Sunday, December 28, 2014

न्यूरोमॉड्युलेशन मेडिकेअर


जिभेचा उपयोग केवळ चवीसाठी नसून मेंदूच्या आजाराने ग्रस्त रुग्णाचा जीव वाचविण्यासाठीही होऊ शकतो हे सिध्द झाले आहे... मानवी शरीरातील मेंदू हा सर्वाधिक संवेदनशील अवयव आहे. एखादा छोटा अपघातही मेंदूला गंभीर दुखापत करू शकतो. अशावेळी त्या रुग्णाचा जीव तरी धोक्यात असतो अथवा त्याला कायमचे अपंगत्व येऊ शकते. पण आता असे धोके टाळता येणार आहेत. संशोधकांनी केलेल्या एका प्रयोगात जीभ आणि मेंदू यांचा परस्परांशी संबंध असून जिभेच्या रक्तवाहिन्या थेट नर्व्हस सिस्टमशी जुळलेल्या असल्याने. न्युरोमॉड्युलेशन हे तंत्र वापरले. त्यामुळे मेंदूतील नक्की दोष ओळखून त्यावर योग्यवेळी योग्य उपचार करणे सोपे झाले आहे.

सौजन्य :- फुलोरा सामना २८१२१४ 

Sunday, December 21, 2014

सोशल नेटवर्किंगमधील गुन्हे

आजकालच्या संगणक युगात विविध ई-फ्रॉइस व्यतिरिक्त सर्वाधिक जास्त गुन्हे हे सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून घडतात. आजच्या संगणक युगात संगणक क्रांतीमुळे अनेकजण संगणकाचा अमर्यादित वापर करतात. संगणक व इंटरनेट युगामुळे अनेक व्यक्ती एकमेकांच्या सहज संपर्कात राहू शकतात व त्यातून विविध प्रकारे माहितीची देवाणघेवाण होते.
संगणक व इंटरनेटमध्ये सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या प्रकारात सोशल नेटवर्किंग हा एक महत्त्वाचा प्रकार आहे. सोशल नेटवर्किंग म्हणजे एखाद्या विशिष्ट संकेतस्थळाचा (वेबसाईट) अथवा ऑनलाइन चॅटिंगचा (गप्पागोष्टींचे ठिकाण) वापर करून अनेक लोक एकमेकांच्या संपर्कात राहणे व एकमेकांच्या माहितीची देवाणघेवाण करणे. गेल्या एका दशकात अशा अनेक वेबसाईट व चॅटिंग रूम तयार व लोकप्रिय झाल्या आहेत. त्याचा वापर करून आपण आपले फोटो, आवडीनिवडी व इतर अनेक गोष्टी एकमेकांना पाठवू शकतो. यातील लोकप्रिय प्रकार म्हणजे याहु मेसेंजर, ऑर्कुट, फेसबुक, लिकेंडीनसारखी संकेतस्थळे ज्याचा सर्रास वापर करून अनेक व्यक्ती एकमेकांशी संपर्क ठेवतात. त्याव्यतिरिक्त सोशल नेटवर्किंगचा वापर करून अनेक ई-पोर्टलस विविध प्रकारे लोकांना नवनवीन सेवा प्रदान करतात. उदा. विवाहविषयक नोंदणी तसेच नोकरीच्या शोधाकरिता वापरण्यात येणारी अनेक संकेतस्थळे.
अनेक लोक या सर्व संकेतस्थळांचा वापर करतात व त्याचा लाभ घेतात. परंतु गेल्या काही वर्षांत ‘सोशल नेटवर्किंग’च्या माध्यमातून अनेक लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली आहे व दिवसेंदिवस ही संख्या वेगाने वाढत आहे. ऑर्कुट/फेसबुक अगदी विवाहविषयक संकेतस्थळांचा वापर करून अनेक गुन्हेगार दररोज नवनवीन पद्धतीने लोकांना फसवतात. वर्षभरापूर्वी ‘ऑर्कुट’ या संकेतस्थळाचा वापर करून मुंबईतील एका श्रीमंत माणसाच्या मुलाचा खंडणीसाठी झालेला खून तसेच एका विवाहविषयक संकेतस्थळाचा वापर करून अनेक महिलांशी लग्न करून त्यांची आर्थिक लुबाडणूक असे एक ना अनेक गुन्हे सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून घडलेले आहेत. सोशल नेटवर्किंगमध्ये लोक आपली महत्त्वाची माहिती त्या संकेतस्थळावर ठेवतात व त्यानंतर त्या संकेतस्थळावर भेट देणारे इतर लोक त्या माहितीच्या आधारे त्या व्यक्तीशी संपर्क करतात. बहुतांशी वेळेस अनेक लोक आपली सर्व खरी माहिती अगदी आपल्या फोटोसहित या संकेतस्थळावर ठेवतात. त्यामुळे सराईत गुन्हेगार या माहितीचा गैरवापर करून अनेक फसवणुकीचे गुन्हे करतात. ‘ऑर्कुट’ या संकेतस्थळावर बदनामीकारक मजकूर छापून एकमेकांची बदनामी करणारे अनेक गुन्हे आज दाखल आहेत. विशेषत: महिलांच्या बदनामीचे. याहू मेसेंजरवरील चॅटिंगचा वापर करून अनेक गुन्हेगार विविध प्रकारचे ई-फ्रॉडस (हॅकिंगचे) गुन्हे तर करतातच. त्याचबरोबर ते समोरील व्यक्तीचे आर्थिक नुकसानदेखील करतात. गेल्या वर्षी काही अतिरेक्यांनी एका विवाहविषयक संकेतस्थळाचा वापर करून अनेक बनावट ‘पॅनकार्ड’ तसेच इतर फोटो आयडेंटी कार्डस् बनवून त्याचा कसा गैरवापर केला हे आपणास माहीतच आहे.
amitghodekar@hotmail.com
- अमित घोडेकर

सौजन्य  :- फुलोरा सामना २११२१४

इंटरनेटवरुन मोजमाप टेक्नोपॉइंट

जर तुम्हाला संगणकापासून अगदी फ्रीजपर्यंत काहीही घ्यायचं आहे आणि त्यातलं सगळ्यात चांगला काय असा प्रश्‍न पडला असेल तर compareindia.in.com:: हे तुमच्यासाठी एक सर्वोत्तम संकेतस्थळ आहे. तुम्हाला जर चंगला एक टनाचा ण् घ्यायचा असेल तर तुम्हाला फक्त ‘‘एक टनचा AC’’ एवढंच सर्च करायचं आहे मग हे संकेतस्थळ तुम्हाला एक टनचा AC मध्ये असणारे सर्व AC आणि त्यांची किमत दाखवेल, त्यानंतर तुम्हाला ज्या ज्या कंपनीच्या AC ची माहिती हवी असेल त्या त्याAC ला तुम्ही एकमेकांसोबत compare करू शकता. एकदा का तुम्ही हे केलं की तुम्हाला त्या सर्व ACचं एकमेकांसोबत केलेलं मोजमाप कळू शकेल. त्याचबरोबर त्याची तांत्रिक माहिती आणि किंमत व कोणत्या ठिकाणी हा AC तुम्हाला स्वस्तात मिळू शकेल याची देखील माहिती कळू शकेल..
http://www.mysmartprice.com/::
हे संकेतस्थळदेखील तुम्हाला म्दस्जग्ह्ग् प्रमाणेच सर्व वैशिष्ट्य देते याची एक खास गोष्ट म्हणजे हे संकेतस्थळ इतर अनेक ई-शॉपिंगची सोय असणार्‍या संकेतस्थळाबरोबर जोडले आहे. त्यामुळे एकदा का वस्तू ठरवली की तुम्ही दुसर्‍या संकेतस्थळावरून ती विकत देखील घेऊ शकता.
http://www.naaptol.com: 
यावर देखील तुम्ही कोणत्याही गोष्टीचं मोजमाप करू शकता त्याचबरोबर त्याची तांत्रिक माहिती आणि किंमत व कोणत्या ठिकाणी ही वस्तू तुम्हाला स्वस्तात मिळू शकेल याची देखील माहिती काढू शकता. यामध्ये बेस्ट डील किंवा हॉटडीलचा वापर करून तुम्ही स्वस्तात एखादी गोष्ट विकत घेऊ शकता. एखादी गोष्ट इथून विकत घेतली की तुम्हाला पुढील खरेदीसाठी काही रिवार्ड गुण दिले जातात व त्याचा वापर करून तुम्ही पुढच्या खरेदीमध्ये सवलत मिळवू शकता.
http://www.mouthshut.com:
हे संकेतस्थळदेखील अतिशय लोकप्रिय आहे याची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या संकेतस्थळावर तुम्ही फक्त वस्तूचे नाव टाकायचं. ज्यांनी कुणी ती वस्तू घेतली असेल त्याचे त्या वस्तू संदर्भातील अभिप्राय त्यांचे रेटिंग्ज देखील कळतील 
Dheeraj.bedarkar@gmail.com - धीरज बेदरकर

सौजन्य :- फुलोरा, सामना २११२१४

आयुर्वेद मातृसुख

हनुमंतापासून ते झाशीच्या राणीपर्यंत अशी विभूती आपल्या पोटी जन्माला यावी ही प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. पण हनुमंताला जन्माला घालणार्‍या अंजनी मातेची तपसाधना, इच्छाशक्ती याचा कोणच विचार करीत नाही. आता तर काय, गर्भाशयच विकत मिळतात. मग माता आणि मातृसुख यांचा विचार करणं सोडलंय सगळ्यांनी. आजकाल फक्त एकच पैसा पैसा आणि पैसाच.
एखाद्याचे आयुष्य किती खडतर असते हे दामणे यांच्या केसमधून जाणवलं. दोन वेळा गर्भाशयात गर्भ राहिलाच नाही. त्यांच्या सांगण्यावरून एक कारण पुढे आले ते म्हणजे ‘भीती.’ त्यांच्या आईला तीन मुली आणि सासरकडून मुलगा व्हावा म्हणून इच्छा या द्विधा भीतीमध्ये सापडलेली ती माऊली. त्या भीतीपोटी गर्भधारणा होऊनही गर्भ टिकत नव्हता. त्यांना बघताक्षणी ‘चिंतानाम् च अतिचिंतनात...’ या श्‍लोकाची प्रचीती येत होती. त्यांना गांभीर्य सांगितले. त्यांनी घरच्यांना समजावून सांगावे म्हणून विनंती केली. त्याप्रमाणे घरच्या मंडळींना समजावून सांगितले की, घरात येणारा जीव मुलगा आहे की मुलगी आहे, यावर बोलण्यापेक्षा त्याला गर्भाशयात असताना आणि नंतरदेखील सकारात्मक दृष्टी द्या. त्यांना ते पटलं. दामणे यांना मासिक पाळीदरम्यान पाळावयाचे नियम सांगितले. त्यासोबत गर्भस्राव करण्याची गर्भाशयाची सवय मोडण्यासाठी गर्भाशय शोधन करून मनाचे आणि शरीराचे बृहण केले. सात महिन्यांत त्यांना गर्भधारणा झाली. त्यांनी सोबत नऊ महिने गर्भसंस्कार घेतल्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी झाली. मुला-मुलीच्या रूपात शिवाजी जन्माला यायला वेळ लागत नाही. त्याला गरज लागते ती फक्त सकारात्मक विचारांची.
गर्भस्राव (Abortion miscarrage) होण्याची कारणे- मासिक पाळीदरम्यान परिचर्या न पाळणे.
- जगाचा मनस्ताप डोक्यावर घेऊन फिरणे.
- शरीराला व मनाला नकारात्मक बनविणे.
- समाजात वावरताना स्त्रीत्व विसरल्याने ममत्व कमी होणे.
- चुकीचे खानपान आणि सवयी.
प्रश्‍न तुमचे...
आहारात तूप का असावे? - भक्ती सावंत (भांडुप)
- तूप खाल्यावर रूप दिसते अशी म्हण आहे. तूप हे मंथनातून तयार होणारा पदार्थ आहे. तुपाचा दिवा हा तेजापेक्षा संथ आणि जास्त काळ टिकतो. तूप हे आपल्या शरीराची व्यवस्था मग त्या पाचनापासून ते एकाग्रतेपर्यंत या सर्वांना छान चालवते. त्यामुळे तुपाच्या दिव्याप्रमाणे आयुष्य जास्त काळ टिकवते. अगदी स्वस्थ. खाताना फक्त अपचन होणार नाही याची काळजी घ्या.
आमच्या घरी न्यूडल मैदा बेसन इतर स्नॅक वारंवार बनवले जातात. माझी पुतणी साडेचार वर्षांची आहे. तिला नाश्त्यात काय द्यावे? - शशांक ठाकूर (दहिसर)
- सर्वप्रथम खाण्यासाठी त्यांच्या मागे लागू नका आणि भूक लागेल तेव्हा त्यांच्या भुकेच्या मर्यादेत खाण्यास द्या. त्यांना नाश्त्याऐवजी मिठ न घातलेली भाताची पेज, तूपसाखर पोळी, चवनप्राश, शतावरी कल्प, भाताची खिमटी, गरमागरम थालीपीठ यांची सवय लावा. म्हणजे पचनशक्ती सुधारेल, हाडे बळकट होतील, मांसपेशी मजबूत होतील आणि तुम्हाला दवाखान्याच्या पायर्‍या झिजवाव्या लागणार नाहीत.
ayurveddeepak@hotmail.com
- डॉ. दीपक केसरकर
सौजन्य:- फुलोरा, सामना २११२१४

मस्त मौला सोल मेट

हा लॅपटॉप म्हणजे एक आक्रितच आहे. बंद असताना अंदाज येत नाही, पण परवलीचा शब्द उच्चारायचा अवकाश अलिबाबाची गुहाच उघडते जणू. कधी जुन्या अल्बममधे प्रवेश केल्यासारखं वाटतं, तर कधी वाचनालयात. कधी डिपार्टमेंटल स्टोअर, तर कधी सिनेमा हॉल, तर कधी जगाकडे उघडणारी मोठीच्या मोठी फ्रेंच विंडो.
मित्रांचा अड्डा भरवतो, गप्पांची मैफल सजवतो, माझा मूड ओळखून कधी ‘मुन्नी बदनाम’, तर कधी ‘गुलों में रंग भरे’ ऐकवतो . अर्ध्या अपुर्‍या कविता, पूर्णत्वास न गेलेल्या लेखांचे चिटोरे, स्कॅन करून ठेवलेली पुस्तकं, काही हवीहवीशी वाटणारी आणि काही अजिबात नकोशी ई मेलरूपी पत्रं सगळं सगळं जपून ठेवतो. घरकामाला मदत म्हणून कुणी घरात यावा आणि आपलं प्रतिबिंब होऊन जावा असा सोलमेट, आत्माराम!
एखाद्या काजळ संध्याकाळी गुहेत नेऊन खुष्कीच्या मार्गाने बरोबर गावी घेऊन जातो, अख्खं बालपण फिरवून आणतो आणि कुणालाही कळायच्या आत वास्तवात आणून सोडतो, कुठेही अडखळू न देता. धुळीने माखलेले पाय अन चेहर्‍यावर वडिलांना भेटून आल्याचं समाधान. पायाकडे कोण बघतंय! लोक वरवरच्या समाधानात खुश, मी लोकात खुश. हा गडी मात्र काम करत राहतो फक्त. कुठल्याही स्तुतीचं वा निंदेचं एनर्जी ड्रिंक पिताना दिसत नाही, पण सतत चार्ज्ड असतो, अलर्ट असतो. स्टॅण्ड बाय मोडमधेही अर्धा जागा असलेल्या रखवालदारासारखा. कधी कधी वाटतं भगवतगीता कोळून प्यायलाय आत्माराम.
चांगलं वाईट सगळं उघडया डोळ्यांनी बघतो, विरक्त हातांनी वेगळं करतो, वाईट गोष्टी रिसायकल करतो, पण बहुतेक काही गोष्टी कायमच्या रजिस्टरमधून काढणं त्यालाही अवघड जात असावं. कारण परवलीचा शब्द विसरून मी जेव्हा केव्हा एखादा क्षण त्याच्यासमोर थबकून उभा राहतो तेव्हा आपोआप आरसा होऊन जातो त्याचा. मग रिसायकल न झालेल्या मोहांचे, चुकांचे, गुन्ह्यांचे काही चरे दिसत राहतात, ज्याला आपल्या जगात सुरकुत्या म्हणतात. वय माझं वाढत चाललंय आणि दिसतंय त्याच्या चेहेर्‍यावर असं नशीब घेऊन आलो आहोत मी आणि माझा लॅपटॉप. आता कधी ना कधी हा आरसा तडकेल तेव्हा मी गरीब दिसेन हातात खजिना असून आणि पाठमोरा आत्माराम दूर जाताना दिसेल परवलीचा शब्द कायमचा स्वत:सोबत घेऊन.

vaibhav.writer@gmail.com वैभव जोशी
सौजन्य  :- फुलोरा, सामना २११२१४