Monday, September 26, 2016

डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड फसवणूक



आज पुन्हा एक प्रसंग बँक डेबिट कार्ड फसवणुकीचा ह्या वेळी बदलापूर मध्ये  वाट्सअँप मध्ये समोर आला. आणि मग मात्र माझ्या तळपायाची आग मस्तकाला पोहचली. आपण एवढा कष्टाने कमावलेला पैसा जेव्हा असा तिऱ्हाईत लुटून नेतो, तेव्हा मन किती अस्वस्थ होते हे एखाद्या शेयर मार्केट मधल्या इंट्राडे ट्रेडर ला विचारून बघा, मग कळेल कॅश लॉस काय असतो  ते.....
प्रसंग  :-

एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह एका हॉटेल मध्ये खानपानासाठी गेले होते. बिल पेयमेन्ट  करताना तिथे त्यांनी वेटर च्या सांगण्यावरून त्यांनी वेटरच्या हातात १. डेबिट कार्ड आणि एका कागदावर परत २. डेबिट कार्ड क्र. ३. डेबिट कार्ड पिन लिहून दिले. त्या दिवशी त्यांच्या व्यवहार पूर्ण झाला, ते घरी परतले.  आणि दोन दिवसांनी त्यांना शॉक बसला त्यांच्या खात्यातून रु ८१०००/- वजा झाले होते. पुढील ट्रांसकशन च्या नावे - 1. SBI Buddy, 2. Snapdeal, 3. ICICI Card, 4. Pay U Money, 5. Ola Cab, 6. Paytm Mobile. त्या गृहस्थांनी मग त्यांच्या परीने बरेच प्रयत्न केले. पोलिसात सायबर सेल मध्ये तक्रार ते हॉटेल च्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची विनंती पण प्रयत्न विफल ठरले. म्हणून त्यांनी आवाहन केले आहे गुन्हेगाराला पकडून देण्यासाठी त्यांच्याशी ९८९०४९७७९१ ह्या क्रमांकावर संपर्क साधावा.

विवरण :- वरील प्रसंगातून समोर आलेल्या काही बाबी व चुका पुढील प्रमाणे :-

१. डेबिट कार्ड जेव्हा आपल्या हातात येते तेव्हा ते एका बँक पत्रासोबत जोडलेले असते व त्यात ठळक अक्षरात लिहिलेले असते,, "आपला पिन क्र. कुणाशी शेयर करू नये. व ऑनलाईन किंवा इतर बाहेर कुठेही पेयमेन्ट करताना आपला पिन क्र. आपणच टाकावा व तो इतर कुणी पाहणार नाही याची काळजी घ्यावी". ह्या प्रसंगात पीडित व्यक्तीने आपला पिन क्र. शेयर केला, XX चूक.

२. ह्या प्रसंगात पीडित  व्यक्तीने स्वतः आपल्या हाताने डेबिट कार्ड दिलेले असताना सुद्धा पुन्हा कागदावर डेबिट कार्ड क्र. व पिन लिहून दिला. XX चूक.

३. पेयमेन्ट झाल्यावर पीडित व्यक्तीने आपला कागद परत मागितला नाही. आता एवढ्या मोठ्या हॉटेल मध्ये समजा तो कागद इतर कुणा गिर्हाईकाच्या हाती लागला असण्याची सुद्धा शक्यता आहे. म्हणजे हा निष्काळजीपणा.. XX चूक....  कुणाचाही ... पीडित व्यक्ती किंवा हॉटेल स्टाफ... 

४. बरं,, त्या पीडित व्यक्तीने हॉटेल मधून बाहेर पडल्यावर आपला पिन क्र. बदलणे गरजेचे होते. वरील प्रसंगातील हॉटेल च्या आजू बाजूस ५ ते ६ ATM आहेत. पण त्यांनी तसे केले नाही. XX चूक 

५. ती पीडित व्यक्ती हॉटेल काउंटर पर्यंत जाऊ शकली असती. कारण सर्व हॉटेल मध्ये बिल पेयमेन्ट हे कॉउंटर वरच असते. पण तो हि निष्काळजीपणा दाखवला.. XX चूक



 ६. वरील प्रसंगात एक वस्तुस्थिती अशी आहे की, लुबाडणार्याने ६ वेग वेगळ्या वेबसाईट वर पेयमेन्ट केलेली आहेत. म्हणजे असे आहे जर तुम्ही एखाद्या वेबसाईट वर वस्तू सिलेक्ट करून ती कार्ट (बॅगेत) ठेवली असेल व फक्त पेयमेन्ट करायचा असेल तर साधारण पाच मिनिटे वेळ लागतो. म्हणजेच जेव्हा पहिले पेयमेन्ट झाले व त्या पीडित व्यक्तीच्या मोबाइलला मेसेज आला तेव्हाच त्यांनी त्यांच्या बँक ग्राहक केंद्राशी फोन वरून संपर्क साधून कार्ड ब्लॉक करावयास हवे होते. पण नाही केले... XX चूक.
जर तसे झाले असते तर चोर पुढील २५ मिनिटे त्यांना लुबाडू शकला नसता.

७. कोणत्याही वेबसाईट वर डेबिट कार्ड द्वारे पेयमेन्ट करताना पुढील बाबींची आवश्यकता असते...
१. डेबिट कार्ड होल्डर चे नाव
२. डेबिट कार्ड क्रमांक
३. कार्ड मागील सीविवि क्रमांक
४. डेबिट कार्ड पिन.
वरील पैकी दोन बाबी तर पीडित व्यक्तीने स्वतःच उघड केल्या आहेत....XX चूक.


म्हणजे कायदेशीर दृष्ट्या हाताएवढे डेबिट कार्ड वापरण्याची पूर्ण जबाबदारी हि पूर्णपणे बँक ग्राहकाची असते. तो जर अश्या प्रकारे डेबिट कार्ड लुबाडणुकीला बळी पडला तर फक्त तक्रार करण्याशिवाय काही पर्याय नसतो. ह्याचे कारण पुढील तांत्रिक बाबी मध्ये पाहुयात.

तंत्रज्ञान :- अश्या डेबिट कार्ड लुबाडणुकीच्या केसेस मध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे अश्या प्रकारे लुबाडणूक करणारे चोर हे कधीही एखाद्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करत नाहीत. ते वेगवेगळ्या खरेदी वेबसाईट वरून वस्तू खरेदी करतात. जसे आता ह्या केस मध्ये SBI Buddy हे एक पॉकेट आहे ज्यात पैसे भरून मग बिल पेयमेन्ट, खरेदी करता वापरता येतात. स्नॅपडील हि ऑनलाइन खरेदी साठी उपयोगात येते. Pay U Money, Ola Cab, Paytm Mobile ह्या सर्व वेबसाईट पेयमेन्ट करता वापरता येतात. आणि त्यामुळे दिवसाला ह्या प्रत्येक किंवा इतर अनेक वेबसाईट वर इतके पेयमेन्ट होत असतात कि त्यातून वरील डेबिट कार्ड चे पेयमेन्ट कुठून, कधी झाले हे शोधणे अशक्य नाही पण खूप कठीण गोष्ट आहे. तसेच असे चोर एकाच संगणकावरून नाही तर वेगवेगळया संगणक किंवा वेग वेगळया मोबाईल वरून देखील पेयमेन्ट करतात. 
 सूचना :- 

१. सध्या ऑनलाईन पेयमेन्ट चे मार्केट एवढे गतिमान झाले आहे कि, तुमचे डेबिट / क्रेडिट कार्ड वापरून कुठून कुठे कधी किती पेयमेन्ट केले जाईल हे सांगता येणार नाही. 

२. इंटरनेट बँकिंग द्वारे पेयमेन्ट करताना OTP (वन टाइम पासवर्ड)  आपल्या मोबाइलला येतो तो फीड केल्याशिवाय पेयमेन्ट पूर्ण होत नाही. त्यामुळे ते सुरक्षित आहे.

३. आपले डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड कोणत्याही हॉटेल किंवा दुकानात स्वाईप करताना कृपया स्वाइपिंग मशीन आपल्या हातात घ्यावी व मगच पिन क्रमांक टाकून द्यावी. अश्या वेळी आजू बाजूला कुणी उभे नाही याची खात्री करावी.

४. सध्या बँक डिटेल्स घेण्याची नवी पद्धत सुरु झाली आहे. आपल्या मोबाइलला एक कॉल येतो व गोड आवाजात "तुमचे कार्ड वैधता संपली आहे व नवीन कार्ड पाठवण्यासाठी जुने कार्ड क्र. व पिन मागतात व आपण पटकन सर्व देऊन मोकळे होतो व मग आपले बँक खाते पण मोकळे होते. तेव्हा RBI व आपल्या बँकेच्या वारंवार सांगण्यानुसार आपले बँक कार्ड डिटेल्स  फोन वर देऊ नये.

५. सर्वात सोपा उपाय शक्य असल्यास दोन बँक खाती ठेवणे. एक खाते मेन ठेवणे व दुसरे खात्यात जेवढी रक्कम महिन्यात खर्च करावी लागते तेवढीच ट्रान्सफर करणे. व अश्या दुसऱ्या खातेच ऑनलाईन पेयमेन्ट किंवा कार्ड वापरासाठी वापरणे. म्हणजे अश्या दुसऱ्या खात्यात रक्कम कमी राहील व लुबाडणाऱ्यांची पंचाईत होईल.

===================
आपल्या बँकेची सुरक्षा आपल्या हाती
========================
छायाचित्रे डाउनलोड :- गूगल.कॉम 

No comments: