Sunday, May 29, 2011

यशस्वी पालक कोण?

दहावी- बारावीचे निकाल लागले की यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक, सत्कार वगैरे होतातच. पण यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक यशस्वी असतातच असे नाही. खर्‍या अर्थाने यशस्वी पालक बनायचं असेल तर पालकांना आजचं मूल बनून आपल्या पाल्याशी संवाद साधावा लागेल.

आपसातील नातेसंबंधांनी त्रस्त झालेले पालक आणि मी यांची बैठक बर्‍याच वेळा एकाच कारणासाठी होत असते. ती किंवा तो हाताबाहेर चालला आहे. अशा वेळी मी पालकांना विचारतो तुम्ही किती स्वत:च्या हातात आहात?


पालक झालात म्हणजे सर्वस्व झालात असेही नाही. मुलाकडून शिस्तीची अपेक्षा आहे. म्हणजे काय लहान मुलांनी प्रौढासारखं वागावं काय? तुमचं मन प्रौढ झालं असेल पण प्रगल्भ झालं असं नाही. म्हणून न चुकता पहिला प्रश्‍न मी पालकांना विचारतो? तुम्ही स्वत:चं तुमच्या स्वत:शी नातं किती चांगलं आहे? जर तुमचं तुमच्याशी जमत नसेल तर तुमच्या सहचराशी कितपत जमेल हे नातं? या जैविक मीलनातून जन्माला आलेल्या अपत्याबरोबर हे सहजीवनाचं नातं कसं जमणार आहे याचा विचार तुम्ही केला आहे का?

तुमच्या अपूर्ण स्वत:ला पूर्ण करण्यासाठीचा अट्टहास आणि त्यातून निर्माण झालेला ताणतणाव ही तुमची खरी समस्या आहे असं तुम्हाला वाटत नाही का? पालक बुचकळ्यात पडतात. कारण सोपं आहे. लहानपणापासून त्यांचा लॉजिकशी संबंध येऊ दिला जात नाही किंवा फक्त मान्यताप्राप्त सोल्युशनशी जमवून घेणं किंबहुना हे असंच असतं याबरोबर राहण्याची तुमच्या मनाची घडी घालून दिली जाते. आता तुम्हीसुद्धा परंपरेने मुलाला हेच देणार असाल तर संघर्ष अटळ आहे.

विचारा स्वत:ला काही प्रश्‍न

- तुमच्या पालकांनी तुम्हाला त्यांच्या कौटुंबिक कायदा आणि सुव्यवस्था धोरणात उमलू देण्याची संधी दिली होती का?

- लहानपणी किती हास्यास्पद नियमांचा आणि कायद्याचा राग आला होता आणि मन किती रडलं होतं ते आता आठवतं का?

- खासकरून मुलींनी ‘मुलीच्या जातीला इतका तोरा चांगला नाही’ असं किती वेळा ऐकलं होतं किंवा मुलांनी ‘फार शेफारला आहे आजकाल’ हे किती वेळा ऐकलं होतं?

- आज्ञाधारक मूल म्हणजेच आदर्श मूल हे किती वेळा बिंबवलं गेलं होतं?

- घरात झांथस किंवा झांटीपी यांच्या कातरीत तुम्ही सापडला होतात का? हे दोघं भांडायचे आणि उपाशी राहायचा इसाप.

हे असं थोड्याफार फरकाने घराघरात होतं आणि प्रत्येकाच्या वाट्याला येतं. तो विशुद्ध आणि सात्त्विक जीव या गदारोळात जे शिकला तेच आता पालक झाल्यावर आपल्या मुलांना देतो आहे. यात गंमत अशी आहे की हे सगळे नकळत मनात घर करून बसलं होतं आणि ते आता सत्ता गाजवतं आहे. याची कल्पना कुणालाही नसते.

मला वाटतं की आजच्या पालकांसमोर सगळ्यात मोठं चॅलेंज असेल तर ते म्हणजे आजच्या मुलांबरोबर आजचं मूल होऊन यशस्वी पालक होणं.

मुलांना आपल्या अंगातल्या दैवी अवतारापासून (अभ्यास नाही केला तर हिरण्यकश्यपू) वाचवणं. त्यांच्या मनाला होणार्‍या इजांपासून त्यांना जपणं आणि बाहेरच्या जगातल्या हिंसाचारापासून (शारीरिक वा मानसिक) स्वत:चा बचाव करायला शिकवणं.

रोज नव्या लढ्याला सामोरे जाणारे,स्वत:ला निराशेच्या गर्तेपासून कसोशीनी दूर ठेवणारे किंवा त्याला बळी पडणारे पालक हे शिवधनुष्य उचलू शकतील का?

आतापर्यंतचं हे निरुपण कदाचित अविश्‍वसनीय किंवा अमान्य आणि तर्कविसंगत समजण्याचे सगळ्यांना पूर्ण अधिकार आहेत. पण आहे त्या परिस्थितीबद्दल दुमत असण्याची शक्यता त्या मानानी कमी आहे. फारच क्वचित एखादा जागरूक पालक हे नाकारू शकेल पण ते सगळं व्यक्तीसापेक्ष असेल. चला आपण घटकाभर समजू या की पूर्वायुष्याचा आणि आताच्या पालकत्वाचा काहीच संबंध नाही. आणि विचार करू या पालकत्वाच जसे आहे जेथे आहे या धर्तीवर.

उद्याचा सक्षम माणूस तयार करण्याची जबाबदारी पालकांवर आहे. पाल्याच्या शारीरिक आणि मानसिक विकासाची जबाबदारी पण पालकांची आहे. ही दोन गृहीतके येथे सगळ्यांना मान्य आहेत असे धरून पुढे चालू या.

आव्हानांची यादी अनलिमेटेड आहे. थोडी यादी बनवू या.

- धावपळीच्या आयुष्यात मुलांना देण्याचा वेळ आणि बाहेरच्या आकर्षणापासून वाचवण्याकरिता पालकांच्या प्रेमाचा चुंबक ताकदीचा असावा.

- एका पालकाची जबाबदारी घेण्याचा नकार किंवा फक्त विशिष्ट जबाबदारी घेण्याचाच हट्ट. आई तर हवीच आहे, पण बाबा पण हवे आहेत. थोडक्यात आईबाबांच्या इक्वल अनलिमिटेड पार्टीसिपेशनचा हा मनोव्यापार आहे.

- पालकांच्या आणि पाल्यांच्या जीवनशैलीमधला फरक. वारंवार हा फरक जाणवून देण्याचा हट्ट. उदा : आमच्या वेळेस... आम्ही लहान असताना... वगैरेनी सुरुवात होणारी सगळी घरगुती समुपदेशने. जुन्या फ्रेम ऑफ रेफरन्स आता बाजूला ठेवून मनाला आवश्यक तेवढे लवचिक पालकांनी बनवले तर मुलांबरोबरचे सहजीवन नक्कीच सफल होईल.

- बाहेरच्या निर्दय आणि रुक्ष व्यवहाराला पाल्याला फार कोवळ्या वयात सामोरे जावे लागते. तुमच्या पाल्याचा दिनक्रम पाहिला तरच हे लक्षात येईल की तुम्हा आम्हाला ऑफिस किंवा इतरत्र ज्या ताणतणावाला सामोरे जावे लागते त्याच ताणतणावाला ही मुलं कोवळ्या वयात सामोरी जातात. त्यांचा सामोरे जाण्याचा रिफ्लेक्स वेगळा असेल त्यामुळे त्याला तुमच्या पारड्यात तोलू नका.

मला म्हणायचे आहे ते एवढेच की पालक पोटेंशिअल एनर्जीचे धनुष्य बनले तर पाल्य कायनेटिक एनर्जीचे बाण होतात. आयुष्याचे युद्ध जिंकायला एवढी तयारी पुरेशी आहे.

- विनायक प्रभू,
सौजन्य:- फुलोरा, सामना, २८०५२०११.

ई लर्निंग

माहिती तंत्रज्ञानामुळे शिकण्याच्या व्याख्याच बदलल्यात. तुम्हाला काही शिकायचं असेल तर कोणती पुस्तकं खरेदी करण्याची किंवा कुठे कोचिंग क्लासला जाण्याची किंवा कोणी व्यक्तिश: मार्गदर्शन करण्याची गरज नाही. हे शक्य झालंय ई-लर्निंगमुळे. शब्दातच याचा अर्थ आहे. ई-लर्निंग म्हणजे इलेक्ट्रॉनिक अर्थात ऑनलाइन लर्निंग.
ई लर्निंगमध्ये सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून प्रदान करण्यात येणार्‍या शिक्षण वर्गाचा समावेश करता येईल. डीटीएच टीव्ही असो वा सीडी-डीव्हीडीज किंवा इंटरनेट, क्लासरूम्स आता तुमच्या घरी आहेत. टाटा स्काय किंवा रिलायन्ससारख्या डीटीएच सुविधा पुरवणार्‍या कंपन्या तुम्हाला इंग्रजी शिकण्यासाठी किंवा १०वी-१२वीचे क्लासेस अगदी टीव्हीवर उपलब्ध करून देतात. बहुतेक कंपन्यासुद्धा आपल्या इंटर्न्ससाठी ई-लर्निंगचा वापर करतात. यामुळे बराच वेळ वाचतो. जर आपला एखादा भाग शिकायचा राहिला किंवा आपल्याला समजलं नाही तर आपण पुन: पुन्हा तो भाग बघू शकतो.


ई-लर्निंगचे फायदेच फायदे आहेत. उदाहरणंच द्यायचं झालं तर गृहिणींना शक्यतो बाहेर क्लास लावणे शक्य होत नाही. लावला तरी संकोच वाटतो. कोणतीही भाषा शिकायची असो वा कोणतीही कला, ई-लर्निंग अगदी स्वत:च्या घरात असल्यामुळे वेळेचं बंधन नाही, ना बाहेर जाण्याचं. शिवाय आपल्याला शिकायला अधिक वेळ लागतो म्हणून संकोचून जाण्याचाही प्रश्‍न नाही.

अमेरिकेसारख्या प्रगत देशात ई-लर्निंगचा वापर झपाट्याने वाढत आहे. गेल्या पाच वर्षांत ई-लर्निंग अधिकाधिक प्रगत, इंटरॅक्टिव्ह होत गेलंय. कारण ई-लर्निंगचा लाभ घेणार्‍यांची संख्या खूप आहे. अमेरिकेत ‘के-१२’ वर्ग आहेत. ई-लर्निंगमध्ये ‘के-१२’ म्हणजे शाळा-कॉलेजांत नेहमीप्रमाणे वर्ग भरतात, पण त्या वर्गांत तुम्ही शारीरिकदृष्ट्या हजर रहाणे जरूरी नसते. या वर्गांना तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून लॉगिंन होऊन हजेरी लावू शकता. याला ‘पब्लिक सायबर स्कूल’ असंही म्हणतात. विद्यार्थी आठवड्यातून एकदा असाईनमेंट्स असतील तर कॉलेजांत जातात. शिकवणारे शिक्षकही या व्हर्च्युअल ट्रेनिंंगसाठी प्रमाणित असतात.

सीबीएल किंवा कॉम्प्युटर बेस्ड लर्निंग

यात शिकताना विद्यार्थी कॉम्प्युटरचा वापर करतात. लॅपटॉप्सच्या आगमनानंतर कॉम्प्युटर छोटे आणि पोर्टेबल झाल्यामुळे हे शक्य झाले. उच्च शिक्षणात कॉम्प्युटर ट्रेनिंगसाठी वापरले जातात.

सीबीटी किंवा कॉम्प्युटर बेस्ड ट्रेनिंग

यात कॉम्प्युटरवर विद्यार्थी स्वत: कॉंम्प्युटरचा वापर करून शिक्षण घेतो. जसे एखादे ई-बुक किंवा म्यॅन्युअल वाचणे. इंटरनेट कनेक्शन असल्यावर ऑनलाइन ट्रेनिंग साईट्सला लॉगिंन होऊन शिक्षण घेता येते. त्याला वेब बेस्ड ट्रेनिंग असं म्हणतात. कोणती प्रोग्रामिंग लँग्वेज शिकायची असेल किंवा कोणती तांत्रिक माहिती किंवा सर्टिफिकेशन करायचे असेल तर वेब बेस्ड ट्रेनिंगचा खूप उपयोग होतो. वेब बेस्ड ट्रेनिंगमध्ये तत्काळ फिडबॅक देऊन कोर्स कम्प्लिट केल्याचं स्टेटसही पाहू शकतो. ऑनलाइन एक्झाम्स देऊन त्याचे निकालही तत्काळ पाहता येतात. सीबीटी हे युजर इंटरॅक्टिव्ह असल्यामुळे नेहेमीच्या क्लासरूम्सपेक्षा खूप युजर फ्रेंडली असतात. ज्यामुळे विद्यार्थ्याला त्यात रसही येतो. मल्टिपल चॉइस प्रश्‍न, ड्रॅग-ड्रॉप बटनं, रेडिओ बटन्स इत्यादींमुळे शिकणं अधिक सुलभ होतं. रटाळवाणी पुस्तकं वाचण्यापेक्षा, व्हिडिओ आणि ऍनिमेशनमधून गोष्टी पटकन आणि अधिक चांगल्या रीतीने समजतात. याचा अजून एक फायदा म्हणजे कमी खर्चात सीबीटी मटेरियल अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतं. पुस्तकांचा किंवा प्रिंटेड नोट्सचा खर्च विद्यार्थी वाढतील तसा वाढत जातो. अनेक दृष्टींनी ई-लर्निंग हे फायद्याचं तर आहेच, पण किफायतशीर आणि प्रभावीसुद्धा आहे.

हिंदुस्थानात इंटरनेटचा वापर वाढतोच आहे. घरी कॉम्प्युटर असणे ही विषेश बाब राहिली नाही. इंटरनेट कनेक्शन्ससुद्धा सहज उपलब्ध आहेत. तेव्हा येत्या काळात कंटाळवाण्या क्लासेसला जाण्यापेक्षा इंटरनेटवर शिक्षण घेण्याचा ट्रेंड येईल यात दुमत नाही. सर्व वयोगटातल्या विद्यार्थ्यांसाठी व्हर्चुअल क्लासरूम्स म्हणजेच ई-लर्निंग खूप फायदेशीर ठरणार आहे.

- prashants.space@gmail.काम
सौजन्य:- फुलोरा, सामना, २८०५२०११

Wednesday, May 25, 2011

बदलापूरची सुरक्षा रामभरोसे


बदलापूर = अदला बदली. कोणाची ? ? पूर्वी शिवाजी महाराज मोहिमेवर निघताना बदलापूरला विश्रांती करत असत व इथे घोड्यांची अदला बदली केली जायची, त्यामुळे बदलापूर हे नाव पडले.


मुंबई, ठाणे, डोंबिवलीनंतर बदलापूर शहराचा सांस्कृतिक आणि शैक्षणिक स्तर उंचावू लागला असतानाच शहराची लोकसंख्या कल्पनेपेक्षाही वाढू लागली आहे. वाढते काँक्रीटचे जंगल, पूर्व व पश्चिम जोडणाऱ्या स्कायवॉकची प्रतीक्षा, मैदानांची वानवा, पाण्याची टंचाई या समस्या सोडविण्यात पालिका अपयशी ठरत असतानाच अद्ययावत अग्निशमन केंद आणि डिझास्टर मॅनेजमेंटची सुविधाच नसल्याने बदलापूरकरांची सुरक्षा रामभरोसेच आहे.

रेल्वे स्कायवॉक कधी जोडणार?
स्कायवॉक पूर्ण होऊन अनेक महिने लोटले तरी पूर्व-पश्चिम जोडणारा स्कायवॉक कधी होणार?, याची बदलापूरकर वाट पाहत आहेत. फेब्रुवारीमध्ये टेंडर काढून स्कायवॉक जोडणीचे काम सुरू होईल, अशा आशयाची पत्रके पालिकेने शहरात सर्वत्र वाटली. परंतु मे महिना संपत आला तरी याबाबत कसलीच हालचाल दिसत नाही. कोट्यवधी खर्चून तयार झालेला हा स्कायवॉक सामान्य बदलापूरकर वापरत नसले तरी प्रेमीयुगुलांसाठी मात्र ते हक्काचे ठिकाण झाले आहे.
महागडे पाणी
शहरात उभ्या राहणाऱ्या आणि आकर्षक सुविधा देणाऱ्या बहुमजली कॉम्प्लेक्समध्ये मुबलक पाणी मिळत असताना शहरातील अन्य भागांत मात्र पाण्यासाठी वणवण करावी लागते. मुंबईपेक्षा महागड्या भावाने पाणी विकत घेऊनही शहराला मागणीप्रमाणे पुरेशा दाबाने पुरवठा होत नाही. पाणी साठवून त्याचा योग्यप्रमाणे विनियोग करणारी यंत्रणाच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे नाही. आजच्या घडीला संपूर्ण शहरात पाच हजार फ्लॅट्स तयार आहेत तर तेवढेच फ्लॅट्स तयार होत आहेत. असेच मोठमोठे प्रकल्प शहरभर उभे रहात आहेत. भविष्यात पाण्याची ही समस्या उग्र स्वरूप धारण करू शकते.

वैद्यकीय सेवा नाही
संपूर्ण शहरात वैद्यकीय सेवा महागडी ठरत असताना सर्वसामान्यांसाठी आवश्यक असलेली सरकारी वैद्यकीय सेवा पुरेशा प्रमाणात मिळत नाही. पालिकेच्या शेजारी असलेल्या सी. एस. दुबे हॉस्पिटलला सिव्हिल हॉस्पिटलला दर्जा देण्यात आला आहे. शिवाय या हॉस्पिटलला शहर आणि ग्रामीण या दोन्हींसाठी मान्यता मिळाली आहे. असे असले तरी या हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी वॉर्ड, कॅज्युअल्टी विभागाची सोय नाही. येथे केवळ एमबीबीएस डॉक्टर आहेत. एमएस किंवा एमडी या दर्जाचे तज्ज्ञ डॉक्टर येथे नाहीत. एखादा अपघात घडल्यास त्यासाठी उल्हासनगरच्या सिव्हिल हॉस्पिटलला जावे लागते. तर खासगी हॉस्पिटले सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची आहेत.

डम्पिंग ग्राऊंडसाठी कायमस्वरुपी जागा नाही
अंबरनाथप्रमाणे बदलापूर शहरातही कायमस्वरुपी डम्पिंग ग्राऊंड नाही. पूवीर् पनवेलकरांच्या खदानीत डम्पिंग ग्राऊंड होते. तिथून ते नवीन अंबरनाथ येथे हलविले असले तरी त्या गावाचा या डम्पिंगला तीव्र विरोध आहे. काही दिवसांत हे डम्पिंग नवीन ठिकाणी पुन्हा हलविले जाऊ शकते. शहरातील प्रभागवार कचराकुंड्या बहुतेक ठिकाणी साफ दिसत असल्या तरी काही ठिकाणी अगदी त्याउलट चित्र दिसते. मुख्य रस्त्यावरील कचराकुंड्या मात्र ओसंडून वाहताना दिसतात.

रस्तेदुरुस्तीची कूर्मगती
पावसाळा तोंडावर आला तरी शहरातील रस्तेदुरुस्तीची कामे अतिशय कूर्मगतीने सुरू आहेत. पाण्याचा निचरा होण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने गटारे असणे आवश्यक आहे, मात्र अनेक ठिकाणी ती अस्तित्वातच नाहीत. अनेक ठिकाणी तर अशा गटारांवरील सिमेंटची झाकणेच त्या गटारात पडलेली दिसतात. त्यामुळे अशा उघड्या पडलेल्या गटारांमध्ये माणसे आणि गुरे पडण्याच्या घटनाही घडल्या आहेत. पालिकेसाठी सर्वात महागडा आणि वादग्रस्त ठरलेला 'अंडरग्राऊंड ड्रेनेज पाइपलाइन' या प्रकल्पाअंतर्गत संपूर्ण शहरात अनेक ठिकाणी खोदण्यात आलेले रस्ते अद्यापही दुरुस्त झालेले नाहीत.

डिझास्टर मॅनेजमेण्ट हवे
बदलापूर पश्चिमेला बॅरेज वॉटर सप्लाय आणि नदीचे पाणलोट क्षेत्र असल्यामुळे केव्हाही पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. प्राणहानी आणि वित्तहानी टाळण्यासाठी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक आहे. मात्र यासाठी पालिकेकडे डिझास्टर मॅनेजमेण्ट (पर्यायी यंत्रणा)ची सुविधाच नाही. त्यामुळे सुरक्षेच्या बाबतीतील पालिकेची अनास्थाच यातून दिसून येते.
मैदानांची वानवा
बदलापूरकरांमध्ये भरपूर गुणवत्ता असूनही त्यांच्यासाठी अनेक सुविधाही शहरात नाहीत. इनडोअर गेम्ससाठी येथे खूप पर्याय आहेत. मात्र आऊटडोअर खेळांसाठी मैदानेच नाहीत. आदर्श कॉलेजचे मैदान सोडल्यास शहरात मैदाने नाहीत. त्यामुळे शहरातील मोकळ्या जागा केवळ नव्या इमारतींसाठीच राखीव आहेत की काय, असा प्रश्न सामान्य बदलापूरकरांना वाटतो.

दुर्लक्षित अग्निशमन केंद
शहरात सर्वत्र उंच इमारती उभ्या रहात असताना सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले नगरपालिकेचे अग्निशमन केंद दुर्लक्षितच राहिले आहे. शहरात कोणतीही दुर्घटना घडल्यास एकच गाडी सर्वत्र धावते. उंच वाढणाऱ्या इमारतींच्या सुरक्षेसाठी कोणतीही अद्ययावत यंत्रणा नाही. शहराच्या एका टोकाला असलेल्या या केंदाबाबत सर्वच स्तरातून कमालीची उदासीनता दिसून येते. बदलापूर पश्चिमेला अग्निशमन केंदासाठी मंजुरी मिळूनही ते घोंगडे जागेअभावी भिजते आहे. मोठी घटना घडल्यास त्यासाठी मीरा-भाईंदर पासून अग्निशमन गाड्या बोलाविल्या जातात.
एकच तलाव शिल्लक
एकेकाळी बदलापुरात १० तलाव होते. मात्र आता शहरात केवळ एकच तलाव आपले अस्तित्व टिकवून आहे. स्टेशनजवळच्या महालक्ष्मी तलावाचे सुशोभिकरण झाले, तिथेच शहीद स्मारकही उभारले गेले. मात्र या ठिकाणी संध्याकाळी प्रेमी युगुलांची गदीर् असल्याने कुटुंबवत्सल सामान्यजनांना येथे फिरणे कठीण जाते. टाटांच्या वीज लाइनखाली मोकळ्या जागेत जॉगर्स पार्क, निसर्ग उद्याने, ज्येष्ठांसाठी बागा बनविल्या जात आहेत, हीच काय ती समाधानाची बाब!
पक्के माकेर्ट नाही

अस्ताव्यस्त वाढणाऱ्या या शहरात कुठेही पक्के माकेर्ट नाही. मच्छी माकेर्ट नाही. शहराच्या वेगवेगळ्या भागात आपल्या मजीर्नुसार अनेकजण भाजी विकताना दिसतात. पूवीर् स्टेशनरोडवर फेरीवाले बसायचे. या फेरीवाल्यांना कोणतीही सुविधा नसणाऱ्या एका मोकळ्या जागेवर बसण्यास सांगितल्यानंतर त्यांनी या जागेलाच रामराम ठोकला. पूवेर्ला माकेर्टच्या इमारतीचे बांधकाम रखडले होते. ते आता सुरू झाले आहे. मात्र ते भाजीवाले तेथे जातील का, हा मुख्य प्रश्न आहे. सध्या तरी या भाजीवाल्यांनी रेल्वेफाटकासमोरच्या रस्त्यावर आपला मुक्काम ठोकला आहे.
 
सौजन्य:- SHAILESHCHAKATTA.BLOGSPOT.COM

Sunday, May 22, 2011

त्रिमितीचा अनुभव

इलेक्ट्रॉनिक्समध्ये दिवसेंदिवस क्रांती होत आहे, बरेच बदल झालेत आणि होतीलही.२डी गॅजेट्सनंतर आता येत आहेत ३डी गॅजेट्स. बरेच ब्रॅण्डस् ३डी डिस्प्लेवर काम करत आहेत आणि आगामी काळात हे सर्वसामान्यांच्या आवाक्यात आलेलं असेल. मोबाईल, टीव्ही, मॉनिटर्स, कॅमेरे, गेम स्टेशन्स या सर्व प्रकारांत आता आपल्याला ३डीचा अनुभव घेता येणार आहे आणि यासाठी आता आपल्याला जास्त वाट पहावी लागणार नाही.
- ३ डी टीव्ही


त्रिमितीतले चित्रपट आपल्याला आता नवीन नाहीत. पण त्यासाठी खास ३डी चित्रपट पहायला तुम्हाला थिएटरमध्ये जावे लागते. पण या क्षेत्रात एल्जी, सॅमसंग, सोनी, पॅनासॉनिक सारख्या वर्ल्डवाईड ब्रँण्डसमध्ये खूप चढाओढ आहे. जुन्या सीआरटी टीव्हीनंतर जेंव्हा प्लास्मा मग एलसीडी आणि अलीकडे एलईडी डिस्प्लेवाले टीव्ही आले तेंव्हा त्यांची मागणी जबरदस्त वाढली. कॉंपिटिशनमुळे कमीत कमी किमतीत एलसीडी/एलईडी टीव्ही उपलब्ध आहेत. पण आगामी आकर्षण असेल ते ३डी टीव्हींचे. पण जरा थांबा. आताच्या ३डी टीव्हींसाठी तुम्हाला महागडे चष्मे घ्यावे लागतात. तसेच यांचा ३डी इफेक्टसुद्धा एवढा प्रभावी नाही. पण थोड्या दिवसांत ३डी सर्वसामान्य होऊन जाईल. सो जस्ट वेट ऍण्ड वॉच .


- ३ डी गेमस्टेशन्स
एक्सबॉक्स ३६० आणि प्लेस्टेशन या सर्वाधिक लोकप्रिय गेमस्टेशन्समध्ये तुम्हाला ३डी डिस्प्ले मिळाला तर? मोशन सेंसर टेक्निकचा वापर केल्यामुळे आता जॉयस्टिक ऐवजी तुमच्या हालचालींना एक मोशन सेन्सर कॅमेरा ट्रॅक करतो आणि त्यानुसार गेमला इनपूट दिले जाते. हा एक निराळा आणि गेम अगदी खरा अनुभव भेटतो. एखादी बॉक्सिंग, टेनिस, बॅडमिंटन किंवा कसलाही गेम खेळण्यासाठी तुम्हाला बाहेरही जायला नकोत , आणि त्याचे कीटही आणायला नको. फक्त एक्सबॉक्स किंवा प्लेस्टेशन घ्या आणि हवा ती गेम हवा तेंव्हा खेळा. त्यातही ३डीचा अनुभव म्हणजे अजून काही विचारायला नकोच.

- ३ डी कॅमेरे
३डी कॅमेर्‍यात दोन लेन्स असतात. ३डीच्या मूळ तत्त्वानुसार कोणत्याही इमेजला दोन कोनांत चित्रित करून त्या इमेजेस एकावर एक ठेवून डेव्हलप केल्या जातात. जेंव्हा ३डी चष्म्यातून बघतो तेंव्हा आपल्याला त्या ३डी दिसतात. उघड्या डोळ्यांनी पाहिल्यास त्या इमेजेस काही पुसटशा दिसतात. ३डी कॅमेर्‍याने तुम्ही ३डी फोटो तसेच ३डी क्लिप्स शूट करू शकता.

- ३ डी लॅपटॉप्स
कॉम्प्युटर / लॅपटॉप प्रेमींसाठी ही एक खुशखबरी आहे. दाक्षिणात्य देशांत ३डी डिस्प्लेचे लॅपटॉप्स लॉंच पण झालेत. गेमर्ससाठी ही सर्वांत खुशीची मेजवानी आहे. हिंदुस्थानातही लवकरच ३डी लॅपटॉप येत आहेत. आगामी काळात ऑपरेटिंग सिस्टिम्स सुद्धा ३डी येतील आणि संगणकाचा एक वेगळाच अनुभव आपल्याला मिळणार आहे. गेम्स किंवा चित्रपट पहाताना ३डीचा अनुभव रोमांच आणि अधिक आनंद देणारा असेल. ३डी लॅपटॉप्स, एक हॉट गॅजेट लवकरच येतंय.



३डी गॅजेट्समध्ये अजून काय काय बघायला भेटेल याची कल्पनाच करावी. या ३डी जगतात अशक्य असं काहीच नाही.

सौजन्य:- फुलोरा, सामना 21052011
prashants.space@gmail.com

(फळ) खा, पिऊ नका!

फळ/भाजीचा रस काढायला जेव्हा ते ज्यूसर/मिक्सरमधे चिरडले जाते, तेव्हा त्याचे क्षेत्रफळ वाढते. त्यामुळे अधिक प्रमाणात हवेतला प्राणवायू (ऑक्सिजन) त्या रसातल्या पौष्टिक तत्त्वांवर प्रतिक्रिया करून त्यांचे स्वरूप बदलून, त्यांची पौष्टिकता नष्ट करतो.


माझा रोजचा फिक्स ब्रेकफास्ट असतो- एका अंड्याचे ऑम्लेट, दोन टोस्ट आणि एक ग्लास ऑरेंज ज्यूस. ‘दुपारी आम्ही ऑफिसची सर्व मंडळी चालायला जातो, टी टाईमला, तेव्हा सगळे चहा पितात पण मी मात्र ज्यूस सेंटरचा फ्रेश ज्यूस पिते.’ ‘रोज संध्याकाळी मी माझ्या रिटायर्ड िर्ंिमत्रांसोबत जॉगर्स पार्कला जातो, तिथून परत येताना मी फ्रूट आणि भाज्यांचे मिक्स हर्बल ज्यूस पितो, वरून साखर न घालता बरं का!’ आहेत न या सगळ्यांच्या एकदम हेल्दी हॅबिट्स? मला विचाराल तर, नाही. यापैकी कुणाचीच सवय खरंच आरोग्यदायक नाहीये. हं, हेल्दी मानसिकता नक्की आहे. पण फ्रूट ज्यूस पिणे म्हणजे सर्व विकारांवरचा रामबाण उपाय किंवा आहारात आवश्यक असलेल्या फळांना पर्याय- हे कधीच होऊ शकत नाही. फळं घन पदार्थ असतात. त्याच्यातील पोषण जपण्यासाठी त्यावर एक किंवा अधिक जाड/पातळ साल असते. जेव्हा फळांचे ज्यूस काढले जाते तेव्हा ते एक किंवा अधिक प्रोसेसिंगमधून तयार होते. जरी तुम्ही ज्यूस सेंटरवरचे ज्यूस प्यायलात, तरी तिथे पण त्या फळाला क्रश करून त्यातून त्याचा रस काढला जातो आणि चोथा गाळून टाकला जातो. तुम्ही म्हणाल की मी टरबूजचा ज्यूस न गाळता पितो - तरी त्या टरबुजाचे फळ, ज्यूस बनण्यासाठी प्रोसेस तर होतेच. फळ/भाजीचा रस काढायला जेव्हा ते ज्यूसर/मिक्सरमधे चिरडले जाते, तेव्हा त्याचे क्षेत्रफळ वाढते. त्यामुळे अधिक प्रमाणात हवेतला प्राणवायू (ऑक्सिजन) त्या रसातल्या पौष्टिक तत्त्वांवर प्रतिक्रिया करून त्यांचे स्वरूप बदलून, त्यांची पौष्टिकता नष्ट करतो. विकत मिळणार्‍या टेट्रापॅकची तर बातच सोडा. एवढया मोठ्या प्रमाणातल्या औद्योगिक उत्पादनात, त्या फळ/भाजीच्या रसात प्राकृतिक रंगदेखील रहात नाही, पौष्टिक तत्त्व राहणे तर जणू अशक्यच असते. म्हणूनच अशा ज्यूसना ‘फोर्टीफाय’ म्हणजे वरून रासायनिक जीवनसत्त्व व खनिज तत्त्व घालावे लागतात (जे आपल्या शरीरात बहुतांश शोषले जात नाहीत). याव्यतिरिक्त त्या ज्यूसमधे रंग, इतर रसायन, कॉर्न सिरप वगैरे तर असतातच.


माझं असं ठाम मत आहे की फ्रूट/व्हेजिटेबल ज्यूस पिणे हे पण एक पाश्चात्य फॅड आहे. फळ हे फळ रूपातच खावे, तरच त्यातून तुम्हाला जीवनसत्त्व, खनिज तत्त्व, फायबर आणि प्रतिकारशक्ती वाढवणारे घटक मिळतात. उगीच त्या फळाचे ज्यूसरूपी सरबत करून असा समज करून घेऊ नये की तुम्हाला फळाचे पोषण मिळत आहे. आणि, कॅलरी बघाल तर, फ्रूट ज्यूस आणि कार्बोनेटेड कोला यात तुलनात्मक कॅलरी असतात. आणि साखरेव्यतिरिक्त, प्राकृतिक पोषण काहीच नाही! तरी का असावा एवढ्या लोकांचा फ्रूट ज्यूस पिण्याचा अट्टहास? यावर मला अशी काही कारणं दिली गेली-

- फळं आणायला वेळ नसतो- फ्रूट ज्यूस आणायला वेळ काढता ना?

- फळं खायला वेळ नसतो- मला सांगा, एक केळं सोलून खायला किती तास लागतात हो?

- फ्रेश ज्यूस तयार मिळतो, नुसतं पिऊन टाकायचा- फ्रेश फळ देखील रेडी-टू-ईट मिळतात, छान पैकी खाऊन टाकायची. ग्लास धुवत बसायला नको आणि बाहेरचे ज्यूस प्यायल्याने रोगराईची भीती पण नको!

- ऑफिसमधे फळं खायला लाज वाटते- जेवण जेवता ना तिथेच तेव्हाच खायचं मग एक फळ. तुम्ही सुरुवात करा मग बघा कसं सगळेच आणायला लागतात एक फळ ते!

- फळं महाग असतात- रोज एक ग्लास फ्रूट ज्यूस पिण्यापेक्षा, एक फळ खाणं कधीही स्वस्त असतं. करा हिशेब!

एवढं सगळं समजावून देखील जर तुम्हाला फळाचा रस प्यायचाच असेल तर- नारळ पाणी प्या. आंबा मऊ करून तसाच त्यातला रस खा/प्या. द्राक्ष, टरबूज, खरबूज खा- केवढी छान रसदार फळं असतात ती. काय तर मग, आता नाही न पिणार? फळ हो!

amitagadre@gmail.com
(लेखिका डाएट कन्सल्टंट आहेत)

Friday, May 20, 2011

नीडर तो लीडर

सत्य साईबाबांच्या जाण्यामुळे आता त्यांचा वारस कोण याकडे सगळ्या भक्तांचे लक्ष लागले आहे. आता आम्हाला मार्ग कोण दाखवणार असा प्रश्‍न भक्तांना पडला आहे. दुसरीकडे उद्योगजगतामध्ये रतन टाटांनीसुद्धा आपला वारस शोधण्यासाठी समिती नेमली आहे. राजकारणातही एका पर्वाचा अस्त झाला की अनुयायांना नेत्याचा नवा चेहरा कोण असेल याबाबत उत्सुकता असते. कोणत्याही समुदायाला नेत्याची गरज असते हे वास्तव आहे. पण खरोखरच स्वत:चा, कंपनीचा, देशाचा विकास घडवण्यासाठी नेत्याची गरज आहे का?

सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात आतापर्यंत ज्या नेत्यांनी जनसमुदायाला मार्ग दाखवला त्यांचे योगदान समाजाच्या जडणघडणीत नक्कीच आहे. पण या नेत्यांच्या जाण्यानंतर त्यांचे विचार त्यांच्यासोबत जातात. किंवा ते विचार पुढे अनुयायांनी नेले तरी काळाच्या कसोटीवर ते लागू होतीलच असे नाही. पुढे नवा नेता आला की त्याचे विचार वेगळे आणि त्याची कार्यपद्धती वेगळी. तरीही आपण पुढच्या नेतृत्चाच्या प्रतिक्षेत असतो. परंतु, आधुनिक काळाची गरज अशी आहे की आपण कायम एखाद्या नेत्याच्या प्रतिक्षेत राहण्याऐवजी प्रत्येकाने आपल्या अंगी नेतृत्वगुण जोपासले पाहिजेत.


- एखाद्या कंपनीमध्ये एखादा प्रमुख काही चांगल्या व्यवस्था राबवतो. या व्यवस्था कर्मचार्‍यांच्या फायद्याच्या आणि सोयीच्या असल्या की तो लीडर गेल्यानंतरही ती व्यवस्था तशीच सुरू राहते, पुढचा लीडर कोणी असो वा नसो. अशा ठिकाणी लीडर हा फक्त नावापुरता असतो.

- एखादी कंपनी, एखादा समुदाय नव्या लीडरच्या शोधात असते आणि लीडर अभावी सारे संपले आहे, अशी भावना त्यांच्यात निर्माण होत असेल तर त्या समुदायामध्ये नेतृत्वगुणाचा अभाव आहे.

- बिझनेस मॅनेजमेंटमधून आजकाल प्रत्येक व्यक्तिमधल्या नेतृत्वगुणाला झळाळी आणण्याचा प्रयत्न केला जातो. आधुनिक काळाची ही गरज आहे. म्हणूनच प्रत्येकाने आपल्यातला नेतृत्वगुण वाढवण्याची गरज आहे.

- प्रथम स्वत:चे नेतृत्व करा

जो स्वत:चे काम जाणतो, ते करण्याची क्षमता अंगी ठेवतो तो खरा लीडर. दुसर्‍याला आदेश देऊन काम करवून घेणं सोपं आहे पण ते काम योग्य पद्धतीने करवून घेणं अवघड आहे. यासाठी लीडर स्वत: उत्तम कामगार असला पाहिजे. त्याने स्वत: स्वत:चे नेतृत्त्व करून आपल्या कामाचा आदर्श इतरांसमोर ठेवावा. नेतृत्व आदर्शवादी असेल तर ते इतर कर्मचारी स्वीकारतात व काम सुधारते.

- कुठलंही काम हलकं समजू नका

काम छोटं असो वा मोठं ते हलकं समजू नका. छोट्या मोठ्या कामात लक्ष काय घालायचं ही प्रवृत्ती बदला. कारण यामुळे कामात अनेक मर्यादा पडतात. सहकार्र्‍यांच्या कामात लक्ष घाला. पण कुरबुर करू नका. वेळप्रसंगी मार्गदर्शन करा. पण त्यालाही त्याच्या पद्धतीने काम करण्याची मुभा द्या. सहकार्यांच्या कामाची दखल घ्या.

- नवनवीन योजना वापरा

बदलत्या परिस्थितीनुसार नवनवीन योजना अमलात आणा. यासाठी कर्मचार्‍यांना विश्‍वासात घ्या. कामाचं स्वरूप आणि त्यामुळे होणारे फायदे समजावून सांगा. यांत्रिकपणे काम करवून घेण्यापेक्षा ते नीट समजवून चांगलं काम करवून घेता आलं पाहिजे.

- खास बना

जगात पांढर्‍या व्यक्ती झपाट्याने कमी होत आहेत. त्यामुळे ते दिसताच त्याची बातमी होते. आपणही अशा प्रकारे सगळ्यांनी दखल घ्यावी इतकं ‘खास’ व्यक्तिमत्त्व बनवले पाहिजे.

- काम करायला शिका

घेतलेलं काम फक्त कागदावर लिहून चालत नाही ते प्रत्यक्षात उतरलं पाहिजे. ठरवलेल्या वेळेत चांगलं काम करून देतो तो लीडर.

- काम पूर्ण करा

घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी आधी ते सुरू केलं पाहिजे. यासाठी कामाचं उद्दिष्ट समोर ठेवा. त्याचा आलेख बनवा. कामे वाटून घ्या. ते काम पूर्ण होत नाही तोपर्यंत सर्व कामे दुय्यम आहेत असं समजून ते पूर्ण केले पाहिजे. जोपर्यंत वस्तू पूर्ण होत नाही तोपर्यंत ती कुणाच्याच उपयोगाची नसते. कामाचंही तसंच आहे. अपूर्ण कामाची कुणीच दखल घेत नाही.

- स्तुती करायला शिका

भविष्याचा विचार करून योजना आखा. चांगल्या कामाची दखल नेहमीच घेतली जाते. त्यानुसारच बढती, बोनस मिळतो. तुमच्या कामाची दखल कुणी घ्यावी असं वाटत असेल तर प्रथम तुम्ही तुमच्या सहकार्यांच्या कामाची दखल घ्यायला शिका. चांगल्या कामाची स्तुती करा.

- प्रशिक्षण घ्या

नेतत्व गुण हे उपजत असतात असं म्हणतात. पण आपल्यालाही ही संधी मिळावी म्हणून तुम्ही प्रशिक्षण घेऊ शकता. यासाठी पुस्तक वाचन, प्रशिक्षण शिबीर, शिकवणी घेऊ शकता. हुशार व्यक्तीच्या सान्निध्यात राहून त्याची मदतही घेऊ शकता.

हेही लक्षात ठेवा

- कुणी आपली मस्करी केली तर प्रति उत्तर देऊ नका.

- आपल्यावर कुणी मेहरबानी करावी अशी परिस्थिती निर्माण करू नका.

- स्वत:ला वेगळं समजू नका.

- कुठल्याही परिस्थितीत काम करण्याची तयारी ठेवा.

- आपलं कुणाला हसू करू देऊ नका.

- जबाबदारीचे भान ठेवा. बेफिकिरीतून बाहेर पडा.

- अपयश पचवण्याची ताकद ठेवा.

- दुसर्‍याच्या यशातही सहभागी व्हा.

- दुसर्‍याचं म्हणणं ऐका. त्यावर विचार करा.

- दुसर्‍या व्यक्तीच्या चुका काढण्यापेक्षा आपल्या चुका सुधारा.

- योग्य नियोजन करा.

Techno.savvy@live.com
सौजन्य:- इंद्रधनू, सामना.
हे टाळा

* कधीही आपल्या वरिष्ठांसमोर हाताची किंवा पायाची घडी घालून बसू नका.
* बोलताना जास्त हातवारे करू नका. याने समोरच्याचं लक्ष विचलित होईल.
* सतत आपल्या चेहर्‍याला हात लावू नका. यामुळे इतरांना तुम्ही नर्व्हस असल्यासारखे दिसाल.
* बोलताना जास्त गंभीर राहू नका. याने लोकांचं तुमच्याकडे लक्ष जाणार नाही थोडं तरी हसत रहा. तसंच अगदी जोरजोरात खळखळून व सतत हसू नका.

* ऑफिसमध्ये असताना पाय हलवणे, टेबल वाजवणे असे प्रकार टाळा.
* कुठल्याही व्यक्तीच्या अगदी जवळ उभे राहू नका. व्यवस्थित अंतर ठेवून उभे रहा.

Saturday, May 14, 2011

आता भरपूर जेवायचं

कुठलीही स्त्री गर्भवती आहे असं कळलं की तिला सगळ्यात आधी दिला जाणारा सल्ला म्हणजे ‘आता भरपूर जेवायचं’, ‘सारखं खात रहायचं’, ‘दोन माणसांना पुरेल एवढं खायचं’. असं होणं स्वाभाविक आहे. गर्भवतीचे पोषण हे खूप महत्त्वाचे असते.


कारण तिच्या आहारातूनच गर्भातल्या बाळाला पोषण मिळत असते. मध्यंतरी माझ्या एका मैत्रिणीची डिलिव्हरी झाल्यावर मी तिला हॉस्पिटलात भेटायला गेले होते. तिच्याच बरोबर अजून एका बाईची पण डिलिव्हरी झाली होती. त्या बाईचं बाळ अगदी लोभस, सुंदर, स्वस्थ आणि आनंदात दिसत होतं. बाईची पण तब्येत एकदम ठणठणीत वाटत होती (नुकतीच डिलिव्हरी झालेली असताना पण तिच्यात बरीच स्फूर्ती होती). तिला बघून माझ्या मैत्रिणीला तिचा हेवा वाटला. आम्ही तिला विचारलं की, तिने गर्भावस्थेत असताना काय खाल्लं? ती म्हणाली, ‘ताई, मी आणि माझी आई फळ विक्रेते आहोत. दुसरं तर काही आणून खाणं शक्य नव्हतं म्हणून मी दिवसभर फळं आणि भुईमुगाच्या शेंगा खायचे. सकाळी घरून निघताना भाकरी भाजी आणि रात्री खिचडी, बाकी दिवसा फळं.’ तिला व तिच्या बाळाला बघून पुन्हा एकदा फळं खाण्याचं महत्त्व आम्हाला पटलं. असो.


स्त्रियांनी एरवी पण आपल्या आहाराकडे जरा जास्त लक्ष दिलेलं असलं की गर्भावस्थेत रोजच्या खाण्या-पिण्यात जास्त बदल करावे लागत नाहीत. गर्भवतीने सगळ्यात जास्त दूध व त्याचे पदार्थ, फळं, भाज्या, कडधान्यं व डाळी खायला पाहिजेत. तसेच साखर व गोड पदार्थ, बटर, तूप, डालडा हे कमी प्रमाणात असले पाहिजे. प्रोसेस्ड किंवा रेडी टू ईट जंक फूड खाणे टाळले पाहिजे. बरं, जर अगदीच अमुलचे आईस्क्रीमच खावंसं वाटत असेल तर ते जरूर खावे, पण एक कप. जेवणाऐवजी आईस्क्रीम नको!

- दूध व त्याचे पदार्थ- दूध, दही, ताक, पनीर, घरचं लोणी, घरचं साजूक तूप हे पदार्थ आवश्यक कॅल्शियम, प्रोटीन व जीवनसत्त्व देतात. घरचं साजूक तूप रोज एक चमचाभर खावं.

- फळं व भाज्या- सर्व फळं व भाज्या भरपूर खाव्यात. शक्यतोवर बाहेर गार, कच्चे सलाड खाऊ नये. कारण जर त्यातल्या भाज्या स्वच्छ धुतलेल्या नसतील तर इन्फेक्शन होऊ शकते. पपई, आंबा खायचं नाही असं सांगितलं असेल तर त्यातून मिळणारे जीवनसत्त्व अ तुम्हाला इतर रंगीत फळं, भाज्या व पालेभाज्यातून मिळू शकते.

- डाळी व कडधान्य - दोन्हीवेळच्या जेवणात किमान एक वाटी डाळ किंवा उसळ असले की आहारात प्रथिनांची उणीव भासत नाही आणि शिवाय जरुरी असे खनिज व जीवनसत्त्व पण मिळतात.

- मासे, अंडी, चिकन, मटण-अंड्यात उच्च प्रतीची प्रथिने असतात. रोज एक अंडं खाल्लं तरी चालतं, मात्र त्याचं अतिरेक केला तर उष्णता होऊ शकते. मासे पण आरोग्यवर्धक असतात. पण त्याला शक्यतोवर डीप फ्राय करून खाऊ नये. तसेच चिकन व मटणाचे - याचे प्रोसेस्ड पदार्थ खाणं टाळावं. गर्भवतीने कच्चे अंडे (हाफ फ्राय, पोच्ड एग, मायोनेझ) किंवा कच्चे मासे (सुशी) खाऊ नये, कारण त्याने ‘साल्मोनेला’ व इतर रोगसंसर्ग होऊ शकतो.

- तेल, तूप, डालडा - डालडा किंवा मार्जरीनमध्ये हानिकारक ट्रान्स फॅट्स असतात म्हणून ते टाळावे. विकतचे केक, कुल्फी, नानकटाई यात पण डालडा/मार्जरीन असते. केक खायचा असेल तर घरी बनवून खावा. तळणीच्या पदार्थांचे प्रमाण कमीच असावे (आठवड्यातून एकदा).

- पाणी व नारळ पाणी - नेहमी उकळलेले पाणी प्यावे. सगळ्यात जास्त रोगराई पाण्यातून पसरत असते. विकतचे मिनरल पाणी घेताना त्याचे सील आणि पॅकिंग व्यवस्थित असल्याची खात्री करून घ्यावी. गर्भावस्थेत नारळ पाणी पिणे पण खूप गुणकारक असते. बाहेर ज्यूस पिऊ नये, शिवाय टेट्रा पॅकचे पण पिऊ नये. कारण त्यातून फळातून मिळणारे पोषण मिळत नाही.

एका स्वस्थ हिंदुस्थानी स्त्रीला साधारण 2000 कॅलरीची रोज गरज असते. गर्भवती झाल्यावर तुमचे जेवण जर खूप कमी असेल तर एवढ्या कॅलरी मिळतील असं खावं. दिवसभरात साधारण 6-8 वेळा काहीतरी खावं म्हणजे उलटीचा पण त्रास कमी होतो. गर्भावस्थेच्या 6 व्या महिन्यापासून रोज 200-300 अधिक कॅलरीची गरज असते. या जास्तीच्या कॅलरी तुम्हाला 2 पोळ्या, 1 सॅन्डवीच, 1 मसाला डोसा, 2 इडल्या, 1 वाटी मिसळ, 1 वाटी खीर- असं खाऊन पण मिळू शकतात. आहार संतुलित आणि नियमित करणं गर्भवतींसाठी खूप गरजेचे असते. वारंवार तेलकट, तळलेले पदार्थ, जंक फूड, प्रोसेस्ड फूड, डबाबंद विकतचे पदार्थ खाल्ले की गरजेपेक्षा जास्त कॅलरी मिळून अती वजन वाढते. पौष्टिक खाण्यावर भर असावा, अचर-पचर खाऊन वजन वाढवण्यावर नव्हे. गर्भवतीचे शरीर बरोबर तिला भूक लागल्याची जाणीव करून देतं - अशा वेळी, ताजं घरी बनवलेलं पौष्टिक खावं. असं केल्याने, तुमच्या आणि तुमच्या बाळाचे आरोग्य जपले जाईल आणि उगीच अनावश्यक वजन वाढणे आणि डिलिव्हरीनंतर ते कमी करण्याचा खटाटोप आणि मनस्ताप होणार नाही. तर असेच - स्वस्थ खा, स्वस्थ रहा!

amitagadre@gmail.com
(ंलेखिका डाएट कन्सल्टंट आहेत)
सौजन्य:- फुलोरा, सामना १४०५२०११.

Wednesday, May 11, 2011

संसाराचे संगीत

पती-पत्नीचे ऐक्य हे संसारात संगीत निर्माण करू शकते. समग्र रुपात मी तुझी आहे असा भाव जर वधूच्या मनात निर्माण झाला नाही तर संसारात आनंद कधीच जाणवत नाही. तो विवाह हा उपहास बनतो.
'सप्तपदी हि रोज चालते' सकाळी सकाळी या गाण्याचे सूर कानावर आले आणि मन भूतकाळापासून वर्तमान काळापर्यंत प्रवास करू लागले.

पंचेचाळीस - पन्नास वर्षांपूर्वी लग्नात सप्तपदिला फार महत्व होते. लग्नात सात पावले चालताना त्याचा अर्थ समजत होता असे नाही, पण घराचे संस्कार, घरात, समाजात पाहायला मिळणाऱ्या गोष्टी, मोठ्यांचे अनुकरण यामुळे मुले-मुली (पती-पत्नी) संसारात सुखी राहून संसार व्यवस्थित करत असत.


आजच्या काळात लग्न समारंभात विवाह प्रसंगाचे गांभीर्य, पावित्र्य, संस्कार हे काहीच न राहता समारंभ बनला आहे.


मंत्र श्रवणा ऐवजी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत नीट करण्याकडेच अधिक लक्ष पुरवावे लागते. लग्न मंडपात नुसता धांगड धिंगा च जास्त अनुभवाला येतो. तिथे पावित्र्य तर जाणवतच नाही.


लग्नामध्ये पुरुषापेक्षा स्त्रीला प्राधान्य अधिक असते. कारण स्त्रीला स्वताचे जीवन पुरुषाच्या जीवनाशी एकरूप करायचे असते. "लग्न म्हणजे पुरुषाचे कर्तुत्व आणि स्त्रीच्या समर्पणाचे सुगम मिलन."


पती-पत्नीच्या प्रेमाला दुध साखरेची उपमा देताना साखर ज्याप्रमाणे गुप्त राहून दुधाचा गोडवा वाढवते त्याप्रमाणेच स्त्रीने स्वकर्तुत्वावर जीवनाचा गोडवा वाढवणे गरजेचे आहे.


'न स्त्री स्वातंत्र्य मार्हती' हे वाक्य मनुने आर्थिक स्वातंत्र्याला उद्देशून लिहिले आहे. स्त्री ने अर्थोपार्जन न करताही तिला पारतंत्र्या सलणार नाही. अशी सुंदर व्यवस्था आपल्या शास्त्रकारांनी केली होती. पुरुष अर्थार्जन करीत असे व मिळणारा सर्व पैसा स्त्रीच्या हातात देत असे. पैशाची सर्व व्यवस्था स्त्रीच्या हातात असे. पुरुषही स्वताला पाहिजे असणारा पैसा स्त्री (घरातील कुटुंब व्यवस्था पाहणारी स्त्री - आई, बायको) कडून मागून घेत असे. यात स्त्रीचा गौरव असे. पुरुषही यथेच्छ पैसा वापरायला मिळत नसल्याने स्वैराचारापासून दूर राहत असे. स्त्री घराची सम्राद्नी असे. घर स्त्रीचे मानले जात असल्यामुळे स्त्री स्वताच्या प्रेमशक्तीने घर आनंदी समाधानी ठेवत असे.


आजच्या काळात विवाह संस्काराचे पावित्र्य समजून घेणे अधिक गरजेचे वाटू लागले आहे.


स्त्री करिता लग्न हे नव्या अवतारासारखे आहे. नवे जीवन, नवे वातावरण, नव्या संबंधिताना तिने आपलेसे करायचे असते. सात पावले बरोबर चालल्याने मैत्री होते असे शास्त्र वाचन आहे. म्हणून विवाह संस्कारात साप्तपादीला फार महत्व आहे आणि आजच्या काळात नव वधू वरांनी सप्तपदीचा अर्थ समजून घेऊन जर वैवाहिक जीवनाची सुरवात केली तर सध्या वाढत चाललेले घटस्फोटाचे प्रमाण नक्कीच कमी होईल. वधू प्रत्येक पावलाला प्रतिज्ञा करते ती अतिशय बोधक आहे.


प्रथम पाऊल -

या प्रतिज्ञेत ती म्हणते पती हेच माझे सर्वस्व आहे. स्त्री स्वताचे भाग्य पतीबरोबर जोडते.


दुसरे पाऊल -
या प्रतिज्ञेत ती संपूर्ण कुटुंबाशी जोडली गेल्याची कबुली देते व लहान थोरांचा योग्य तो मान राखण्याची जबाबदारी स्वीकारते. त्याच प्रमाणे मिळणाऱ्या पैशात मी समाधानी राहीन. समाधानाशिवाय संसारात सुख नाही हे ती जाणून असते.


तिसरे पाऊल -
या प्रतिज्ञेत ती आज्ञा पालनाची व रोज स्वादिष्ट व रुचकर जेवण बनविण अशी खात्री देते. स्त्रीही भोजन गृहाची राणी समजली जाते.


चवथे पाऊल -
या प्रतिज्ञेत ती मन, वाणी आणि कर्म यांनी पतीशीच एकनिष्ठ राहण्याचे मनोमन ठरवते. चतुराई, स्वच्छता व शृंगार दाम्पत्य जीवनातील महत्वाचा भाग सजवतात.


पाचवे पाऊल -
टाकताना पत्नी-पतीला तुमच्या सुख दुखात सामील होईन असे खात्री पूर्वक सांगते.


सहावे पाऊल -
टाकताना ती (पत्नी) म्हणते घर कामात लक्ष घालून मी ते काम आनंदाने करीन. सासू सासऱ्यांची सेवा याचाच अर्थ त्यांना मी सन्मानाने वागवीन. घरकाम हे स्त्रीला भर न वाटता त्यात आनंद वाटला पाहिजे. वडिलधाऱ्या माणसाना सन्मानाने वागवल्यामुळे घरात आनंदी वातावरणच राहते.


सातवे पाऊल -
टाकताना ती म्हणते, यज्ञकार्यात तुझ्या बरोबरच राहीन. यज्ञाचा अर्थ सहकार्य. चांगल्या कामाच्या वेळी जी पती बरोबर राहते तिला पत्नी म्हणतात. अर्थकारण तर पत्नीनेच सांभाळण्याची गरज असते आणि तेव्हा तर पत्नी अधिक प्रमाणात पतीबरोबरच असते. धर्माचरण हि महत्वाची गोष्ट आहे. तेव्हाही पत्नीने पतीबरोबर उभे राहून धर्माचे पालन करणे गरजेचे असते व सहधर्मचारिणी हे नाव सार्थ करणे योग्य असते.

गुरुजी, अग्नी, आई, बाप यांच्या साक्षीने वधू वराला स्वतः चे जीवन अर्पण करते. हे समर्पण शरीरापुरते मर्यादित न राहता मन, बुद्धी व अहंकाराच्या समर्पनापर्यंत पुढे गेले पाहिजे असे ऐक्यच संसारात संगीत निर्माण करू शकते. समग्र रुपात मी तुझी आहे असा भाव जर वधूच्या मनात निर्माण झाला नाही तर संसारात आनंद कधीच जाणवत नाही व तो विवाह हा उपहास बनतो.


ह्याचसाठी प्रत्येक  नव वधू वरांनी पूर्वी शास्त्रकारांनी सुखी संसारासाठी जी मुल्ये सांगितली आहेत ती आचरणात आणून आपले संसारी जीवन आनंदी करावे.


सौजन्य:- सौ. मंगला अभ्यंकर, पुढारी-कस्तुरी, ११०२२००५.

Thursday, May 05, 2011

फोन शिवाय फोन

इंटरनेटमुळे खरंच जग खूप जवळ आलं आहे. अगदी एखाद्या ‘ग्लोबल व्हिलेज’प्रमाणे नेटीझन्स सदैव एकमेकांच्या टचमध्ये असतात. एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी इंटरनेटवर असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. मग ते सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून असो किंवा ई-मेल किंवा यंगस्टर्सचं आवडतं चॅटिंग असो. इंटरनेटच्या जगात आता एकमेकांच्या टचमध्ये राहण्याचा एक नवीन पर्याय समोर आला आहे व तो म्हणजे आयपी फोन. VOIP (व्हॉईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल)चा वापर करून इंटरनेटवरून थेट एकमेकांशी फोनवर बोलता येऊ शकते किंवा अगदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगदेखील करता येऊ शकते. सध्या इंटरनेवर आयपी फोन व व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचे असंख्य पर्याय आपल्यासमोर आहेत.


* इंटरनेट फोन :

भविष्यात घरातील फोन हे इंटरनेट फोन असतील व हे फोन्स इंटरनेटवर चालतील. सध्या कॉर्पोरेट जगात इंटरनेट फोन (Ipphone) ची प्रचंड चलती आहे व बहुतांशी सर्वजण जुन्या टेलिफोन तंत्रज्ञानाऐवजी आयपी फोनला प्राधान्य देत आहेत. इंटरनेट फोन हे थेट इंटरनेटवर चालतात. म्हणजेच तुमच्या इंटरनेटची केबल थेट फोनमध्ये टाकली की तुम्ही इंटरनेट फोनवरून कोणालाही फोन करू शकता. सध्या बाजारात D-Link चा GVC ३००० व GLV-540 हे दोन इंटरनेट फोन्स उपलब्ध आहेत. उथ्न्न्-३००० या फोनमध्ये एक LCD व छोटा वेब कॅमदेखील देण्यात आला आहे. त्याचा वापर करून तुम्ही थेट फोनवरूनच व्हिडीओ कॉलदेखील करू शकता.

* (व्हॉईस ओव्हर इंटरनेटचे फायदे) :

* फोन कॉल किंवा व्हिडीओ कॉल इंटरनेटवरून केल्यामुळे कॉल चार्जेस लागत नाहीत फक्त तुमच्या इंटरनेट वापराचे पैसे मोजावे लागतात.

* ISD (इंटरनॅशनल) कॉलसाठी न्न्ध्घ्झ् तंत्रज्ञाचा खूपच फायदा होतो व अर्थात ISD कॉल खूप स्वस्तात करता येतात.

* मोबाईल किंवा दूरध्वनी नसला तरीदेखील थेट संगणकावर एकमेकांशी बोलता येते.

* फेसबुक, याहू मेसेंजरसारख्या नेटिझन्सच्या आवडत्या ऍप्लिकेशनमधून एकमेकांशी संभाषण करता येते.

* व्हिडीओ कॉलिंग हे VOIP चे सर्वात मोठे व युनिक वैशिष्ट्य आहे व त्यामुळे सातासमुद्रापार असलेल्या व्यक्तीदेखील अगदी आपल्यासमोर असल्याप्रमाणे संभाषण करता येते.

* व्होनेज मोबाईल ऍप्लिकेशन फॉर फेसबुक :

जर तुमच्याकडे आयफोन/आयपॅड किंवा कोणताही ऍड्रॉईड मोबाईल प्रणाली असणारा मोबाईल असेल व त्यावर इंटरनेटची सुविधा असेल तर तुम्ही तुमच्या फेसबूकमधील कोणत्याही मित्राला थेट मोबाईलवरून इंटरनेटद्वारे फोन करू शकता अगदी जर तुमचा मित्र परदेशात असेल तरीही व यासाठी तुमच्या इंटरनेटचा वापर केला जातो. म्हणजेच तुमचा मोबाईल ऑपरेटर तुमच्याकडून कॉल चार्जेसऐवजी इंटरनेट वापराचे चार्जेस घेईल जे कॉल चार्जेसपेक्षा बरेच स्वस्त आहेत.

* गुगल फोन

गुगलचा वापर करून आपण हिंदुस्थानातून थेट अमेरिका किंवा कॅनडामधील कोणत्याही क्रमांकावर फोन करू शकतो व त्यासाठी तुम्हाला गरज आहे ती फक्त इंटरनेटची. गुगलच्या उ ूत्व् चा वापर करून आपण ही सेवा वापरू शकतो.

* स्कायपी :

स्कायपी ही जगातील सर्वात मोठी इंटरनेट कम्युनिकेशन सेवा पुरवणारी कंपनी आहे. स्कायपीचा वापर करून तुम्ही कम्युनिकेशन व्यतिरिक्त अनेक युनिक सेवा वापरू शकता.

* स्कायपी आऊट : या सेवेचा वापर करून तुम्ही थेट कोणत्याही क्रमांकावर फोन करू शकता.

* स्कायपी इन : मोबाईलवरून थेट संगणकावर फोन करता येतो.

* व्हिडीओ कॉल : जर तुमच्या संगणकाला ‘वेब कॅम’ जोडला असेल तर थेट संगणकावरून तुम्ही व्हिडीओ कॉल करू शकता.

* कॉन्फरन्स कॉल : या सेवेचा वापर करून आपण २४ लोकांसोबत एकाच वेळेस थेट इंटरनेटवरून कॉन्फरन्स करू शकतो.

* फाईल शेअरिंग : आपला फोन कॉल चालू असताना किंवा व्हिडीओ कॉन्फरन्स चालू असताना थेट आपल्या संगणकावरून कोणत्याही मोबाईल किंवा संगणकावर आपल्याकडील एखादी फाईल शेअरिंग करता येते. त्याचबरोबर व्हॉईसमेल व इन्स्टंट मेसेजिंगसारखे अनोखे पर्यायदेखील स्कायपी आपणास देते. माहितीसाठी

Techno.savvy@live.com
सौजन्य:- इंद्रधनू, सामना.