Saturday, December 17, 2011

वरळीपासून सांताक्रुझपर्यंत धो धो पाणी

मरोळ ते रूपारेल कॉलेज जलबोगद्याची उद्धव ठाकरे यांनी केली पाहणी


मरोशी ते रूपारेल कॉलेजदरम्यानच्या भूमिगत जलबोगद्याचे ७७ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे पाणीगळती, पाणीचोरी आणि अनधिकृत नळजोडणीला आळा बसणार असून वरळी, महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, परळ, दादर, चिंचपोकळी, माटुंगा, धारावी, माहीम, खार, सांताक्रुझ आणि वांद्रे परिसरात धो धो पाणीपुरवठा होणार आहे.

मरोशी ते रूपारेल कॉलेजदरम्यान भूमिगत जलबोगद्याचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहे. हा १२ किलोमीटरचा जलबोगदा असून त्याचे १० किलोमीटरपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. केवळ दोन किलोमीटरचेच काम बाकी असून सप्टेंबर २०१३ ला हा जलबोगदा तयार होणार आहे. शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज माहीम येथे जाऊन या जलबोगद्याच्या माहीम ते रूपारेल कॉलेज यापुढील टप्प्याच्या भूमिगत जलबोगद्याची पाहणी केली. जलबोगद्यात ६० फूट खोल जाऊन उद्धव ठाकरे यांनी या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच जलबोगद्याची निर्मिती करणार्‍या अभियंत्यांकडून कामाची माहिती घेतली. यावेळी महापौर श्रद्धा जाधव, शिवसेना सचिव विनायक राऊत, पालिका सभागृहनेते सुनील प्रभू, स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे आणि विभागप्रमुख मिलिंद वैद्य उपस्थित होते.

कामांचा पाठपुरावा करावा लागतो

पालिका प्रशासनाने केलेल्या कामाचे श्रेय शिवसेना घेत असल्याचा आरोप विरोधक करीत असल्याचा प्रश्‍न प्रसारमाध्यमांनी उद्धव ठाकरे यांना विचारला. त्यावर खड्डे पडले तर आम्ही आणि उड्डाणपूल झाले तर तुम्ही अशी मार्मिक प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. कोणतेही काम असेच होत नाही. त्याचा पाठपुरावा करावा लागतो. ते काम करून घ्यावे लागते. उगाच काम होत नाही. पाठपुराव्याविना कामे झाली असती तर नालेसफाईची पाहणी करावी लागली नसती, असा टोलाही त्यांनी लगावला.

‘शताब्दी’तील बाह्यरुग्ण कक्षाचे आज उद्घाटन

शिवसेना-भाजप युतीच्या प्रयत्नाने साकारलेल्या कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयातील बाह्यरुग्ण कक्षाचे शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. उद्या शनिवार १७ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता शताब्दी रुग्णालय, एस. व्ही. रोड, कांदिवली (प.) येथे हा कार्यक्रम होत आहे.

वैशिष्ट्ये

- जलबोगद्याचे अंतर १२ किलोमीटर.

- किंमत ४१५ कोटी १० लाख ६२५रुपये.

- कामाचा कालावधी ५६ महिने.

- कामाची सुरुवात १५ सप्टेंबर २००७.

- ३६०० मि.मी. व्यासाचा बोगदा. लांबी १२,२८५ मी.

- जलबोगद्यामुळे पाणीगळती, चोरी आणि अनधिकृत जलजोडणीला लगाम.

- वरळीपासून सांताक्रुझपर्यंत पाण्याचा दाब वाढणार.

- बॉम्ब टाकला तरी जलबोगद्याला धोका नाही.

सौजन्य:- सामना १७१२२०११.

No comments: