Saturday, July 20, 2013

मसुर्‍याच्या प्रसादाची सोलकडी

  






‘‘आजयेच्या हाताची चव आईशीच्या हाताला नाय आणि आईशीच्या हाताची चव बायकोच्या हाताला नाय... आजयेने केलेला धनगरी मटण...’’ असं म्हणून मालवणी माणूस नोस्टॅलजिक झाला की, समजायचं चाकरमान्याला गावचे वेध लागलेत... हीच मेख हेरून मसुर्‍याच्या प्रसाद परबने घोडबंदर रोडवर ‘सोलकढी’ नावाची एक कार्पोरेट एसी ‘पडवी’ उभी केली... स्ट्रक्चर आणि लुक कार्पोरेट असला तरी फील मात्र ‘पडवी’तल्या त्या जेवणाचा... आणि साबणाने हात धुतले तरी वास राहील अशा कालवणाचा...!









एन्ट्रीलाच मसुर्‍याच्या देवस्थानचे गार्‍हाणे... बाय माझे आवशी सातेरी, भराडी... त्यामुळे खवय्या थेट मालवणी मुलखात. काचेच्या पार्टीशनने झाकलेले किचन. आतमध्ये शामसुंदर धुरी हा मालवणी शेफ त्याच्या कामात मग्न... किचनचा दरवाजा उघडताच गंध दरवळतो. भूक चाळवते...


मसुर्‍यातून त्याला त्याच्या काकांनी इथं आणलं... काही तरी काम कर म्हणून हॉटेलमध्ये म्हणजे ‘रेनासन्स’सारख्या स्टार हॉटेलमध्ये लावले... हाच त्याच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट. तो या हॉटेलमध्ये काम करता करता ‘शेफ’ कधी झाला हे त्यालाही कळले नाही... रेनासन्स मग लीला नंतर परदेशातही तो जाऊन आला... हॉटेल क्षेत्रातले बारकावे त्याने जाणले आणि स्वत: हॉटेलिंगमध्ये पाऊल टाकताना मसुर्‍याच्या मातीशी नाळ कायम ठेवत मालवणी सोलकढीला त्याने कॉर्पोरेट मसाल्यात मिक्स करून टाकले.

आजीच्या हाताची चव ही आठवण त्याने जपली म्हणूनच त्याच्या हॉटेलमधील मसाले थेट मालवणातून येतात. अगदी खोबर्‍यापासून सर्व काही.. इथली प्रत्येक ‘डिश’ प्रसादनेच त्याचा ‘कॉर्पोरेट लुक’नुसार डिझाईन केली आहे. त्याचे म्हणणे एकच ‘आजयेच्या हातची चव’ चाकरमान्यालाच नव्हे तर कोणालाही केव्हाही घेता आली पाहिजे...

स्पेशल डिशेस

हळदीच्या पानातले सुळे, केळीच्या पानातले सौंदाळे, चुलीवरची कलेजी, तुडतुडी कोंबडी, चिंगळाची भजी तर शाकाहारीत भटाचे वरण, आळूवडीची आमटी, टोमॅटोचा सार, पीठी भात, शेंगाची डाळ, डेझर्टस्मध्ये खापरोळ्या, खरवस... खास मालवणी मुलखातल्या आंबोळ्या, घावने आणि नेहमीचे कोंबडी वडे किंवा भाकर्‍या आहेतच... प्रत्येक पदार्थ तोंडाला पाणी आणणारा... थेट मालवणात पोचवणारा...!

माझ्या मालवणी मुलखातली ‘चव’ इंटरनॅशनल झाली पाहिजे... बास.... म्हणूनच ‘सोलकढी’ला कॉर्पोरेट लूक दिलाय...

- प्रसाद परब
सौजन्य:- फुलोरा, सामना १३०७१३

No comments: