Saturday, September 24, 2016

बदलते शहर बदलापूर





महान्यूज        
बदलते शहर बदलापूर                                                                                 शुक्रवार, ०२ सप्टेंबर, २०१६
मुंबई पुणे रेल्वे मार्गावर सह्याद्रीच्या डोगररागांच्या कुशीत कोकणातील ठाणे जिल्ह्याच्या उत्तरेस वसलेलं गाव म्हणजे बदलापूर. मुंबईला जवळ असल्याने भरभराटीला आलेले गाव वजा शहर तसेच इतिहासाचा वारसा जपणारे आणि आधुनिक काळात उद्योग धंदे व चाकरमान्यांचे शहर म्हणून देखील हे गाव प्रसिद्ध झाले आहे. भौगोलिक दृष्टीने कोकणच्या उत्तरेला सरकलेले, दक्षिणेकडे पूर्व पश्चिम पर्वत रांगा, पूर्वेकडे खंडोबाचा डोंगर आणि बारमाही वाहणारी उल्हास नदीमुळे सदा हिरवेगार नटलेले हे शहर निसर्ग प्रेमी पर्यटकांना सतत भुलविणारे गाव ठरले आहे.

इतिहासाचा वारसा - छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी घोडे बदलण्याचे आणि विश्रांतीचे स्थान म्हणून ह्या गावाला बदलापूर गाव असे नाव पडले. बदलापूर हे महाराष्ट्र राज्यातील एक निसर्ग सौंदर्याने नटलेले शहर आहे. ठाणे जिल्ह्यातील या शहराला कुळगाव बदलापूर या नावाने सुद्धा ओळखले जाते. मुंबई शहराशी बदलापूर शहर मध्ये उपनगरीय रेल्वेसेवेने जोडलेले असून दक्षिणेस वांगणी तर उत्तरेस अंबरनाथ स्थानक आहे. मुळातले बदलापूर गाव हे बदलापूर रेल्वे स्थानकापासून जवळपास ५ किलोमीटर अंतरावर आहे. आज बदलापूर शहरात जुने बदलापूर गाव, कुळगाव, मांजर्ली, बेलवली, कात्रप आणि अनेक छोट्या गावांचा समावेश आहे.

बदलापूर कुळगाव भागाला ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व आहे, बदलापूर स्टेशन कुळगाव हद्दीत १८५८ मध्ये बांधले गेले. रा.सा.गोविंदराव सरदेसाई यांच्या रियासतीतील नोंदीनुसार १७७९ चे सुमारास कुळगाव आणि बदलापूर गावात इंग्रज व पेशवे यांच्यात अल्प मुदतीची लढाई झाल्याचे आढळते. दि. ११ डिसेंबर १७८० रोजी हार्टलने बदलापूरजवळ कुळगाव येथे मुक्काम केला होता. त्याचेवर मराठ्यांनी दि. १६ रोजी हल्ला केला. १७८१ साली गाईड नावाचा अधिकारी चालून आला तेव्हा हरिपंत सरदार व त्याची बदलापूर जवळ चकमक उडाली असे ऐतिहासिक माहिती अजूनही आपल्या संग्रहित आहे. त्याच संग्रहानुसार वासुदेव पटवर्धन व परशुराम भाऊ पटवर्धन यांची ता. ३ व ११ फेब्रुवारी १७८१ च्या पत्रात बदलापूरचा उल्लेख इंग्रजांबरोबर झालेल्या लढाईच्या वर्णनात आढळतो. म्हणजेच सुमारे १७७९ च्या सुमारास कुळगाव बदलापूर हद्दीत लढाई झाली व बदलापूर गाव २ दिवस इंग्रजांच्या ताब्यात होते असे आढळून येते.

राष्ट्रीय पुरस्कार

आधुनिक काळात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बदलापूर गावात भेट दिल्याचे व त्यांच्यात पुढाकाराने उल्हास नदीवर प्रथम पूल बांधल्याची नोंद आहे. सरकारने त्यांची आठवण ठेऊन या नदीच्या काठी त्याचे भव्य स्मारक उभारले आहे. असे हे बदलापूर शहर अपंग पुनर्वसन कामासाठी देखील देशात प्रसिद्ध पावले आहे. या कामासाठी कुळगाव बदलापूर नगर परिषदेला २००३ साली राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. तसेच बदलापूर येथे अपंग व्यक्तींसाठी अनेक संस्था कार्यरत असून ठाणे जिल्ह्यातील एकमेव अंध शाळा असलेल्या प्रगती विद्यालयाने देशभर लौकिक प्राप्त केला आहे.

बदलापूर परीसरातील ६५.१५ मीटर उंचीचे बारवी धरण हे बदलापूर स्थानकापासून सुमारे १६ किलोमीटर अंतरावर असलेले एक विशाल जलाशय स्रोत आहे. बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, मुरबाड येथील औद्योगिक वसाहतींना या धरणातून पाणीपुरवठा केला जातो. दरवर्षी बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २८०० ते ३००० मि.मी. पावसाची नोंद होते. बारवी, ब्यारेज आणि कोंडेश्वर येथील भोज धरणां व्यतिरिक्त बदलापूर स्थानकापासून सुमारे ८ किलोमीटर अंतरावर चिखलोली धरण आहे, या धरणांच्या परिसरातील निसर्गामुळे छोट्या सहलीसाठी जवळपासच्या शहरांतून पर्यटक येथे येतात. एकूणच नावाप्रमाणेच हे शहर बदलत असून येथील शिक्षण, वाचक व ग्रंथ प्रसार चळवळ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध सामाजिक उपक्रमामुळे हे शहर नावारूपाला आले आहे. वेगाने वाढते शहर पण अजूनही गावाचा चेहरा असलेले हे शहर सर्वांचे आवडणारे शहर आहे.

'महान्यूज' (www.mahanews.gov.in) मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.

सौजन्य :- वाट्सअँप फॉरवर्ड

No comments: