Thursday, December 15, 2011

कॉर्पोरेट मंत्र - बुट्टी म्हणा

प्रत्येकात एक लहान पोर जगत असते. त्या पोराला फक्त प्रेम, आनंद, खेळ, विश्‍वास, राग आल्यावर केलेली कट्टी आणि दुसर्‍या क्षणात घेतलेली बट्टी कळते. कट्टीनंतर बट्टी घेण्यास छोटी मुलं वेळ नाही घालवत. कारण त्यांच्या खेळांचा वेळ वाया न जावा म्हणून ते राग-रुसवे सोडायला तयार होतात, पण आपण मोठे झालो असे समजून आपण त्या आपल्यातल्या पोराला सतत चापट मारून गप्प बसवत असतो. हल्ली मित्र आठवत नाहीत, लोकांचे फोन नंबर आठवत नाहीत, कामं लक्षात राहात नाहीत. सण, वार, तिथीही लक्षात राहात नाही. पण राग, अपमान, रुसवे मात्र जिभेच्या टोकावर रचून ठेवलेले असतात. एका लग्नात दोन मित्रांचा आमना सामना होतो. काही वर्षांपूर्वीचा मतभेद अगदी काल झाल्यासारखाच त्यांना लक्षात असतो. एकमेकांच्या नजरेला नजर मिळू नये अशी प्रार्थना दोघेही मनात पुटपुटत असतात. अजिबात त्याच्या बायकोकडे पाहायचेही नाही, असे आपापल्या बायकोला दोघांनी धमकावले असते. बाजूबाजूला बसूनही दोन कुटुंबे परक्यासारखे इथे तिथे पाहत असतात. दोघांची पोरं मात्र एक कोपरा पकडून आपला खेळ सुरू करतात. ही दोघं अस्वस्थ होऊन पोरांचा खेळ पाहत असतात. ‘या वेड्याच्या पोराशी का खेळतोय माझा मुलगा!’ असे हावभाव दोघांच्याही चेहर्‍यावर ठळक दिसत होते. खेळ पाहता पाहता दृश्य बदलले. पोरांचे अचानक भांडण सुरू झाले. दोघांचा बाप मनात म्हणाला, ‘‘बापावर गेलाय पोरगा, भांडखोर!’’ काहीच क्षणात परत एक बदल. त्या छोट्यांनी गळ्यात गळे घातले. दोन जुन्या मित्रांना आपल्या पोरांना पाहून त्यांचे मैत्रीचे दिवस आठवले. एका बापाने आपल्या पोराला जवळ बोलावून विचारले, ‘‘काय रे, लगेच भांडण मिटले कसे?’’ तर तो चिमुरडा म्हणाला, ‘‘बाबा, आपण इथे थोड्या वेळासाठीच आहोत ना. आपण निघाल्यावर हा मला परत कधी भेटणार? मग आम्ही परत कधी खेळणार? आता आहे तो वेळ का घालवू खेळायचा. खेळायला किती मजा येते. कट्टी होणारच, खेळ आहे; पण बट्टी नाही झाली तर खेळ कसला!’’ दोन्ही बाप एकमेकांकडे पाहू लागले. त्यांनी कडकडून मिठी मारून म्हटले, ‘‘बट्टी.’’


ही बट्टी फार महत्त्वाची. आयुष्य फार छोटे असते, अनिश्‍चित असते. ते घालवू नये. कट्टी केल्यावर बट्टी लगेच झालीच पाहिजे. आज जेवढ्यांशी कट्टी असेल त्यांना बट्टी म्हणा. कट्टी करणे सोडू नका, पण वेळ न घालवता बट्टी म्हणायला विसरू नका. नक्की ‘‘बट्टी म्हणा.’’

- स्वप्ना पाटकर
सौजन्य:- सामना, १०१२२०११

No comments: