Saturday, February 27, 2016

टेक्नोफंडा मुलांचा घात करतोय…

‘‘मला कळत नाही, पण माझ्या दोन वर्षांच्या मुलाला ‘मोबाईल’मधलं सगळं कळतं…’’ कौतुकलेले हे वाक्य प्रत्येक घरातून ऐकायला मिळते, पण हे कौतुकच आता भारी पडतंय महाराजा… उद्याचं भविष्य असणारी ही पिढी कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल आणि तत्सम गॅजेट्सच्या वापरामुळे बरबाद होत आहे…
‘तंत्रज्ञान घातक, घातक…’’ अशी ओरड बर्‍याच वर्षांपासून सुरू आहे, पण तरीही तिकडे कानाडोळा करताना नव्या पिढीच्या हातात तंत्र सोपविण्याची घाई प्रत्येक पालकाला आहे. मात्र हे किती धोकादायक आहे याचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येऊ लागले आहे. मुलांना इलेक्ट्रॉनिक वस्तू देणे चुकीचे असल्याचे मत ‘दी अमेरिकन अ‍ॅकॅडमी ऑफ पेडिअ‍ॅट्रिक अ‍ॅण्ड दी कॅनडियन सोसायटी’च्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासानंतर व्यक्त केले आहे. तेव्हा वेळीच सावध व्हा… तरुणाईला वाचवा…
– शून्य ते दोन वर्षांपर्यंत लहान मुलांच्या मेंदूचा विकास झपाट्याने होत असतो. नव्या गोष्टींबद्दल मुलांना मोठं कुतूहल असतं. मोबाईल फोन, इंटरनेट, टॅबलेट, टीव्ही अशा घरातल्या वस्तू कशा वापरल्या जातात ते पाहून त्यापासून ते प्रेरणा घेत असतात. मात्र मेंदू पूर्ण विकसित झालेला नसल्याने या प्रगत तंत्रज्ञानापासून मुलांना इजा होण्याचीच शक्यता जास्त.
– तंत्रज्ञान सतत बदलत असते. त्यात तीन मुलांपैकी एक मुलगा अशिक्षित राहतो अशी आकडेवारी आहे. शिक्षण नसल्याने व्यक्तिमत्त्व विकास खुंटतो. शैक्षणिक पात्रता नसलेल्या मुलांच्या विकासात इलेक्ट्रॉनिक उपकरणे हानिकारक असतात.
– मुलांना त्यांच्याच खोलीत इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरू दिल्यास ते लठ्ठ होण्याचा धोका जास्त… लहान वयातच इलेक्ट्रॉनिक वस्तू हाताळू लागल्यामुळे त्यांच्यात लठ्ठपणाचे प्रमाण ३० टक्क्यांनी वाढते. लठ्ठपणामुळे फार कमी वयातच मुलांना डायबेटीस, हृदयविकार असे विकार जडतात.
– आपली मुले कोणत्या इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरत आहेत याची ६० टक्के पालकांना कल्पनाच नसते. किमान ७५ टक्के मुले पालकांच्या नकळत आपापल्या खोलीत गॅझेटस् वापरत असतात. त्यामुळे मुलांमध्ये निद्रानाशाचा विकार कधी जडतो याची त्या पालकांना कल्पनाही नसते.
– तंत्रज्ञानाच्या अतिवापराने मुलांना मानसिक आजार जडण्याची भीती असते. तत्पूर्वी या मुलांमध्ये तणाव, चिंता, अस्वस्थता, व्यग्रता ही लक्षणे दिसू लागतात. पण पालकांच्या ती लक्षात आली नाहीत तर मुलांचे मानसिक आजार वाढतात.
– नवनवे तंत्रज्ञान माहीत असले की मुले आक्रमक होण्याचा धोका असतो. कोणत्याही प्रकारचे शारीरिक किंवा लैंगिक आक्रमण करायलाही ते मागेपुढे पाहात नाहीत. स्वत:च्या खोलीत पालकांच्या नकळत मोबाईल किंवा टीव्हीवरच्या बातम्या, शोज पाहून अलीकडे मुले तोच प्रकार स्वत: करून बघतात.
– शाळेत अभ्यास आणि घरात वेगवेगळी इलेक्ट्रॉनिक उपकरणे… यामुळे मुले कन्फ्युज होतात. नेमके कोठे लक्ष द्यावे, काय करावे हे लक्षात न येऊन ते एकाग्र होऊ शकत नाहीत. त्यांना वेड लागू शकते. ते धड शिकूही शकत नाहीत. घरातल्या गॅझेटस्चा हा फार मोठा धोका असतो.
– कामाच्या गडबडीत पालकांचे मुलांकडे लक्ष राहात नाही. पालक दुर्लक्ष करत असल्याने मुले इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये मन रमवतात. यामुळे नकळत त्यांना या गॅझेटस्चे व्यसन जडू शकते. प्रत्येक ११ मुलांपैकी एका मुलाला हे व्यसन जडलेले असते.
– मोबाईल फोनसारख्या वायरलेस उपकरणांतून निघणार्‍या रेडिएशनमुळे जागतिक आरोग्य संघटनेने मे २०११मध्ये काही वस्तूंना ‘२बी रिस्क’ गटात टाकले आहे. या वस्तूंमुळे मोठ्यांपेक्षा लहान मुलांच्या मेंदू आणि पचनशक्तीवर घातक परिणाम होतो असे त्यांचे म्हणणे आहे.

सौजन्य :- फुलोरा, सामना १९०२१६

No comments: