Saturday, January 04, 2014

४ G इंटरनेट

इंटरनेटचं विश्व आता खर्‍या अर्थाने सुपरफास्ट होणार आहे, आतापर्यंत आपण वायरलेस इंटरनेट, ब्रॉडबॅण्ड इंटरनेट, मोबाईल इंटरनेट असे इंटरनेटचे नानाविध प्रकार पहिले आहेत. पण इंटरनेटच्या जगात खरी क्रांती घडली ती ३ G च्या अगमनानंतर. ३ G इंटरनेटमुळे आपणास फास्ट इंटरनेट आपल्या आयुष्यात कसा बदल घडवू शकते हे कळले आणि आता इंटरनेटची चौथी पिढी अर्थात ४ G आपल्यासमोर हजर झाली आहे. इंटरनेटची ही चौथी पिढी आपले आयुष्य त्याच्या वेगाने सर्वार्थाने बदलणार आहे. द्रष्टा तंत्रज्ञ स्टीव जॉब्सच्या डोळस नजरेने तर ४ G नंतरचे टेक युग कसे बदलणार आहे हे अगोदरच ओळखले. त्यामुळेच मग ऍपलने तर खास फक्त ४ G ला डोळ्यासमोर ठेवून नवीन आयफोन ५ S देखील सादर केला आहे. ज्यात अनेक नवीन वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
४ G चा चमत्कार : ३ G मुळे आपण व्हिडीओ कॉल, मोबाइल टीवी सुपरफास्ट इंटरनेट अशा अनेक गोष्टी कधीही व कुठेही वापरू शकत होतो. ४ G आपणास हे सर्व तर देणार आहेच, पण त्यापेक्षाही अधिक वैशिष्ट्यपूर्ण व अनोख्या सेवा मिळवून देईल. त्यामुळेच ४ G सेवा ही खरं तर एक चमत्कारच असणार आहे.
विद्यार्थांसाठी : आजकाल ई-लर्निंगसारख्या अनेक सेवा या इंटरनेटवर चालतात. अनेक कंपन्यानी तर खास विद्यार्थ्यांसाठी संगणक तसेच टॅबलेटदेखील तयार केले आहेत. ४ G मुळे विद्यार्थी तसेच त्यांचे शिक्षक अगदी शहरातील किंवा गावातील शाळा एकमेकांबरोबर इंटरनेटने जोडता येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास करण्यापासून ते अगदी इतर शाळा/कॉलेजमधील अद्ययावत गोष्टींची माहिती मिळवण्यापर्यंत मदत होऊ शकते.
तरुणांसाठी : सुपरफास्ट इंटरनेटचा खरा फायदा तरुणवर्गाला होणार आहे. आता सोशल नेटवर्किंगच्या कट्ट्यावर असो किंवा एखादा चित्रपट डाऊनलोड करायचा असेल किंवा अगदी लाइव्ह टीव्ही बघायचा असेल तरी ४ G मुळे तुम्ही कधीही कशावरही सुपरफास्ट इंटरनेटचा आनंद लुटू शकता.
सर्वांसाठी : खरं तर ४ G सुपरफास्ट इंटरनेटचा फायदा सर्वांनाच होणार आहे. ४ G मुळे तुम्ही मोठमोठ्या आकाराच्या फाईल्स काही क्षणातच कोणालाही इमेलद्वारे सहज पाठवू शकता. ४ G मुळे व्हिडीओ कॉन्फरन्सचा दर्जादेखील वाढणार आहे. त्यामुळे जगातील एका कोपर्‍यातील व्यक्ती कोणाशीही कधीही संपर्कात राहू शकते.
- सुपरफास्ट मोबाइल टू मोबाइल कनेक्टिव्हिटी
- सुपरफास्ट फाईल शेयरिंग
- सुपरफास्ट व्हिडीओ कॉन्फरन्स
- सुपरफास्ट ऑनलाईन गेमिंग.
- लाइव्ह टीव्ही
- ३ G पेक्षा ८ पट अधिक वेग
- सुपरफास्ट सोशल नेटवर्किंग.

सौजन्य:- फुलोरा, सामना ०४०११४

No comments: