Sunday, December 04, 2011

कॉर्पोरेट मंत्र - ‘‘हा सूर्य आणि हा जयद्रथ’’

‘देव अक्कल वाटत होता तेव्हा चाळणी घेऊन गेलेलास का,’ हे अनेकदा तुमच्या ऐकण्यात आले असेल. पण मुळात पंगत बसवून देवाने अक्कल वाटली असेल असे मला वाटत नाही. देवाचे प्रेम समान सर्वांसाठीच. कुणाला चाळणीत आणि कुणाला पातेल्यात असे काही झाले नसावे. सर्व आपल्या परीने, आपल्या मर्यादा टिकवून वागत असतात. खरं तर प्रत्येक जण शूर आणि हुशार असतो व त्याच्या जीवनात येणार्‍या प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी सक्षम असतो. पण कधी कधी पाय लटपटतात, गोंधळल्यासारखे वाटते. अशा क्षणीही आपण निर्णय ठामपणेच घेत असतो. फक्त आपला निर्णय बरोबर असल्याचा शिक्का आपल्याला कुणाकडून तरी हवा असतो. प्रत्येक जण जीवनात बर्‍याचदा अर्जुन होतो. कसे ते सांगते. अभिमन्यूच्या मृत्यूची खबर येताच अर्जुन पुत्रशोकाने व्याकूळ झाला व संतापला. जयद्रथाच्या घृणास्पद कृत्याचा त्याला प्रचंड राग आला होता. त्याने प्रतिज्ञा केली ‘उद्या सूर्यास्तापूर्वी जयद्रथाचा वध करीन नाहीतर स्वत: अग्नीभक्षण करीन’. कौरवांनी जयद्रथाला वाचवण्यासाठी त्याच्या भोवती महान योद्ध्यांचे कवच उभारले. दुपार टळली. अर्जुन जयद्रथाला शोधूच शकला नाही. अर्जुनाचा त्रास श्रीकृष्णाला पाहावेना. त्याने आपले सुदर्शनचक्र सिद्ध करून त्याच्या सहाय्याने सूर्यालाच झाकून टाकले. सर्वांना वाटले सूर्य मावळला. अर्जुनाने अग्नीभक्षणाची तयारी केली. लाकडे जमवली, चिता पेटवली. कौरव अर्जुनाची फजिती पहाण्यास जमले. जयद्रथही येऊन उभा राहिला. अर्जुन चितेत उडी टाकणार तेवढ्यात श्रीकृष्णाने आपले सुदर्शनचक्र काढून घेतले. सर्वत्र सूर्याचा प्रकाश पसरला. सगळे भांबावून गेले. इतक्यात कृष्ण अर्जुनाला म्हणाला, ‘‘अर्जुना पाहतोस काय? लाव बाण धनुष्याला. हा बघ सूर्य आणि हा बघ जयद्रथ.’’ कृष्णाचे ते शब्द आसमंतात घुमले. अर्जुनाने क्षणाचाही विलंब न लावता आपल्या बाणांनी जयद्रथाचा शिरच्छेद केला. आयुष्यात निर्णय घेण्यास घाबरू नका. प्रत्येक अर्जुनाला सूर्य दाखवण्यासाठी एक कृष्ण जन्माला येतो. तो कृष्ण कोण ते ओळखा. एकदा निर्णय घेतला की जे होईल त्याचा हसत स्वीकार करा. जयद्रथासारखा घृणास्पद व कठीण संकटांचा खात्मा करण्यासाठी तुमचा कृष्ण तुमची साथ देईल. तुम्हाला कुणाच्या आयुष्यात कृष्ण होण्याची संधी मिळाली तर तीही सोडू नका. अर्जुनासारखे वाटले तर कृष्ण शोधा आणि एखादा अर्जुन सापडला तर कृष्ण व्हा. ‘‘सूर्य पहा, सूर्य दाखवा.’’


‘‘जय श्रीकृष्ण’’
- स्वप्ना पाटकर
सौजन्य:- ०३१२२०११ फुलोरा, सामना

No comments: