Saturday, December 24, 2011

हायफाय टेक्नॉलॉजी

इलेक्ट्रॉनिक वस्तूंना वायरलेस जोडणारी सिस्टीम म्हणजे वायफाय. रेडिओ वेव्हज्वरून वायफाय ऑपरेट करता येते. यामुळे हाय स्पीड इंटरनेट सर्विसेस वापरता येत असून आजकालच्या नवीन रेंजच्या फोनमध्ये याचा जास्त वापर केला जातो. वाय फाय सिस्टिम १९९७ मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक इंजिनीअरिंंग (IEEE)द्वारा विकसित करण्यात आला.


वाय फाय सिस्टीम घेणे हल्ली अतिशय कमी खर्चाचे झाले आहे. यामुळे मॅक डी, कॉफी शॉप्स किंवा अनेक हॉटेल्समध्ये नेटवर्क उपलब्ध होते. ८०२.११ स्टॅण्डर्ड या फ्रिक्वेन्सीमध्ये वायफाय चालविले जाते. हे वापरण्याची योग्य रीत लक्षात घेतली तर याचे फायदेच असल्याचे लक्षात येईल. हे एक सेफ्टी टेक्नॉलॉजी असून हे वापरताना आपला डेटा हॅक होण्याची चिंता नसते.

- वायरलेस कनेक्शन सिस्टीम वायफायमध्ये असल्यामुळे माहिती घेणे आणि पाठविणे अगदी सोपे झाले आहे.

- वायफाय वायरलेस असल्याने केव्हाही कुठेही इंटरनेट नेटवर्क उपलब्ध होऊ शकतं. यामुळे नेटवरून कामे करताना कोणतीही अडचण येत नाही.

- वायफाय चालविण्यासाठी 2.4 GHZ& 802.11B स्टॅण्डर्ड या फ्रिक्वेन्सीची आवश्यकता असते. आधुनिक तंत्रज्ञानानुसार रेडिओ वेव्हज् टेक्नॉलॉजी समोर आल्याने याचाही वापर होतो.

- पर्सनल कंम्प्युटर, व्हिडीओ गेम कन्सोल, स्मार्टफोन, आयफोन, डिजीटल ऑडीओ प्लेअर यांना वायरलेस इंटरनेटने जोडता येते. त्यामुळे कुठेही जाताना ट्रान्सफॉर्मरची गरज भासत नाही.

- वाय फाय ही डिवाइस टु डिवाइस कनेक्टिव्हिटी असूनPAN (personal area network) LAN (local area network) WAN (wide area network) या नेटवर्कमध्ये थेट कनेक्ट होते.

- वाय फायमध्ये वायरलेस राऊटर वापरला जातो. त्यामुळे त्या नेटवर्क क्षेत्रातले नेटवर्क स्थिर राहते.

- 802.11B, 802.11G या रेंजमधले राऊटर जास्त वापरले जातात.

- या राऊटरची रेंज ३२ मी (१२० फूट) इनडोअर आणि ९५ मी (३०० फुट) आऊटडोअर इतकी आहे.

- सध्या त्रिकोणा या वाय फाय कंपनीची वाय फाय सिस्टीम सर्वात जास्त वापरली जाते.

- एका वाय फाय नेटवर्क अंतर्गत हजारो कंप्यूटर, लॅपटॉप किंवा मोबाईल कार्यरत असले तरीही यामुळे आपल्या मोबाईलमधला डेटा हॅक होण्याची शक्यता नसते.

- ब्लूटुथप्रमाणे कार्यरत असणार्‍या वाय फाय टेक्नॉलॉजीमध्ये कोणतेही डिवाइस कनेक्ट होताना त्याची रिक्वेस्ट पाठविली जाते. ती एक्सेप्ट केल्यावरच दुसरे डिवाईस कनेक्ट होते. म्हणून वाय फाय वापरताना कोणतीही भीती बाळगण्याची गरज नाही.

- राजन सावंत.
सौजन्य:- फुलोरा, सामना १७१२२०११

Saturday, December 17, 2011

पैसा पैसा

पैसा पैसा पैसा वेडी झाली माणसं


पैसा पैसा पैसा वेडी झाली माणसं


पैसा पैसा पैसा जीव झाला स्वस्त

पैसा पैसा पैसा नात्यांना नसतो अर्थ


पैसा पैसा पैसा विसरले सगळे उपकार

पैसा पैसा पैसा हि माणसच आहेत बेकार


पैसा पैसा पैसा भांडणाला नसतो तोटा

पैसा पैसा पैसा जो - तो मोजतो फक्त नोटा


पैसा पैसा पैसा नाती गेले विसरून

पैसा पैसा पैसा अग्रीमेंट टाका पुसून


पैसा पैसा पैसा नको आम्हाला पैसा

प्रेम - जिव्हाळा - नाती मनी भाव आमच्या ऐसा

- पूजा पाठारे
सौजन्य:- http://marathikavita.co.in

वरळीपासून सांताक्रुझपर्यंत धो धो पाणी

मरोळ ते रूपारेल कॉलेज जलबोगद्याची उद्धव ठाकरे यांनी केली पाहणी


मरोशी ते रूपारेल कॉलेजदरम्यानच्या भूमिगत जलबोगद्याचे ७७ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे पाणीगळती, पाणीचोरी आणि अनधिकृत नळजोडणीला आळा बसणार असून वरळी, महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, परळ, दादर, चिंचपोकळी, माटुंगा, धारावी, माहीम, खार, सांताक्रुझ आणि वांद्रे परिसरात धो धो पाणीपुरवठा होणार आहे.

मरोशी ते रूपारेल कॉलेजदरम्यान भूमिगत जलबोगद्याचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहे. हा १२ किलोमीटरचा जलबोगदा असून त्याचे १० किलोमीटरपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. केवळ दोन किलोमीटरचेच काम बाकी असून सप्टेंबर २०१३ ला हा जलबोगदा तयार होणार आहे. शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज माहीम येथे जाऊन या जलबोगद्याच्या माहीम ते रूपारेल कॉलेज यापुढील टप्प्याच्या भूमिगत जलबोगद्याची पाहणी केली. जलबोगद्यात ६० फूट खोल जाऊन उद्धव ठाकरे यांनी या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच जलबोगद्याची निर्मिती करणार्‍या अभियंत्यांकडून कामाची माहिती घेतली. यावेळी महापौर श्रद्धा जाधव, शिवसेना सचिव विनायक राऊत, पालिका सभागृहनेते सुनील प्रभू, स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे आणि विभागप्रमुख मिलिंद वैद्य उपस्थित होते.

कामांचा पाठपुरावा करावा लागतो

पालिका प्रशासनाने केलेल्या कामाचे श्रेय शिवसेना घेत असल्याचा आरोप विरोधक करीत असल्याचा प्रश्‍न प्रसारमाध्यमांनी उद्धव ठाकरे यांना विचारला. त्यावर खड्डे पडले तर आम्ही आणि उड्डाणपूल झाले तर तुम्ही अशी मार्मिक प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. कोणतेही काम असेच होत नाही. त्याचा पाठपुरावा करावा लागतो. ते काम करून घ्यावे लागते. उगाच काम होत नाही. पाठपुराव्याविना कामे झाली असती तर नालेसफाईची पाहणी करावी लागली नसती, असा टोलाही त्यांनी लगावला.

‘शताब्दी’तील बाह्यरुग्ण कक्षाचे आज उद्घाटन

शिवसेना-भाजप युतीच्या प्रयत्नाने साकारलेल्या कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयातील बाह्यरुग्ण कक्षाचे शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. उद्या शनिवार १७ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता शताब्दी रुग्णालय, एस. व्ही. रोड, कांदिवली (प.) येथे हा कार्यक्रम होत आहे.

वैशिष्ट्ये

- जलबोगद्याचे अंतर १२ किलोमीटर.

- किंमत ४१५ कोटी १० लाख ६२५रुपये.

- कामाचा कालावधी ५६ महिने.

- कामाची सुरुवात १५ सप्टेंबर २००७.

- ३६०० मि.मी. व्यासाचा बोगदा. लांबी १२,२८५ मी.

- जलबोगद्यामुळे पाणीगळती, चोरी आणि अनधिकृत जलजोडणीला लगाम.

- वरळीपासून सांताक्रुझपर्यंत पाण्याचा दाब वाढणार.

- बॉम्ब टाकला तरी जलबोगद्याला धोका नाही.

सौजन्य:- सामना १७१२२०११.

Thursday, December 15, 2011

कॉर्पोरेट मंत्र - बुट्टी म्हणा

प्रत्येकात एक लहान पोर जगत असते. त्या पोराला फक्त प्रेम, आनंद, खेळ, विश्‍वास, राग आल्यावर केलेली कट्टी आणि दुसर्‍या क्षणात घेतलेली बट्टी कळते. कट्टीनंतर बट्टी घेण्यास छोटी मुलं वेळ नाही घालवत. कारण त्यांच्या खेळांचा वेळ वाया न जावा म्हणून ते राग-रुसवे सोडायला तयार होतात, पण आपण मोठे झालो असे समजून आपण त्या आपल्यातल्या पोराला सतत चापट मारून गप्प बसवत असतो. हल्ली मित्र आठवत नाहीत, लोकांचे फोन नंबर आठवत नाहीत, कामं लक्षात राहात नाहीत. सण, वार, तिथीही लक्षात राहात नाही. पण राग, अपमान, रुसवे मात्र जिभेच्या टोकावर रचून ठेवलेले असतात. एका लग्नात दोन मित्रांचा आमना सामना होतो. काही वर्षांपूर्वीचा मतभेद अगदी काल झाल्यासारखाच त्यांना लक्षात असतो. एकमेकांच्या नजरेला नजर मिळू नये अशी प्रार्थना दोघेही मनात पुटपुटत असतात. अजिबात त्याच्या बायकोकडे पाहायचेही नाही, असे आपापल्या बायकोला दोघांनी धमकावले असते. बाजूबाजूला बसूनही दोन कुटुंबे परक्यासारखे इथे तिथे पाहत असतात. दोघांची पोरं मात्र एक कोपरा पकडून आपला खेळ सुरू करतात. ही दोघं अस्वस्थ होऊन पोरांचा खेळ पाहत असतात. ‘या वेड्याच्या पोराशी का खेळतोय माझा मुलगा!’ असे हावभाव दोघांच्याही चेहर्‍यावर ठळक दिसत होते. खेळ पाहता पाहता दृश्य बदलले. पोरांचे अचानक भांडण सुरू झाले. दोघांचा बाप मनात म्हणाला, ‘‘बापावर गेलाय पोरगा, भांडखोर!’’ काहीच क्षणात परत एक बदल. त्या छोट्यांनी गळ्यात गळे घातले. दोन जुन्या मित्रांना आपल्या पोरांना पाहून त्यांचे मैत्रीचे दिवस आठवले. एका बापाने आपल्या पोराला जवळ बोलावून विचारले, ‘‘काय रे, लगेच भांडण मिटले कसे?’’ तर तो चिमुरडा म्हणाला, ‘‘बाबा, आपण इथे थोड्या वेळासाठीच आहोत ना. आपण निघाल्यावर हा मला परत कधी भेटणार? मग आम्ही परत कधी खेळणार? आता आहे तो वेळ का घालवू खेळायचा. खेळायला किती मजा येते. कट्टी होणारच, खेळ आहे; पण बट्टी नाही झाली तर खेळ कसला!’’ दोन्ही बाप एकमेकांकडे पाहू लागले. त्यांनी कडकडून मिठी मारून म्हटले, ‘‘बट्टी.’’


ही बट्टी फार महत्त्वाची. आयुष्य फार छोटे असते, अनिश्‍चित असते. ते घालवू नये. कट्टी केल्यावर बट्टी लगेच झालीच पाहिजे. आज जेवढ्यांशी कट्टी असेल त्यांना बट्टी म्हणा. कट्टी करणे सोडू नका, पण वेळ न घालवता बट्टी म्हणायला विसरू नका. नक्की ‘‘बट्टी म्हणा.’’

- स्वप्ना पाटकर
सौजन्य:- सामना, १०१२२०११

अस्सल कोकणी मेजवानी

महाराष्ट्राला सुमारे ७२० कि.मी. लांबीचा सागरकिनारा लाभला आहे. हिरवीगर्द झाडी, लाल माती, गरजणारा दर्या आणि रुपेरी वाळू यांचं लेणं लेवून ही किनारपट्टी आपल्याला साद घालते आहे. या भूमीशी भगवान परशुरामांचं नातं जोडलं आहे. ऐतिहासिक गड-किल्ल्यांची सफर करत अस्सल कोकणी स्वादामध्ये आणि मोकळ्या मनाच्या कोकणी सौंदर्यामध्ये तुम्ही नक्कीच हरवून जाल.कोकणातील सुग्रास जेवण मनात दडून बसलेल्या खवय्यांना जागे करा आणि अस्सल कोकणी लज्जतदार, चटकदार, चमचमीत मेजवानी घ्या.


प्रदूषणमुक्त शांत समुद्रकिनारी कौलारू घरात नारळ, सुपारीच्या बागेत प्रेमळ अगत्य ही येथे खवय्यांसाठी तर खासीयत आहे. कांदापोहे, रव्याचे लाडू, उपमा, गोड शिरा, करंजी, कोकणी खाजा, शंकरपाळी, बटाटावडा, तरी मारलेली मिसळ, अळूवडी, थालीपीठ, कोथिंबीरवडी, नारळीपाक, पुरीभाजी, उकडीचे मोदक, पोहे चिवडा, शेवचिवडा, बेसनवड्या, राजगिरा लाडू इ. सकाळच्या न्याहरीमध्येही इथं मांसाहारी टच दिसून येतो. अंडापोळी, भाकरी, तळलेली सुकट व भाकरी, नाचणीची भाकरी असा न्याहरीचा बेत इथं असतो. वरणभात, घावणे, तिळाचा (तिळकूट) लावलेली गवारीची भाजी, तिळकूट लावलेल्या शेवग्याच्या शेंगा, वांगेभरीत, माठाची भाजी, वालाच्या दाण्याची भाजी, मटकीची उसळ, चवळीची उसळ, पुरणपोळी, आमरस, दही, ताक असा शाकाहारी आहार असतो.

पर्यटक पाहुण्यांसाठी खास मांसाहारी कोकणी पाहुणचार केला जातो. यात कोंबडी (सागुती) वडे, आंबोळी, तांदळाची भाकरी, सुके मटण, कोलंबी फ्राय, तळलेली सुरमईची तुकडी, कडक तळलेले बोंबील, तळलेले पापलेट, हलवा फ्राय, सुकी कोलंबी, कोलंबी रस्सा, तिसर्‍या रस्सा, चिंबोरी, खेकड्याचा रस्सा, झिंगा फ्राय, मटणाचा झणझणीत रस्सा, सोलकढी, मांदेली फ्राय, बांगडा फ्राय, बांगडा रस्सा, तळलेले कालव्याचे गर, शिवल्या भरीत अशी आकर्षक मेजवानी असते. नारळ, रोठा सुपारी, खारा तांदूळ, पोहे, वाल, चवळी, फणस, आंबे, करवंद, कोकम सरबत, आवळा सरबत, आंबा पोळी, फणसपोळी, पोहेपापड, नाचणी पापड, बटाटापापड, पोहे, मिरगुंडा मिरचीचे लोणचे तसेच आंब्याचे लोणचे, सांडगे, मिरची, आवळा कॅण्डी, मँगोपल्प, कोकम आगळ, आमसूल, आंबावडी, मोरावळा, काळीमिरी, दालचिनी, जाम, सुकी मासळी कोकणमेव्याची रससंपदा आपल्या आनंदात भर घालते.

- मंगेश निंबरे

पर्यटनासाठी कोकणात जायचे म्हटले की, सर्वांच्या चेहर्‍यावर एक वेगळा आनंद फुलून येतो. शांत, सुंदर समुद्रकिनारे, नारळी पोफळीच्या बागा, गडकिल्ले, शिल्पकलेचा अप्रतिम ठेवा असलेली मंदिरे, पुरातन वास्तू, स्मारके आदी अनेक गोष्टी कोकणात पाहण्यासारख्या आहेत. कोकणात येणारे पर्यटक येथील सह्याद्रीचे कडे, सुंदर निसर्ग संपदा याच्या सान्निध्यात चार दिवस भटकंती करण्यासाठी खास करून येत असतात. याचबरोबर कोकणातून परत जाताना इथला खास कोकणी मेवा विकत घेऊन जातात.


संगमेश्वरची मोहनपुरी

ज्याप्रमाणे सिंधुदुर्गात मालवणी खाजाचे नाव आहे त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वरची मोहनपुरी प्रसिध्द आहे. मालवणी खाजा आणि संगमेश्वरच्या मोहनपुरीत बराच फरक आहे. मैदा, खाद्यरंग, शुद्ध शेंगदाणा तेल आणि साखरेच्या पाकापासून बनविली जाणारी ही मोहनपुरी पीठ मळण्यापासून ते साचेबद्ध पध्दतीत तयार करताना ती हातानेच तयार केली जाते हे विशेष. एकदा का साखरेच्या पाकातून ही मोहनपुरी बाहेर काढली की तिला पाहिल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटणारच.

रत्नागिरीच्या चिंगळांची न्यारी लज्जत

रत्नागिरीच्या समुद्रात मुबलक प्रमाणात मिळणारी चिंगळ ही केवळ मुंबईच्या मासळी बाजारापुरती मर्यादित राहिली नसून ती थेट परदेशातही निर्यात केली जातात. त्यामुळे रत्नागिरीत येणारे पर्यटक येथील चिंगळांची चव घेतल्याशिवाय पुढील प्रवासाला फिरत नाहीत. ही मासळी तयार करण्याची पध्दत वेगवेगळी असून यासाठी वापरण्यात येणारा खास कोकणी गरम मसाला यामुळे याला येणारा आगळा स्वाद सर्वांच्या जिभेवर कायम तरळत राहतो.

सिंधुदुर्गातील मालवणी खाजा व सोलकढी

सिंधुदुर्गात गेल्यावर येथील मालवणी खाजाची चव चाखली नाही तर सिंधुदुर्गाची सफर झाली असे वाटत नाही. गूळ, चण्याचे पीठ, आले असे पदार्थ वापरून तयार होणारा हा मालवणी खाजा केवळ कोकणात नव्हे तर संपूर्ण राज्यांत प्रसिध्द पावला आहे. याचबरोबर सिंधुदुर्गात ठिकठिकाणी मिळणारे गुळाच्या चिकीत बनवलेले शेंगदाण्याचे लाडूही सर्वांचे आवडते खाद्य बनले आहे. या पदार्थांप्रमाणेच सिंधुदुर्गात मिळणारी झणझणीत सोलकढी हेसुध्दा येथील खाद्यपदार्थांचे मोठे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. जेवण शाकाहारी असो वा मांसाहारी जेवणानंतर मात्र सोलकढी हवीच असे येथील समीकरण आहे. सिंधुदुर्गातील मालवणी मसाला हा या सर्व शाकाहारी आणि मासांहारी पदार्थांमध्ये आगळी लज्जत आणतो.

पुळ्यातील उकडीचे मोदक

गणपती आणि मोदकाचा अनोखा नातेसंबंध आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथे हा मोदकांचा बेत वर्षभर ठरलेलाच असतो. सुंदर समुद्रकिनारा आणि स्वयंभू देवस्थान यामुळे देशाविदेशातील पर्यटक कोकणात आल्यावर गणपतीपुळे येथे जातात. गणपतीला नैवेद्यासाठी नियमित मोदकांचा बेत असतो. गणपतीपुळे परिसरात मिळणारे उकडीचे मोदक हे केवळ हिंदुस्थानीच नाही तर परदेशी पर्यटकांचाही आवडता खाद्यपदार्थ म्हणून नावारूपास आला आहे.

संगमेश्वरचे खोबरे मोदक

मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरच संगमेश्वरमध्ये गेल्या काही वर्षांत ताज्या नारळाच्या खोबर्‍यापासून बनविल्ेले मोदक प्रसिद्ध झाले आहेत. नारळाच्या खोबर्‍यापासून बनविलेल्या या मोदकातही आंबा, सीताफळ, स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट अशा वेगवेगळ्या चवी असून यामध्ये आंबा मोदकालाच मोठी मागणी आहे. गुहागरच्या समुद्रकिनार्‍यावरील नारळाची चवही आगळीवेगळी असल्याने या मोदकांना खरी लज्जत चढते.
- जे. डी. पराडकर
सौजन्य:- फुलोरा, सामना १०१२२०११

Wednesday, December 14, 2011

एक थोर अनुभव

किल्ले पुरंदर


- किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्ग (डोंगरी किल्ला), उंची : १५०० मीटर/४६०० फूट


- भौगोलिक स्थान : तालुका पुरंदर, जिल्हा पुणे

- गडावर जायचे मार्ग : पायथ्याच्या नारायणपूर या गावातून दोन मार्गांनी पुरंदर. माचीवर जाता येते. एक वाट आहे डोंगरभटक्यांसाठी व दुसरी सर्वसामान्य जनतेसाठी जी पूर्वी लष्करी वाहनांसाठी बनवली होती

- गडावर पाहावयाची स्थळे : १) बिनी दरवाजा, २) पुरंदरेश्‍वर मंदिर, ३) रामेश्‍वर मंदिर, ४) कंदकडा, ५) केदारेश्‍वर मंदिर, ६) माची, ७) भैरवखिंड, ८) वज्रगड, ९) वीररत्न मुरारबाजी पुतळा, १०) पद्मावती तळे, ११) शेंदरी बुरुज, १२) राजगादी, १३) पेशव्यांचा वाडा, १४) गडावरची सुमारे ५० पाण्याची टाकी.

किल्ले रायगड

- किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्ग (डोंगरी किल्ला), उंची : ८५५ मीटर/२८५१ फूट

- भौगोलिक स्थान : तालुका महाड, जिल्हा रायगड

उत्तर अक्षांश : १८० १४ मिनिट पूर्व रेखांश : ७३० २० मिनिट

- गडावर जायचे मार्ग : १) मुंबई - गोवा महामार्गावरील महाड या गावापासून पायथ्याची रायगडवाडी सुमारे २६ कि.मी. आहे. चित् दरवाज्यापासून सुमारे १५०० पायर्‍या चढून गडावर जाता येते.

२) रायगडवाडीपासून नाना दरवाजातून जाणार्‍या शिवकालीन वाटेने गडावर जाता येते.

३) हिरकणीवाडीतील रोपवेने केवळ ४ मिनिटांतही गडावर जाता येते.

- रायगडाची प्राचीन नावे : रायरी, राजगिरी, तणस, रासिवटा, जंबुद्वीप, नंदादीप.

- गडावरचे पाहावयाची स्थळे : १) खुबलढा बुरुज, २) नाना दरवाजा, ३) महादरवाजा, ४) गंगासागर, ५) स्तंभ/मनोरे, ६) बालेकिल्ला, ७) बाजारपेठ, ८) होळीचा माळ - शिवपुतळा, ९) टकमक टोक, १०) दारूकोठारे, ११) जगदीश्‍वर मंदिर, १२) शिवसमाधी, १३) भवानी टोक, १४) बाराटाकी, १५) वाघदरवाजा, १६) हिरकणी बुरूज, १७) शिरकाई मंदिर.

विजयी विजयदुर्ग

- किल्ल्याचा प्रकार : मिश्रदुर्ग (जलदुर्ग व भुईकोट यांचा सुंदर मिलाप)

- भौगोलिक स्थान : तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग

- गडावर जायचे मार्ग : डांबरी सडकेने हा किल्ला सहजसाध्य आहे.

जलमार्गानेही किल्ल्यावर जाता येते.

- गडावर पाहावयाची स्थळे : १) तीन प्रवेशद्वारे २) तळघर ३) चिरेबंदी जलाशय ४) अनोखे बुरूज व तिहेरी तटबंदी ५) साहेबाचे ओटे ६) जाखिणीची तोफ ७) दारूकोठार.

किल्ले प्रतापगड


- किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्ग (डोंगरी किल्ला),

उंची : १०८० मीटर/३५४३ फूट

- भौगोलिक स्थान : तालुका जावळी, जिल्हा सातारा

- गडावर जायचे मार्ग : पोलादपूर - महाबळेश्‍वर रस्त्यावरील वाडा या पायथ्याच्या गावातून डांबरी सडकेने थेट गडापर्यंत पोहोचता येते. (४ कि.मी.)

- गडावर पाहावयाची स्थळे : १) महादरवाजा, २) भवानी मंदिर, ३) टेहळणी बुरूज, ४) हनुमान मंदिर, ५) केदारेश्‍वर मंदिर, ६) सदर, ७) शिवपुतळा,

८) राजपहार्‍याची दिंडी व त्यावरील घोरपडीचे शिल्प, ९) यशवंत बुरूज, १०) चिलखती बांधणीची तटबंदी

किल्ले राजगड

- किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्ग (डोंगरी किल्ला), उंची : १३९४ मीटर/४६०० फूट

- भौगोलिक स्थान : तालुका वेल्हा, जिल्हा पुणे

- गडावर जायचे मार्ग : १) पायथ्याच्या वाजेघर गावातून, बाबुदाच्या झापापासून डोंगरधारेने चोरदरवाजा व मग पद्मावती माचीवर, २) पाली खुर्द गावातून पायर्‍यांच्या वाटेने पालीदरवाजातून पद्मावती माची, ३) पायथ्याच्या गुंजवणे गावातून अवघड वाटेने गुंजवणे दरवाजातून गडावर, ४) भुतोंडे गावातून अळुदरवाज्याने संजीवनी माची. शिवधर घळीतूनही गोप्याघाटाने अळू दरवाजातून गडावर येण्याचा मार्ग आहे, ५) तोरणा-राजगड डोंगरधारेने खडतर वाट चालून संजीवनी माचीवर येता येते.

गडावर पाहावयाची स्थळे : १) पद्मावती माची, २) पद्मावती मंदिर, ३) पद्मावती तळे, ४) रामेश्‍वर मंदिर, ५) राजवाडा, ६) सदर, ७) अंबरखाना, ८) गुंजवणे, पाली दरवाजा, ९) बालेकिल्ला, १०) सुवेळा माची, ११) संजीवनी माची, १२) काळेश्‍वरी बुरूज व परिसर, १३) अळू दरवाजा इत्यादी.

किल्ले शिवनेरी


- किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्ग (डोंगरी किल्ला)

- उंची : ११०० मीटर/ ३५०० फूट

- भौगोलिक स्थान : तालुका जुन्नर, जिल्हा पुणे

- गडावर जाण्याचे मार्ग : पायथ्याच्या जुन्नर गावातून गडावर जायला दोन मार्ग आहेत.

१. सात दरवाज्यांच्या मालिकेतून पायर्‍यांच्या वाटेने, मार्गातील सात दरवाजे : महादरवाजा, पीर दरवाजा, परवानगीचा दरवाजा, हत्ती दरवाजा, शिपाई दरवाजा, फाटक दरवाजा आणि कुलाबकार दरवाजा.

२. शिवनेरीच्या दक्षिण कड्यात कोरलेल्या गुहा व लेण्यांना कवेत घेऊन वर चढणारी साखळीची अवघड वाट.

किल्ले सिंधुदुर्ग

- किल्ल्याचा प्रकार : जलदुर्ग (पाण्यातला किल्ला)

- भौगोलिक स्थान : तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग.

- गडावर जायचा मार्ग : मालवण हे गाव मुंबई - गोवा हमरस्त्यापासून अगदी जवळ आहे. मालवणमधून छोट्या नावांमधून किल्ल्यावर जाण्याची सोय आहे.

- गडावर पाहावयाची स्थळे : १) महादरवाजा २) दोन फांद्यांचे नारळाचे झाड ३) शिवराजेश्‍वर मंदिर ४) शिवरायांची हस्तपद चिन्हे ५) दूधबाव, दहीबाव व साखरबाव ६) राणीचा वेळा ७) दर्याबुरूज.

- गडावर पाहावयाची काही प्रमुख स्थळं : १. सात दरवाजे, २. शिवजन्मस्थान आणि शिवाई मंदिर, ३. शिवकुंज, ४. गंगा जमुना टाके, ५. अंबरखाना, ६. कोळी चौथरा, ७. बदामी तळ, ८. कडेलोट टोक. अष्टविनायकातील लेण्याद्री, नाणेघाट, जीवधन-हडसर-चावड-निमगिरी आदी गिरिदुर्ग, कुकडी नदीचा उगम आणि पूर गावचे कुकडेश्‍वराचे प्राचीन व कलासंपन्न शिवमंदिर, शिवनेरीच्या पोटातील आणि भीमाशंकर, तुळजा, अंब-अंबिका गटात मोडणारी असंख्य कोरीव लेणी, वडज-पिंपळगाव-येडगाव-माणिकडोह आणि डिंभे धरणाचे जलाशय, खादेड येथील जगप्रसिद्ध रेडिओ दुर्बिण.

- पराग लिमये

सौजन्य:- फुलोरा, सामना १०१२२०११

Sunday, December 04, 2011

कॉर्पोरेट मंत्र - ‘‘हा सूर्य आणि हा जयद्रथ’’

‘देव अक्कल वाटत होता तेव्हा चाळणी घेऊन गेलेलास का,’ हे अनेकदा तुमच्या ऐकण्यात आले असेल. पण मुळात पंगत बसवून देवाने अक्कल वाटली असेल असे मला वाटत नाही. देवाचे प्रेम समान सर्वांसाठीच. कुणाला चाळणीत आणि कुणाला पातेल्यात असे काही झाले नसावे. सर्व आपल्या परीने, आपल्या मर्यादा टिकवून वागत असतात. खरं तर प्रत्येक जण शूर आणि हुशार असतो व त्याच्या जीवनात येणार्‍या प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी सक्षम असतो. पण कधी कधी पाय लटपटतात, गोंधळल्यासारखे वाटते. अशा क्षणीही आपण निर्णय ठामपणेच घेत असतो. फक्त आपला निर्णय बरोबर असल्याचा शिक्का आपल्याला कुणाकडून तरी हवा असतो. प्रत्येक जण जीवनात बर्‍याचदा अर्जुन होतो. कसे ते सांगते. अभिमन्यूच्या मृत्यूची खबर येताच अर्जुन पुत्रशोकाने व्याकूळ झाला व संतापला. जयद्रथाच्या घृणास्पद कृत्याचा त्याला प्रचंड राग आला होता. त्याने प्रतिज्ञा केली ‘उद्या सूर्यास्तापूर्वी जयद्रथाचा वध करीन नाहीतर स्वत: अग्नीभक्षण करीन’. कौरवांनी जयद्रथाला वाचवण्यासाठी त्याच्या भोवती महान योद्ध्यांचे कवच उभारले. दुपार टळली. अर्जुन जयद्रथाला शोधूच शकला नाही. अर्जुनाचा त्रास श्रीकृष्णाला पाहावेना. त्याने आपले सुदर्शनचक्र सिद्ध करून त्याच्या सहाय्याने सूर्यालाच झाकून टाकले. सर्वांना वाटले सूर्य मावळला. अर्जुनाने अग्नीभक्षणाची तयारी केली. लाकडे जमवली, चिता पेटवली. कौरव अर्जुनाची फजिती पहाण्यास जमले. जयद्रथही येऊन उभा राहिला. अर्जुन चितेत उडी टाकणार तेवढ्यात श्रीकृष्णाने आपले सुदर्शनचक्र काढून घेतले. सर्वत्र सूर्याचा प्रकाश पसरला. सगळे भांबावून गेले. इतक्यात कृष्ण अर्जुनाला म्हणाला, ‘‘अर्जुना पाहतोस काय? लाव बाण धनुष्याला. हा बघ सूर्य आणि हा बघ जयद्रथ.’’ कृष्णाचे ते शब्द आसमंतात घुमले. अर्जुनाने क्षणाचाही विलंब न लावता आपल्या बाणांनी जयद्रथाचा शिरच्छेद केला. आयुष्यात निर्णय घेण्यास घाबरू नका. प्रत्येक अर्जुनाला सूर्य दाखवण्यासाठी एक कृष्ण जन्माला येतो. तो कृष्ण कोण ते ओळखा. एकदा निर्णय घेतला की जे होईल त्याचा हसत स्वीकार करा. जयद्रथासारखा घृणास्पद व कठीण संकटांचा खात्मा करण्यासाठी तुमचा कृष्ण तुमची साथ देईल. तुम्हाला कुणाच्या आयुष्यात कृष्ण होण्याची संधी मिळाली तर तीही सोडू नका. अर्जुनासारखे वाटले तर कृष्ण शोधा आणि एखादा अर्जुन सापडला तर कृष्ण व्हा. ‘‘सूर्य पहा, सूर्य दाखवा.’’


‘‘जय श्रीकृष्ण’’
- स्वप्ना पाटकर
सौजन्य:- ०३१२२०११ फुलोरा, सामना