Sunday, December 29, 2013

शैवालं

पश्चिम घाटातल्या जंगलात निरनिराळी शैवालं पाहिलीत. शैवाल या वनस्पतींची संरचना अतिशय साधी. एकपेशीय किंवा बहुपेशीय. बहुपेशीय असल्यास अनेक पेशी एकत्र येऊन वसाहत बनते. एकापुढे एक पेशी जोडल्या जाऊन तंतू(टिशू)बनतात.शैवाल परोपजीवी नाही. क्लोरोफिलच्या साह्याने ती स्वत:चे अन्न स्वत: तयार करतात.
बहुतांशी शैवालं पाण्यातच वाढतात. त्यांचा विशिष्ट प्रकारचा वास येतो. डबकी, तळी, नद्या व समुद्र अशा ठिकाणी तसेच उष्ण झर्‍यांमध्ये आणि बर्फाखालीही त्यांचे आस्तत्व दिसते. नील-हरित शैवालं गुठळींमध्ये किंवा लांब धाग्यांच्या स्वरूपात असतात. हरित शैवाले समुद्रातही सापडतात. काही जमिनीच्या ओलसर पृष्ठभागावर वाढतात. त्यांची वाढ झालेल्या ठिकाणी हिरवा तवंग तयार होतो. आर्द्रता आणि पाऊस जास्त असलेल्या एरियात खडकावर, मोठ्या झाडांच्या सालीवर शैवालांची जोमाने वाढ होते. इतर वनस्पतींप्रमाणे यांना मूळ,खोड,पान असे अवयव नाहीत.
विशेष म्हणजे पाण्यातल्या परिसंस्थेतील अनेक प्राण्यांचे आस्तत्व शैवालांवर अवलंबून असते. माशांसह बहुतेक जलचर प्राण्यांचे अन्न शैवाल आहे. म्हणूनच जैवसाखळीतला हा अत्यंत महत्त्वाचा घटक. शैवालात जीवनसत्त्वे व क्षार विपुल प्रमाणात असतात. अलीकडे शेतीसाठी जैविक औषधे आणि खतांना(बायोफर्टीलायझर) मागणी वाढलीय. स्पायोरीना जातीच्या शैवालात विपुल प्रमाणात प्रोटिन्स असतात. ‘स्पायरोलीन’ नावाने बाजारात प्रोटिन्सच्या टॅबलेट मिळतात. शैवालांमध्ये पेशीविभाजन,खंडन,बीजाणू व युग्मक यांद्वारे प्रजनन होते. नॉस्टॉक, ऍनाबीना, स्पायरोगायरा, क्लोरेला, लँमिनॅरिया व जेलिडियम ही शैवालांची काही उदाहरणे सांगता येतील.
फुले न येणार्‍या वनस्पतींना ‘अपुष्प वनस्पती’ (क्रिप्टोगॅमस) म्हणतात. जलवाहिन्या आणि रसवाहिन्याचा अभाव असलेल्या आणि पाने,खोड, मूळ ही वैशिष्ट्यदर्शक इंद्रिये नसलेल्या अशा वनस्पतींचे थॅलोफायटा व ब्रायोफायटा असे दोन गट. मूळ,खोड,पाने हे अवयव तसेच जलवाहिन्या आणि रसवाहिन्या असलेल्या पण फुले,फळे व बीजे नसलेल्या अपुष्प वनस्पतींचा समावेश टेरिडोफायटा विभागात होतो.या वनस्पती सरळ वरच्या दिशेने वाढतात. थॅलोफायटा या विभागांत शैवाल,जीवाणू,कवक आणि शोवाक (लायकेन) यांचा समावेश होतो. या वनस्पती जमिनीला समांतर वाढतात.

सौजन्य :- फुलोरा, सामना २९१२१३

No comments: