवर... सुपल्या आणि रवळ्यांवर... नाकात घुमत असतो मालवणी मसाल्याचा हवाहवासा वाटणारा वास... सदरा पायजम्यातले वेटर ‘येवा कोकण आपलाच आसा’ म्हणत स्वागत करतात. त्यानंतर टेबलावर येतो चमचमीत मालवणी पदार्थांचा ‘मेन्यू’.‘सिंधू’ची एक भिंत मासे पकडायच्या जाळ्याने सजली आहे. त्यात बांगडा, पापलेट, सुरमई, कुर्ल्याची फायबरची मॉडेल्स लटकविण्यात आली आहेत. ताज्या फडफडणार्‍या माशांचे खाद्यपदार्थच ‘सिंधू’मध्ये बनवले जातात. चिनीमातीच्या बरण्या अगदी कोकणातल्या चुलीजवळ असतात तशाच मांडलेल्या.
‘फणसाची बिर्याणी’. कधी ऐकलंय हे नाव. नवीनच. हीच तर खासियत आहे ‘सिंधू’ची. चिकन आणि मटणाऐवजी बिर्याणीसाठी फणस वापरला जातो. तोसुद्धा खास कोकणातून येतो. मालवणी मसाल्यांमध्ये बनवण्यात येणारी फणसाची बिर्याणी खायची तर विलेपार्ल्याच्या ‘सिंधू’शिवाय पर्यायच नाही. फणसाची भाजी खावी तर कोकणात आणि फणसाची बिर्याणी चाखावी तर ‘सिंधू’ची.
चिकन बिर्याणी आणि ‘मटण मालवणी बिर्याणी’सुद्धा ‘सिंधू’मध्ये मिळते. ती पण मालवणी मसाल्यात बनवलेली. म्हणूनच तिचे नावही ठेवलेय ‘चिकन मालवणी बिर्याणी’. चिकन थाळी, चिकन सागोती वडे, तांदळाच्या भाकर्‍या, माशाचे सार आणि हो इथे माशांच्या काट्यांचा वापर करून बनवलेले सार घ्यायलाच हवे. त्याच्या वासानेच तोंडाला पाणी सुटेल.
आंबोळी... चपाती... तळण... कोळंबी सुके... आंबट वरण... कोळंबी भात... तळलेले बोंबील, सुरमई, पापलेट अन् कोळंबीचा आस्वादही ‘सिंधू’ने खवय्यांना दिलाय. कोकणवासीच नव्हे तर अन्य प्रांतातील लोकांनाही ‘सिंधू’च्या मालवणी ठसक्याची चटक लागली आहे. खाऊन पोट भरलं असेल तर मुखवास... काय तर सुपारी आणि मालवणी खाजा. कोकणभूमी झिंदाबाद...
सागोती वडे तर कोकणचे पेटंट. आम्हाला द्यायचे होते त्यापेक्षाही वेगळं. फणसाची बिर्याणीही त्यातूनच आली. मालवणी माणसाचा स्वभाव फणसासारखा. वरून काटेरी वाटला तरी आतून मऊ, प्रेमळ. आमची फणसाची बिर्याणीही तशीच आहे. नाव ऐकले की ग्राहक थोडा विचार करतात, पण आस्वाद घेतला की ती चव त्यांच्या जिभेवर कायमची रेंगाळते. मालवण, मालवणी माणूस, मालवणी मसाला याला तोडच नाही. 
- मिथिल भोगले

सौजन्य :- फुलोरा, सामना २९१२१३

No comments: