Sunday, September 04, 2016

रापणीची आगळी संस्कृती

‘रापण’ कोकण किनारपट्टीच्या सागरी संस्कृतीचा एक जिता जागता इतिहास. या ‘रापण’ संस्कृतीला कोकणच्या सामाजिक व सांस्कृतिक जडणघडणीत फार मोलाचे स्थान आहे. म्हणूनच या रापण संस्कृतीच्या पाऊलखुणा प्रत्येक कोकणी माणसाने जपून ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. कोकणात नारळी पौर्णिमेनंतर मासेमारीला आरंभ होतो. पण मासेमारीला खरी बरकत येते ती दिवाळीच्या दिवसांदरम्यान. आता रापणीची जागा लहानमोठय़ा पातींनी घेतली. आंब्याच्या होडीची जागा (ज्याला गाबीत लोक पगार म्हणत) जेव्हा फायबर बोटींनी घेतली त्याच वेळी रापण संस्कृती मावळण्याचे ढग कोकण किनारपट्टीवर जमू लागले. ब-याच किनारपट्टीवरील मोठाल्या रापणी कधीच बंद झाल्या. आता काही भागात आहेत त्या हात रापणी आणि छोटय़ा रापणी.
रापण कुटुंबाचा तारणहार
पूर्वी नव्वद पंच्याण्णव पाटय़ाच्या मोठाल्या रापणी असायच्या. एका रापणीशी पन्नास ते साठ रापणकर मच्छीमार बांधील असायचे. त्या साठ-सत्तर कुटुंबांतील दोनशे-अडीचशे माणसांची तारणहार ती रापणच असायची. एका माणसासोबत तीन-चार माणसे वावरायची. रापणीच्या माणसाची पेज, जेवण पोहोचविणे, वाटय़ाचे मासे विकणे, खारविणे आदी सर्व कामे घरातीलच माणसे करायची. आपली रापण कंपनीच आपले ‘जीवन तारणहार’ आहे, असे समजूनच सर्व जण वागत. रापण सुकवणे, वाळत घालणे, त्याला आगूळ देणे, तुटलेल्या रापणीचे पाटे शिवणे, जाळी होडीवर चढविणे, मासोळ्यांचा अंदाज घेणे आणि मासळीचा अंदाज ‘एलाम्बे हैले याल्लाऽऽऽ’ अशी हमावणी गात गात रापणीची होडी समुद्रात लोटणे हे सर्व पाहात राहावे असे वाटे. ते एका सुरात एका तालात हमावण्या म्हणणारे मच्छीमार सागराच्या सौंदर्यपासनेचे आणि मानवाच्या निर्भयतेचे वेगळेच दर्शन घडून आणत. सर्व मच्छीमारांचा वावर समुद्रालगतच्या त्यांच्या मांगरीतच असायचा. त्यामुळे समुद्रावर जिताजागता पहारा अष्टोप्रहर असायचा.
साधनांची नावेही आता दुर्मीळ
रापणीच्या मोठाल्या जाळ्याच्या निगराणीसाठी त्यांची वेगवेगळी साधने असत. त्यांची नावे आणि अस्तित्वही आता कोकण किनारपट्टीवरून अस्तंगत झाले आहे. दोन रापणीची कपी अडकविण्यासाठी ‘शिवाजी’ मासळी सुकत घालण्यासाठी उथळ अशी ‘शितरी’, कुटी सुकत घालण्यासाठी ‘भंगारी’ मासळी एकत्र करण्यासाठी ‘लाकडी खोरे’, समुद्रावरती रापणीचे दोर बनविण्यासाठी वापरण्यात येणारे ‘घुगरा’ माशांची वाहतूक करण्याकरिता ‘येंडकुल’ नामक जाळ्याचे फाळके , रापण ओढण्याकरिता लाकडी टांगूल आणि हरास, होडीतले पाणी बाहेर काढण्याकरिता वापरण्यात येणारे शेलना आणि मासळीच्या मोजमापाकरिता चिव्यांच्या काठय़ांच्या बेळाचा भलामोठा मण अशी विविध रापणीची साधने आता पाहायला मिळणे दुर्मीळ. रापणीच्या वैभवाचा काळ मला देवबाग, मालवण, आचरा या समुद्रकिना-यावर लुटता आला हे माझे भाग्य.
रापणीची अर्थव्यवस्था आणि श्रमविभागणी
रापण समुद्रातून ओढल्यावर तिचा लिलाव होई. लिलावाचा वाटा रापण संघाशी संबंधित असलेल्या प्रत्येक मच्छीमाराला तर मिळायचाच. तो तर त्याचा रोजगार होता. पण त्या व्यतिरिक्त पाच वाटे जादा काढले जायचे. त्यातील एक वाटा रापण संघाचा फंड म्हणून या वाटय़ाला जमा होणारी रक्कम वर्षभर एकत्र करून त्यातून निवृत्त होणा-या मच्छीमारांना निवृत्तीफंड देण्यात येत असे. दुसरे दोन वाटे ‘शिमगा’ आणि ‘दिवाळीचे’ काढले जायचे. त्या दोन वाटय़ाच्या वर्षभराच्या जमलेल्या रकमेतून शिमगा व दिवाळी या सणाच्या वेळी मच्छीमाराला बोनस किंवा पोस्त दिले जायचे. चौथा वाटा पावसाळी म्हणून काढला जायचा. पावसाळ्यात ज्या वेळी मच्छीमारी बंद असायची त्या वेळी वर्षभर जमलेल्या या रकमेतून त्यांना रोजगार (पगार) दिला जायचा आणि पाचवा वाटा उचल म्हणून काढला जायचा. त्या रकमेतून मच्छीमारांच्या अडचणीच्या प्रसंगी त्यांना तातडीची रक्कम उचल म्हणून अदा केली जायची. अशा प्रकारे लेबर अ‍ॅक्टचे कोणतेही शिक्षण न झालेल्या त्या जुन्या काळातील रापण संघांनी आपली ‘कामगार कल्याण योजना’ उत्कृ ष्ट राबविली होती. लग्नाच्या वेळी वरास भरपगारी रजा म्हणजे त्याचा मासळीचा वाटा त्याला पोच. घरात कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर कार्य पूर्ण होईपर्यंत भरपगारी रजा. लग्नाच्या वेळी सर्व रापण संघांनी आपल्या संघात असलेल्या नव-या मुलाच्या अगर नव-या मुलीच्या (रापण संघ सदस्याची मुलगी) मंडपापासून ते जेवणापर्यंतची सर्व व्यवस्था करणे ही कामगिरी बांधिलकीच्या नात्याने रापण संघ करायचा. म्हणून रापण कंपनी प्रत्येकाला आपली वाटायची. त्यामुळेच कोकण किनारपट्टीचे ऐक्य अबाधित राहिलेले होते. रापण संघातला कोणी आजारी पडला, तर सर्व खर्च रापण संघच करीत असे.
रापण संघात तंटाबखेडा अजिबात नव्हता. पूर्वीच्या रापणीचे नियोजन सांगताना आचरे येथील दक्षिणवाडा रापण संघाचे सत्तर वर्षाचे सुरेंद्र टिकम यांनी एक आगळीवेगळीच माहिती दिली. ते म्हणाले, ‘रापण संघात हेवेदावे नसायचे. किनारपट्टीचा भाग ज्या ठिकाणी कमी असेल आणि रापण संघाची संख्या जास्त असेल तेथे पालाव पद्धतीने रापणी मारण्यात यायच्या. म्हणजे रापणीच्या वेळा ठरवून दिलेल्या असायच्या. त्याचे कोणी उल्लंघन करत नसे. ज्या ठिकाणी कमी रापण संघ असायचे त्या ठिकाणी ‘जेची आग तेचो सोडो’ या पद्धतीने रापणी घालण्यात यायच्या. जेची आग याचा अर्थ मासळी शोधण्यासाठी प्रत्येक रापण संघाचा एक तज्ज्ञ जाणकार असायचा. तो समुद्रातून सुंभाचा ढलपा जाळून विशिष्ट खाणाखुणा करायचा. त्या खाणाखुणावरुन कोणती मासळी आहे हे समुद्रकिना-यावरच्या रापण संघाला समजायचे. ज्या रापण संघाच्या जाणकाराने अगोदर आग दाखविली असेल, त्या रापण संघांची रापण सोडली जायची.
असे होते सागरी नियम
समुद्रकिनारी काही अपरिहार्य कारणासाठी मासेमारी बंद करायची असेल तर त्याला दुराई टाकणे असे म्हणत. काही जाणकार मच्छीमार समुद्राच्या किनारपट्टीवरील हिरवीगार मर्यादावेल होडीच्या नाळी टाकत. ती सूचना सर्व जण आदेश मानून आपापल्या होड्यांमध्येसुद्धा मर्यादावेल टाकत. यालाच दुराई टाकणे असे म्हणत. जोपर्यंत दुराई उठत नाही तोपर्यंत त्या किनारपट्टीवरील कोणीही मच्छीमार मच्छीमारीसाठी जात नसत. रापण टाकणारा ही वर्दी ऐकून जर कोणी सभासद रापण ओढायला आला नाही तर शिक्षा म्हणून त्याच्या वाटय़ात कपातही व्हायची. त्या वर्दीला ‘पानसुपारी’ म्हणत. वर्दी म्हणजे रापण कोणत्या वेळी घालणार याची वेळ जाहीर करणे. त्यावेळी रापण संघात गुप्तता पाळली जायची.
रापण संघाचा सांस्कृतिक वारसा
प्रत्येक रापण संघात दरवर्षी सत्यनारायणाची पूजा असायची. एखाद् वेळी जास्त मासळी मिळाली, तर समुद्रकिना-यावर ते जत्राही भरवत. दशावतारी खेळ घडवून आणीत. स्वत:ची बँडपथके, कलापथके स्थापन करत. पूर्वी काही ठिकाणी फावल्या वेळीचे श्रम करून काही रापण संघांनी आपल्या रापण संघाच्या नारळीच्या बागाही उभ्या केलेल्या होत्या. ज्या वेळी धंदा बंद असेल त्या वेळी ते कल्पवृक्ष त्यांच्या मदतीला धावून जात असत. मात्र, त्यांची बांधिलकी, त्यांचा विश्वास त्यांच्या ग्रामदैवतेवर व कुलदैवतेवर असायचा. त्याच्या हुकुमाशिवाय त्यांचे पाते हलत नसे आणि टांगूल चालत नसे. ज्योतिषावरती त्यांचा गाढा विश्वास असायचा.
रापण म्हणजे काय रे भाऊ ?
पूर्वी कोकण किनारपट्टीवरती सर्व रापण संघांनी आपल्या अलिखित नियमांनी ही रापण संस्कृती जतन करून ठेवली होती. या रापण संस्कृतीमुळे जसे मस्त्यबीजांचे संरक्षण होत असे तसे मच्छीमारही सुरक्षित राहत असत. आज काळ बदलला आणि पाच वर्षानी ‘रापण म्हणजे काय रे भाऊ’ असे विचारण्याची पाळी मच्छीमारांच्या मुलांवर तर येणार नाही ना! अशी भीती वाटू लागली आहे.
आज पात संस्कृतीत जखडलेल्या कोकणच्या सर्व श्रमिक मच्छीमारांनी या रापण संस्कृतीचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. रापण संस्कृतीची जी चिरंतन मूल्ये आहेत त्यांचे संवर्धन करून ती जिवंत ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. त्याला कष्टाच्या ऐनाचा आगूळ लावून तो अभेद्य केला पाहिजे. असे सुदैवाने जर झाले तर सागरावर येणा-या अनेक संकटांना आमचे मच्छीमार..
एलाम्बे. हैले याल्लाऽऽऽ करून कधीच पळवून लावतील.

सौजन्य :- वॉट्सअँप फॉरवर्ड - मनीष पराडकर

No comments: