Saturday, January 04, 2014

नागपुरी सावजी चिकन

- प्रसाद पोतदार

  झणझणीत नागपुरी सावजी चिकन, पांढर्‍या वांग्याचे जळगावी भरीत. हलकी फुलकी तरीही तितकीच पौष्टिक ‘सोयाबीन’ मिश्रित ज्वारीची भाकरी... आई शप्पथ... पोट असं तुडुंब भरलं ना... आणि या सगळ्यावर पाचक सोलकडी, तोंड गोड करायला खरवस... अस्सल ‘मराठी’ फूड याशिवाय दुसरं काय असणार... पंचवीसव्या वर्षात पदार्पण करणार्‍या गोवा पोर्तुगीज आणि ‘दिवा महाराष्ट्राचा’मधली हीच तर खासीयत...
‘दिवा महाराष्ट्राचा’ हॉटेलच्या दरवाजातच एक बोर्ड आहे. कोल्हापूर शून्य किलोमीटर, गोवा शून्य कि.मी. याचा नक्की अर्थ बाहेर पडताना कळतो आणि पुढल्यावेळी ‘कुठं खायचं’ हेही ठरतं... कारण कोल्हापुरी पांढरा रस्सा हवा तर कोल्हापुरात कशाला जायचं? ‘दिवा’ आहे ना... जळगावी भरीत म्हणा, नागपुरी ठेचा म्हणा, कोकणातलं वालाचं भिरडं किंवा महाराष्ट्रातला मराठमोळा इतर कोणताही झणझणीत, चमचमीत पदार्थ खायचा असेल तर सरळ ‘दिवा’ महाराष्ट्रामध्ये शिरायचं... पेशवाई थाटात पोटभर जेवायचं आणि खूश व्हायचं...
तर गंमत नागपुरी सावजी चिकनची... नागपुरी तिखट... माणसाला सहज नाही परवडणारे. खोबर्‍याचा संबंध नाही... नुसतं तिखटजाळ... भगभगून जायला होईल.... पण इथं तेच चिकन त्यातला तिखटी उग्रपणा कमी करून हेल्थ कॉन्शस मुंबईकरांकरिता खास तेल कमी करून तयार होते; पण चवीत फरक अजिबात नाही... २१ मसाले चार-चार पाच-पाच तास मुरवले जातात चिकनमध्ये. मग कुठे मंद आचेवर शिजवायला घालतात... त्यामुळे डिश पुढे येते तेव्हा मन वासानेच भरून जाते. जळगावी भरीतही, त्याचीही तीच तर्‍हा... तिखटपणा कमी, जोडीला ज्वारीची भाकरी कडकच...
‘स्टार्टर’ला तर विचारूच नका... किती खायचे आणि नाही हे पोटाने ठरवायचे. कोलंबीची करंजी, खिम्याचे थालीपिठ, केळफुलाचा वडा यासारखे इतर अनेक मेनू आहेत... सुरुवातीला ते भूक वाढवतात आणि मग माणूस हातचं न राखता जेवतो... ‘तुडुंब झाल्यावरच उठतो... बिलाचं टेन्शन नसतं. ते ओ.के.च असतं... मनही खूष...
शाकाहारी-मांसाहारी... प्रत्येकासाठी वेगळं किचन... भांडी वेगळी... हिरवी भांडी व्हेजची. लाल भांडी नॉनव्हेजची... एखादी डिश आवडली नाही पहिल्याच घासात सरळ परत करायची... त्याचे बिल लावले जात नाही... ‘मराठी’ बोललात तर बिलात स्पेशल सूट. मालक प्रत्येक टेबलवर येऊन स्वत: भेटणार... आस्थेने चौकशी करणार, हवं नको पाहणार... ऑर्डर दिली पण आता नको तरीही ओ.के. उगाच चिडचिड नाही... बिलही नाही... एकूण काय ‘दिवा महाराष्ट्राचा’मधला प्रत्येक क्षण एन्जॉयेबल... खा आणि खात राहा... ‘दिवा महाराष्ट्राचा’ पेटवत राहा!
असं म्हणतात... माणसाला जिंकायचं असेल तर त्याला पोटभर खायला घाला... पोटातून हृदयात पटकन शिरता येते. आम्ही तेच करतो... दर्जा जपतो... तेवढीच माणुसकी-आपुलकीही जपतो.
- डॉ. सुहास अवचट

सौजन्य:- फुलोरा, सामना ०४०११४

No comments: