पती-पत्नीचे ऐक्य हे संसारात संगीत निर्माण करू शकते. समग्र रुपात मी तुझी आहे असा भाव जर वधूच्या मनात निर्माण झाला नाही तर संसारात आनंद कधीच जाणवत नाही. तो विवाह हा उपहास बनतो.
'सप्तपदी हि रोज चालते' सकाळी सकाळी या गाण्याचे सूर कानावर आले आणि मन भूतकाळापासून वर्तमान काळापर्यंत प्रवास करू लागले.
पंचेचाळीस - पन्नास वर्षांपूर्वी लग्नात सप्तपदिला फार महत्व होते. लग्नात सात पावले चालताना त्याचा अर्थ समजत होता असे नाही, पण घराचे संस्कार, घरात, समाजात पाहायला मिळणाऱ्या गोष्टी, मोठ्यांचे अनुकरण यामुळे मुले-मुली (पती-पत्नी) संसारात सुखी राहून संसार व्यवस्थित करत असत.
आजच्या काळात लग्न समारंभात विवाह प्रसंगाचे गांभीर्य, पावित्र्य, संस्कार हे काहीच न राहता समारंभ बनला आहे.
मंत्र श्रवणा ऐवजी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत नीट करण्याकडेच अधिक लक्ष पुरवावे लागते. लग्न मंडपात नुसता धांगड धिंगा च जास्त अनुभवाला येतो. तिथे पावित्र्य तर जाणवतच नाही.
लग्नामध्ये पुरुषापेक्षा स्त्रीला प्राधान्य अधिक असते. कारण स्त्रीला स्वताचे जीवन पुरुषाच्या जीवनाशी एकरूप करायचे असते. "लग्न म्हणजे पुरुषाचे कर्तुत्व आणि स्त्रीच्या समर्पणाचे सुगम मिलन."
पती-पत्नीच्या प्रेमाला दुध साखरेची उपमा देताना साखर ज्याप्रमाणे गुप्त राहून दुधाचा गोडवा वाढवते त्याप्रमाणेच स्त्रीने स्वकर्तुत्वावर जीवनाचा गोडवा वाढवणे गरजेचे आहे.
'न स्त्री स्वातंत्र्य मार्हती' हे वाक्य मनुने आर्थिक स्वातंत्र्याला उद्देशून लिहिले आहे. स्त्री ने अर्थोपार्जन न करताही तिला पारतंत्र्या सलणार नाही. अशी सुंदर व्यवस्था आपल्या शास्त्रकारांनी केली होती. पुरुष अर्थार्जन करीत असे व मिळणारा सर्व पैसा स्त्रीच्या हातात देत असे. पैशाची सर्व व्यवस्था स्त्रीच्या हातात असे. पुरुषही स्वताला पाहिजे असणारा पैसा स्त्री (घरातील कुटुंब व्यवस्था पाहणारी स्त्री - आई, बायको) कडून मागून घेत असे. यात स्त्रीचा गौरव असे. पुरुषही यथेच्छ पैसा वापरायला मिळत नसल्याने स्वैराचारापासून दूर राहत असे. स्त्री घराची सम्राद्नी असे. घर स्त्रीचे मानले जात असल्यामुळे स्त्री स्वताच्या प्रेमशक्तीने घर आनंदी समाधानी ठेवत असे.
आजच्या काळात विवाह संस्काराचे पावित्र्य समजून घेणे अधिक गरजेचे वाटू लागले आहे.
स्त्री करिता लग्न हे नव्या अवतारासारखे आहे. नवे जीवन, नवे वातावरण, नव्या संबंधिताना तिने आपलेसे करायचे असते. सात पावले बरोबर चालल्याने मैत्री होते असे शास्त्र वाचन आहे. म्हणून विवाह संस्कारात साप्तपादीला फार महत्व आहे आणि आजच्या काळात नव वधू वरांनी सप्तपदीचा अर्थ समजून घेऊन जर वैवाहिक जीवनाची सुरवात केली तर सध्या वाढत चाललेले घटस्फोटाचे प्रमाण नक्कीच कमी होईल. वधू प्रत्येक पावलाला प्रतिज्ञा करते ती अतिशय बोधक आहे.
प्रथम पाऊल -
या प्रतिज्ञेत ती म्हणते पती हेच माझे सर्वस्व आहे. स्त्री स्वताचे भाग्य पतीबरोबर जोडते.
दुसरे पाऊल -
या प्रतिज्ञेत ती संपूर्ण कुटुंबाशी जोडली गेल्याची कबुली देते व लहान थोरांचा योग्य तो मान राखण्याची जबाबदारी स्वीकारते. त्याच प्रमाणे मिळणाऱ्या पैशात मी समाधानी राहीन. समाधानाशिवाय संसारात सुख नाही हे ती जाणून असते.
तिसरे पाऊल -
या प्रतिज्ञेत ती आज्ञा पालनाची व रोज स्वादिष्ट व रुचकर जेवण बनविण अशी खात्री देते. स्त्रीही भोजन गृहाची राणी समजली जाते.
चवथे पाऊल -
या प्रतिज्ञेत ती मन, वाणी आणि कर्म यांनी पतीशीच एकनिष्ठ राहण्याचे मनोमन ठरवते. चतुराई, स्वच्छता व शृंगार दाम्पत्य जीवनातील महत्वाचा भाग सजवतात.
पाचवे पाऊल -
टाकताना पत्नी-पतीला तुमच्या सुख दुखात सामील होईन असे खात्री पूर्वक सांगते.
सहावे पाऊल -
टाकताना ती (पत्नी) म्हणते घर कामात लक्ष घालून मी ते काम आनंदाने करीन. सासू सासऱ्यांची सेवा याचाच अर्थ त्यांना मी सन्मानाने वागवीन. घरकाम हे स्त्रीला भर न वाटता त्यात आनंद वाटला पाहिजे. वडिलधाऱ्या माणसाना सन्मानाने वागवल्यामुळे घरात आनंदी वातावरणच राहते.
सातवे पाऊल -
टाकताना ती म्हणते, यज्ञकार्यात तुझ्या बरोबरच राहीन. यज्ञाचा अर्थ सहकार्य. चांगल्या कामाच्या वेळी जी पती बरोबर राहते तिला पत्नी म्हणतात. अर्थकारण तर पत्नीनेच सांभाळण्याची गरज असते आणि तेव्हा तर पत्नी अधिक प्रमाणात पतीबरोबरच असते. धर्माचरण हि महत्वाची गोष्ट आहे. तेव्हाही पत्नीने पतीबरोबर उभे राहून धर्माचे पालन करणे गरजेचे असते व सहधर्मचारिणी हे नाव सार्थ करणे योग्य असते.
गुरुजी, अग्नी, आई, बाप यांच्या साक्षीने वधू वराला स्वतः चे जीवन अर्पण करते. हे समर्पण शरीरापुरते मर्यादित न राहता मन, बुद्धी व अहंकाराच्या समर्पनापर्यंत पुढे गेले पाहिजे असे ऐक्यच संसारात संगीत निर्माण करू शकते. समग्र रुपात मी तुझी आहे असा भाव जर वधूच्या मनात निर्माण झाला नाही तर संसारात आनंद कधीच जाणवत नाही व तो विवाह हा उपहास बनतो.
ह्याचसाठी प्रत्येक नव वधू वरांनी पूर्वी शास्त्रकारांनी सुखी संसारासाठी जी मुल्ये सांगितली आहेत ती आचरणात आणून आपले संसारी जीवन आनंदी करावे.
सौजन्य:- सौ. मंगला अभ्यंकर, पुढारी-कस्तुरी, ११०२२००५.
No comments:
Post a Comment